Blog Archive

Tuesday, 16 February 2016

जो हिंदू आहे,फक्त तोच देशभक्त? - मिलींद धुमाळे

जो हिंदू आहे,फक्त तोच देशभक्त?

- मिलींद धुमाळे.

आपल्याकडे एक गंमतच आहे, “मी हसतो दुसऱ्याला अन शेंबूड माझ्या नाकाला”अशी आपल्या सर्वांची गत आहे.आता जी उन्मादी पिढी आहे,विशेषतः ८०-९०च्या दशकातील आणि त्यानंतर जन्माला आलेली त्यांच्यात सारासार विवेकबुद्धी वापरण्याकडे कल अजिबात नसून प्रसारमाध्यमांवर विसंबून राहण्याचा विशेष भर आहे.यातही माहितीतंत्रज्ञानाचा स्फोट झाल्यामुळे सोशल मिडिया क्रांतिकारक माध्यम वाटत असला तरी इथे सेकंदा-सेकंदाला आदळणाऱ्या बातम्यांची विश्वासार्हता तपासायच्या फंदात कुणी पडत नाही. ज्यांना लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ म्हणले जाते त्यांनीही आपली नैतिकता शेटजी-बनिया राजकारण्याच्या शेजेवर सजविण्यात धन्यता मानली आहे.त्यामुळे तत्व आणि विचार याच्याशी कुणाला सोयरसुतक राहिलेलं नाही.तेही एकवेळेस परवडले असते परंतु आता देशाच्या सार्वभौमत्वाशी खेळण्याचा विचित्र खेळ सुरु झाला आहे. देश आज भांडवलदारांच्या हाताचे खेळणे झाला आहे.

देशात कोणत्या मुद्यावर चर्चा झाली पाहिजे हे आता भांडवलादार उद्योगपतीच्या मर्जीवर विसंबले आहे.आपण नकळत या खेळाचा एक भाग होऊन जातो आहोत.तुम्हाला आज तेवढेच पुढ्यात ठेवले जाते जेवढे वाढले की गहजब  आणि  अस्वस्थता वाढेल, ही गोष्ट धार्मिक-जातीय गोष्टीशी इतकी घट्ट बसली आहे की तुम्हाला आवडो न आवडो त्याकडे ठरवूनही दुर्लक्ष करता येत नाही.मग अस्वस्थ मन काहीतरी प्रतिक्रिया दिल्याशिवाय रहात नाही. चित्रपटगृहात राष्ट्रगीतासाठी उभे राहण्याचा मुद्दा राष्ट्रीय पातळीवर चर्चिला जातो. देशभक्ती सिद्ध करण्यासाठी चित्रपट पाहण्या अगोदर उभे राहण्याचा बालीशपणा आपल्याच देशात चालू शकतो, देशाचे महत्व पटवून घेण्यासाठी “निदान” चित्रपट गृहात राष्ट्रगीत वाजविण्याची प्रथा सुरु झाली.हे खरे आपले अपयश नाही का? हे जसे चूक तसे शंभर–दीडशे भावनिक नाजूक बेंड असलेल्या हलक्या काळजाच्या भावना दुर्लक्षून त्यांच्या आग्रहाला नकार देत उभे न राहण्याचा बालिशपणा करणे हेही अक्षम्य आत्मघातकी.

१३ डिसेंबर २००१ साली संसदेवर हल्ला घडवून आणण्यात आला.या  हल्ल्याचा सूत्रधार अफजल गुरूला फाशी सुनावण्यात आली.दिली. अफजलने चौकशीत अनेक गोष्टी कबूल केल्या होत्या,अतेरिकी पाकिस्तानातून आले हेही सांगितले.युट्युबवर त्याचे व्हिडीओ आहेत.झाल्या कृत्याबद्दल त्याने वेळोवेळी जाहीर पश्चाताप व्यक्त केला होता.गुन्हा केला हेही कबूल केले.आपल्या देशात फाशी देण्याबद्दल मतमतांतरे आहेत.फाशीच्या शिक्षेमुळे गुन्हे रोखण्याचा उद्देश पूर्ण होत नाही असे म्हणत भारताच्या दस्तुरखुद्द कायदे आयोगाने फाशीच्या शिक्षेला विरोध केला होता. असाच विरोध समाजकार्य  करणाऱ्या अनेक व्यक्ती संघटना अभिनेते यांनी केला होता.अफजल गुरूला फाशी देण्यास भारिपचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी विरोध केला होता.अफझलला फाशी दिल्यास काश्मीरमधल्या दहशतवाद्यांसाठी तो हुतात्मा ठरेल,त्याऐवजी जेलमध्ये ठेवणंच चांगलं असं त्यावेळी आंबेडकर म्हणाले होते.अफजलला फाशी न देता जन्मठेप दिली असती तर? परंतु आपला सुडाग्नी थंड झाला नसता... अतिरेकी जिवंत असणे सहन झाले नसते.अतेरिकी जीव घेतात आपण  वेगळे काय करतो? बरं फाशी दिल्याने अतिरेक्यांना दहशत वाटते? तर नाही त्यांना तर जन्नतमध्ये 72 हूर मिळणार आहेत,त्यामुळे ते आनंदाने मरायला  तयार असतात. त्यांना मरणाचे भय नाही. ते हसत हसत ‘शहिद’ होतात.हे आपण लक्षात का घेत नाही? अफजलला फाशी दिली आणि त्या फाशीचा बदला घेण्यासाठी हैदराबादमध्ये बॉम्बस्फोट घडवून आणल्याची माहिती समोर आली होती.यात दहा जण मृत्यूमुखी पडले होते.

