Tuesday, 26 February 2019

चंद्रशेखर आझाद आणि नेहरू परीवार

अलाहाबादच्या आल्फ्रेड पार्क मधे 27 फेब्रुवारी 1931 रोजी चंद्रशेखर आझाद,  सुखदेव यांना भेटायला आल्याची बातमी पोलिसांना खब-याकडून मिळाली आणि लवकरच पोलिसांनी त्यांना घेरले आणि गोळीबार सुरू केला. आझादांनी एका मोठ्या झाडाचा आडोसा घेतला आणि  सुखदेव यांना तिथून निघून जायला सांगितले. जवळपास अर्धा तास एकट्याने गोळाबाराचा सामना केल्यानंतर आपण पकडले जाणार असे वाटू लागले तेंव्हा त्यांनी स्वत:वर गोळी मारून घेतली! आणि ते शहीद झाले! आझाद नावाप्रमाणे शेवटपर्यंत आझादच राहीले !

भगतसिंग आणि त्यांच्या सहकाऱ्यांना गांधीजी-पटेल-नेहरू यांनी वाचविण्याचा प्रयत्न केला नाही , असा खोटा आरोप स्वातंत्र्यलढ्यात आजीबात सहभागी
नसणा-यांकडून नेहमी केला जातो. मध्यंतरी नेहरूंना बदनाम करण्यासाठी, चंद्रशेखर आझाद नेहरूंना भेटून परत आल्यावरच त्यांना पोलिसांनी कसे काय मारले? असा कुत्सित प्रश्न उपस्थित करून  नेहरू आझादांना हिंदुस्तान रिपब्लिकन आर्मीने साठवलेले पैसे मागत होते ,असाही धादांत खोटा आरोप केला गेला !

जवाहरलाल नेहरूंच्या आत्मचरित्रात चंद्रशेखर आझाद यांच्या भेटीचा संदर्भ असून, गांधी आणि आयर्विन करारात सशस्त्र क्रांतीकारकांना कांही स्थान असेल काय यावर त्यांच्यात चर्चा झाली. नेहरू यावेळी म्हणतात ,भारताला सशस्त्र क्रांती शिवाय स्वतंत्र मिळू शकणार नाही ,अशी भूमिका आझाद यांची होती, जी नेहरूंना मान्य नव्हती!  नेहरूंच्या आत्मचरित्रातील हा भाग अमेरिकन आवृत्तीतून काढून टाकण्यात आला. याचे कारण नेहरूंचे हे आत्मचरित्र 1936  साली प्रकाशित झाले आणि त्यावेळी भारताबाहेर कॉंग्रेस ही सशस्त्र  क्रांतीकारकांना छुपी मदत करते हा आरोप केला जात होता, जो कांही अंशी खरा होता. पण तो जाहीर होवू नये याची काळजी घेतली जात होती.

प्रत्यक्ष चंद्रशेखर आझाद आणि मोतीलाल नेहरू यांचे जुने स्नेहसंबंध होते आणि मोतीलाल नेहरूंचे 6 फेब्रुवारी 1931 ला निधन झाल्यामुळेच आझाद नेहरूंना भेटायला साधारणपणे 7 फेब्रुवारी ते 20 फेब्रुवारीच्या दरम्यान आलेले होते. कारण ज्या काकोरी कटात आझाद आरोपी होते त्यातील आरोपींच्या बचावासाठी मोतीलाल नेहरूंनी बचाव समिती स्थापन केली होती, त्यात जवाहरलाल नेहरूही होते.

पंडीत मोतीलाल नेहरू आणि भगतसिंगचे सहकारी यांचा जवळचा सबंध होता. भगतसिंग आणि सहका-यांच्या विरोधातील खटल्या दरम्यान कोर्टात येऊन आरोपींसोबत बसून त्यांनी चर्चा केली. त्यांनी खटल्यात भुलाभाई देसाईंची मदत घ्यावी असा प्रस्ताव दिला होता. सॉण्डर्सच्या हत्येनंतर आझादांच्याच सल्ल्यानुसार भगतसिंग मोतीलाल नेहरूंना आर्थिक सहाय्यासाठी भेटले होते. मात्र त्यावेळी त्यांचा आणि भगतसिंगचा परीचय नसल्यामुळे त्यांनी मदत केली नाही परंतु त्यानंतर मात्र त्यांनी भगतसिंगला कायदेशीर बचावाच्या कामात नेहमी आर्थिक मदत केली! हीच बाब एस.के.मित्तल आणि इरफान हबीब यांनी त्यांच्या लेखनात मांडली आहे.

