Saturday, 1 December 2018

Understanding Jainism माहिती, नियम, अटी

सर्व नवीन सदस्यांचे Understanding Jainism समूहात स्वागत आहे.

जैन अभ्यासक, सामजिक क्षेत्रात चांगले कार्य करणारे लोक, अंधश्रद्धा न मानता पुरोगामी विचारांनी जैन धर्माचे आचरण करणारे लोक, अहिंसेसाठी ज्यांनी आपले आयुष्य समर्पित केले किंवा करत आहेत असे लोक यांच्यासाठी हा समूह आहे.

समुहाचा उद्देश :-

सर्व सदस्यांनी यात सहभागी होऊन अहिंसेचा प्रचार-प्रसार, अनेकांतवाद, जैन तत्वे आदींबद्दल जाणून घ्यावे, मार्गदर्शन करावे.

समूहात दर काही दिवसांनी काही प्रश्न विचारले जातील त्यावर आपण आपले मत मांडावे.

हा समुह forwarded messages किंवा timepass चर्चेसाठी नाही.

समूहाद्वारे विचारमंथन आणि कृती दोन्ही कार्यक्रम घेतले जातात त्यात सहभागी व्हावे, अशी अपेक्षा आहे.

*Understanding Jaininsm* या आपल्या समूहाचा मुळ हेतु आपल्या जैन तत्वांप्रति जागृती केंद्रस्थानी ठेवून अहिंसा, अनेकांतवाद, सर्व पंथांचे एकत्रीकरण, जैन धर्मच्या बाहेर असणारे अहिंसक विचार, तत्सम कार्य, या  विषयांवरील वेगवेगळी मते पोहचवणे, दिशाभुल करणाऱ्या हिंसक भडक साहित्यांविरुध्द कार्य करणे व त्यातुन विचारांची प्रगल्भता वाढवून मानवतेचा, अहिंसा परमोधर्माचा, विचार वृद्धिंगत करणे हा आहे.

आपणास योग्य पोस्ट करता आली नाही तरी चालेल, पण त्या पोस्ट तुम्हाला वाचण्यास मिळणे हे महत्वाचे आहे.

कोणतीही पोस्ट ग्रुपच्या विषयाशी संबंधित असेल याची काळजी घ्यावी .

ग्रुपमध्ये भिन्न मतांचे सदस्य असुन ही मते प्रदर्शन करताना व्यक्तिगत पातळीवर जाऊन वाद, अथवा भांडण होऊन कटुता निर्माण होणार नाही याची काळजी घेणे आपणा सर्वांचीच जबाबदारी आहे.

एखाद दोन सदस्याचे मत म्हणजे पूर्ण समूहाचे मत ठरवून समूहच असा आहे असे ठरवू नये.

समूहाच्या कृती कार्यक्रर्मात सहभाग घ्यावा आणि मग आपले मत बनवावे.

ग्रुपमध्ये पोस्ट करणे शक्य नसले तरी  किमान एकदा चित्रलिपी (👌👍✅❓❌🚫👎👏🙏....इत्यादी ) किंवा अक्षर लिपीत आपले मत मांडुन आपली सक्रियता दाखवावी.

ग्रुपमध्ये आपल्या मताशी कोणी सहमत होत नाही अशा अवस्थेत  ग्रुपच्या नावाबद्दल, उद्देशाबद्दल कोणत्याही स्वरूपाच्या सुचना देऊ नये, इतर विचार व दृष्टिकोन समजुन घेण्याचा प्रयत्न करावा.

ग्रुपबाबत महत्वाच्या काही सुचना, बदल सांगायचेच झाले तर ग्रुप अॅडममिनला तसा व्यक्तिगत मेसेज पाठवावा.

खालील नमुद केलेल्या प्रकारातील पोस्ट करू नये.

1.कोणताही अश्लील विनोद, शिवी वा इतर काही

2.दैवी किंवा इतर कोणतेही चमत्कार करणारे मॅसेज फोटो, अमुक ही पोस्ट ... एवढ्या लोकांना ... ग्रुपमध्ये पाठवा .

