नेताजी बोस यांचे गूढ आणि जवाहरलाल नेहरू ...................
पश्चिम बंगाल च्या मुख्यमंत्री ममता बँनर्जी यांनी राज्यात येवू घातलेल्या विधानसभेच्या निवडणुकीच्या तोंडावर नेताजी बोस यांच्याबाबतच्या एकूण ६४ फाईल्स जनतेसमोर मांडून पोलिस म्युझियम मध्ये ठेवल्या. या कृतीतून नेताजी सारख्या भावनिक मुद्द्याला हात घालून ममता यांनी केंद्रातील भाजपा सरकारवर कुरघोडी करून केंद्र सरकारच्या अखत्यारीतील फाईल्स उघड करण्याविषयीचा दबाव वाढवला आहे. केंद्र सरकारने यापूर्वीच नेताजी विषयीच्या फाईल्स उघड करण्यास नकार दिला आहे. केंद्राच्या अधिकार क्षेत्रातील विषय आणि जवाबदाऱ्या या खूप व्यापक आहेत, त्याचा विचार करूनच केंद्र सरकारने ही माहित उघड करण्यास नकार दिलेला आहे . मात्र राज्यातील सत्तेच्या शुद्र राजकारणासाठी वापर करणाऱ्या ममता यांनी केंद्रातील सरकारवर आणि भाजपवर कुरघोडी करण्याच्या नादात देशाचे काय नुकसान होईल याचा अजिबात विचार केलेला नाही, असे खेदाने म्हणावे वाटते. शिवाय त्यांनी या अर्धवट फाईल्स उघड करून गांधी नेहरू द्वेष्ट्या संघासारख्या संघटनांना आयते कोलीत मिळवून दिले आहे . केंद्र सरकार त्यांच्या अखत्यारीतील फाईल्स उघड करणार नाही ,म्हणजे पूर्ण सत्य समोर येणार नाही आणि अर्धवट तुटपुंज्या माहिती आधारे आरोपांच्या फैरी सोशल मेडीयातून सुरु झाल्या आहेत .
नेताजी यांच्या एक नातलग राजश्री चौधरी यांनी गोविंदाचार्य यांच्यासोबत प्रेस कॉन्फरन्स घेवून नेहरूंनी नेताजींचा यातना देवून मृत्यू घडविला असा आरोप केला, एका नातलगाने तर, हेरगिरी करायला माझे आजोबा काय दावूद इब्राहीम होते काय? असा बालिश प्रश्न केला. संघाचे मुखपत्र असणाऱ्या पांचजन्य मधून नेताजींच्या फाईल्स मुळे देशासमोर नेहरूंचा खरा चेहरा येणार अशा बातम्यांना उत आला आहे . फेसबुक, वॉट्स अप वर नेहरूंनी क्लेमेंट एटली यांना पत्र लिहिल्याचे खोटे बनावट छायाचित्र प्रसिद्ध केले जात आहे. या सर्व पार्श्वभूमीवर ,नेताजींचा मृत्यू अपघातात झाला काय ? माहिती गुप्त का ठेवली गेली ? हेरगिरी झाली काय ? असेल तर त्याची करणे कोणती ? याचा अभ्यास करण्यास मात्र कोणीही तयार नाही !
सर्व प्रथम आपण ही बाब मान्य करायला हवी कि , दुसऱ्या जागतिक महायुद्धात ब्रिटन-अमेरिका-फ्रांस ही प्रमुख विजयी राष्ट्र आहेत आणि जपान-जर्मनी-इटली ही पराभूत झालेली राष्ट्रे आहेत. विजयी राष्ट्रांच्या विरोधात लढणारे जपान-जर्मनी-इटली चे सर्व सैन्य अधिकारी हे विजयी राष्ट्रांच्या नजरेत युद्धगुन्हेगार आहेत आणि अशा अनेक युद्ध गुन्हेगारांवर ब्रिटन-अमेरिका यांनी खटले भरून त्यांना शिक्षा दिली आहे. युद्ध समाप्तीनंतर या सर्व खटल्यांना सामोरे जावे लागणार आणि मृत्यूदंडाची शिक्षा भोगावी लागणार याची भीती हिटलर,मुसोलिनी, जनरल शिझुकी तनाका, मेजर केंजी हातानाका , कर्नल जिरो शिझाकी यांच्यासह सर्वांना होती. यापैकी ३० एप्रिल १९४५ रोजी हिटलर, २४ ऑगस्ट १९४५ रोजी जनरल शिझुकी तनाका आणि १५ ऑगस्ट १९४५ रोजी मेजर केंजी हातानाका यांनी आत्महत्या केल्या. मुसोलिनीला देखील याची कल्पना होती म्हणून तो स्वित्झर्लंड मार्गे स्पेन ला पळून जाण्याच्या प्रयत्न केला पण तो या तयारीत असताना त्याला पकडण्यात आले आणि २८ एप्रिल १९४५ रोजी गोळ्या घालून ठार मारण्यात आले . हिटलर-मुसोलिनीचे सहकारी मार्टिन बोरामन ,गोबेल्स आदींना आणि महायुद्धातील इतर प्रमुख लष्करी अधिकारी यांना युद्ध गुन्हेगार घोषित करण्यात आले.
महायुद्धातील एकूण युद्ध गुन्हेगारांचा आकडा ४०००० ते ५०००० एवढा होता आणि सर्व युद्ध गुन्हेगारांच्या ट्रायल्स जगभर घेण्यात आल्या. या ट्रायल्स इतिहासात नुरेनबर्ग ट्रायल्स, मिल्च ट्रायल्स, ऑशवित्झ ट्रायल्स या नावाने ओळखल्या जातात . जगभरातील विजयी राष्ट्रात अशा ट्रायल्स मधून जर्मनी मधील ८०६ सैन्य अधिकाऱ्यांना,जपान मधील ९२० सैन्य अधिकाऱ्यांना आणि इटली मधील ७०० सैन्य अधिकाऱ्यांना मृत्युदंड दिला गेला ,यावरून आजन्म कारावासाची आणि ७ ते २५ वर्षापर्यंत शिक्षा झालेले किती असतील याची कल्पना येवू शकते आणि विशेष म्हणजे निर्दोष सुटू शकलेले लोक खूप कमी होते .