मोतीलाल नेहरूंशी चंद्रशेखर आझादांचा जवळचा सबंध होता मात्र जवाहरलाल नेहरूंची भेट त्यांनी प्रथमत: मोतीलाल नेहरू वारल्यानंतरच घेतली.  आझाद आणि जवाहरलाल नेहरूंच्या भेटीबद्दल यशपाल यांनी लिहिले आहे. पण ते म्हणतात की, या भेटीबद्दल आझाद नाराज होते कारण नेहरूना हिंसेचा मार्ग पसंत नव्हता.

आझादांच्या नि जवाहरलाल नेहरूंच्या या भेटीनंतर कांही दिवसांनी यशपाल देखील नेहरूंना भेटले. त्यानंतर आठवड्यात  आल्फ्रेड पार्क मध्ये पोलिसांनी चंद्रशेखर आझाद यांच्यावर गोळीबार केला आणि  त्यातच त्यांचा अंत झाला! यशपाल म्हणतात त्यावेळी आझांदांच्या खिशात सापडलेले पैसे हे जवाहरलाल नेहरूनींच त्यांना दिलेले होते ! यशपाल म्हणतात ही रक्कम रु.500 होती सशस्त्र क्रांतिकारकांचे नुकतेच दिवंगत झालेले संशोधक श्री. प्रमोद मांडे सर यांनी 1983  साली  प्रत्यक्ष आलाहाबादला जाऊन आणि दिल्लीतील सशस्त्र क्रांतीकारकांच्या नातेवाईकांच्या मेळाव्यात आझादांच्या आप्तांकडून याबाबत माहिती घेतली होती. मांडे सरांच्या माहीती नुसार ही रक्कम रु 402/-  होती आणि ती आझादांना पंडित नेहरू यांनी दिलेल्या रु 1200/-मधील शिल्लक राहीलेली होती ! 

पोलिस आझादांच्या प्रेताची परस्पर विल्हेवाट लावण्याच्या तयारीत असल्याची बातमी समजताच कमला नेहरू यांनी शिवनारायण मिश्रा यांना बोलावून घेतले आणि नातेवाईक म्हणून प्रेत ताब्यात घेण्यासाठी सांगीतले. त्यानुसार अनेक अडचणीतून मार्ग काढून त्यांनी त्यांचा विधीवत अंत्यविधी केला. जवाहरलाल नेहरू स्वत:च कॉग्रेसचे अध्यक्ष असल्यामुळे त्यांनी ही जवाबदारी स्वत:तर्फे कमला नेहरूंवर सोपवली असा अंदाज करणे योग्य राहील. आझादांच्या अंत्यविधीसाठी प्रत्यक्ष कमला नेहरूंनी घरातील चंदनाची लाकडे दिली, अशीही माहीती  मांडेसरांनी त्यांच्या 'आजादी के दिवाने' या कार्यक्रमात दिली होती. उपलब्ध असणा-या समकालीन लेखकांच्या पुराव्यानुसार गोविंद वल्लभ पंत यांच्यासह कमला नेहरू आझादांच्या अंत्यविधीसाठी हजर होत्या. याचा  उल्लेख आर.के.कपूर यांनी त्यांच्या लेखनात केला आहे. मार्ग भिन्न असला तरीही आझादांचे बलिदान महान असल्याचे जाहीरपणे सांगून अलाहाबादचे कॉंग्रेस नेते  पुरुषोत्तम दास टंडन यांनी चंद्रशेखर आझाद यांच्या अस्थीची भव्य यात्रा आयोजित केली होती. यावेळीही कमला नेहरू आणि सचिंद्रनाथ संन्याल हजर होते. असा संदर्भ  ब्रिटीशांच्या सन 1931 च्या 'सिव्हिल अँड मिलीटरी गँझेट' मधे आहे. यानंतर चमनलाल आणि शंकरलाल बन्सल यांनी नौजवान सभेमार्फत 'आझाद स्मृती निधी' गोळा करून तो कॉंग्रेस च्या कार्यासाठी म्हणून कॉंग्रेसचे तत्कालीन अध्यक्ष जवाहरलाल नेहरूंच्या नावे  कॉंग्रेसला स्वातंत्र्यलढ्यासाठी  देण्याचे जाहीर केले!

हे पाहून मनात प्रश्न निर्माण होतो तो असा की, आज आझादांबद्दल दांभिक प्रेम दर्शवून गांधी नेहरूंवर टिका करणा-यांचे पुजनिय व वंदनिय नेते  कुठे भुमिगत होते?