3. जाहिरात

4. ग्रुपमध्ये एकदा पोस्ट झालेला मेसेज पुन्हा पोस्ट करणे .

6. एखादी चुकीची viral post.

7. अश्लील पोस्ट, शिवीगाळ इत्यादी सारखे बदनामीकारक मेसेज, जे आपली समाजातील ओळख वाईट करतात व काही अंशी आपले खरे सुक्ष्म स्वरूप देखील दर्शवितात .

8. राजकीय प्रचाराच्या पोस्ट खरे तर टाळायला हव्यात. पण राजकीय घटनांबद्दल विश्लेषण करून समजुन घेणेही महत्वाचे आहे .
आपल्या प्रत्येक गोष्टीवर राजकीय निर्णयाचा परिणाम होत असतो. म्हणून राजकीय घटनांबद्दल तटस्थपणे कोणत्याही नेत्याच्या, पक्षाच्या भक्त किंवा विरोधकाच्या भुमिका, निवडणुकपुर्व प्रचारी पोस्ट टाळुन चर्चा होणे अत्यंत महत्त्वाचे आहे .

9. समाजातील विषमता नष्ट करून समानतेकडे, मानवतेकडे प्रवास करणे  हाच आपला मार्गक्रम आहे . म्हणूनच जातीय आकडेवारी व तपशील देत "इतिहासाचे कैदी" होऊन नवीन जातीयवादी मांडणी करत जातींना भक्कम करत जातीय अस्मिता (स्वाभिमान, अभिमान, गर्व ) असणाऱ्या पोस्ट कोणीही करू नये .

10. ही लिंक open करा, वगैरे सारखे मेसेज

ग्रूपचे नियम पाळा,
ग्रुपचा आणि ग्रुपमधिल सदस्यांचा सन्मान करा, 

RSS(राष्ट्रीय स्वयंसेवक संघ), कुठलाही अतिरेकी हिंदुत्ववादी विचारसरणीचा पक्ष आदींचे अंध समर्थक यांच्यासाठी हा समूह नाही.आणि तरीही add झालेच तर त्या-त्या कट्टर विचारसरणीची होणारी भांडाफोड व अवमान झेलण्याची तयारी ठेवावी ,
कारण जैन धर्म चिकित्सेला, अनेकांतवादानी पडताळून पाहायला प्रोत्साहन देतो जो वरील संघटना वा पक्ष देत नाहीत
स्वतःचा मेंदू न वापरता  वरतून येणाऱ्या आदेशाचे प्रश्न न विचारता पालन करणे आणि नेत्याचे गोडवे गात अंधभक्ती करणे त्यांना आवडते

त्यासाठी पूर्वीच क्षमा मागतो

समुह संपादक

*Understanding Jaininsm*

Sunday, 12 August 2018

आधुनिक लग्नकुंडली- प्रत्येक लग्नाळू व्यक्तीने वाचावेच असे ..