भारतात देखील अशा ट्रायल्स झाल्या ज्या 'रेड फोर्ट ट्रायल्स' म्हणून ओळखल्या जातात. आझाद हिंद सेनेतील अधिकाऱ्यांच्या विरोधात या ट्रायल्स चालल्या आणि या अधिकाऱ्यांवर दोन प्रकारचे आरोप होते कारण, आझाद हिंद सेनेतील सैनिक आणि अधिकारी हे पुर्वी ब्रिटीश फौजेत होते आणि त्यांनी स्वतःच्या फौजेच्या विरोधात युद्ध लढून तत्कालीन अर्थानुसार गद्दारी केली होती ,जी अतिशय गंभीर होती. कारण सैनिकांची त्यांच्या बटालियन किंवा रेजिमेंट शी असणारी निष्ठा लष्करात खूप महत्वपूर्ण मानली जाते .त्यामुळे त्याच्या विरोधात इंडियन आर्मी कायदा १९११ मधील तरतुदीनुसार राजद्रोहाचा लष्करी खटला (waging war against Emperor King) भरला गेला आणि तत्कालीन ब्रिटीश इंडिअन फौजेचे कमांडर-इन-चीफ क्लाऊड अकीनलेक यांच्या समोर याची सुनावणी घेण्यात आली. तेंव्हा भारतीय राष्ट्रीय कॉंग्रेस ने एक समिती स्थापन करून या खटल्यातील आरोपींना विधी सहाय्य पुरवले . यावेळी खुद्द नेहरू यांनी वकीलपत्र घेवून आझाद हिंद सेनेतील सैन्य अधिकाऱ्यांच्या वतीने हे खटले चालवले . त्यात सुभाषबाबूंच्या आझाद हिंद सेनेत 'नेहरू ब्रिगेड' नावाची एक तुकडी होती.तीचे प्रमुख शह नवाज खान , प्रेम सहेगल आणि गुरुबक्ष सिंघ धिल्लन आदी आरोपी होते. त्यांची या खटल्यात निर्दोष मुक्तता झाली नाही आणि ते तत्कालीन परिस्थिती आणि पुराव्यानुसार त्यांची निर्दोष मुक्तता होणे शक्य देखील नव्हते. ब्रिटीश सरकार कोणासही माफी देण्यास तयार नव्हते .परंतु भारताच्या स्वातंत्र्याच्या कायद्यांतर्गत असणा-या करारात नेहरूंनी ब्रिटीशांच्या युद्ध गुन्हेगारांना सहाय्य केले जाणार नाही अशा प्रकारचा एखादा गुप्त करार केला गेला असण्याची शक्यता आहे . कारण यासाठी खास बैठक घेवून त्यास नेहरूंनी मान्यता दिल्यावर नेहरूंच्या सहमतीने आणि लॉर्ड माउंटबँटन यांच्या शिफारशीनुसार निर्वाह भत्ता दिला जाणार नाही आणि स्वतंत्र भारताच्या फौजेत या सैनिकांना सामील करणार नाही, या अटीवर मृत्यूदंड दिला गेला नाही. केवळ त्यावेळी लष्करी नियमांनुसार त्यांची पदके आणि सन्मान सर्वांसमक्ष काढून घेण्यात आले. त्यांना मृत्युदंड मिळाला नाही याचे श्रेय अर्थात नेहरूंनाच आहे आणि अशा पद्धतीने सुटलेल्या सैनिकांची संख्या ११००० होती. यात शहनवाजखान, गुरुबक्षसिंह ढिल्लन, प्रेम सहेगल ,अब्दुल रशीद , फतेह खान हे होते. यांना देखील या अटीवर मृत्युदंड न देता प्रथम कारावास आणि नंतर तो कारावास स्वातंत्र्यानंतर माफ करण्यात आला. पुढे या सैनिकांचा सन्मान करण्यासाठी , आझाद हिंद सेनेतील अनेकांना नागरी सन्मान देण्यात आले , प्रेम सहगल ,लक्ष्मी सहगल यांना पद्मविभूषण ,पदमश्री देण्यात आला तर शहनवाज खान कॉंग्रेसमधेच सामील होवून निवडून आले आणि राज्यमंत्री देखील झाले,आझाद हिंद सेनेचे सरसेनापती जनरल जगन्नाथराव भोसले यांनी पुढे नेहरू मंत्रिमंडळात पुनर्वसन मंत्री म्हणून कार्य केले, अनेकांची नियुक्ती राजदूत म्हणून किंवा राज्यपाल म्हणून करण्यात आली . महत्वाची बाब अशी कि ,आझाद हिंद सेनेतील सैनिकांना वाचविण्यासाठी कायदेशीर मदत केली ती शेवटी जवाहरल नेहरू ,तेज बह्दूर सप्रू आणि भुलाभाई देसाई या कॉंग्रेस अंतर्गत गठीत केलेल्या समितीनेच केली ,आज नेताजी यांच्याबद्दल बेगडी प्रेम दर्शविणारे त्यावेळी कुठे गायब होते ,हे त्यांचे त्यांनाच ठावूक ! या सर्व सैनिकांना सजा मिळण्यापासून वाचविण्याचे श्रेय पुन्हा शेवटी जवाहरलाल नेहरू यांच्याकडेच जाते हे विशेष !