© राज कुलकर्णी

संदर्भ-

1) A revolutionary History of Interwar India – Kama Maclean Penguin Books page no. 144

2) 'Pandit Motilal Nehru-His life and Work' - U.C.Bhattachrya and Shovendu Chakraborty,  Modern Book Agency CulCutta Page 107

3) An Autobiography _ J.Nehru

4) सिंहावलोकन - यशपाल

5) Nehru-Motilal and Jawaharlal- B.R.Nanda.

6) भगतसिंह से दोस्ती - जतींद्रनाथ संन्याल, संपादन- व्ही.एन.राय 

7) शहीद भगतसिंग-वैचारीक बंदुकांचे शेत- डॉ. विवेक कोरडे.

Monday, 18 February 2019

१५० वर्षांचे गांधी भाग १ (ओळख)- चेतन साळुंखे

*१५० वर्षांचे गांधी*   भाग १ (ओळख)

           जग त्यावेळेस साम्राज्यवाद्यांच्या आपापसातल्या संघर्षांची युद्धभूमी होती. पश्चिमी देशात औद्योगिक क्रान्ति ने खूप आर्थिक प्रगती केली होती. वसाहतवादी राष्ट्रे पूर्वेकडचे व दक्षिणेकडचे नवीन देश पादाक्रांत करण्याचा स्पर्धेत गुंतलेली होती. अमेरिका ब्रिटन सारख्या देशात, स्वार्थाने बरबटलेल्या लोकशाही शासने आली होती किंवा येऊ पाहात होती. यूरोप खंड जाती , भाषा आणि संस्कृती या आधारावर छोट्या देशात विभागाला जात होता. भांडवलदार आणि राजकीय लागेबांधे पाहून मार्क्स सारख्या साम्यवादी विचारांकडे मजूर व शोषित वर्ग वळत होता. फ्रेंच, रशियन राज्य क्रान्ति मुळे जग ढवळून निघाले होते. अशा वातावरणात ब्रिटिश शासन भारतात जवळ जवळ स्थिरावला होता. १८५७ च्या प्रसंगानंतर ब्रिटीश सत्ताधीश, भारतीय जनतेला राजकीय प्रक्रियेत टप्प्या टप्प्याने सहभागी करत होती  ( लोकसंख्याने कमी असलेल्या ब्रिटिश सत्ताधीशांना या खेरीज पर्याय नव्हता, म्हणून आय सी एस सारख्या परीक्षा आणून, भारतीय नागरिकांना त्यांनी ब्रिटिश प्रशासकीय नोकरी उपलब्ध केल्या, अर्थात मुख्य मुस्क्या ब्रिटिशांच्या ताब्यात होत्या, पण आपण भारतीय नागरिकांचे कैवारी असल्याचे दाखवून, स्वतःचे इंगित साध्य करायचा हि एक रणनीतीचा भाग होता ). सामाजिक सुधारणांना ब्रिटिशांनी पाठिंबा दिला होता आणि राजकीय सुधारणा स्वतःच्या स्वार्थानुसार हाताळल्या. अर्थात या बाबी भारतीय मुत्सद्द्यांच्या लक्षात यायला वेळ लागला हे भारताचे एक दुर्दैवच म्हणावे लागेल. पण जेव्हा हे लक्षात आले तेव्हा राष्ट्रीय काँग्रेस च्या माध्यमातून नवं सुशिक्षित वर्गाने त्याविरुद्ध आवाज उठवला. पुढे स्वजाणीवेनुसार मवाळ व जहाल गट राजकारण हाताळत होते व क्षमतेनुसार झगडत होते. गांधी नावाचा एक खेळाडू या पटलावर फार उशिरा अनपेक्षितपणे आला, आपल्या चाली खेळला, जिंकला आणि भाव खाऊन गेला. त्याच गांधीजींविषयी माहिती सांगणारी हि लेख मालिका.

