गांधी फाळणीचे गुन्हेगार ?
अखंड भारताचे स्वराज्य ही मागणी होती. परंतु दुर्दैवाने फाळणी झाली. महात्मा गांधीच फाळणीला जबाबदार आहेत, असा आरोप गांधींवर करण्यात आला. पण नेमकं काय घडलं हे जाणुन घ्यायचं असेल तर स्वातंत्र्यापुर्वी आणि नंतर घडलेल्या घटना अधिक तपशीलाने पाहणं आवश्यक आहे.
इंग्रजांनी भारतावर आपलं वर्चस्व प्रस्थापित केल्यानंतर हिंदू-मुसलमान समन्वयाला खिंडार पाडलं. १८५७ च्या उठावात हिंदू-मुसलमान सैनिक, हिंदू राजे-मुसलमान बादशहा, त्यांचे सैन्य आणि सेनापती एका झेंड्याखाली एकत्र झाले होते. धर्मभेद व जातपात विसरुन सर्वजण खांद्याला खांदा लावुन ब्रिटीशांविरुद्ध लढले होते. हिंदू-मुसलमान एकीने ब्रिटीशांच्या छातीत धडकी भरली असणे स्वाभाविक आहे. "फोडा आणि राज्य करा" या नीतीचा अवलंब सुरु झाला. "एक बंदर दो बिल्ली" या गोष्टीसारखा खेळ त्यांनी चालु ठेवला. त्यानंतर झालेल्या घटना साधारण अश्या -
१. १८८५ साली राष्ट्रीय सभेची स्थापना, १९०५ साली मुस्लिम लीगची स्थापना.
२. लीगच्या नेत्यांमध्ये स्वतंत्र मतदारसंघांचे बीज इंग्रजांनी पेरले. याच बीजाचं पुढे फाळणीच्या विषवृक्षात रुपांतर झालं.
३. टिळक(कॉंग्रेसच्या बाजुने)-जीना(मुस्लिम लीगच्या बाजुने) यांनी १९१६ मध्ये "लखनौ करार" केला. त्यानुसार मुस्लिमांना स्वतंत्र मतदारसंघ देण्याचे मान्य केले गेले. तोपर्यंत लीग इंग्रजांच्या बाजुने होती. करारानुसार लीगने स्वातंत्र्यलढ्यात इंग्रजविरोधी भुमिका घेण्याचे मान्य केले.
जीना टिळकांचे अनुयायी होते. ते गांधींना सीनीयर सुद्धा होते. गांधींच्या कॉंग्रेसमध्ये उदयामुळे(१९१५) त्यांचे नेतृत्व मागे पडले.
४. १९२० साली गांधींनी असहकार आंदोलन सुरु केले. मुस्लिमांनी लढ्यात सहभागी व्हावे म्हणुन खिलाफत चळवळीला असहकार चळवळीचा भाग बनवले. जीनांचे नेतृत्व मागे पडले. पुढे त्यांनी लंडनला वकिली करणे सुरु केले. लंडनच्या गोलमेज परिषदेत जीनांची उपस्थिती होती, मात्र त्यांची कुणी विशेष दखल घेतली नाही.
५. १९३७ साली प्रांतीय निवडणुका होणार होत्या. जीनांनी या निवडणुकांना आपल्या राजकीय पुनरुज्जीवनाची संधी म्हणून पाहिले. जीना भारतात परतले. त्यांनी पुन्हा लीगचे नेतृत्व स्वीकारले. स्वतंत्र मतदारसंघांच्या आधारे लीगने चांगल्याच जागा जिंकल्या.
६. १९४० साली लाहोरला झालेल्या मुस्लिम लीगच्या परिषदेत वेगळ्या मुस्लिम राष्ट्र मागणीचा ठराव संमत करण्यात आला. मात्र त्यात "पाकिस्तान" हा शब्द नव्हता. "हिंदुस्थानात २ राष्ट्र आहेत. द्वीराष्ट्रवादाचा आमचा सिद्धांत आहे. सिवील वार(यादवी) झाली तरी आम्हाला पर्वा नाही." ही कट्टर भुमिका तोवर जीनांनी आपलीशी केली होती.