नेताजींच्या बाबत मात्र ब्रिटीश आणि अमेरिकन यांचे धोरण कठोर होते , हे नव्या कागदपत्रावरून समोर आले आहे. जागतिक पातळीवरून तटस्थपणे पहिले तर नेताजी हे दुस-या जागतिक महायुद्धातील युद्धगुन्हेगार होते ही बाब आपण मान्य केली पाहीजे. ते जीवंत असते तर हा खटला भरला गेलाच असता आणि त्यांना सजा झालीच नसती असे खात्रीने सांगता येत नाही. नेताजींच्या अपघाती मृत्यूवर ब्रिटन अमेरीकेचा अजिबात विश्वास नव्हता. कारण जपान ,जर्मनी आणि इटलीमधील अनेक युद्ध गुन्हेगार अशा पद्धतीने परागंदा झाले होते . उदाहरण द्यायचे झाले तर अमेरिकेचा आणि ब्रिटनचा हिटलर ने खरेच आत्महत्या केली यावर देखील विश्वास नव्हता ,म्हणून महायुद्ध संपल्यावर देखील अमेरिकेच्या गुप्तहेर संस्थांनी महायुद्धानंतर स्थापन झालेल्या जर्मन सरकारच्या मदतीने हिटलर आणि त्याचे नातलग यांची कसून चौकशी केली. एवढेच काय हिटलर जिवंत असल्याच्या अनेक अफवा उठल्या ,त्यावर आयुर्विंग वालेस सारख्या साहित्यिकांनी ' दि सेवन्थ सिक्रेट' सारख्या कादंबऱ्या लिहिल्या अनेकांनी चित्रपट देखील काढले. सांगायचे तात्पर्य असे कि ब्रिटन ने हिटलर ने खरोखरच आत्महत्या केली होती आणि त्याचा मृत्यू झाला आहे , ही बाब १९९० पर्यंत अधिकृतरित्या मान्य केली नव्हती. मग सुभाषबाबूंचा मृत्यू विमान अपघातात झाला ही बाब त्यांना मान्य होणे अशक्य होते ,हे नव्याने सांगण्याची गरज नाही
भारतात ज्या युद्धगुन्हेगारावर खटले दाखल झाले ,त्यांना कांही विशेष गुप्त करार,अटी, प्रतिबंध स्विकारून त्यांची सुटका करणे शक्य होवू शकले मात्र ज्यांचा ठावठिकाणा नाही ,ज्यांचा मृत्यू संदिग्ध आहे त्यांची सुटका कोणत्या मार्गाने आणि कोणत्या आधारावर करावी हा खरा प्रश्न त्यावेळी तत्कालीन नेतृत्वावर होता. त्यामुळे अशा व्यक्तीची माहीती आम्हास झाल्यास , ती माहिती आंम्ही तुम्हाला देऊ असा करार, त्या ११००० सैनिकांची सुटका करताना तत्कालीन प्रसंगात तत्कालीन सरकारने केला असण्याची शक्यता जास्त आहे. म्हणून नेताजीच्या फाईल्स गुप्त ठेवण्याचा निर्णय तत्कालीन सरकारने घेतला असावा आणि तो निर्णय केवळ नेहरूंचा नव्हता किंवा केवळ कॉंग्रेस पक्षाचाही नव्हता कारण देशाला पारतंत्र्यातून मुक्त केल्यावर जे सरकार स्थापन झाले होते, त्याचे प्रमुख नेहरू असले तरीही ते सरकार कॉग्रेसचे नव्हते तर ते राष्ट्रीय सरकार होते. ज्या सरकार मधे हिंदु महासभेसह अनेक कॉग्रेसेतर छोटेमोठे पक्ष सामील होते. भाजपलाही वंदनीय असणारे सरदार पटेल, शामाप्रसाद मुखर्जी आदी त्या मंत्रिमंडळात असणाऱ्या सरकारने या फाइल्स गुप्त ठेवण्याचा तपास कायम ठेवण्याचा करार स्वातंत्र्याच्या करारादरम्यान केला असण्याची शक्यता आहे. नेताजींची कथित हेरगिरी आणि माहिती गुप्त ठेवण्याचा निर्णय आपल्याला या परिप्रेक्ष्यात पाहावा लागतो
जागतिक पातळीवर देखील युद्ध समाप्तीनंतर ब्रिटन -अमेरीकेने शीतयुद्धात जर्मनी-जपानच्या संपर्कातील, एवढेच नव्हेतर रशियातील सैनिकांच्या हालचालीवर आणि सर्व जुन्या फौजींवर नजर ठेवली आणि जगातील विविध देशांच्या सरकारात तसे गुप्त करार देखील करण्यात आले. त्यामुळे अशा आशयाचा कांही भागही त्याकाळातील भारत आणि ब्रिटन यांच्यातील सत्ता हस्तांतारांच्या वेळेस गुप्त करारात नमुद असण्याची शक्यता नाकारता येत नाही . अशा प्रकारे हेरगिरी करण्याचा कालावधी आणि माहीती गुप्त ठेवण्याचे आंतराष्ट्रीय आणि राष्ट्रीय कायदे एकत्रीत तपासले तर लक्षात येईल की, असा कालावधी २० ते ३० वर्षाचा असतो. माझी याबद्दल खात्रीशीर माहीती नाही, पण देश १९४७ ला स्वतंत्र झाला तरी २० जून १९४८ पर्यंत भारत कॉमनवेल्थ मधेच होता, तेव्हापासून २० वर्ष हा कालावधी धरला तर १९६८ साली हा अवधी संपतो. त्यातून ही कथीत हेरगीरी नेहरू १९६४ साली वारले तरी १९६८ पर्यंत का चालू होती या प्रश्नाचे उत्तर आपल्याला मिळू शकेल . हेरगिरी नेहरूंनी केली असेल तर ती १९६८ साली थांबायला हवी होती आणि हेरगिरी कॉग्रेसला करायची होती तर १९६८ ते १९७७ पर्यंत कॉंग्रेसचेच शासन होते. मग १९६८ साली का बंद केली गेली . या सर्व बाबींचा अगदी थोडा तरी विचार नेहरूंनी हेरगिरी केली म्हणून ओरडणाऱ्या लोकांनी करणे गरजेचे आहे.
