Friday, 17 March 2017

तुमच्या आत्महत्या फार किरकोळ गोष्ट आहे

तुमच्या आत्महत्या फार
किरकोळ गोष्ट आे...
अवकाळी पडलेल्या गारा
हातात धरून मिडियावर
आम्ही पाहतो तेव्हा,
फक्त गाराच दिसतात डोळ्यांना.
दिसलं असतं तुझं दुःख तर
महालक्ष्मीला सोन्याची पालखी अर्पण
झालीच नसती..
सध्यातरी तू
वक्तृत्व स्पर्धेचा,
कवीच्या कवितेचा
गजलकाराच्या गजलेचा
चॅनेलवाल्यांच्या टी आर पी चा,
वर्तमानपत्राचा,
विरोधकांच्या तोंडचा,
आणि कर्जमाफीचा
फक्त तू एक विषय आहेस...
बाकी काहीच नाही.
कर्जमाफी दिल्यानंतर
आत्महत्या होणार नाही.
याची हमी देवेंद्राला द्या....
मेघराजाला अक्कल नावाची गोष्ट
आत्ता उरली नाही..
(ज्यांना समजले त्यांना).
कारभार कसा करायचा म्हणतात..
अहो जसा प्रचार केलात
तसा करा...
पोरांनो रानातल्या गारा गोळा करा.
बापाला एकटा सोडू नका..
बाभळीच्या फांद्या तोडा..
दावणीचे कासरे लपवा..
कीटकनाशक औषध फेकून द्या...
आणि पोरांनो बाप वाचवा.
बाप वाचवा....
............................

दंगलकार नितीन चंदनशिवे.
कवठे महांकाळ.
सांगली.

Friday, 10 March 2017

उपवासाचा एक दिवस / विजय तरवडे

उपवासाचा एक दिवस / विजय तरवडे

सवयीने तो उशीरा उठला. ती केव्हाच उठली होती आणि आंघोळ करून शंकराला निघालेली होती. त्याला घाईघाईने चहा करून देत ती म्हणाली, “मी जाऊन येते. तोवर घरातला पसारा आवरा, जमल्यास. लगेच फेसबुकवर बसू नका. थोडी बायकोला मदत करा.”

“नक्की यार. तू जाऊन ये. देवाला माझा देखील नमस्कार सांग. नाहीतर मेल्यावर तू एकटी स्वर्गात जाशील आणि मी नरकात जाईन. तिथं माझ्या जुन्या मैत्रिणी मला भेटल्यावर तुला स्वर्गातलं अमृत गोड लागणार नाही.”

ती फणकारली.

“आज नाश्त्याचं काय?”

“तुम्ही चहा घ्या आणि घरातला पसारा आवरा. जमलं तर आंघोळ करून घ्या. आज उपवास आहे. मी देवळातून आले की तुमच्या आवडीची साबुदाण्याची खिचडी, बटाट्यांची भाजी, रताळ्याचा कीस आणि शेंगदाण्यांची आमटी करणारे. सगळी तयारी करून ठेवलीय.”

“ओके. जाव तुम.”

ती गेली. त्याने चहा घेतला. अजून एक चहा घ्यावा म्हणून स्वयपाकघरात गेला. बायकोने केलेली तयारी बघून त्याचं अंतःकरण गलबललं. किती बिचारी आपल्यासाठी झिजते. चलो, आपण तिला सरप्राईज देऊ.

