कुणी कुठल्या मंचावर हजेरी लावावी हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे. पण दाभोलकर-पानसरे-कलबुर्गी यांच्या खुनानंतर, सरकारच्या असंवेदनशील वर्तनाविरुद्ध लेखक-कलावंतांनी पुरस्कार-परतीचं आंदोलन केल्यानंतर, आणि यु. आर. अनंतमूर्ती यांनी मृत्यूपूर्वी पाहिलेलं भारतीय समाज राजकारणाविषयीचं भयस्वप्न प्रत्यक्षात उतरल्यानंतरच्या आजच्या परिस्थितीत कवितेची अग्निहोत्रं आणि प्रबोधिनीची चर्चासत्रं यांच्या पायऱया चढण्याची कवी-लेखकांमध्ये दिसू लागलेली लगबग अस्वस्थ करणारी आहे.
या कवी-लेखकांच्या बाजूनेही काही म्हणता येईल; किंबहुना ते तसं म्हणू लागले आहेत. या म्हणण्यात दोन मुद्दे प्रमुख आहेत. पहिला मुद्दा निष्ठेचा आहे : मी कवी आहे, मी शिक्षणतज्ञ आहे, मी अगैरेवगैरे आहे; माझी निष्ठा माझ्या कवितेशी/माझ्या विषयाशी आहे. मी याच्याही मंचावरून बोललो, मी त्याच्याही मंचावरून बोलणार. मला जे बोलायचं आहे ते बोलण्यावर जोवर गदा येत नाही, तोवर मी मंचाविषयी अस्पृश्यता कशाला बाळगावी? दुसरा मुद्दा नैतिकतेचा आहे : कवी-लेखक कुठल्या विचाराच्या मंचावरून बोलतात यापेक्षा ते काय बोलतात याला महत्त्व दिलं पाहिजे. मंच उजव्या विचाराच्या लोकांनी स्थापलेला असला, तरी त्याला अस्पृश्य मानण्याचं कारण काय? उलट त्या मंचावर आपल्याला बोलावल्यास आपले विचार निर्भयपणे मांडण्याची संधी, आपल्या विरोधी विचारांच्या लोकांचं मतपरिवर्तन करण्याची संधी म्हणून तिच्याकडे पाहिलं पाहिजे.
दोन्ही भूमिका तर्काच्या कसोटीवर योग्य ठरतात, पण काळाच्या कसोटीवर नव्हे. कुठल्या काळाविषयी आपण बोलतो आहोत याचंही भान ठेवायला हवं. या काळात पुरोगामी चळवळीच्या नेते-विचारवंतांचे राजरोसपणे खून होतात; विशिष्ट धर्माच्या देव आणि उत्सव यांच्या नावाखाली कायदा धाब्यावर बसवून रस्त्यावर धुडगूस घातला जातो; धार्मिक प्रतीकांचा अपमान केल्याच्या केवळ संशयावरून मुस्लीम-दलितांना जिवानिशी संपवलं जातं. समाजातली केवळ काही असामाजिक तत्त्वं हा उद्योग करतायत म्हणावं, तर इथं लोकशाही मार्गाने निवडणुका लढवणारे राजकीय पक्षच कायदा मोडत धार्मिक उन्माद यथेच्छपणे साजरा करण्याची चिथावणी लोकांना देतात. इतकंच नव्हे, तर काही राजकीय पक्ष आमच्या धर्माला लक्ष्य केलं जातंय असा कांगावा करत खुनाच्या आरोपींच्या बाजूने जाहीरपणे उभे राहतात, या आरोपींना वकिलांच्या संघटनाही पाठिंबा देतात आणि विकृत प्रसारमाध्यमांच्या गोबेल्सनीतीला बळी पडून देशद्रोहीपणाचा शिक्का बसलेल्या विद्यार्थी-नेत्याला वकीलच न्यायालयाच्या आवारात बेदम मारहाण करतात. पोलीस मूकपणे हे सगळं घडू देतात आणि सरकारी यंत्रणा ‘त्याकडे आपलं लक्षच नाही, या गोष्टी किरकोळ आहेत’, असं भासवतात. आता या काळात केवळ कातडी बॅग वापरली म्हणून किंवा आपल्या मुलांना उत्तम प्रतीचं दूध मिळावं यासाठी खरेदी केलेल्या गायी टेम्पोतून नेताना पकडला गेला म्हणून एखाद्याचा जीव जाऊ शकतो इतपत परिस्थिती अविवेकी आणि विकृत बनली आहे. अशा हैदोस
घालणा-या समाजातल्या संघटना, त्यांच्या पाठीशी उभे राहणारे वकील-पोलिसांसारखे तथाकथिक ‘कायद्याचे रक्षक’आणि या सा-या तमाशाविरुद्ध जराही कारवाई न करणारं सरकार यांच्यात काहीच नातं नाही, आणि या साऱया व्यवस्थेशी आम्ही ज्या मंचावर जाऊन बोललो त्या मंचांचादेखील काहीच संबंध नाही, असं म्हणणारी व्यक्ती एकतर भाबडी-मूर्ख तरी असेल किंवा स्वतचे हितसंबंध जपण्यापुरतंच पाहाण्याइतपत ‘बनेल’ तरी असेल.