या कथित हेरगिरी बाबत महत्वपूर्ण बाब अशी की ,ही हेरगिरी आयबी अर्थात 'Intelligence Bueuro ' या संस्थेने केली असे म्हटले जाते . मात्र ही संस्था पंतप्रधान मंत्रालयाच्या नव्हेतर गृहमंत्रालयाच्या अख्त्यारीत काम करते ! नेहरूंच्या कालखंडात म्हणजे २७ मे १९६४ पर्यंत , देश स्वतंत्र झाल्यापासून १५ डिसेंबर १९५० पर्यंत हे खाते सरदार पटेल यांच्याकडे, त्यानंतर सी. राजगोपालचारी, कैलाशनाथ कटजू, गोविंद वल्लभ पंत आणि लालबहाद्दुुर शास्त्री यांच्याकडे होते. मग यांनाही या आरोपात सामील करावे लागेल काय? भाजपला वंदनीय असणारे सरदार पटेल हे कणखर आणि पोलादी पुरुष होते तर मग त्यांच्या मंत्रालयाच्या मार्फत होणाऱ्या नेताजींच्या हेरगिरी बाबत या पोलादी पुरुषास काहीही माहित नव्हते असे म्हणता येईल काय? माहित असेल तर पटेल यांचीही त्यास संमती होती असे म्हणावे लागेल ! नेताजी यांच्यावर गांधी नेहरू यांनी अन्याय केला असा आरोप असेल तर त्यांच्यावर कथित अन्याय होताना पटेल देखील नेहरूंच्या बाजूने होते ! एरवी गांधी- नेहरू यांनी पटेल यांच्यावर अन्याय केला आणि नेहरू यांच्या ऐवजी पटेल पंतप्रधान व्हायला हवे होते असे म्हणून नेहरूंवर आरोप करणाऱ्यांना लोकांना, या ठिकाणी मात्र , अशा सर्व गोष्टीचा विसर सोयीस्कर रित्या पडतो ,यात आश्चर्य असण्याचे काही कारण नाही ,कारण त्यांचा हेतू सत्य जाणण्याचा नसून नेहरू यांची बदनामी करणे हा आहे.
ममता बँनर्जी यांनी जाहीर केलेल्या या कागदपत्रावरून एक गोष्ट उघड झाली आहे. नेताजी जर हयात असतील तर त्यांना युद्धगुन्हेगार न समजता माफी द्यावी अशी मागणी स्वत: नेहरूंनी १ सप्टेंबर १९४५ रोजी अमेरीकसमोर केल्याचे वृत्त रायटर या वृत्तसंस्थेने दिल्याचे व त्यावर अमेरिका नाराज असल्याची देखील माहीती परवाच खूल्या केलेल्या एका संचिकेत आढळून आली आहे. पण मुळात अशी कागदपत्रे खरोखरच उघड करणे गरजेचे होते काय ? आणि गरज असेलच तर दोन्ही , केंद्र आणि बंगाल मधील राज्य सरकार कडील म्हणजे सर्वच कागदपत्रे का उघड केली गेली नाहीत ? सत्य बाहेर पडावे हा हेतू आहे की ,जनतेत अर्धवट कागदपत्रांच्या आधारे नेहरूंची बदनामी करण्याचे षड्यंत्र रचले आहे ? याही पेक्षा काही गंभीर प्रश्न यातून उभे राहिले आहेत ज्यावर कोणीही चर्चा करू इच्छित नाही. एका अंतराष्ट्रीय स्तरावर कार्य केलेल्या नेत्याबद्दलची आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर देशाची प्रतिमा मलीन करु शकेल, अशी माहीती एखाद्या राज्याच्या अख्त्यारीत कशी काय असू शकते? अशी माहीती असेलच तर केंद्र शासनाशी सल्लामसलत केल्याशिवाय ती जाहीर करता येऊ शकते काय? देशाच्या परराष्ट्र धोरणावर परीणाम करू शकेल अशी माहिती एखाद्या राज्य सरकारच्या ताब्यात असणे आणि केंद्र सरकारला न विचारता ती जाहीर करणे , ही कृती ,केंद्र सरकारच्या अधिकारावरील अधिक्षेप नव्हे काय? या घटना भारतीय केंद्र राज्य संबंधाच्या अनुषंगाने संघराज्याच्या संरचनेस कांही नवीन आव्हाने तर निर्माण करत नाही ना ? याचाही विचार व्हावा !!!!
नेताजी हे महान देशभक्त, पुरोगामी, कडव्या डाव्या विचारसरणीचे विचारवंत , दूरदृष्टी असणारे ,पराक्रमी ,धाडशी स्वातंत्र्य सेनानी होते ! नेहरूंचे ते जवळचे सहकारी होते ,१९३५ साली त्यांनी आणि मेघनाथ सहा यांनी स्थापन केलेल्या नियोजन समितीचे अध्यक्षपद नेहरूंनी नेताजीच्या इच्छेखातर स्वीकारले होते. त्यांच्या सेनेत त्यांनी नेहरू ब्रिगेड स्थापन केले होते ! त्यांच्या देशप्रेमाला आणि स्वातंत्र्याच्या प्रेरणेला वंदनच आहे. पण त्यांचे कर्तृत्व पाहून मला महाभारतातील कर्णाची आठवण येते. कारण कर्ण देखील असाच पराक्रमी ,बुद्धिमान ,दानशूर आणि कर्तृत्ववान होता, मात्र तो युद्धात चुकीच्या बाजूने लढला, त्यामुळेच काळाला त्यांच्या कर्तृवास शोभेल असा न्याय करणे कदाचित अशक्य झाले असावे !