त्याने एका शेगडीवर चहा ठेवला आणि भराभर कामाला लागला. आधी खिचडी बनवली. चहा ओतून घेतला. तो पीतपीत एका बाऊलमध्ये खिचडी काढून ओव्हनमध्ये लपवून ठेवली. उकडलेलं एक रताळे स्मॅश करून त्यावर जिऱ्याची आणि मिरच्यांची फोडणी ओतली. त्यात शेंगदाण्यांचा कूट, दही, मीठ, साखर कालवून आणि वरून कोथिंबीर टाकून ती चटणी सजवली आणि फ्रिजच्या एका कप्प्यात लपवली. त्याच्या हातची ही चटणी म्हणजे त्यांच्या सुखी संसाराचा एक युएसपी आहे. शेंगदाण्यांची आमटी बनवली. त्यात वरून कोथिंबीर टाकून बाऊलमध्ये ओतून फ्रीजमध्ये लपवली. उकडलेल्या बटाट्यांची भाजी बनवली. ती देखील एका बाऊलमध्ये भरून फ्रीजमध्ये लपवली. कढई, चहाची भांडी, वगैरे सरंजाम स्वच्छ धुवून जागच्या जागी मांडल्यावर त्याला आठवलं.
गेल्या आठवड्यातच तिचा चेकअप झालेला आहे. च्यायला ते शुगर आणि कोलेस्टेरॉल वगैरेचे रिपोर्ट्स खतरनाक होते. डॉक्टरने गोळ्यांच्या पॉवर्स पण वाढवल्यात. असं असताना आपण तिच्यासाठी एवढे पदार्थ बनवले म्हणजे तिला विष घालण्यासारखंच आहे. पण काय करणार. तिला तर हे खूप आवडतं. आपल्याला देखील आवडतं.

थोडंसं डोकं चालवून त्यानं फ्रिजच्या खालच्या कप्प्यातून पुदिना काढला. त्याची पाने स्वच्छ धुवून-चिरून खिचडी, आमटी आणि भाजीवर पेरली.

तेवढ्यात बेल वाजली आणि दार उघडल्याचा आवाज आला. पाठीमागून बायको आली.

“आवरलं का सगळं?”

“येऊन बघ.”

तिनं सगळे पदार्थ बघितले आणि लईच गहिवरली.

“रताळ्याची चटणी देखील केलीय. तुझ्या त्या मैत्रिणीनं खाल्ली तर नवऱ्याला घटस्फोट देऊन माझ्यावर लाईन -”

“जरा तोंडाला लगाम देता का? ती बाहेर बसलीय.” बायकोने घाईघाईने त्याचे तोंड दाबले.

“सॉरी.”

“तुमच्या जिभेला हाडच नाही.”

“सणाच्या दिवशी नॉनव्हेजची आठवण काढू नकोस. चल आपण प्लेट्स भरू.”

तिघे खायला बसल्यावर पहिल्या एक दोन बेसावध घासांनंतर बायकोची मैत्रीण म्हणाली, “या सगळ्यात पुदिना घातलाय का? उपवासाला नाही चालत.”

बायकोने खवळून त्याच्याकडे पाहिले.

“अगं तुला या पदार्थांचा त्रास होऊ नये म्हणून -”

“मी उपवास करीत नाही. मला काही प्रॉब्लेम नाही. तुझं काय ते बघ बाई,” मैत्रीण म्हणाली.

बायकोने सगळे पदार्थ खाल्ले. पण उपवास मोडला म्हणून खाताना बडबड केली. शिवाय जाताना मैत्रीण बॉम्ब टाकून गेली –

“रताळ्याची चटणी एकदम क्लास झालीय बरं का.”
मैत्रीण गेल्यावर घरात काय घडले त्याची इतिहासात यथावकाश नोंद होईल.

* * *

© विजय तरवडे

तरुण भारत - ०५ ०२ २०१७

सूचना -
१.पोस्ट शेअर केली तर चालेल.
२.पोस्ट चोरणाऱ्या पुरुषाच्या बायकोला तिच्या मैत्रिणींचे नवरे रताळ्याची चटणी खाऊ घालून पटवतील.
३.चोरणाऱ्या स्त्रीचा नवरा तिच्या मैत्रिणींवर लाईन मारीत फिरेल.

19-20 वर्षाची सर्प मैत्रीण मृण्मयी जाधव

"हॅलो S .. मृण्मयी जाधव आहेत का?  प्लीज लौकर या मॅडम. आमच्या इथे नाग निघाला आहे.."

'फुस्स्स्स्' करून तो जेव्हा सणसणीत फणा काढून पुढे उभा रहातो ना... तेव्हा भल्याभल्या 'दादा'लोकांची , नको तिथे 'मर्दुमकी' गाजविणार्‍या 'शूरवीरांची' बोबडी वळते.. पाय लटलट कापू लागतात ... मग त त प प करत मोबाईल काढून एफ् .वाय. ला शिकत असणार्‍या अवघ्या १९-२० वर्षांच्या मृण्मयीला मदतीसाठी बोलावले जाते...

