स्वातंत्र्य दिन चिरायू होवो ...........
“आज या प्राचीन किल्ल्याच्या परिसरात आपण एका ऐतिहासिक प्रसंगाच्या निमित्ताने जे आपण गमावले होते ते पुन्हा जिंकण्यासाठी एकत्र आलो आहोत. हा ध्वज कोण्या एका व्यक्तीच्या व कॉंग्रेस पक्षाच्या विजयाचे प्रतिक नसून,तो संपूर्ण देशाच्या विजयाचे प्रतिक आहे. भारताचा हा मुक्त ध्वज केवळ भारताच्या नव्हेतर संपूर्ण जगातील स्वातंत्र्याचा आणि लोकशाहीचा प्रतिक म्हणावा लागेल. भारत, आशिया आणि संपूर्ण जगाने हा महान दिवस आनंदाने साजरा करायला हवा !
'भारताच्या स्वातंत्र्यासाठी ज्यांनी कष्ट घेतले ,ज्यांनी त्याग केला त्या सर्वांचे स्मरण आजच्या दिवशी महत्वाचे आहे. प्रत्येकाचे नाव घेण्याची मला आवश्यकता वाटत नाही मात्र सुभाषचंद्र बोस यांचे नाव मी आवर्जून घेईन. ज्यांनी भारताबाहेर जावून या देशाच्या स्वातंत्र्यासाठी आझाद हिंद सेनेची स्थापना केली आणि मोठ्या धैर्याने स्वातंत्र्यासाठी ते लढले. भारताचा हा तिरंगा ध्वज त्यांनीच प्रथमतः विदेशात फडकाविला. त्यांचे स्वप्न आज पुर्ण होऊन हा ध्वज लाल किल्ल्यावर फडकविण्याची वेळ आली आहे. त्यांनी भारतात परत येण्याचा हाच दिवस असायला हवा होता ,पण दुर्दैवाने ते या जगात नाहीत'
'एक सशक्त आणि कणखर भारत घडविण्याचे आपले ध्येय आहे. मजबूत पायाभरणीच्या आधारावरच देश महान बनू शकतो. स्वातंत्र्याची पहाट आपल्यासाठी मोठ्या जवाबदा-या घेवून आली आहे आणि या जवाबदा-या पूर्ण कार्यक्षम होवून आपल्याला पार पाडावयाच्या आहेत. पण जनतेच्या सहकार्याशिवाय आपण पुढे जावू शकत नाहीत. आपल्यापैकी कोणीही इथे प्रधानमंत्री अथवा मंत्री नसून,आपण सर्वजन या देशाचे विनम्र सेवक आहोत. माझे सरकार जनतेचे ख-या अर्थाने प्रतिनिधी म्हणून कामकाज करेल, अशी मला आशा आहे. आज जनता हीच ख-या अर्थाने खरी सत्ताधीश असून सरकारचे सशक्त असणे वा नसणे केवळ जनतेवरच अवलंबून आहे. जनतेची इच्छा आपण सरकार मध्ये असावे अशी असल्यामुळेच आपल्यापैकी प्रत्येकजण आज सरकार मध्ये आहोत आणि जनतेच्या इच्छेनुसारच आपल्याला ही पदे त्यागावी लागतील'
'आपल्याला मिळालेले स्वातंत्र्य हा केवळ एक पडाव आहे, विश्वशांतीचे आणि उन्नतीचे अत्युच्च ध्येय प्राप्त करण्याच्या प्रवासातील ही केवळ एक पायरी आहे आणि आपल्याला खूप दुरचा प्रवास करायचा आहे !"
जवाहरलाल नेहरू
(१६ ऑगस्ट १९४७ रोजी लाल किल्ल्यावरील ध्वजारोहण सोहळ्याच्या निमित्ताने केलेल्या भाषणातून ....)
अनुवाद :- राज कुलकर्णी.
No comments:
Post a Comment