राज कुलकर्णी .
Blog by people for People, Creative Ideas, Inspirational and Motivational stories, Myths and Facts, Social activities
Tuesday, 20 September 2016
नेताजी बोस यांचे गूढ आणि जवाहरलाल नेहरू
Saturday, 17 September 2016
मुक्या प्राण्याचा बळी देण्याऐवजी रक्तदान शिबीर एक चांगले पाऊल
*"असा कसा तुमचा देव जो बोकड्याला लालची आहे?"* असा थेट सवाल गाडगेबाबांनी विचारला होता.
जो धर्म कोणत्याही जीवाची हिंसा मान्य करतो तो धर्म नसून अधर्म आहे.
काळाच्या ओघात धर्मात बदल केला नाही तर माणूस हा जनावराच्याच पातळीवर राहतो.
बळी देणे ही मुळात मागास विचारसरणी आहे आणि त्याचा आनंद साजरा करणे ही त्याही पुढील विकृती आहे.
मला थोडा आनंद ही वाटतो काही मुस्लिम बंधूंचा जे बकऱ्याचा बळी न देता *रक्तदान शिबीर* घेत आहे.
धर्म हा माणसासाठी आहे, माणूस धर्मासाठी नाही अस आपण म्हणतो तसच ते इतर जीवांच्या बाबत देखील आहे.
*समाज बदलुया... जुने जाळुनि, धर्माला नवीन मूल्य जोडुया*
"बकरी इद निमीत्त रक्तदान शिबीर"
💉💉💉💉💉💉💉💉
सर्व समविचारी संघटना मार्फत "बकरी ईद "निमित्त रक्तदान शिबीर दिनांक 18 सप्टेंबर 2016 रोजी वेळ सकाळी 9 ते दुपारी 3 वाजेपर्यंत आहे
रक्तदान साठी जरुर यावे ही विनंती....
दिनांक: 18 सप्टेंबर 2016,रविवार
वेळ : सकाळी 9 ते दुपारी 3 वाजेपर्यंत
ठिकाण- साने गुरुजी विद्यालय ,
हडपसर अमर -धाम (स्मशानभूमी) रोड, शितळादेवी मंदिरसमोर, हडपसर येथे.
जरुर यावे
Saturday, 3 September 2016
गणपतीबाप्पा आणि ‘मोर’ या -मंगला सामंत
गणपतीबाप्पा आणि ‘मोर’ या
Maharashtra Times | Sep 7, 2014, 12.59 AM IST
मंगला सामंत
गणपतीच्या जयजयकारात 'मोरया' हे संबोधन मोठ्या जोशात उच्चारलं जातं. पण मोरया या संबोधनाचा नेमका अर्थ काय? त्यामागे प्राचीन भारतीय मातृसंस्कृती कशी दडलेली आहे, त्याचा वेध घेणारा लेख...
गणेश चतुर्थीला स्वागताला आणि अनंत चतुर्दशीला निरोप देताना, गणपतीला उद्देशून आपण 'गणपतीबाप्पा मोरया' अशी हाक देत असतो. अशी हाक का दिली जाते? त्यामागचं रहस्य काय? हे जाणून घेताना, भारताच्या प्राचीन मातृसंस्कृतीतील पुरावे, अवशेष तपासावे लागतात. कारण गणपती म्हणजे 'गणाची प्रमुख' (पती) ही संकल्पना मातृसंस्कृतीतून पुढे आलेली आहे. भारतातील प्राचीन-अतिप्राचीन संस्कृती ही मातृप्रधान होती, हे आता सर्वमान्य झालेलं सत्य आहे.
अपत्यसंभवामध्ये पुरुषाचंही योगदान असतं, हे सत्य स्त्री-पुरुषास ठाऊक नसण्याचा काळ हजारो वर्षांचा होता. तोपर्यंत मूल जन्माला घालणारी माता ही आपोआपच टोळीबाबत निर्णय घेणारी, अन्नपदार्थ वाटून देणारी, औषधोपचार करणारी, अरिष्टापासून वाचवणारी अशी प्रमुख मानली जात होती. संस्कृतमध्ये 'मा' म्हणजे वाटप करणे यावरून 'माता' असं संबोधन स्त्रीला आणि 'दोहन' म्हणजे दूध काढणे यावरून 'दुहिता' हे संबोधन त्या मातेच्या कन्येला आहे. या वस्तुस्थितीतून पुढे स्त्री-प्रधान टोळी-अवस्था उदयाला आली. या मातृप्रधान टोळ्या प्रथमार्धात जगात सर्वत्र होत्या. परंतु त्या काळात भटक्या, शिकारी अवस्थेतील जंगली पुरुष-टोळ्यासुद्धा जगात सर्वत्र होत्या. त्यांच्या हल्ल्यात जगातील अनेक मातृटोळ्या प्राथमिक अवस्थेतच नष्ट झाल्या. भारतामध्ये मात्र मातृटोळ्यांचं रूपांतर एका रचनाबद्ध अशा संस्कृतीत झालेलं आढळतं. त्याचे पुरावे आपले प्राचीन वाङ्मय, महाकाव्यं, पुराणकथा, उत्खननातील अवशेष, मातृदेवतांचं पूजन, धार्मिक रीती, परंपरा, अंधश्रद्धा या सर्वांमधून, आणि त्याचप्रमाणे आजच्या आदिवासीच्या चालीरीतीतून, या मातृसंस्कृतीची पावलं स्पष्टपणे दिसतात.