७. दुसरीकडे १९२३ साली स्वातंत्र्यवीर सावरकरांनी "हिंदुत्व" या आपल्या पुस्तकात द्वीराष्ट्र सिद्धांताचा उल्लेख केला होता. १९३७ साली अहमदाबाद येथे झालेल्या हिंदू महासभेच्या अधिवेशनात द्वीराष्ट्राचा मुद्दा त्यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणातून मांडला होता.
एका माणसाने मात्र अगदी अखेरपर्यंत द्वीराष्ट्र सिद्धांताचा अगदी स्पष्ट शब्दांत इन्कार केला होता. तो माणूस होता महात्मा गांधी ! "धर्माबरोबर राष्ट्र बदलत नाही." असा विचार मांडत गांधींनी जीनांच्या वेगळ्या राष्ट्राच्या मागणीला शेवटपर्यंत विरोध केला होता. जीनांना फाळणीपासून परावृत्त करण्यात गांधींना यश आलं नाही. पुढे ते त्यांनी बोलुनही दाखवलं. ते म्हणाले होते- मी माझ्या आयुष्य़ात दोन व्यक्तींना माझी बाजु पटवुन देवु शकलो नाही. एक मुलगा हरिलाल आणि दसरे जीना. फाळणीसाठी गांधींचा पाठिंबा मिळवण्यात जीनाही अपयशी ठरले.
गांधींनी माउंटबॅटन यांच्यापुढे एक प्रस्ताव ठेवला. त्यानुसार जीनांना पंतप्रधान करण्याची तयारी त्यांनी दाखवली. अखंड हिंदुस्थानातल्या एखाद्या प्रांताला पाकिस्तान नाव देण्यात यावे, अशीही तयारी दाखवली. मौलाना आझादांना ही भुमिका अजब मात्र "प्रॅक्टीकल" वाटली. जीना तयार होतील असेही त्यांना वाटले. "आणखीही योजना असु शकतात" असे सांगुन माउंटबॅटन यांनी ही योजना फेटाळली. शिवाय या योजनेवर कॉंग्रेस कमिटीतही चर्चा न होवु देण्याची दक्षता त्यांनी घेतली.
माउंटबॅटन यांनी चलाखीने गांधींना टाळुन लीग व कॉंग्रेसनेत्यांशी चर्चा केली. जीनांनी डायरेक्ट ऍक्शनची घोषणा दिली. परिस्थितीच अशी उद्भवली की, कॉंग्रेसला फाळणी स्वीकारण्याशिवाय पर्यायच उरला नाही. पंडित नेहरु- सरदार पटेल आदींनी फाळणीला मान्यता दिली. माउंटबॅटन योजनेवर कॉग्रेसने सह्या केल्या. रेडीओ, वृत्तपत्रांमधुन छापुन आल्यावर गांधींना याविषयी कळलं. गांधी त्यावेळी नौखालीत होते. त्यांनी नेहरु-पटेल यांना पत्र लिहून "आपण असा निर्णय घेतला हे मला समजण्यासारखं नाही" एवढंच लिहून कळवलं. त्यांच्या पत्राला नेहरुंनी उत्तर पाठवलं नाही. पटेलांचं उत्तर आलं - "आपण खुप दूर होतात, त्यामुळे
आपल्याशी सल्लामसलत करता आली नाही. खुप विचार करुन फाळणीचा निर्णय संमत करण्यात आला."
फाळणीबद्दल गांधींना राजकुमारी अमृत कौर यांनी सांगितले तेव्हा ते म्हणाले - "इंग्रज देशाचे विभाजन करणार, याचा अंदाज मला होता. ही फाळणी आम्ही रोखू शकलो नाही. मी फाळणी मानत नाही. लोक म्हणले, फाळणी झाली तर झाली असं समजा. आता एवढंच करावं की भुप्रदेशाचं विभाजन इंग्रज निघुन गेल्यावर आपण एकमेकांत चर्चा करुन ठरवावं. इंग्रजांना त्यात आणू नये." गांधींनी तसं कॉंग्रेस कमिटीला कळवलं होतं, परंतु त्यांचा विचार स्वीकारण्यात आला नाही.
