तुमच्या आत्महत्या फार
किरकोळ गोष्ट आे...
अवकाळी पडलेल्या गारा
हातात धरून मिडियावर
आम्ही पाहतो तेव्हा,
फक्त गाराच दिसतात डोळ्यांना.
दिसलं असतं तुझं दुःख तर
महालक्ष्मीला सोन्याची पालखी अर्पण
झालीच नसती..
सध्यातरी तू
वक्तृत्व स्पर्धेचा,
कवीच्या कवितेचा
गजलकाराच्या गजलेचा
चॅनेलवाल्यांच्या टी आर पी चा,
वर्तमानपत्राचा,
विरोधकांच्या तोंडचा,
आणि कर्जमाफीचा
फक्त तू एक विषय आहेस...
बाकी काहीच नाही.
कर्जमाफी दिल्यानंतर
आत्महत्या होणार नाही.
याची हमी देवेंद्राला द्या....
मेघराजाला अक्कल नावाची गोष्ट
आत्ता उरली नाही..
(ज्यांना समजले त्यांना).
कारभार कसा करायचा म्हणतात..
अहो जसा प्रचार केलात
तसा करा...
पोरांनो रानातल्या गारा गोळा करा.
बापाला एकटा सोडू नका..
बाभळीच्या फांद्या तोडा..
दावणीचे कासरे लपवा..
कीटकनाशक औषध फेकून द्या...
आणि पोरांनो बाप वाचवा.
बाप वाचवा....
............................
दंगलकार नितीन चंदनशिवे.
कवठे महांकाळ.
सांगली.
No comments:
Post a Comment