Monday, 9 December 2019

जवाहरलाल नेहरू-१६ ऑगस्ट १९४७ लाल किल्ल्यावरील ध्वजारोहण सोहळा-भाषण

स्वातंत्र्य दिन चिरायू होवो ...........

“आज या प्राचीन किल्ल्याच्या परिसरात आपण एका ऐतिहासिक प्रसंगाच्या निमित्ताने जे आपण गमावले होते ते पुन्हा जिंकण्यासाठी एकत्र आलो आहोत. हा ध्वज कोण्या एका व्यक्तीच्या व कॉंग्रेस पक्षाच्या विजयाचे प्रतिक नसून,तो संपूर्ण देशाच्या विजयाचे प्रतिक आहे. भारताचा हा मुक्त ध्वज केवळ भारताच्या नव्हेतर संपूर्ण जगातील स्वातंत्र्याचा आणि लोकशाहीचा प्रतिक म्हणावा लागेल. भारत, आशिया आणि संपूर्ण जगाने हा महान दिवस आनंदाने साजरा करायला हवा !

'भारताच्या स्वातंत्र्यासाठी ज्यांनी कष्ट घेतले ,ज्यांनी त्याग केला त्या सर्वांचे स्मरण आजच्या दिवशी महत्वाचे आहे. प्रत्येकाचे नाव घेण्याची मला आवश्यकता वाटत नाही मात्र सुभाषचंद्र बोस यांचे नाव मी आवर्जून घेईन. ज्यांनी भारताबाहेर जावून या देशाच्या स्वातंत्र्यासाठी आझाद हिंद सेनेची स्थापना केली आणि मोठ्या धैर्याने स्वातंत्र्यासाठी ते लढले. भारताचा हा तिरंगा ध्वज त्यांनीच प्रथमतः विदेशात फडकाविला. त्यांचे स्वप्न आज पुर्ण होऊन हा ध्वज लाल किल्ल्यावर  फडकविण्याची वेळ आली आहे. त्यांनी भारतात परत येण्याचा हाच दिवस असायला हवा होता ,पण दुर्दैवाने ते या जगात नाहीत'

'एक सशक्त आणि कणखर भारत घडविण्याचे आपले ध्येय आहे. मजबूत पायाभरणीच्या आधारावरच देश महान बनू शकतो. स्वातंत्र्याची पहाट आपल्यासाठी मोठ्या जवाबदा-या  घेवून आली आहे आणि या जवाबदा-या पूर्ण कार्यक्षम होवून आपल्याला पार पाडावयाच्या आहेत. पण  जनतेच्या सहकार्याशिवाय आपण पुढे जावू शकत नाहीत. आपल्यापैकी कोणीही इथे प्रधानमंत्री अथवा मंत्री नसून,आपण सर्वजन या देशाचे विनम्र सेवक आहोत. माझे सरकार जनतेचे ख-या अर्थाने प्रतिनिधी म्हणून कामकाज करेल, अशी मला आशा आहे. आज जनता हीच ख-या अर्थाने खरी सत्ताधीश असून सरकारचे सशक्त असणे वा नसणे केवळ जनतेवरच अवलंबून आहे. जनतेची इच्छा आपण सरकार मध्ये असावे अशी असल्यामुळेच आपल्यापैकी प्रत्येकजण आज सरकार मध्ये आहोत आणि जनतेच्या  इच्छेनुसारच आपल्याला  ही पदे  त्यागावी लागतील'

'आपल्याला मिळालेले स्वातंत्र्य हा केवळ एक पडाव आहे, विश्वशांतीचे आणि उन्नतीचे अत्युच्च ध्येय प्राप्त करण्याच्या प्रवासातील ही केवळ एक पायरी आहे आणि  आपल्याला खूप दुरचा प्रवास करायचा आहे !"

जवाहरलाल नेहरू
(१६ ऑगस्ट १९४७ रोजी लाल किल्ल्यावरील ध्वजारोहण सोहळ्याच्या निमित्ताने केलेल्या भाषणातून ....)
अनुवाद :- राज कुलकर्णी.

आमदार सुनील अण्णा टिंगरे यांची भेट आणि चर्चा

माझे साडूबंधू व वडगावशेरी विधानसभा मतदार संघातील राष्ट्रवादी कांग्रेसचे नवनिर्वाचित आमदार श्री. सुनिलआण्णा टिंगरे यांची कालच्या रविवारी सकाळी त्यांच्या कार्यालयामध्ये आपल्या समविचारी मित्रपरिवारासह भेट घेण्याचा योग जुळून आला. गेला सव्वा महिना चाललेल्या राजकीय गदरोळाच्या पार्श्वभूमीवर आज त्यांची मिळालेली भेट, ही अपेक्षेनुसार "निवांत" अशीच होती. त्यामुळेच सर्वांशी वेगवेगळ्या विषयांवर दीर्घकाळ व सविस्तर बोलता आले.

दोन वेळा नगरसेवक व आत्ता विद्यमान आमदार असलेल्या सुनिलअण्णा टिंगरे यांची प्रतिमा, एक कार्यक्षम लोकप्रतिनिधी म्हणून 'पक्षातीत' अशीच राहिलेली आहे. किंबहुना अशी प्रतिमा हे सुनिलजी यांचे वैशिष्ट्यच म्हणावे लागेल. २००७ साली पहिल्यांदा महानगरपालिकेवर निवडून गेल्यापासून आजपर्यंत त्यांचा जनमानसातला  'सार्वजनिक अहवालाचा' (पी.आर.चा) आलेख हा सतत चढता राहिलेला आहे. त्यांचा आजवरचा राजकीय प्रवास पाहता त्यांची लोकांसाठीची उपलब्धता, मतदारसंघाच्या प्रश्नांची चांगली जाण, समस्यांचा गरजेनुसार प्राध्यान्यक्रम ठरवून योग्य दिशेने व प्रामाणिक तळमळीने केलेला सुसूत्र - नियोजनबद्ध विकास व आपल्या विरोधकांनाही आपलेसे करून घेण्याचे कसब या चार-पाच गोष्टी त्यांचा हा 'पी.आर.' वाढण्यात महत्वाच्या ठरलेल्या आहेत, हे प्रकर्षाने जाणवते.