विभाजन कसं करायचं हे इंग्रजांनी ठरवलं. बॉर्डर आखायला इंग्लंडवरुन सर सिरील रॅडक्लीफ ला इंग्लंडवरुन बोलावलं गेलं. त्याने पहिल्यांदाच भारतात पाऊल ठेवलं होतं. अश्या अनभिज्ञ माणसाला जाणकार मानलं गेलं. हिंदू बहुसंख्यिक गावे पाकिस्तानात, तर मुस्लिम बहुसंख्यिक गावे भारतात अशी अजब विभागणी या माणसाने केली. रॅडक्लीफ लाईननुसार विभाजन झालं तर प्रचंड हिंसा होईल, रक्ताचे पाट वाहतील, असं गांधीजींनी अगोदरच बजावलं होतं. जागतिक इतिहासातले हे एक मोठे स्थलांतर होते. स्थलांतर करायला वेळही दिला गेला नाही. परिणामी प्रचंड गोंधळ, कत्तली, दंगली उसळल्या. सीमारेषेजवळ जी गावे होती त्यातल्या बहुसंख्य मुसलमानांना आपलं गाव पाकिस्तानात जावं असं वाटत होतं. त्यांनी हिंदूंना मारलं. ज्या गावात हिंदूंची संख्या अधिक त्यांनी आपण भारतात राहावं यासाठी मुस्लिमांना मारलं. स्वतंत्र भारताचे दुसरे राष्ट्रपती डॉ. झाकीर हुसैन यांनाही त्यांचा मुसलमानी पोशाख पाहुन अमृतसरला मारहाण करण्यात आली होती.
१५ ऑगस्ट ला देश स्वतंत्र झाला तेव्हा बापू कलकत्त्याला दंगली मिटवत होते. १३ ऑगस्ट ला पंडित नेहरुंचा संदेश घेवुन सुधीर घोष आले. स्वातंत्र्याचा पहिला उत्सव साजरा करण्यासाठी राजधानीत येण्याचा संदेश त्यांनी गांधींना सांगितला; पण इच्छा नसल्याने गांधींनी दिल्लीला जाणे टाळले. पानगळीत पडलेलं एक पिंपळाचं पान बापूंनी उचललं आणि "या पानासारखी माझी स्थिती आहे" असं म्हणाले.
माउंटबॅटन यांनी गांधींना बाजुला ठेवुन आम्ही फाळणी करण्यात कसे यशस्वी झालो हे त्यांच्या लंडनमधील एका भाषणात सांगितले आहे. पंडीत नेहरुंनी न्युयॉर्कमधल्या एका भाषणात "फाळणीमुळॆ लोकांच्या अदलाबदलीचे इतके भयानक परिणाम होतील असं माहिती असतं तर आम्ही फाळणी मान्य केली नसती" असं म्हटलं आहे.
जीनांनी आपल्या शेवटच्या आजारपणात आपल्या डॉक्टरांकडे एक उल्लेख केलाय. त्यांना विचारलं की तुमच्या आयुष्य़ातील सर्वात मोठी चुक कोणती ? त्यांनी उत्तर दिलं - "डीव्हीजन ऑफ इंडीया" ! त्या डॉक्टरांचं नाव आता आठवत नाही, पण त्यांच्या पुस्तकात याचा उल्लेख आहे.
आता यावरुन तुम्हीच ठरवा, खरंच गांधींनी फाळणी केली का ?
पुर्ण लेख - http://www.misalpav.com/node/20331
महापुरुषांवरील निवडक व माहिती नसलेले असे प्रेरणादायी लेख व अफवावरील ऊत्तरे खालील पेजवर मिळतील
https://m.facebook.com/mahatmagandhipeace
तसेच चर्चा करायची असल्यास सर्व गांधीविचारक व विरोधक यांचा खालील ग्रुप जॉईन करावा
https://m.facebook.com/groups/562250187168592