स्त्रियांना मंदिरात / मंदिराच्या गाभार्यातही प्रवेश नाकारला जातो याविरुध्द सध्या आंदोलन सुरु आहे. या आंदोलनावर टीका करणारे काही लोक म्हणतात कि आधुनिक विचाराच्या स्त्रियांनी मंदिर, पुजा अर्चा, दर्शन यांत गुंतू नये.इतर काही म्हणतात की, दुष्काळ वगैरे इतर अधिक महत्वाचे प्रष्ण आहेत. केवळ शनिचा चौथरा हाच प्रष्ण आहे का?
मग मोहनदास करमचंद गांधी यांना देशात इतरत्र मीठ मिळत नव्ह्ते म्हणून ते चिमुठभर मीठ उचलायला दूरवर चालत दांडीला गेले होते का ?
भीमराव आंबेडकर यांना खूप तहान लागली होती आणि जवळपास पाणी मिळत नव्ह्ते म्हणून ते महाडच्या चवदार तळ्यावर पाणी प्यायला गेले होते का ?
मंदिर हे भक्तिभावनेचे स्थळ आहे. परंतु, मंदिर हे कुणा एकाचे खाजगी देवघर नाही. मंदिर सार्वजनिक आहे म्हणुनच मंदिरात प्रवेश देताना भेदभाव करणे हा अन्याय आहे.काही जातीना अस्पृष्य ठरवुन त्यांनाही मंदिरात प्रवेश बंदी होती. त्याविरुध्दही आंदोलने, सत्याग्रह झाले. त्यांनाही हेच सांगितले जायचे, "तुझ्या घरातही देव आहे, मंदिरातच कशाला जायला हवे?"
घरी बसुन पण देवाजवळ जाता येते हे मान्य असेल तर मग सर्वच देवळे मोडीत काढा ना! सर्वांनीच घरगुती स्वरुपात देवभक्ति करावी. परंतु, फक्त स्त्रियांनी घरगुती देवभक्ति करावी हे सांगण्यामागची मानसिकता पुरुषी आहे.
मंदिरात जाण्याचा... मंदिराच्या गाभाऱ्यात जाण्याचा... शनिच्या चौथऱ्यावर जाण्याचा अधिकार सर्वांना आहे. तसेच स्वत:च्या विचारसरणीनुसार मंदिरात, मंदिराच्या गाभार्यात, शनिच्या चौथर्यावर जायचे की नाही हे ठरविण्याचे स्वातंत्र्यही सर्वांना आहे.
प्रथा, परंपरा, वगैरे बिनबुडाची कारणे सांगुन घटनेने व कायद्याने दिलेला अधिकार कोणी हिरावून घेत असेल तर तो अन्याय आहे, म्हणून त्याविरुध्द संघर्ष करणे उचितच आहे.
एखादा पुरुष नास्तिक असूनही शनिच्या चौथऱ्यावर जाऊ शकलो, कारण तो पुरुष आहे. परंतु, स्त्रियांना मात्र सरसकट बंदी. हा अन्याय आहे.स्त्रियांना समान हक्क नाकारण्याची मानसिकता या मागे आहे. म्हणुन हा संघर्ष आवश्यक आहे.
No comments:
Post a Comment