           २ ऑक्टोबर १८६९ ते ३० जानेवारी १९४८ हा एक जीवनप्रवास आहे, "मोनिया" या नावाने ज्याला त्याचे आईवडील संबोधायचे त्या “मोहनचा”, रवींद्रनाथानी ज्यांना “महात्मा” संबोधले आणि चर्चिलने ज्याला “नंगा फकीर” म्हटले  त्या बापूंचा, अर्थातच “मोहनदास करमचंद गांधी” या अवलियाचा. महात्मा गांधी माहीत नाही असा भारतीय नाही, जगात जिथे जिथे अहिंसेच समाजकारण रूढ आहे तिथे तिथे गांधी ज्ञात आहेत. गांधींवर भारतातच नव्हे तर जगाच्या पाठीवर खूप अभ्यास झाला, आजही होत आहे आणि भविष्यातहि होत राहील. भारतात एखाद्या व्यक्तीवर सर्वाधिक लिखाण जर झालं असेल तर ते कदाचित महात्मा असू शकतील. गांधी चरित्र्य खूप लोकांनी लिहिलं, गांधी विचारांची चिकित्सा खूप झाली आणि आजही होत आहे.  आज साहित्यविश्वात अशी अनेक साधने उपलब्ध आहेत, अशी साधने लिहिणारे काही गांधीचे सहकारी होते ,समकालीन समर्थक व विरोधक होते, काही समकालीन व उत्तरकालीन देशी विदेश पत्रकार होते, ज्यांनी त्यांच्या मुलाखती घेतल्या होत्या किंवा भारतीय पत्रकारिता केली होती, ब्रिटीश व इतर देशी परदेशी पाहुणे व तत्वज्ञ होते, ज्यांचा गांधीजींशी संबंध आला होता, काहींना गांधी कुतुहूल होते, काही विज्ञानवादी, वैज्ञानिक, भौतिकवादी स्थितप्रज्ञ देशी विदेशी विचारवंत होते, तर काहींसाठी गांधी म्हणजे राजकीय विरोधक, शत्रू होते, निंदेचे धनी होते.  काही साम्यवादी विचारसरणीच्या सुवर्ण युगातील आघाडीचे व  जडणघडणीत मोलाचे योगदान असलेले, डाव्या विचारणींचे प्रतिनिधित्व करणारे महत्वाचे साम्यवादी कार्यकर्ते, कॉम्रेड  होते, तसेच समाजवादी काही होते.  धर्म प्रमाण मानून राष्ट्रवादी विचारसरणीचे पुरस्कर्ते, स्वतःला उजवे म्हणवणारे जहाल विचारवंत होते, तर काही कला, साहित्य, विद्यार्थीदशेतील व विज्ञान क्षेत्रातील काही मान्यवर होते. अशा विविध क्षेत्रातील विविध व्यक्तींचा गांधीजींशी संबंध आला होता. या सर्वानी गांधीविषयी काही ना  काही तरी लिहिलेले आहे आणि आज ते पुस्तक,पत्र , वर्तमान पत्र या ना त्या माध्यमातून अभ्यासकांना उपलब्ध आहे. असे हे  महात्मा व्यक्तिमत्व, नेहमीच तत्वज्ञान, राजकारण, समाजकारण, धर्म आणि एव्हाना साहित्य क्षेत्रात वेळोवळी चर्चेचा विषय ठरले. गांधी,अभ्यासकांसाठी नेहमी आव्हान ठरत राहिले. अभ्यासकांना व त्यांना पाहिलेल्या, भेटलेल्या, त्यांच्याशी स्पर्धा व  त्यांच्याशी वैर स्वीकारलेल्या व्यक्तींना गांधी जसे दिसले तसे त्यांनी लिहिले, त्यांना ज्या नजरेतून पाहायचे होते त्या नजरेतून त्यांनी पाहिले, त्यांना जे अपेक्षित होते आणि जे मांडायचे होते तसे मांडले.  समाज्यातील अनेक स्तरातून त्यांचा बहुआयामी दृष्टिकोन प्रत्येकाने मांडायचा प्रयत्न केला. थोडक्यात गांधी आज विविध रूपात सगळ्यांसमोर आहेत. कोणासाठी ते फाळणीचे कारक व प्रमुख दोषी आहेत, कोणासाठी ते भ्याड व भित्रे आहेत, कोणासाठी ते चतुर, लबाड(वस्ताद), कारस्थानी आहेत. काहींसाठी ते संत, सत्पुरुष व समर्थ असे पथदर्शक राष्ट्रपुरुष आहेत. काहींसाठी ते अहिंसेचे पुजारी आणि स्वातंत्र्य लढ्याचे प्रमुख नायक, स्वातंत्र्य मिळवून देणारा सच्चा देशभक्त आहे. गांधी हे असे कोणासाठी आदर्श तर कोणासाठी खलनायक ठरले.  पळपुटा, नेभळट, मेंगळट, टाळपिटया तुकाराम, कारस्थानी, टकल्या, लंपट इ. अश्या नाना प्रकारे त्यांची टिंगल टवाळी केली गेली आणि आजही होत असते. महात्मा, राष्ट्रपिता, सत्पुरुष, संन्यासी, साबरमती का संत अशा गौरवाद्गाराने त्यांचा कार्याची, त्यागाची दखल हि घेतली जाते.
     