'*आधुनिक लग्नकुंडली*

लग्न म्हटलं, की सर्वांत प्रथम पाहिला जाणारा मुद्दा म्हणजे ज्योतिषाने तयार केलेली कुंडली. ती एकदा जुळली, की अर्धं लग्न जमल्या- सारखंच असतं. अनेकदा मुला-मुलींचा लग्नासाठीचा ‘बायोडाटा’ बनवतानासुद्धा त्यात निम्म्याहून अधिक भाग हा कुंडलीतील बाबींचाच असतो. प्रत्यक्षात भलेही त्या गोष्टीतलं आपल्याला काहीच कळत नसलं, तरी आजही त्याच गोष्टींच्या आधारे अनेक ठिकाणी लग्नाचा निर्णय घेतला जातो, ही खेदाची बाब आहे.  आपल्यापासून कोट्यवधी किलोमीटर दूर आहेत, ते आकाशातले ग्रह-तारे आपल्या आयुष्यावर नियंत्रण ठेवतात, हाच मुळात भाबडा समज आहे. ज्या ग्रहांना साधा स्वतःचा प्रकाशसुद्धा नाही; त्यांना एवढ्या दूर पृथ्वीवरील एका छोट्याशा ठिपक्यातदेखील दाखवता येणार नाही इतक्या दूरच्या ठिकाणी राहणार्‍या व्यक्तीच्या आयुष्यातील घटना कशी ठरवता येतील? आणि त्यांच्यासाठी इथे घातलेली शांती किंवा पूजा त्या ग्रहापर्यंत कशी पोहोचेल? हा सगळा फसवेगिरीचा धंदा असून आजही अनेक लोक यात फसत असतात. सर्वप्रथम यातून बाहेर निघायला हवं आणि डोळसपणे आपल्या किंवा आपल्या मुलांच्या होणार्‍या जोडीदाराची निवड करायला हवी. म्हणूनच या ग्रह-तार्‍यांच्या थोतांडाला पर्याय म्हणून आपण एक आधुनिक गुणांची कुंडली सर्वांना सुचवत असतो. जी आपल्या परिचयोत्तर विवाहाचा पाया आहे, असं म्हटलं तरी चालेल. यातील एकेक गुण आपण आजच्या लेखात पाहणार आहोत.
परस्पर पसंती: जोडीदार निवडीची सुरूवात करताना सर्वप्रथम महत्त्वाचा मुद्दा असतो तो परस्पर पसंती. मुलामुलींची एकमेकांना प्राथमिक पसंती असल्याशिवाय पालकांनी किंवा इतर कुणीही त्यांना आग्रह करताच कामा नये. अनेकदा पसंती विवाहामध्ये पालकांची पसंतीच महत्त्वाची मानली जाते. मुला-मुलींना एकतर विश्वासात घेतलं जात नाही किंवा घेतलं तरी त्यांच्यावर पालक किंवा त्रयस्थांचीच मतं लादली जातात; जे पूर्णत: चुकीचं आहे.
हुंडाविरोधी आहे का?:  दोन्ही कुटुंबियांनी आणि मुला-मुलीनेसुद्धा हुंडा देण्याघेण्याला ठामपणे विरोधच केला पाहिजे. आजकाल हुंड्याचं स्वरूप बदललं आहे, तेसुद्धा लक्षात घ्यायला हवं. अनेकदा छुप्या स्वरूपात, वस्तूंच्या स्वरूपात हुंडा मागितला किंवा दिला जातो. त्याबाबतही आपण स्पष्ट विरोधच दाखवायला हवा.
वय-वजन-उंची: याबाबतीत आजही आपल्या समाजात अनेक गैरसमज आहेत. ‘मुलगी वयाने लहानच हवी’ यामागे अनेक कारणं सांगितली जातात, जी एकतर फसवी, चुकीची किंवा गोंधळातून आलेली असतात. कायद्याने लग्नासाठी मुलीचं वय १८ व मुलाचं २१ असं घालून दिलेलं आहे; ज्यामध्ये मुलीचं वय लहान असावं असंच दिसतं, असंही अनेकांचं मत असतं. पण यात काहीही तथ्य नाही, हे लक्षात घेतलं पाहिजे. १८ आणि २१ हे वय मुला-मुलींना जननक्षम होऊन त्यांच्या शरीराची तयारी होण्यासाठी ठरवलेलं कमीतकमी वय असतं. किमान या वयाच्या आधी लग्न करू नये एवढं सांगण्यासाठीच हे आहे. याव्यतिरिक्त त्याचा काहीही संबंध नाही. असेच समज-गैरसमज वजन, उंची व रंगाविषयीसुद्धा आहेत. आपण या सगळ्या गोष्टी आधी बोलून आपली यासंदर्भात काय मतं आहेत, ती एकमेकांना स्पष्ट असायला हवीत.