जगातील सर्व मातृटोळ्यांचं प्राथमिक वैशिष्ट्य म्हणजे भाषा बोलता येत नसल्यामुळे, आणि वस्त्राचा शोध लागला नसल्यामुळे टोळी सदस्यांना एकमेकांना ओळखता येण्यासाठी, विविध पशु, पक्षी, वनस्पती यांच्या खुणांनी, म्हणजे त्यांची पिसे, शिंगे, शेपट्या, मुखवटे अशी चिन्हे धारण करून वावरणे, हा एकमेव पर्याय होता. भारतीय संस्कृतीत मत्स्य, कच्छ, वराह, वृषभ, महिष, नाग, मोर, गरुड, हंस, जटायू, वानर वगैरे नावांनी अशा मातृगण-जमातींचे उल्लेख सापडतात. रामायण काळातील जटायू किंवा वानर यासुद्धा त्या प्राण्यांचे मुखवटे धारण करणाऱ्या जमाती होत्या. मातृटोळ्यांना पशु-पक्ष्यांच्या ह्या चिन्हामुळे एकसंधता आली. त्यांची सुरक्षितता वाढली. त्यांच्या एकत्र राहण्याला अर्थपूर्णता आली. हळूहळू या चिन्हांवरून मातृटोळ्या ओळखल्या जाऊ लागल्या. अखेरीस ती त्यांची कुलचिन्हे होऊन गेली. पुढे भाषा विकसित होण्यात अनेक शतके गेली. तोपर्यंत कुलचिन्हांवरील विश्वास टोळ्यांच्या श्रद्धेमध्ये बदलला. भाषेच्या विकासात मातेला संबोधन आले. तसे दितीवरून दैत्यगण, दनुमातेचे दानव, अदितीचे आदित्य, कपिलेचे कपिलेय अशी संबोधनं मातृगणांना आली, तरी कुलचिन्हांवरील श्रद्धा, त्यांची गणातील प्रतिष्ठापना, पूजन यामध्ये बदल झाला नाही. टोळ्यांमधील चांगल्या घटना, दुर्घटना किंवा युद्धसंघर्षाचे प्रसंग, विजय मिरवणुका यामध्ये आपापली कुलचिन्हं मिरवत न्यायची परंपरा गण-जीवनातही तशीच टिकून होती, कारण त्याशिवाय त्या गणाचा सहभाग समजता येत नसे. आजच्या काळात परिषदेसाठी येणारे राष्ट्रप्रमुख जसे त्यांच्या राष्ट्रीय पोशाखात असतात, किंवा क्रीडा स्पर्धेसाठी राष्ट्रं आपापला ध्वज मिरवत आणतात, तेच काम ही कुलचिन्हं करीत होती. काही ठिकाणी कुलचिन्हांचा उल्लेख 'वाहन' असाही आहे. याबाबत संशोधक असं मानतात की, जेव्हा दोन मातृगणांमध्ये संघर्ष होत असे, तेव्हा ज्या गणाचा पराभव होई, त्याचं कुलचिन्ह हे विजेत्या गणाचं वाहन (मांडलिक) म्हटलं जात असे. विजेत्या गणाची प्रमुख (पती) माता ही पराभूत गणाचे चिन्ह वाहनासारखे मिरवत आणि दौडत विजयी सभेमध्ये येत असे. याबाबत डॉ. धर्मानंद कोसंबी काही निरीक्षणं मांडतात. महाराष्ट्र क्षेत्रातील ठाणे जिल्हा परिसरात प्राचीन काळात जो संघर्ष झाला, त्यामध्ये, मातंग (हत्ती) गणाने मूषक (उंदीर) गणाचा पराभव करून मूषकांना जंगलपट्टीबाहेर हाकललं. या विजयानंतर मातंग गणाची गणपती-माता हत्तीचा मुखवटा लावून, मुषकाला वाहन बनवून मिरवणुकीने आली. दोन गणांमधील हा संघर्ष दीर्घकाळ आणि तीव्रपणे झालेला दिसतो. म्हणून पुढेही या विजयाची आठवण घरोघरी गणपती मूषक वाहनासह वाजत-गाजत आणून चालू ठेवली गेली. साधारणपणे, इ.स.पूर्व सुमारे २ ते ३ हजार वर्षांपर्यंत लोखंडी नांगराचा शोध लागण्यापूर्वी, मातांनी 'गणपती' बनून आणि वाहन घेऊन मिरवणुकीने निघावे, अशी प्रथा चालू होती. दुर्गेने महिषासुराचा पराभव केला, म्हणून ती महिष वाहनावरून येते, हे आपल्याला माहीत आहेच. त्याचबरोबर, वैष्णवी गरुडावरून येते, माहेश्वरी बैलावरून येते वगैरे उल्लेख भारतीय संस्कृतीत फक्त स्त्रियांबाबत सापडतात.