आम्हा सर्व समविचारी मित्रमंडळींनी, कामाचा दांडगा अनुभव असलेल्या या आमदारांची भेट घेऊन त्यांचे अभिनंदन करणे, हा या भेटीचा एक भाग होताच. पण त्याबरोबर शाश्वत मानवी मूल्यांचा आग्रह धरण्यासाठी जातपात, धर्म, लिंग, वंश, वर्ग व प्रांत या भेदांच्या पलीकडे जाऊन, भारतीय संविधानात मांडलेल्या मूलभूत तत्त्वांनुसार स्वातंत्र्य, समता, बंधुता यावर आधारलेला व सामाजिक, आर्थिक आणि राजनैतिक न्यायाची कास धरणारा समाज निर्माण करण्याकामीच्या कल्पक योजनांना आमदार साहेबांकडूनही एक जागरूक लोकप्रतिनिधी या नात्याने भरभक्कम साथ मिळावी, तशी अपेक्षा त्यांच्याकडे व्यक्त करणे, हा देखील प्रमुख उद्देश होता. अपेक्षेनुसार आमदारसाहेबांचा यास मिळालेला प्रतिसाद अत्यंत सकारात्मक होता. याकामी शक्य ती सर्व मदत करण्याची ग्वाही त्यांनी दिली.

आम्ही सर्वांनी त्यांच्या निवडणुकीतील यशाबद्दल त्यांचं अभिनंदन पुष्पगुच्छ वगैरे देऊन करण्यापेक्षा वेगवेगळ्या विषयांवरील पुस्तकं, भेट स्वरूपात देत अभिनव पद्धतीने करण्याचे योजले होते. त्याचाच भाग म्हणून...

१) तरुण गांधीविचार अभ्यासक, Knowing gandhism global friends, चांगले विचार समूह व नाते टिकवूया या समाज माध्यमावरील समूहाचे संघटक श्री. संकेत मुनोत यांनी स्वतः संकलित केलेलं "एक धैर्यशील योद्धा - गांधी" हे पुस्तक, त्यांच्यासह श्री. निलेश शिंगे व सचिन देशमुख यांच्या हस्ते आमदारसाहेबांना भेट देण्यात आलं.

२) 'सिंगल मिंगल' या आपल्या कादंबरीला राज्य शासनाचा पुरस्कार प्राप्त झालेले तरुण लेखक, कवी व विविध वृत्तवाहिन्यांवरील चर्चासत्रात आपली भूमिका व विश्लेषण प्रभावीपणे मांडणारे राजकीय अभ्यासक श्री.श्रीरंजन आवटे यांनी लिहिलेलं, संविधानिक मूल्यांचं महत्व अधोरेखित करणारं, "आपलं आयकार्ड" हे पुस्तक त्यांच्या स्वहस्ते आमदारांना भेट देण्यात आलं.

३) युवक क्रांती दल (युक्रांद) चे राज्य कार्यवाह श्री. संदीप बर्वे यांनी प्रख्यात लेखिका, राजकीय अभ्यासक तिस्ता सेटलवाड यांची, सध्या देशात प्रचंड गाजत असलेल्या एन. आर. सी. या वादग्रस्त विषयाचं वास्तव मांडणारी, माहिती पुस्तिका आमदारांना दिली.

४) Knowing Gandhism Global Friends चे मार्गदर्शक सदस्य  व सोशल मीडियावर आपले परखड विचार मांडणारे श्री.राजा परांजपे काका यांच्या हस्ते आमदारसाहेबांना श्री. संजय आवटे सरांचं, भारतीयत्व म्हणजे नेमकं काय यावर प्रकाश टाकणारं, "We the change - आम्ही भारतीय लोक" हे पुस्तक भेट देण्यात आलं.

तर

५) Knowing Gandhism Global Friends कोअर कमिटी सदस्य व पुणे शहर काँग्रेसचे युवा कार्यकर्ते सर्वश्री उमेश ठाकूर, संजय मानकर, शशांक पाटील, युक्रांदचे पुणे शहर सचिव श्री.सुदर्शन चखाले व भोसरी पुणे येथील सामाजिक कार्यकर्ते डॉ. जयपाल गोरडे यांच्या हस्ते भारताची राजमुद्राधारी अशोक स्तंभ प्रतिमा भेट म्हणून देण्यात आली.

आम्हा मित्रपरिवाराची आणि आमदार साहेबांची आजची भेट अनेक अर्थाने महत्वपूर्ण होती. भौतिक विकास कामांबरोबर, एक परिपूर्ण विकसित समाज घडविणे देखील महत्वाचे आहे. त्या कामात आम्ही मित्रपरिवार नेहमी आमदार साहेबांबरोबरच राहू आणि संविधानाला अपेक्षित समाज बांधणी व विकास करण्यात आमदार साहेबांचे आम्हाला सहकार्य लाभेल.
भौतिक विकास कामांच्या बरोबरीने, समाजातील सर्व थरांचा सर्वांगीण विकास करून #वडगावशेरी एक रोल मॉडेल म्हणून महाराष्ट्रात एक आदर्श घालून देईल अशी आशा नक्कीच करू या.

गणेश चोंधे.

https://m.facebook.com/story.php?story_fbid=2589877201089401&id=100002014396029