अफगाणिस्तानात मझार-ए-शरीफ येथे भारतीय वाणिज्य दूतावासावर केलेला दुसरा हल्ला हा अफजल गुरू याच्या फाशीचा बदला घेण्यासाठीच  करण्यात आला होता, असे तपासात निष्पन्न झाले.या हल्ल्यात सामील चार दहशतवाद्यांनी त्यांच्या रक्ताने तसे भिंतीवर उर्दू भाषेत लिहून ठेवले होते.‘अफजल गुरू का इंतेकाम, एक शहीद हजार फिदाईन’ याकुब मेमनचे प्रकरण असेच आहे.त्याला फाशी देवू नये म्हणून  भाजपचे खासदार शत्रुघ्न सिन्हा यांनी राष्ट्रपतीला पत्र लिहिले होते. रोहितला देशद्रोही ठरविणारे भाजपा खासदार शत्रुघ्न सिन्हा यांना देशद्रोही का मानत नाहीत? अशी सिलेक्टिव्ह देशभक्ती असू शकते काय? मुळात याकुब आरोपी नाही त्याला शिक्षा देऊ नका हा मुद्दाच नव्हता, तर कोणती शिक्षा दिली जावी हा मुद्दा आहे, “घर घर में पैदा होंगे याकुब” याचा अर्थ उन्मादात विवेक हरवल्यामुळे आपल्या शंभर ग्रॅम मेंदूत जात नाही. अफजल गुरूचा बदला घेण्यासाठी ज्या धमक्या देण्यात आल्या त्यानुसार याकुबमुळे सुद्धा तशीच परिस्थिती निर्माण झाली असती.हा कयास होता.ही भावना उलट देशाच्या सुरक्षेच्या काळजीतून आलेली. यावरून एखादी व्यक्ती देशद्रोही कशी काय ठरवली जाऊ शकते? हा लावलेला कयास काही चुकीचा नाही, कारण देशभरातून आयसीसमध्ये भरती होण्यासाठी अनेक तरूण तयार होते; त्यांची वेळीच धरपकड झाली हे आपले सुदैव. त्यामुळे द्वेषाची राजनीती कुठपर्यंत ताणत ठेवायची याचा विचार दोन्ही बाजूंनी झाला पाहिजे. कारण यात भरडला जाणार आहे तो सामान्य नागरिक.ज्याचा राजकारण, धर्मकारण याच्याशी थेट संबंध नाही.त्यामुळे दहशतवाद हिरवा असो नाहीतर भगवा त्यावर परिणामकारक उपाय योजनांची आवश्यकता आहे. केवळ फाशीने तो आटोक्यात येणार नाही.दादरीत मंदिराच्या भोंग्यावरून पद्धतशीर कट करून अखलकला मारण्यात आले.हि घटना देशभक्तीचे प्रतिक कशीकाय मानली जाईल? याचा अर्थ जो हिंदू आहे तोच देशभक्त अशी सरकार आणी सरकार समर्थकांची भूमिका दिसते.

 वरवर कितीही सबका साथ सबका विकास अशी प्रलोभने दाखविली तरी सरकार हे भांडवलशाही व्यवस्थेला पूरक ठरते आहे,हे आता गुपित राहिलेले नाही. मुख्यमंत्र्यांनीही इथे आपले मत देण्याचा मोह टाळता आला नाही. हेडलीच्या जबानीवर संशय घेणारे देशद्रोही आहेत असे बालिश वक्तव्य राज्याचे नेतृत्व करणारी व्यक्ती करत असेल तर ते फार दुर्दैवी आहे.आज आपण राजकीय, आर्थिक आणि सामाजिकदृष्ट्या विभाजित आहोत.एकमेकांशी युद्धरत असलेल्या प्रतिस्पर्धी गटांत आपण विभागले गेलो आहोत.त्यामुळे अशावेळी जी प्रगल्भता हवी ती दाखविण्यासा प्रत्येकजण कमी पडतो आहे. शेतकरी आत्महत्या,महागाई ,भ्रष्टाचार ,काला धन, प्रत्येकाच्या खात्यात 15 लाख रुपये विकास मेक इन इंडिया वगैरे गोष्टीचे काय झाले? जनतेने बहुतेक या गोष्टींसाठीच मत दिले होते,आज ते  मुद्देच गायब आहेत.

No comments:

Post a Comment