नांगराच्या शोधानंतर मात्र शेती उद्योगात जी मोठी क्रांती आली, त्यामध्ये शेती जी विळ्या-कोयत्याने स्त्रियांकडून होत होती, ती पुरुषाहाती गेली. फळे, भाजी, कंदमुळांऐवजी अमाप धान्य पिकू लागलं. जमीनदारी उदयास येऊन, पुरुष जमिनीचा व धान्य उत्पादनाचा मालक झाल्यामुळे, स्त्री-वारसाऐवजी पुरुष-वारसाचा प्रश्न ऐरणीवर आला. आणि इथेच विवाह प्रथेचा चंचुप्रवेश झाला. मातेकडून मुलीकडे जाणारा वारसा हक्क आणि त्याकरिता विवाहाची नसणारी गरज, हाच संस्कार शेकडो शतके रूढ होता. पितृसंस्कृतीचे समर्थक जमीनदार आणि राज्यकर्ते यांना हा संस्कार पुसून टाकण्यासाठी बरेच प्रयास करावे लागले. त्यातून देव-दानव संग्राम, रामायण आणि महाभारत हे मोठे संघर्ष, मजबूत मातृसंस्कृती उखडण्यासाठी, भारतीय उपखंडात होऊन गेले. मातृसंस्कृतीतील अवैवाहिक स्त्री-पुरुष संबंध पद्धतीची, जमीनदार-राज्यकर्त्यांनी मोठीच धास्ती घेतलेली होती. ज्या रीतींमुळे त्यांचं पितृत्व धोक्यात येत होतं, त्या रीतींचा नायनाट करायला हवा, हे त्यांनी ताडलं. त्यामुळे 'स्त्री-पुरुष मुक्त संबंध हे नैतिक नाहीत' हा नवा संस्कार रूढ करण्यासाठी या आक्रमकांनी भारतात हजारो वर्षे स्थिर असलेल्या मातृसंस्कृतीवर धार्मिक, आर्थिक, सांस्कृतिक, नैतिक अशा सर्व बाजूंनी हल्ले करण्याचे राजकारण-धोरण जन्माला घातले. उदा. तत्कालीन राज्यांच्या स्त्री-शासकांना राक्षसिणी रंगवून त्यांचा संहार करण्यास सुरुवात केली. मातृपरंपरेप्रमाणे, कुणा स्त्रीने पुरुषाला शरीरसंबंधासाठी विचारण्याचे धाडस केल्यास, तिचे नाक-कान कापून विटंबनेचे उदाहरण शूर्पणखेद्वारे निर्माण केले गेले. आणि स्त्रीच्या या पारंपरिक स्वातंत्र्यावर दहशत बसविण्यात आली. शिवाय स्त्रीच्या चारित्र्याचं महत्त्व वाढविण्यासाठी अहिल्या, रेणुकासारख्या मातृगणातील मातांच्या चारित्र्याबाबत संशयावरून छळाच्या कथा रंगविण्यात आल्या, आणि त्यांना कशा शिक्षा होऊ शकतात, त्याची उदाहरणं मातृगणासमोर ठेवण्यात आली. मातृगणातील माता गावोगावी व्यापारासाठी कुळातील उत्पादनं घेऊन किंवा औषधोपचारासाठी जात असत. त्यांना अनेकदा रात्रीचा तिथे मुक्काम करावा लागे. म्हणून त्यांना 'कुलस्था' (कुळात राहणारी) म्हटलं जाई. पण पितृसंस्कृतीच्या समर्थकांनी त्याचं 'कुलटा' असं संबोधन करून, वाईट चालीची या अर्थाने स्त्रियांच्या या मुक्त संचारावर, त्यांचे बाहेर शरीरसंबंध होतील या भीतीने बंदी आणली. तरीही काही मातृगणांनी अशा आक्रमणांना न जुमानता, आपल्या परंपरा चालवीत आणि मुक्त शरीरसंबंधांना प्रमाण मानीत, आपले व्यवहार चालू ठेवलेले होते. मग त्यांच्या कुळात होणाऱ्या उत्पादनावर सामाजिक बहिष्काराचं शस्त्र राज्यकर्त्यांनी उपसलं आणि या मातृगणांच्या चरितार्थाची कोंडी केली. अखेर शरीरसंबंधासाठी येणाऱ्या पुरुषाच्या मदतीच्या मेहेरबानीवर जगण्याशिवाय या मातृगणांना उपजीविकेचा दुसरा मार्ग राहिला नाही. त्यातून वेश्याव्यवसाय समाजात उगवला. स्त्री-पुरुष संबंधांवर तत्कालीन स्त्रियांचा स्वतःचा असणारा अधिकार खच्ची करणं, हा एकूण या संघर्षाचा केंद्रबिंदू होता.
मातृसमाजावरील त्यांच्या संस्कृतीचे सर्व ठसे पुसून टाकण्याचा प्रयत्न म्हणून पटकीवर औषधोपचार करणाऱ्या मरीआईसारख्या परोपकारी मातृदेवतांची मंदिरं गावाबाहेर टाकली गेली, आणि त्याऐवजी राम-सीता, विठ्ठल-रखुमाई, विष्णू-लक्ष्मी अशी विवाह ठसवणारी जोडपेयुक्त मंदिरं बांधली गेली. गणांना मातांवरून असणारी नावं बदलून मरुत गण, देवगण, असुरगण, रुद्रगण, शिवगण, ब्रह्मगण अशी पुरुषांवरून नावं आणली गेली. त्याचं पुढील पाऊल म्हणजे, स्त्रीऐवजी आता पुरुष हा गणप्रमुख आहे, हे ठसविण्यासाठी, गणपती-स्त्री आपल्या वाहनावर बसून येण्याची जी परंपरा आहे, तिथे पुरुष-गणपती आणून, ती मोडण्याचा प्रयत्न आक्रमकांनी केला आणि आपल्या आजच्या गणपतीबाप्पाचा जन्म झाला.