...फोन येतो तेव्हा मृण्मयी एकतर काॅलेजमध्ये असते किंवा घरी ,नाहीतर काॅलेजच्या वाटेवर. लगेच पायात शूज घालून ती 'कामगिरीवर' निघते. जाताना 'त्याला अजिबात मारू नका किंवा कुठलीही इजा करू नका.फक्त कुठे जातोय याकडे लक्ष ठेवा.' अशा सूचना द्यायला विसरत नाही...

...आणि एखाद्या आवडत्या-जवळच्या मैत्रीणीला भेटायला जायच्या आतुरतेने , लगबगीने आणि प्रेमाने ती त्या सापाला भेटायला निघते ! अतिशय हळूवारपणे,नाजूकपणे त्या सापाला पकडून आपल्या सॅकमध्ये ठेवते आणि त्याची आवश्यक ती काळजी घेत लांब एखाद्या जंगलात किंवा नैसर्गिक अधिवासात सुरक्षित ठिकाणी सोडून येते...विशेष म्हणजे या कामासाठी स्नेकस्टिक , स्नेकहूक किंवा स्नेकटाॅग यापैकी काहीही ती जवळ बाळगत नाही ! विषारी - बिनविषारी सगळे साप ही अफाट मुलगी नैसर्गिक पद्धतीने अलगद पकडते आणि लिलया हाताळते !!

सातार्‍यातील जकातवाडी येथील यशवंतराव चव्हाण समाजकार्य महाविद्यालयात F.Y.ला शिकणार्‍या मृण्मयीला मी आज आवर्जुन भेटायला गेलो... खूप गप्पा मारल्या...रोज काॅलेजला गेल्यावर तिच्या मैत्रीणी तिच्या सॅकपासून चार हात लांब असतात हे सांगताना ती खूप हसत होती...कारण काॅलेजला येताना वाटेत कुठेतरी दिसलेला आणि मनुष्यवस्तीत त्याला कुणी मारू नये म्हणून पकडून सॅकमध्ये ठेवलेला एखादा विषारी किंवा बिनविषारी साप   तिच्या सॅकमध्ये असण्याची शक्यता असतेच असते ! एकदा जकातवाडीच्या एका ओढ्यात सापडलेला 'कोब्रा' कुणी मारू नये म्हणून पकडून सॅकमध्ये ठेवून ती वर्गात गेली होती..अर्थात नंतर वेळ मिळाल्यावर ती त्याला सुरक्षित नैसर्गिक अधिवासात नेऊन सोडणार होती..पण वर्गात एकच घबराट उडाली होती हे सांगताना तिला हसू आवरत नव्हते...

तिचे मित्रमैत्रीणी तिला 'साप पकडी' , 'सापाडी' , 'गारूडी' अशा  नावांनी चिडवतात , चेष्टा करतात...पण तिचा 'फोकस' अजिब्बात हलत नाही !

ती मित्रमैत्रिणींची भिती समजू शकते कारण ती सुद्धा लहानपणी घरात निघालेला आणि सिलेंडरला वेटोळे मारून बसलेला साप पाहिल्यावर त्यांच्यासारखीच घाबरली होती ..पण तिचा मामा सर्पमित्र स्वप्निल साळूंखे याने त्या सापाला अलगद पकडले आणि तिच्या लक्षात आले की 'अरे ! मी याला पाहून घाबरले होते पण हा साप मला पाहून माझ्यापेक्षा जास्त घाबरलेला होता. निरूपद्रवी आहे हा !' मग तिने कुतूहल म्हणून मामाकडून सापाविषयी सगळी माहिती मिळवली.असंख्य पुस्तके वाचली. व्हिडीओज पाहिले. मग मामानेही तिला साप पकडण्याचे व्यवस्थित ट्रेनिंग दिले. आज तिच्याकडे '#सर्पमैत्रीण' असे अधिकृत ओळखपत्र आहे !

तिचे शिक्षक प्रा. भाईशैलेंद्र माने गप्पा मारताना मला म्हणाले, "अहो किरणसर सापाचे काय घेऊन बसलाय , आमच्या काॅलेजच्या मागच्या डोंगरात बिबट्याचा वावर आहे हे कळाल्यावर ही पोरगी त्याला बघण्यासाठी त्याच्या पावलांच्या ठशांचा मागोवा घेत डोंगराकडे चालली होती...!" यावर मी तिला विचारले असता ती अतिशय #निरागसपणे फक्त एवढेच म्हणाली "मला जंगली प्राणी खूप आवडतात !"

पुस्तकात आणि आता व्हाॅटस् अॅप-फेसबुकवर महिला दिनानिमित्त,मदर्स डे वगैरेला वाचून गुळगुळीत झालेले अशा पद्धतीचे एक वाक्य कायम समोर येते की , 'धाडसाचे, साहसाचे आणि निग्रहाचे दूसरे रूप म्हणजे स्त्री' !

...आज मृण्मयी रहात असलेल्या आणि शिकत असलेल्या कोंडवे-जकातवाडी परीसरातील शेकडो विषारी-बिनविषारी सापांना 'जीवदान' देणारी , खर्‍या अर्थाने #मर्दानी आणि रणरागिणीची 'वृत्ती' असणारी मृण्मयी भेटली त्या वाक्याचा पुरेपुर प्रत्यय आला !

#सलाम_मृण्मयी !!!

- किरण माने.

रमेश गोरख घोलप.- स्पर्धापरीक्षेच्या क्षेत्रातील अनेक गैरसमज मोडीत काढून यश आपल्या जवळ आले आहे ही भावना निर्माण करणारा एक संघर्षमय जीवनप्रवास...

*जन्मस्थळः महागांव, ताःबार्शी.(सोलापूर)
*जन्मतारीखः ३० एप्रिल,१९८८.
*आई- अशिक्षित आणि घरोघरी जाऊन बांगड्या भरण्याचा व्यवसाय.
*वडीलः रमेश १२ वीत शिकत असताना निधन.
*प्राथमिक शिक्षण- जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, महागांव.
*माध्यमिक शिक्षणः संत सावता माळी विद्यालय, अरण. (१०वी-८४.४०%)-२००३.
*महाविद्यालयीन शिक्षणः श्री शिवाजी महाविद्यालय बार्शी. (१२ वी सायन्स शाखा -८८.५०%)-२००५
*डिप्लोमा शिक्षण(D.Ed): शं. निं. डी. एड्. कॉलेज, बार्शी.(२००९).
*पदवीचे शिक्षणः यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ, नाशिक.(विषय-इतिहास)-२०१०.
*नोकरी-(२००९-१० )- सोलापूर जिल्ह्यातील माढा तालुक्यात बावी येथे जि.प. शाळेत शिक्षकाची नोकरी.
*सप्टेंबर २००९ साली स्पर्धापरीक्षेच्या तयारीसाठी पुण्यात.
*२०१० साली- यू.पी.एस.सी. त अपयश.
*२०११ सालच्या यू.पी.एस.सी. परीक्षेतून आय.ए.एस. पदी निवड.(निकाल ४ मे,२०१२)
*२०११ साली दिलेल्या परीक्षेत महाराष्ट्रात एम.पी.एस.सी. परीक्षेत महाराष्ट्रात विक्रमी गुणांनी प्रथम.(निकाल-३० जून २०१२).

*सध्या झारखंड राज्यामध्ये खूंटी जिल्ह्यात एस.डी.एम. या पदावरती कार्यरत...

**निकालाची वैशिष्ट्ये-
१) कोणताही क्लास लावला नाही. फक्त मुलाखतीसाठी क्लासचा उपयोग.
(आय.ए.एस. होण्यासाठी क्लास लावावाच लागतो या समजूतीला फाटा दिला)

२)दोन वर्षे इतक्या अल्प कालावधीत यश.
(स्पर्धापरीक्षेत यशासाठी ५ वर्षे तरी अभ्यास करावा लागतो ही गैरसमज दूर केला.)

३) सरकारी शाळेतून शिक्षण.
(आय.ए.एस. होण्यासाठी इंग्रजी माध्यमाच्या शाळेतून शिकावे लागते हा समज मोडून काढला)

४) आई अशिक्षित व बांगड्या भरण्याचा व्यवसाय. वडीलांचे १२ वीत असताना निधन-
(अधिकारी होण्यासाठी खूप श्रीमंत आणि सुशिक्षित घरात जन्म व्हावा लागतो हे चुकीचे मत.खोडून काढले)

५). मुक्त विद्यापीठातील पदवीधर- अधिकारी होण्यासाठी पुणे, मुंबईसारख्या शहरांमध्ये नामांकित महाविद्यालयांत शिकावे लागते हे मत बदलायला भाग पाडले.

६)आयुष्यात प्रथम दिल्लीला मुलाखतीसाठीच गेले- तयारीसाठी दिल्लीला जावेच लागते हा गैरसमज खोडून काढला.

७)एकाच वर्षी आय.ए.एस. व त्याच वर्षी एम.पी.एस.सी. मध्ये प्रथम क्रमांक येण्याची पहिलीच वेळ-नियोजनबद्ध अभ्यास केल्यास एकावेळी दोन्ही परीक्षेत यश मिळविणे शक्य आहे हे दाखवून दिले.

८)एम.पी.एस.सी. च्या निकाला आधी आत्मविश्वासाने मी महाराष्ट्रात प्रथम येईल म्हणून आत्मविश्वासाने सांगणारा विद्यार्थी- 'नशिबात असल्याशिवाय मिळत नाही' हे म्हणणे चुकीचे ठरवून स्पर्धा परीक्षा हा नशिबाचा नव्हे तर प्रयत्नांचा डाव आहे हे दाखवून दिले.

जर रमेश घोलप करू शकतात, तर मी का नाही ? हा प्रश्न मनाला नक्की विचारा...
कोणतीही गोष्ट अशक्य नाही..फक्त निर्धारपूर्वक योग्य दिशेने होणारे प्रामाणिक कष्ट महत्वाचे आहेत...

"कुछ किए बिना जयजयकार नहीं होती।
कोशिश करनेवालों की कभी हार नहीं होती।

========================
        👆🙏कृपया आत्मविषश्वास वाढवण्यासाठी लेख मुलांना वाचुन दाखवा तसेच प्रतिक्रिया अवश्य द्या
ब्लॉग फॉलो करा
    !!!!!     !!!!!     !!!!!  
=================

होय,मी सावित्री ज्योतिबा फुले बोलतेय- सूर्यकांत डोळसे

महाराष्ट्रातील प्रसिद्ध वात्रटिकाकार, व्याख्याते, मुक्त पत्रकार, कवी सूर्यकांत डोळसे यांची डोळ्यात झणझणीत अंजन घालून आत्मपरीक्षण करायला लावणारी अत्यंत लोकप्रिय अशी मालिका वात्रटिका
...................
होय,मी सावित्री ज्योतिबा फुले बोलतेय....
....................

होय,मी सावित्री ज्योतिबा फुले बोलतेय....
एरव्ही बोललेही नसते,
पण माझ्या विचारांचे
तुम्ही घोटून घोटून क्रिम केलेय.
चक्क माझी देवी बनवून
मला फोटोमध्ये फ्रेम केलेय.

जमेल तेंव्हा,जमेल तसे
माझे सोईनुसार कौतुक करता.
खरे दु:ख याचे की,
तुम्ही मला गृहित धरता.
त्याचा राग मी तुमच्यासमोर खोलतेय..
होय,मी सावित्री ज्योतिबा फुले बोलतेय....

कुर्‍हाडीचा दांडा गोतास काळ व्हावा,
सगळ्या गोष्टी डोक्यावरून गेल्यात.
ज्या माझ्या वारसा सांगतात,
त्याच बेईमान झाल्यात.
असे होईल,मला काय माहित?
मला कुठे पुढचे दिसले होते?
एका वेगळ्या जगासाठी
मी शिव्याशाप,
दगडाबरोबर शेणही सोसले होते.
तुमच्याच शब्दात सांगायचे तर
रात्रंदिवस घासले होते.
आज मी कसले घाव झेलतेय?
होय,मी सावित्री ज्योतिबा फुले बोलतेय....

ही काही उपकाराची भाषा नाही.
आजच्या बाजारू समाजसेवेसारखा
हा बेंडबाजा अगर ताशा नाही.
मी विसरून गेले होते,
आम्ही कोणकोणते विष पचवले आहे.
हल्ली मात्र तुम्ही
आमच्या आत्मसन्माला डिचवले आहे.
म्हनूनच तुमच्या बहिर्‍या कानी
हे गार्‍हाणे घालतेय.
होय,मी सावित्री ज्योतिबा फुले बोलतेय.....

माय मावल्यांनो,लेकीबाळींनो.
तुम्ही शिकलात सवरलात.
पण नको तेवढ्या शहाण्या झालात.
विकृत स्त्रीमुक्तीच्या
प्रत्येकजणी कहाण्या झालात.
माझा वारसा सांगून,
स्वार्थासाठी राबता आहात.
या सगळ्या संतापापुढे
आज मी भिड्भाड भुलतेय.....
होय,मी सावित्री ज्योतिबा फुले बोलतेय.....

बाईपणाचे दु:ख काय असते?
मी तुमच्यापेक्षा जास्त भोगलेय.
आरशात पाहून सांगा,
मी सावित्रीच्या शब्दाला जागलेय?
तकलादू आणि भंपक
स्त्रीमुक्तेची नशा
तुम्हांला आज चढली आहे.
कपडे बदलेले की,
पुरोगामी होता येते,
ही फॅशन तुम्ही पाडली आहे.
शिकली सवरलेली माझी लेक
संस्कृतीच्या नावाखाली
नाकाने कांदे सोलतेय..
होय,मी सावित्री ज्योतिबा फुले बोलतेय.....

मान नको,पान नको,
आमचे उपकारही फेडू नका.
किर्तन-बिर्तन काही नको
झोडायची म्हनून
भाषणंही झोडू नका.
वाघिणीचे दूध पिऊन
कुत्र्यांसारखा गोंडा घोळीत आहात.
धर्म-संस्काराच्या नावाखाली
टाकाऊ परंपरा पाळीत आहात.
तुमच्या चिपाडलेल्या डोळ्यात
म्हनूनच हे अंजन घालतेय...
होय,मी सावित्री ज्योतिबा फुले बोलतेय.....

तुम्हांला आज
काहीसुद्धा सोसायचे नाही.
काढणारे काढीत आहेत
तुम्हांला शाळा काढीत बसायचे नाही.
तुम्ही फक्त पुरोगामित्त्वाचा
खरा वसा घ्यायला पाहिजे.
एखादा दुसरा ’यशवंत’ शोधून
त्याला आधार द्यायला पाहिजे,
शाळा कॉलेजचे पिक तर
हायब्रिडसारखे डोलतेय.....
होय,मी सावित्री ज्योतिबा फुले बोलतेय.....

मनमानी आणि स्वैराचाराला
पुरोगामित्त्वाचे लेबल लावणे,
यासारखी दुसरी सोपी युक्ती नाही.
फक्त नवरे बदलणे,
घटस्फोट घेणे,
ही काही स्त्रीमुक्ती नाही.
माझी खरी लेक तीच,
जी सत्यापूढे झुकत नाही.
सावित्री आणि ज्योतिबांपूढे
आंधळेपणाने माथा टेकत नाही.
माझी खरी लेक तीच,
आम्हांलासुद्धा नव्याने तपासून
स्वत:ची भाषा बोलतेय.
आमचाही वसा
तावून-सुलाखुन पेलतेय.....
होय,मी सावित्री ज्योतिबा फुले बोलतेय.....

आमच्याच मातीत,
आमच्याच लेकरांकडून
दूजाभाव बघावा लागला.
माझा फोटो लावण्यासाठीही
सरकारी जी.आर.निघावा लागला.
आपल्या सोईचे नसले की,
विचारांकडेही कानाडॊळा होतो.
समाजासाठी काही करायचे म्हटले की,
पोटात प्लेगचा गोळा येतो.

ज्योतिबांशिवाय सावित्री,
सावित्रीशिवाय ज्योतिबा,
समजून घेता येणार नाही.
विचारांची ही ज्योती,
एकटी-दुकटी नेता येणार नाही.
सुनांना लागावे म्हणून तर
लेकींनो, तुम्हांला बोलतेय....
होय,मी सावित्री ज्योतिबा फुले बोलतेय...

-सूर्यकांत डोळसे,पाटोदा (बीड)
मोबाईल-9923847269
..............
पूर्व प्रसिद्धी-
दै.पुण्यनगरी।दै.झुंजार नेता