जबाबदारी पेलण्याची क्षमता आहे का ते पाहणे. यामध्ये अनेक वेगवेगळ्या प्रकारच्या जबाबदार्‍या येतात. उदाहरणार्थ, आर्थिक, कौटुंबिक, पालकत्वाची जबाबदारी, घरकामाची जबाबदारी आणि इतरही. या सर्व बाबींवर आधी बोलून घ्यायला हवं. आर्थिक जबाबदारीचा विचार अनेकदा होतोच; पण तो फक्त मुलाच्या. मुलीच्या आर्थिक जबाबदारीविषयी बोललं किंवा विचारलंच जात नाही. मग यातून पुढे जावून मुलीला नोकरी करायची इच्छा असेल आणि मुलाला किंवा त्याच्या घरात तिने नोकरी केलेली चालणार नसेल, तर मोठी अडचण होते. तसंच, मुलीचं शिक्षण झालेलं असलं, मात्र तिला नोकरी करण्याची अजिबात इच्छा नसली; परंतु मुलाकडच्यांची इच्छा आहे की तिने नोकरी करायलाच हवी, तरीही मोठी समस्या उद्भवू शकते. हे टाळण्यासाठीच निवडीआधी या सर्व गोष्टी बोलून घेणं गरजेचं आहे. कौटुंबिक जबाबदारीमध्ये जसे मुलाचे कुटुंबीय असतात, तसेच मुलीच्यासुद्धा कुटुंबियांची जबाबदारी असते, याचा विचार फारसा होताना दिसत नाही. दोन्ही बाजूने आपल्यावर घरातील कोणकोणत्या जबाबदार्‍या आहेत यावर आधी स्पष्ट बोलणं व्हायला हवं. आज अनेक मुली लग्नानंतरही आपल्या पालकांची जबाबदारी स्वतः घेणार या विचाराच्या असतात. अनेक मुलं आजही आपल्या होणार्‍या जोडीदाराकडून आपल्या आई-वडिलांच्या सेवेची अपेक्षा करत असतात. आपलं हे जे काही ठरलं असेल, ते दोघांनी व दोघांच्या घरच्यांनीही एकमेकांशी आधी बोलणं गरजेचं आहे. मान्य असेल तरच पुढे जायला हवं. यात फक्त पालकच नाहीत, तर कुटुंबातील इतर सदस्य जसे- भाऊ, बहीण किंवा इतर कोणीही असेल, ज्यांच्याप्रती आपल्याला काही जबाबदार्‍या पार पाडाव्या लागतील, ते सर्व आधी जोडीदारासोबत बोलायला हवं. ‘घरकाम हे फक्त स्त्रियांचंच’ असा गैरसमजाचा एक खूप मोठा पगडा समाजात आहे; तो दूर व्हायला हवा. ‘घरकाम हे घरात राहणार्‍या प्रत्येक व्यक्तीचं काम आहे’ ही संकल्पना सर्वांनी आत्मसात करायला हवी. अनेक ठिकाणी तर घरकामातून सुटका मिळण्यासाठी सुनेची वाट पाहिली जाते आणि सून आली, की मग घरातील कामातून आपली सुटका होईल या आशेवर मुलाचं लग्न केलं जातं. इथूनच खरी समस्या सुरू होते. ही मानसिकता बदलली तर बराच फरक पडेल. आपापल्या घरातील या विचारसरणीविषयी आधी एकमेकांना स्पष्ट सांगितलं पाहिजे. पालकत्त्वाबाबतीतल्या संकल्पना आता बर्‍याच बदलत आहेत. अनेक मुलं-मुली असे भेटतात, ज्यांना स्वतःचं मूल न होऊ देता दत्तक मूल घ्यायची इच्छा असते. अनेकजण आता व्यवस्थित नियोजन करून मूल होऊ देण्याच्या विचारांचे असतात. लग्न झालं म्हणून लगेच मूल व्हायलाच हवं, लग्नानंतरच्या पहिल्या वर्षात पाळणा हललाच पाहिजे, वगैरे जुने विचार आता मागे पडत आहेत. मुलं ही एक मोठी जबाबदारी आहे आणि त्याचा परिणाम दोघांच्याही आर्थिक, मानसिक, शारीरिक, सामाजिक अशा सगळ्याच बाबतीत होत असतो. म्हणूनच हा निर्णय विचारपूर्वकच घ्यायला हवा, असा यामागचा मुला-मुलींचा विचार आहे. त्यामुळे, या गोष्टीसुद्धा निवडीआधी एकमेकांशी बोलून घ्यायला हव्यात. दोघांच्या घरच्यांशीसुद्धा याबाबतीत आधीच संवाद साधायला हवा. नाहीतर लग्नाआधी घरातील दबावामुळे याबाबतीतला निर्णय बदलावा लागणं आणि त्याचा उर्वरित आयुष्यावर परिणाम होणं, या गोष्टीसुद्धा होऊ शकतात. कुटुंबियांनीही या गोष्टीत मुला-मुलींच्या निर्णयात हस्तक्षेप न करणंच चांगलं. एकूणच, आपल्याला मूल हवंय की नको? हवं असेल तर कधी हवंय? किती हवीत? स्वतःचं हवं, की दत्तक? दोन मुलांत किती अंतर असावं? मुल झाल्यानंतर त्यांच्या संगोपनाच्या जबाबदार्‍या कशा वाटून घेणार आहोत? या सर्व बाबी आधीच बोलून घेणं गरजेचं आहे.
आवडी-नावडी: हा मुद्दा अनेकदा लग्नानंतरच्या छोट्या छोट्या भांडणातील कळीचा मुद्दा ठरतो. एकाला चित्रपट पाहणं आवडतं, तर दुसर्‍याला नाटक पाहणं. किंवा एकाला फक्त हॉलीवूडचे सिनेमे पाहायला आवडतात, तर दुसर्‍याला फक्त मराठी सिनेमे. निवांत वेळी एखाद्याला मस्त भटकायला आवडतं; तर दुसर्‍याला घरातच मस्त झोपून राहायला आवडतं. अशा खूप सार्‍या गोष्टी सांगता येतील, ज्यात आपल्या आवडी वेगळ्या असू शकतात. इथं आवडी वेगळ्या असणं ही समस्या नाही तर त्या वेगळ्या असू शकतात, हे मान्य न करणं ही समस्या होऊ शकते. मला जे आवडतं तेच जोडीदाराने पण करावं, असा अट्टाहास किंवा मला माझी ही आवड जोडीदारासोबतच जोपासायची आहे, असं असेल तर प्रश्न निर्माण होऊ शकतात. तसंच मला तर जायला आवडणार नाहीच, पण तिने किंवा त्यानेही तिच्या मित्रांसोबत किंवा त्याच्या मैत्रिणींसोबत गेलेलं मला चालणार नाही, असं असेल तर मात्र खटके उडू शकतात. नावडींचं तर याहून अवघड असतं. न आवडणार्‍या गोष्टी कोणत्या हे आधीच एकमेकांना माहित असणं गरजेचं आहे. नाहीतर एखादी गोष्ट मला खूपच आवडणारी असेल आणि समोरच्याला मात्र ती अजिबातच आवडत नसेल तर मात्र मोठी समस्या उद्भवू शकते. आमच्याकडे आलेल्या एका उदाहरणात मुलीकडच्या घरी सर्वजण शुद्ध शाकाहारी होते, तर मुलाकडचे मात्र मांसाहाराशिवाय राहूच शकणार नाहीत, अशा स्वरूपाचे होते. त्यांचे म्हणणे होते, की मुलीला मांसाहार करण्याची सक्ती आम्ही करणार नाही. पण, मुलीला मांसाहाराचा वासही सहन होणार नव्हता. तिच्यासाठी मुलाच्या घरच्यांना मांसाहार सोडणं शक्य नव्हतं. पुढं ते लग्न थांबलं. पण अशी अनेक उदाहरणं असू शकतात, जिथं आपल्या आवडीनावडी या एकदम टोकाच्या, विरोधी असू शकतात. जसं- एकाला बसमधूनच फिरायला आवडतं आणि दुसर्‍याला मात्र बसचा प्रवासच सहन होत नाही. एकाला बाईकवरून दूरदूरपर्यंत फिरायला आवडतं आणि दुसर्‍याला मात्र बाईकवरून फिरायची भिती वाटते. एकाला कुत्रा किंवा मांजर पाळायला खूपच आवडतं आणि दुसर्‍याला मात्र ते सहनच होत नाही किंवा त्यांची अ‍ॅलर्जी आहे. अशा बाबतीत आपण आधीच बोलून घेतलेलं असेल तर पुढच्या समस्या टाळता येऊ शकतात. किमान कोणत्या गोष्टी मला अजिबातच आवडत नाहीत आणि कोणत्या आवडीच्या अशा आहेत ज्यांच्याशिवाय मी राहूच शकत नाही, त्या स्वत:ला पूर्ण माहित असणं आणि त्या समोरच्याला स्पष्ट सांगणं व समोरच्याच्या विचारून घेणं गरजेचं आहे.
सवयी व व्यसने: आवडीनावडी इतकाच महत्वाचा मुद्दा सवयींचा. एकाला पंखा किंवा एसीशिवाय झोपच येऊ शकत नाही आणि दुसर्‍याला ते चालू असताना झोपणं शक्यच नाही, अशा छोट्या वाटणार्‍या पण मोठी समस्या ठरू शकणार्‍या सवयी असू शकतात. अनेकांच्या स्वच्छतेच्या सवयी, जेवतानाच्या सवयी, बोलण्याच्या-राहण्याच्या-वागण्याच्या सवयी अशा अनेक सवयी असू शकतील, ज्या समोरच्याला अजिबात न चालणार्‍या असतील. एकाला घरात सारखा पसारा करण्याची, वस्तू कुठेही टाकण्याची, आंघोळीचा टॉवेल, कपडे कुठेही टाकून देण्याची सवय असेल आणि दुसरा मात्र खूपच टापटीप राहणारा असेल तर या गोष्टींवरून रोजची चिडचीड होऊ शकते. एखाद्याला पसारा आवरण्याची सवय असते तर दुसर्‍याला पसार्‍यातच राहायला आवडत असते. मोबाईलची सवय ही तर आता नव्याने भर पडलेली सर्वत्र आढळणारी सवय आहे. अशी सवयींची खूप मोठी यादी होऊ शकते. यात महत्त्वाचं हे आहे, की मला असणार्‍या सवयी आणि मला अजिबातच न आवडणार्‍या किंवा खटकणार्‍या सवयी या स्वत:ला माहिती असायला हव्यात आणि निवडीआधी एकमेकांना स्पष्ट सांगितलेल्या असाव्यात. नाहीतर या खटकणार्‍या सवयी आयुष्यभर दोघांत खटके उडण्यासाठी कारणीभूत ठरतात.
    व्यसन हा मुद्दा आता समाजात बर्‍यापैकी गौरवीकरण झालेला वाटतो. आता कुठे अशी निर्व्यसनी मुलं मिळतात का? प्रत्येकालाच कशाचे ना कशाचे व्यसन असतेच, असं सर्रास बोललं जातं. अनेकदा नोकरी, व्यवसाय किंवा कॉर्पोरेटीकरणाच्या नावाखाली व्यसनांचं समर्थन केलं जातं. परंतु, हे पूर्णपणे चुकीचं आहे. अनेक मुलं-मुली व्यसनाच्या आहारी गेलेली आहेत, हे जरी वास्तव असलं तरी तेवढीच निर्व्यसनीसुद्धा आहेत. त्यामुळे, सर्वांत पहिल्यांदा आपणच समाज म्हणून व्यसनाला प्रतिष्ठा मिळवून देणं, व्यसनाचं गौरवीकरण करणं, व्यसन मान्य करणं बंद केलं पाहिजे. व्यसनाला सर्व स्तरातून सर्वांनी विरोधच केला पाहिजे. दुसरं म्हणजे जोडीदार म्हणून समोरच्या व्यक्तीची निवड करताना एकमेकांच्या व्यसनाविषयी स्पष्ट आणि खरं बोललं पाहिजे. आधी लपवून ठेवून पुढे जाऊन लक्षात आलं, तर हा एक प्रकारचा धोकाच असेल. ‘ऑकेजनली ड्रिकींग’ हा एक यातला गोंधळात टाकणारा महत्त्वाचा मुद्दा आहे. या ‘ऑकेजनली’ची तशी काहीही स्पष्ट व्याख्या नसते. हे कधी वर्षातून येते, कधी महिन्यातून तर कधी आठवड्यातूनही येऊ शकते. त्यामुळे, व्यसनाविषयीचं माझं मत काय आहे? मला ‘ऑकेजनली ड्रिकींग’ किंवा व्यसन असणारा जोडीदार चालणार आहे का? त्याचे सर्व दुष्परिणाम मला माहिती आहेत का? याचा विचार केला पाहिजे. ज्यांना आपला जोडीदार निर्व्यसनी असावा असं प्राधान्याने वाटतं, त्यांना तसा जोडीदार मिळणं हा त्यांचा अधिकार आहे, हे मान्य केलं पाहिजे. त्याबाबत त्यांच्यावर कोणतीही जबरदस्ती करता कामा नये. अनेकदा प्रेमात असताना मुली असं म्हणतात की, लग्नानंतर मी माझ्या प्रेमाने त्याचं व्यसन सोडवीन. तर अशी प्रेमाची जादू वगैरे फिल्मी गोष्टी वास्तविक आयुष्यात अपवादानेच होतात, हे लक्षात घेतलं पाहिजे. समजा जरी असेलच तुमच्या प्रेमात एवढी ताकद वगैरे; तरी ती लग्नाआधी एक-दोन वर्षं वेळ घेऊन आजमावून पाहिली पाहिजे आणि मगच लग्नाचा निर्णय घेतला पाहिजे. शेवटी, व्यसनी व्यक्ती वाईट असतेच असं नाही. पण, व्यसन मात्र वाईटच असतं आणि ते चांगल्या व्यक्तीलासुद्धा वाईट बनवू शकतं, हे लक्षात ठेवूनच जोडीदार निवडीपूर्वी विचार करायला हवा.
स्वभाव: जोडीदार निवडीपूर्वी एकमेकांचे स्वभाव माहिती असणं ही अत्यंत गरजेची बाब आहे. स्वभावाचे अनेक कंगोरे आहेत. रागीट, शांत, संशयी, समंजस, बोलके, उत्साही, एकलकोंडे, कटकटे, चिडचिडे, प्रेमळ असे स्वभावाचे अनेक प्रकार असतात. यातले आपण कोणत्या प्रकारात मोडतो आणि आपला जोडीदार कोणत्या प्रकारात मोडणारा असावा किंवा किमान कोणत्या प्रकारात मोडणारा नसावा याविषयी आपल्याला आधीच स्पष्टता असणं गरजेचं आहे. राग आल्यावर नेमके आपण काय करतो? राग व्यक्त करण्याची पद्धत काय? कशाकशाने राग येतो? या गोष्टी विचारात घ्यायला हव्यात. एखाद्याला सतत खूप बोलत राहण्याची सवय असते आणि जोडीदार पण तसाच असावा अशी अपेक्षा असते. पण जोडीदार जर एकदम अबोल स्वभावाचा असेल तर मात्र गोची होऊ शकते. तसेच एखादा खूपच प्रेमळ स्वभावाचा असला आणि जोडीदारही तसाच मिळावा अशी अपेक्षा असली; पण जोडीदार खूपच चिडचिड करणारा भेटला तर अवघड होते. मात्र अनेकदा दोघांचे स्वभाव एकमेकांना पूरक असतील तर नाते छान खुलू शकते. त्यासाठीच आधी आपल्या याबाबतीतल्या अपेक्षा स्पष्ट ठरलेल्या असाव्यात. अनेकदा प्रेमात असणार्‍या मुला-मुलींमध्ये स्वभावाच्या बाबतीत गृहीत धरण्याची किंवा दुर्लक्ष करण्याची शक्यता खूपच असते. पझेसिवनेस, संशयी स्वभाव, राग, चिडचिड या गोष्टींकडे प्रेमात असताना फारसं लक्ष दिलं जात नाही. पण, लग्नानंतर मात्र या गोष्टी वादाचे कारण बनू शकतात. पसंती विवाहात तर याबाबतीत अगदीच उदासीनता असते. मात्र ही गोष्ट पुढच्या आयुष्यात खूपच महत्वाची असते आणि म्हणूनच जोडीदार निवडीआधी त्याविषयी जाणून घेणं गरजेचं असतं.
    अशा प्रकारे एकूण १२ गुणांच्या या कुंडलीतील उर्वरित ५ गुण आपण पुढच्या लेखात पाहुयात. तोपर्यंत या गुणांवर विचार करूया...

- सचिन थिटे
जोडीदाराची विवेकी निवड टीम, महाराष्ट्र अंनिस

Monday, 9 July 2018

चित्रपट काढायचा असला की त्यात हमखास गांधी-नेहरूंना खलनायक किंवा लेचेपेचे नेते म्हणून दाखवायचे

टिळकांवरील मराठी चित्रपट मी पाहिलेला नाही. मात्र एका मराठी वाहिनीवर त्याचा ट्रेलर (प्रोमो) बऱ्याचदा दाखविण्यात आला. एका दृष्यात असे  होते की टिळक गांधीजींना म्हणताहेत की " गांधी, तुम नही जानते, मैं अंग्रेजोंके खिलाफ २५ सालसे लड रहा हुं ". अर्थात ते गांधीजींची कान उघाडणी करताहेत असे या प्रसंगात दिसते. अर्थात टिळकांना काय अभिप्रेत होते व ते याप्रसंगात काय बोलले होते हे सर्वसामान्य माणसांना माहित नाही. जे दिग्दर्शक व पटकथा लेखकाला अभिप्रेत आहे तसे संवाद लेखकाकडून संवाद लिहिले जातात. मात्र दिग्दर्शक/पटकथालेखकाने येथे थोडे इतिहासात डोकावून पाहिले असते तर त्यांना असे दिसले असते की गांधीजीसुद्धा दक्षिण आफ्रिकेत पंचवीस वर्षे इंग्रजांविरुद्ध लढा देत होते व ही गोष्ट टिळकांना माहित नसेल अशी शक्यता वाटत नाही. म्हणजे येथे दिग्दर्शक व पटकथालेखकाने ठरवून गांधीजीं हे एक अपरिपक्व नेता होते असे प्रेक्षकांच्या मनावर बिंबविण्याचा प्रयत्न केलेला दिसतो. गेली काही वर्षात असा ट्रेंड आलेला दिसतो आहे की थोर क्रांतिकारक देशभक्त (भगतसिंग/सुभाषबाबू वैगरे) यांच्यावर चित्रपट काढायचा असला की त्यात हमखास गांधी-नेहरूंना खलनायक किंवा लेचेपेचे नेते म्हणून दाखवायचे. अशा प्रकारे ज्यांना आपण बुद्धिवंत कलाकार,लेखक दिग्दर्शक, कलावंत म्हणतो ते सुद्धा सुपारी घेण्याच्या मोहात पडतांना दिसत आहेत.