Saturday, 28 March 2015

राम आणि रावण , काळा कि पांढरा ?

राम आणि रावण , काळा कि पांढरा ?
आपल्याला विचारांपेक्षा प्रतीकांच्या समारंभात जास्त रस असतो हेच दोन्ही वादात दिसून आलय.
रामाच चित्र पूर्ण पांढर नाही आणि रावणाच चित्र पण पूर्ण काळ नाहीये. हा आपल्या मनाचा खेळ आणि भाबडा अट्टाहास आहे म्हणून आपण बळेच राम सगळा सफेदधोट करायला जातो आणि रावण काळा करायला जातो.
प्रसंगी त्रास सोसून आज्ञापालन करणारा , राज्य सोडून वनवास स्वीकारणारा राम , राम म्हणून जगताना मनुष्यस्वभावानुसार चुकतो आणि चुकांची शिक्षा भोगतो. राम सत्यवचनी म्हणवतो पण वाली-सुग्रीव लढाईत कपट करतो. शूर्पणखा प्रकरण , सीतेची अग्निपरीक्षा आणि शेवटी गर्भवती सीता पुन्हा त्यागण ह्या प्रत्येक वेळी राम चुकतो आणि त्याच माणूसपण सिध्द करतो.
राम चुकतो म्हणून त्याच शौर्य ,त्याचे सदगुण कमी होत नाहीत.
रावण , चौदा विद्या चौसष्ट कलांचा अधिपती. प्रजाहितदक्ष राजा जो आपल्या कर्तुत्वाने लंकेला सोन्याची करतो तो बहिणीच्या अपमानाने आणि तिच्या राज्यात आलेल्या अतिक्रमणाने पेटून उठतो. पण हा भावाचा क्रोध राजाच्या विवेकावर मात करतो आणि भाऊ रावण सीतेच हरण करतो.
पण सीतेच हरण करूनही राजा रावण अशोकवनात तिला सुरक्षित ठेवतो आणि तिची अब्रू राखतो.
युद्धात हरल्यावर राम लक्ष्मणाला राज्यकारभाराची आणि युद्धशास्त्राची गुपित सांगतो. अनावर झालेल्या क्रोधाची राजा रावण किंमत आपल्या प्राणाने मोजतो.
ना राम पूर्ण पांढरा ना रावण पूर्ण काळा.
आपण राम रावण एकमेकासमोर उभे करतो. त्यांना शेजारी उभे करा आणि मग पहा.
रामाच्या आणि रावणाच्या चुकाच ज्याला आठवतात त्याचा रामही काळा आणि रावणही काळा.
रामाचे गुण आणि रावणाचे गुण ज्याला आठवतात त्याचा रामही पांढरा आणि रावणही पांढरा.
तोच राम तोच रावण. बदलते ती आपली नजर.
दिसला दगड , फास शेंदूर आणि आपटा डोक.
रावणाच मोठेपण रामाला पण मोठ करून गेल.
देव म्हणून पुजायला गेलात तर तर्काच्या कसोटीवर असंख्य न सुटणारे प्रश्न पडतील. त्याला माणूस म्हणून पहाल तर प्रत्येक माणसाला आपल्या आतच रामही दिसेल , रावणही दिसेल आणि हनुमानपण दिसेल.
त्याला देवत्व देण्यापेक्षा माणूस म्हणून पाहिलं तर राम समजेल.
आपल दुखण त्याला माणूस म्हणून समजून न घेता फक्त प्रतिक म्हणून देव्हाऱ्यात शेंदूर फासून ठेवण आहे.
त्याला माणसात आणा.सगळ सोप होईल.

आनंद शितोळे ©

No comments:

Post a Comment