मातृगणांमध्ये, संशोधन-अभ्यास करणारा, तंत्रज्ञान, वैद्यकीय ज्ञान, अवगत असणारा विद्वान स्त्रियांचा एक गट प्राचीन काळापासूनच कार्यरत होता. हा गण सरस्वतीमातेवरून ओळखला जात होता. सरस्वती ही विद्येची देवता आणि 'मोर' हे तिच्या गणाचं कुलचिन्ह होतं. वटपौर्णिमा कथेतील सावित्री ही याच गणाची सदस्य होती, जिने वैद्यकीय क्षेत्रात बरंच संशोधन करून वनस्पती औषधांचा शोध लावलेला होता. नांगरतंत्रानंतर आलेली विवाहप्रथा आणि ती रुजविण्यासाठी प्राचीन मातृसंस्कृतीचा इतिहास व परंपरा नष्ट करण्याची आक्रमकांची सुरू झालेली कारस्थानं यावर या बुद्धिवादी स्त्रियांचं बारीक लक्ष होतं. गणपती मिरवणुकीतल्या स्त्री-गणपतीला डावलून जो पुरुष-गणपती पुढे आणला गेला, तो गणपती स्वीकारण्यास मातंग-मूषक संघर्षाच्या प्राचीन इतिहासाची अडचण राज्यकर्त्यांना होत होती. म्हणून गणपतीला पार्वतीने मळापासून बनवला, पुढे शंकराने त्याचं डोकं उडवून हत्तीचं शीर लावलं वगैरे कथांच्या अंधश्रद्धेचा मुलामा देऊन मातांच्या शौर्याच्या इतिहासाची आठवण अक्षरशः गाडून टाकली गेली. पुढे विवाह प्रथा पक्की रुजविण्यास अविवाहित स्त्रियांसाठी चतुराईने आणलेलं हरतालिका व्रत, गौरीला मिरवणुकीने आणून फक्त पुत्राच्या मातेचं महत्त्व ठसविण्याचा प्रयत्न या सर्व घटना मातृसंस्कृती लयाला जाण्याच्या धोक्याच्या घंटा होत्या. हे या विद्वान स्त्रियांनी ओळखले. विवाहाचे मूळ रुजविण्याच्या प्रयत्नातून स्त्री-कुळं उध्वस्त होत आहेत, आपली मातृमंदिरे उखडली गेली आहेत, मातृदेवतांना गावाबाहेरचा रस्ता दाखवून आपल्या श्रद्धेचा अवमान केला गेलेला आहे. इतकंच नव्हे तर आपल्या अवैवाहिक पण सन्माननीय शरीरसंबंधांना वेश्याव्यवसाय बनवून विकृत केलेलं आहे, हे या स्त्रियांच्या लक्षात आलं. नांगरापूर्वी विळ्या-कोयत्यांनी स्त्रिया कंद-फळं-भाज्या असं पीक जोपर्यंत घेत होत्या, तोपर्यंत शेती व्यवसाय, हा स्त्रियांचा व्यवसाय होता. तेव्हा आपलं सुवर्णयुग होतं, माता सन्मानाच्या शिखरावर होत्या, हे या विद्वान स्त्रिया विसरू शकत नव्हत्या. पण पितृसंस्कृतीच्या झंझावातापुढे आणि आक्रमणाला बळी पडून जसजसे मातृगण स्वतःला बहिष्कारापासून वाचविण्यासाठी विवाह प्रथा स्वीकारून पितृगणात दाखल होऊ लागले तेव्हा, या सरस्वती गणाच्या सदस्यांना आपल्या मातृसंस्कृतीचा शेवट डोळ्यासमोर दिसू लागला. प्रसंगावधान राखून या गणाच्या बुद्धिमान सदस्यांनी गणेश चतुर्थीला जोडून येणाऱ्या शेतीकाळातील भाद्रपद पंचमीला, 'कृषिपंचमी' हे संबोधन देऊन, त्या दिवशी ज्या नांगर तंत्रामुळे आपल्यावर ही स्थिती आली, त्या नांगराने नांगरलेलं धान्य स्त्रियांनी वर्ज्य करावं आणि त्या दिवशी फक्त भाजी, कंदमुळं, फळं खाऊन, आपल्या इतिहासाचं स्मरण करावं, असं व्रत निर्माण केलं. महाराष्ट्रातील पश्चिम भूभागात जिथे मातंग-मूषक संघर्ष झाला, तिथे कोकणपट्टी धरून कृषिपंचमीचं हे व्रत 'ऋषीपंचमी' या अपभ्रंशाने स्त्रिया आजही करतात. त्या दिवशी विळ्या-कोयत्याची पूजा करून स्त्रिया फळं, भाज्यांचं सेवन करतात. तांदूळ, गव्हाचं वा अन्य धान्यांचं सेवन त्या दिवशी केलं जात नाही.
सरस्वती गणाच्या माता, एवढ्यावरच थांबलेल्या दिसत नाहीत, तर ज्या गणपती मिरवणुकीत अन्य मातृगण आपापली चिन्हे घेऊन दाखल होत होते, त्या गणपतीमागील, मातंग-मूषक संघर्षाचा इतिहास गणपतीच्या जन्माच्या अशास्त्रीय कथेद्वारे विपरित केला गेला, त्याचा निषेध म्हणून, या मिरवणुकीवर सरस्वती गणाने बहिष्कार टाकलेला दिसतो. त्यामुळे इतर कुलचिन्हांबरोबर या मिरवणुकीत असणारं त्यांचं चिन्ह 'मोर' हे त्या मिरवणुकीतून बाहेर पडलं ते कायमचंच. सरस्वती गणातील मातांबरोबर चर्चा करणाऱ्या पितृगणातील विद्वान पुरुषांना याचा धक्का बसला. गणपती मिरवणुकीत 'मोर' या चिन्हाची उपस्थिती नसणं, हे या मिरवणुकीला येणाऱ्या मातृगणांनासुद्धा दुःखदायक होतं. म्हणूनच गणपतीबरोबर मोराचा (सरस्वती गणाचा) सुद्धा सन्मान आमच्या मनात आहे, हे दर्शविण्यासाठी मिरवणुकीतून आर्त साद घातली जाऊ लागली. 'गणपतीबाप्पा, (आणि) मोर या'.
सौजन्य- महाराष्ट्र टाइम्स
http://m.maharashtratimes.com/edit/samwad/ganesh-utsav/articleshow/41882026