"हॅलो S .. मृण्मयी जाधव आहेत का? प्लीज लौकर या मॅडम. आमच्या इथे नाग निघाला आहे.."
'फुस्स्स्स्' करून तो जेव्हा सणसणीत फणा काढून पुढे उभा रहातो ना... तेव्हा भल्याभल्या 'दादा'लोकांची , नको तिथे 'मर्दुमकी' गाजविणार्या 'शूरवीरांची' बोबडी वळते.. पाय लटलट कापू लागतात ... मग त त प प करत मोबाईल काढून एफ् .वाय. ला शिकत असणार्या अवघ्या १९-२० वर्षांच्या मृण्मयीला मदतीसाठी बोलावले जाते...
...फोन येतो तेव्हा मृण्मयी एकतर काॅलेजमध्ये असते किंवा घरी ,नाहीतर काॅलेजच्या वाटेवर. लगेच पायात शूज घालून ती 'कामगिरीवर' निघते. जाताना 'त्याला अजिबात मारू नका किंवा कुठलीही इजा करू नका.फक्त कुठे जातोय याकडे लक्ष ठेवा.' अशा सूचना द्यायला विसरत नाही...
...आणि एखाद्या आवडत्या-जवळच्या मैत्रीणीला भेटायला जायच्या आतुरतेने , लगबगीने आणि प्रेमाने ती त्या सापाला भेटायला निघते ! अतिशय हळूवारपणे,नाजूकपणे त्या सापाला पकडून आपल्या सॅकमध्ये ठेवते आणि त्याची आवश्यक ती काळजी घेत लांब एखाद्या जंगलात किंवा नैसर्गिक अधिवासात सुरक्षित ठिकाणी सोडून येते...विशेष म्हणजे या कामासाठी स्नेकस्टिक , स्नेकहूक किंवा स्नेकटाॅग यापैकी काहीही ती जवळ बाळगत नाही ! विषारी - बिनविषारी सगळे साप ही अफाट मुलगी नैसर्गिक पद्धतीने अलगद पकडते आणि लिलया हाताळते !!
सातार्यातील जकातवाडी येथील यशवंतराव चव्हाण समाजकार्य महाविद्यालयात F.Y.ला शिकणार्या मृण्मयीला मी आज आवर्जुन भेटायला गेलो... खूप गप्पा मारल्या...रोज काॅलेजला गेल्यावर तिच्या मैत्रीणी तिच्या सॅकपासून चार हात लांब असतात हे सांगताना ती खूप हसत होती...कारण काॅलेजला येताना वाटेत कुठेतरी दिसलेला आणि मनुष्यवस्तीत त्याला कुणी मारू नये म्हणून पकडून सॅकमध्ये ठेवलेला एखादा विषारी किंवा बिनविषारी साप तिच्या सॅकमध्ये असण्याची शक्यता असतेच असते ! एकदा जकातवाडीच्या एका ओढ्यात सापडलेला 'कोब्रा' कुणी मारू नये म्हणून पकडून सॅकमध्ये ठेवून ती वर्गात गेली होती..अर्थात नंतर वेळ मिळाल्यावर ती त्याला सुरक्षित नैसर्गिक अधिवासात नेऊन सोडणार होती..पण वर्गात एकच घबराट उडाली होती हे सांगताना तिला हसू आवरत नव्हते...
तिचे मित्रमैत्रीणी तिला 'साप पकडी' , 'सापाडी' , 'गारूडी' अशा नावांनी चिडवतात , चेष्टा करतात...पण तिचा 'फोकस' अजिब्बात हलत नाही !
ती मित्रमैत्रिणींची भिती समजू शकते कारण ती सुद्धा लहानपणी घरात निघालेला आणि सिलेंडरला वेटोळे मारून बसलेला साप पाहिल्यावर त्यांच्यासारखीच घाबरली होती ..पण तिचा मामा सर्पमित्र स्वप्निल साळूंखे याने त्या सापाला अलगद पकडले आणि तिच्या लक्षात आले की 'अरे ! मी याला पाहून घाबरले होते पण हा साप मला पाहून माझ्यापेक्षा जास्त घाबरलेला होता. निरूपद्रवी आहे हा !' मग तिने कुतूहल म्हणून मामाकडून सापाविषयी सगळी माहिती मिळवली.असंख्य पुस्तके वाचली. व्हिडीओज पाहिले. मग मामानेही तिला साप पकडण्याचे व्यवस्थित ट्रेनिंग दिले. आज तिच्याकडे '#सर्पमैत्रीण' असे अधिकृत ओळखपत्र आहे !
तिचे शिक्षक प्रा. भाईशैलेंद्र माने गप्पा मारताना मला म्हणाले, "अहो किरणसर सापाचे काय घेऊन बसलाय , आमच्या काॅलेजच्या मागच्या डोंगरात बिबट्याचा वावर आहे हे कळाल्यावर ही पोरगी त्याला बघण्यासाठी त्याच्या पावलांच्या ठशांचा मागोवा घेत डोंगराकडे चालली होती...!" यावर मी तिला विचारले असता ती अतिशय #निरागसपणे फक्त एवढेच म्हणाली "मला जंगली प्राणी खूप आवडतात !"
पुस्तकात आणि आता व्हाॅटस् अॅप-फेसबुकवर महिला दिनानिमित्त,मदर्स डे वगैरेला वाचून गुळगुळीत झालेले अशा पद्धतीचे एक वाक्य कायम समोर येते की , 'धाडसाचे, साहसाचे आणि निग्रहाचे दूसरे रूप म्हणजे स्त्री' !
...आज मृण्मयी रहात असलेल्या आणि शिकत असलेल्या कोंडवे-जकातवाडी परीसरातील शेकडो विषारी-बिनविषारी सापांना 'जीवदान' देणारी , खर्या अर्थाने #मर्दानी आणि रणरागिणीची 'वृत्ती' असणारी मृण्मयी भेटली त्या वाक्याचा पुरेपुर प्रत्यय आला !
#सलाम_मृण्मयी !!!
- किरण माने.
No comments:
Post a Comment