Friday, 10 March 2017

उपवासाचा एक दिवस / विजय तरवडे

उपवासाचा एक दिवस / विजय तरवडे

सवयीने तो उशीरा उठला. ती केव्हाच उठली होती आणि आंघोळ करून शंकराला निघालेली होती. त्याला घाईघाईने चहा करून देत ती म्हणाली, “मी जाऊन येते. तोवर घरातला पसारा आवरा, जमल्यास. लगेच फेसबुकवर बसू नका. थोडी बायकोला मदत करा.”

“नक्की यार. तू जाऊन ये. देवाला माझा देखील नमस्कार सांग. नाहीतर मेल्यावर तू एकटी स्वर्गात जाशील आणि मी नरकात जाईन. तिथं माझ्या जुन्या मैत्रिणी मला भेटल्यावर तुला स्वर्गातलं अमृत गोड लागणार नाही.”

ती फणकारली.

“आज नाश्त्याचं काय?”

“तुम्ही चहा घ्या आणि घरातला पसारा आवरा. जमलं तर आंघोळ करून घ्या. आज उपवास आहे. मी देवळातून आले की तुमच्या आवडीची साबुदाण्याची खिचडी, बटाट्यांची भाजी, रताळ्याचा कीस आणि शेंगदाण्यांची आमटी करणारे. सगळी तयारी करून ठेवलीय.”

“ओके. जाव तुम.”

ती गेली. त्याने चहा घेतला. अजून एक चहा घ्यावा म्हणून स्वयपाकघरात गेला. बायकोने केलेली तयारी बघून त्याचं अंतःकरण गलबललं. किती बिचारी आपल्यासाठी झिजते. चलो, आपण तिला सरप्राईज देऊ.

त्याने एका शेगडीवर चहा ठेवला आणि भराभर कामाला लागला. आधी खिचडी बनवली. चहा ओतून घेतला. तो पीतपीत एका बाऊलमध्ये खिचडी काढून ओव्हनमध्ये लपवून ठेवली. उकडलेलं एक रताळे स्मॅश करून त्यावर जिऱ्याची आणि मिरच्यांची फोडणी ओतली. त्यात शेंगदाण्यांचा कूट, दही, मीठ, साखर कालवून आणि वरून कोथिंबीर टाकून ती चटणी सजवली आणि फ्रिजच्या एका कप्प्यात लपवली. त्याच्या हातची ही चटणी म्हणजे त्यांच्या सुखी संसाराचा एक युएसपी आहे. शेंगदाण्यांची आमटी बनवली. त्यात वरून कोथिंबीर टाकून बाऊलमध्ये ओतून फ्रीजमध्ये लपवली. उकडलेल्या बटाट्यांची भाजी बनवली. ती देखील एका बाऊलमध्ये भरून फ्रीजमध्ये लपवली. कढई, चहाची भांडी, वगैरे सरंजाम स्वच्छ धुवून जागच्या जागी मांडल्यावर त्याला आठवलं.
गेल्या आठवड्यातच तिचा चेकअप झालेला आहे. च्यायला ते शुगर आणि कोलेस्टेरॉल वगैरेचे रिपोर्ट्स खतरनाक होते. डॉक्टरने गोळ्यांच्या पॉवर्स पण वाढवल्यात. असं असताना आपण तिच्यासाठी एवढे पदार्थ बनवले म्हणजे तिला विष घालण्यासारखंच आहे. पण काय करणार. तिला तर हे खूप आवडतं. आपल्याला देखील आवडतं.

थोडंसं डोकं चालवून त्यानं फ्रिजच्या खालच्या कप्प्यातून पुदिना काढला. त्याची पाने स्वच्छ धुवून-चिरून खिचडी, आमटी आणि भाजीवर पेरली.

तेवढ्यात बेल वाजली आणि दार उघडल्याचा आवाज आला. पाठीमागून बायको आली.

“आवरलं का सगळं?”

“येऊन बघ.”

तिनं सगळे पदार्थ बघितले आणि लईच गहिवरली.

“रताळ्याची चटणी देखील केलीय. तुझ्या त्या मैत्रिणीनं खाल्ली तर नवऱ्याला घटस्फोट देऊन माझ्यावर लाईन -”

“जरा तोंडाला लगाम देता का? ती बाहेर बसलीय.” बायकोने घाईघाईने त्याचे तोंड दाबले.

“सॉरी.”

“तुमच्या जिभेला हाडच नाही.”

“सणाच्या दिवशी नॉनव्हेजची आठवण काढू नकोस. चल आपण प्लेट्स भरू.”

तिघे खायला बसल्यावर पहिल्या एक दोन बेसावध घासांनंतर बायकोची मैत्रीण म्हणाली, “या सगळ्यात पुदिना घातलाय का? उपवासाला नाही चालत.”

बायकोने खवळून त्याच्याकडे पाहिले.

“अगं तुला या पदार्थांचा त्रास होऊ नये म्हणून -”

“मी उपवास करीत नाही. मला काही प्रॉब्लेम नाही. तुझं काय ते बघ बाई,” मैत्रीण म्हणाली.

बायकोने सगळे पदार्थ खाल्ले. पण उपवास मोडला म्हणून खाताना बडबड केली. शिवाय जाताना मैत्रीण बॉम्ब टाकून गेली –

“रताळ्याची चटणी एकदम क्लास झालीय बरं का.”
मैत्रीण गेल्यावर घरात काय घडले त्याची इतिहासात यथावकाश नोंद होईल.

* * *

© विजय तरवडे

तरुण भारत - ०५ ०२ २०१७

सूचना -
१.पोस्ट शेअर केली तर चालेल.
२.पोस्ट चोरणाऱ्या पुरुषाच्या बायकोला तिच्या मैत्रिणींचे नवरे रताळ्याची चटणी खाऊ घालून पटवतील.
३.चोरणाऱ्या स्त्रीचा नवरा तिच्या मैत्रिणींवर लाईन मारीत फिरेल.

No comments:

Post a Comment