समाजात धार्मिक कट्टरता, उन्माद वाढतो आहे; त्याला पुरोगामी, अल्पसंख्य समुदाय बळी पडत आहेत, ही परिस्थिती पूर्वीपासून कमीअधिक प्रमाणात आहे असं म्हणता येईल. पण धार्मिक उन्मादी वर्तन
करणा-या संघटनांना सरकारकडून अप्रत्यक्षपणे पाठिंबा मिळणं हे अधिक धोकादायक आहे. खून पूर्वीही पडले असतील, अत्याचार त्याही काळात होत असतील; पण अशा खुनांचं, अत्याचारांचं बेमुर्वत समर्थन सरकारी प्रतिनिधींनी, लोकप्रतिनिधींनी आजवर केलं नव्हतं.
अशा काळात जगणा-या कलावंत किंवा बुद्धिमंतांना स्वतच्या निष्ठेची टिमकी वाजवत राहण्याची किंवा ‘नैतिक शिक्षका’चं सोंग पांघरण्याची भाबडी चैन परवडू शकते? कवीची निष्ठा त्याने कोणते शब्द वापरले आहेत, त्यांतून काय भूमिका प्रकट झाली आहे, एवढ्याशीच असते? त्याला त्या ठिकाणी बोलण्याची संधी कोण देतं आहे, याच्याशी तिचा काहीच संबंध नसतो? त्याच्या हेही लक्षात येत नाही का, की आपण ज्यांचं विचारपरिवर्तन करण्याच्या गोष्टी करत आहोत, तेच आपला वापर स्वत:वरचे कलंकित डाग पुसून स्वत:ची प्रतिमा ‘स्वच्छ’ करून घेण्यासाठी करत आहेत? धार्मिक-राजकीय दृष्ट्या ‘कट्टरवादी’ अशी उजव्या पक्ष-संघटनांची प्रतिमा आहे. या कट्टरवाद्यांकडे स्वतचे मोठे लेखक-कलावंत-विचारवंत नाहीत. त्यामुळे पुरोगामी लोकांना गळाला लावून (आणि गळ्याशी भिडवून) त्यांना आपल्या मंचावरून बडबड करू दिली, की आपण कट्टर नसून विरोधी विचारांचाही आदर राखण्याइतपत, मुक्त लोकशाही विचाराचे आहोत अशी आपली स्वच्छ प्रतिमा ते सहज निर्माण करू शकतात. अशी प्रतिमा निर्माण करणे हेच सांस्कृतिक क्षेत्रात कार्यरत असणाऱया उजव्या संघटनांचं मुख्य उद्दिष्ट आहे. अशा प्रतिमेआड धार्मिक उन्मादाची कारस्थानं बिनबोभाट चालू ठेवता येतात.
अग्निहोत्र किंवा प्रबोधिनीच्या मंचावर बोलताना, कविता सादर करताना अनंतमूर्तींच्या निधनाबद्दल साजरा झालेला विकृत जल्लोष, दाभोलकर-पानसरे-कलबुर्गी यांच्यावर बरसलेल्या बंदुकींच्या गोळ्यांचे आवाज, दादरी-उना इथल्या पीडितांच्या किंकाळ्या यापैकी कशाचेही प्रतिध्वनी आमच्या ‘संवेदनशील’ कवी-अभ्यासक मित्रांच्या मनात उमटले नसतील तर नागपूरच्या ‘बागेत’ तयार खास विणण्यात आलेल्या ‘रेशमी’ फासात स्वत:सह स्वत:च्या समाजाची मान अडकवून घ्यायला ते फारच उत्सुक आहेत असं म्हणायला हवं.
- नीतीन रिंढे
Blog by people for People, Creative Ideas, Inspirational and Motivational stories, Myths and Facts, Social activities
Thursday, 1 September 2016
नितीन रिंढे यांनी लिहिलेले मुक्त शब्दचे संपादकीय
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment