Monday, 9 July 2018

चित्रपट काढायचा असला की त्यात हमखास गांधी-नेहरूंना खलनायक किंवा लेचेपेचे नेते म्हणून दाखवायचे

टिळकांवरील मराठी चित्रपट मी पाहिलेला नाही. मात्र एका मराठी वाहिनीवर त्याचा ट्रेलर (प्रोमो) बऱ्याचदा दाखविण्यात आला. एका दृष्यात असे  होते की टिळक गांधीजींना म्हणताहेत की " गांधी, तुम नही जानते, मैं अंग्रेजोंके खिलाफ २५ सालसे लड रहा हुं ". अर्थात ते गांधीजींची कान उघाडणी करताहेत असे या प्रसंगात दिसते. अर्थात टिळकांना काय अभिप्रेत होते व ते याप्रसंगात काय बोलले होते हे सर्वसामान्य माणसांना माहित नाही. जे दिग्दर्शक व पटकथा लेखकाला अभिप्रेत आहे तसे संवाद लेखकाकडून संवाद लिहिले जातात. मात्र दिग्दर्शक/पटकथालेखकाने येथे थोडे इतिहासात डोकावून पाहिले असते तर त्यांना असे दिसले असते की गांधीजीसुद्धा दक्षिण आफ्रिकेत पंचवीस वर्षे इंग्रजांविरुद्ध लढा देत होते व ही गोष्ट टिळकांना माहित नसेल अशी शक्यता वाटत नाही. म्हणजे येथे दिग्दर्शक व पटकथालेखकाने ठरवून गांधीजीं हे एक अपरिपक्व नेता होते असे प्रेक्षकांच्या मनावर बिंबविण्याचा प्रयत्न केलेला दिसतो. गेली काही वर्षात असा ट्रेंड आलेला दिसतो आहे की थोर क्रांतिकारक देशभक्त (भगतसिंग/सुभाषबाबू वैगरे) यांच्यावर चित्रपट काढायचा असला की त्यात हमखास गांधी-नेहरूंना खलनायक किंवा लेचेपेचे नेते म्हणून दाखवायचे. अशा प्रकारे ज्यांना आपण बुद्धिवंत कलाकार,लेखक दिग्दर्शक, कलावंत म्हणतो ते सुद्धा सुपारी घेण्याच्या मोहात पडतांना दिसत आहेत. 

No comments:

Post a Comment