           गांधी महान होते कि नव्हते , त्यांच्यावरच्या टीका खऱ्या कि खोट्या हे ठरवायला आजचा समाज किती समर्थ आहे हे माहीत नाही. उथळ, जलद आणि मुळातच इन्स्टंट आकलन करून प्रतिक्रिया देणारी हि अतिप्रवाही पिढी गांधी समजून घ्यायला कितपत संयमी आहे, हे जाणून घेण्याचा प्रयत्न करणे फार उत्सुकतेचं असेल.

               ०२ ऑक्टोबर २०१८ ला बापूंचे १५० वि जयंती वर्ष चालू होईल आणि ०२ ऑक्टोबर २०१९ साली गांधींजी १५० वर्षांचे झालेले असतील. अजून एक वर्ष आहे (०२ ऑक्टोबर जागतिक अहिंसा/शांती दिवस) . देशात त्या वेळेस बरेच राजकारण ढवळले जाणार असल्याने, कदाचित हि १५० वि जयंती म्हणजे राजकारण्यांसाठी पर्वणीच ठरणार. बापूंचा वारसा चालविणारे अनेक दावेदार समोर येतील, कार्यक्रमांची सरबराई होईल, वक्ते येतील, अंगावर खादि  चढेल, मुखात देशभक्तीची  आवसाने येतील, सप्ताह, प्रवचने, भजने, प्रदर्शने, मॅरेथॉन दौड, इ. असे अनेक कार्यक्रम रंगतील. धूळ खात पढलेला चरखा शोधायची धडपड होईल, चरखा दुरुस्त करण्यासाठी मोक्याच्या वेळेस सुतार शोध चालू होईल, गांधींचा फोटो म्हणून चुकून कोणी शास्त्रींचा फोटो आणेल ( दोघांची जयंती एकाच दिवशी असते, आपण अनपेक्षित पने चुकलेलो  नाही आहोत याची सुद्धा नेते आणि कार्यकर्त्यांना जाणीव होणार नाही, गांधी फोटो आणून हे लोक शास्त्रींचा फोटो बाजूला ठेवणार हे १००% सत्य), जिथे देशाचे विद्यमान उपराष्ट्रपती गल्लत करतात तिथे बाकीच्यांचे काय घ्या! औपचारिक हजेरी लागून, गांधी परत सोईस्कर बस्तानात घालून पुढाऱ्यांसकट अनुयायी व  नागरिक पुन्हा रोजमार्गाला रुजू होतील.

            मुळातच इतिहासात हरवलेले, आणि सध्या फक्त ड्राय डे ला आठवणारे आणि नोटांवर दिसणारे, गांधींचे एवढे स्मरण करण्याची गरजच काय? हा प्रश्न उपस्थित होतो. आजकाल जवळ जवळ सगळ्यांना गांधी स्वीकारार्हय वाट नाहीत, मग प्रत्येक पुढाऱ्याला त्यांना स्मरावें का लागते? उघडपणे  कोणी त्यांना नाकारताना का दिसत नाहीत? नेमकी हतबलता काय आहे हे जाणून घेणे इथे महत्वाचे ठरते.

            १८६९ ते १९४८ हा प्रवास पुन्हा एकदा टप्प्या टप्प्याने मांडायचं मी प्रयत्न इथे करणार आहे. गांधी मांडणे काही सोप्प काम नाही याची पूर्ण जाणीव असणे गरजेचं आहे आणि त्याच भान मी ठेवलय. म्हणून याचा आवाका लक्षात घेता मी "१५० वर्षांचे गांधी " हा विषयच मांडायचा प्रयत्न करणार आहे. नावात १५० असले तरी, १५० वर्षातील सगळेच येणार नाहि अन्यथा त्याला समग्र म्हणावे लागेल आणि तेवढी पात्रता माझी नाही.   समग्र गांधी आज पुस्तक रूपात उपलब्ध आहेत. सरकारी आणि इतर साधनात ते उत्तमरित्या मांडलेले आहेत. त्याची पुनरावृत्ती करणे शक्यही नाही, तेवढा माझा आवाकाहि नाही आणि गरजही नाही. गांधीजींच्या वाटचालीत आजू बाजूस बऱ्याच घटना घडत होत्या. राजकीय, सामाजिक,तत्वज्ञान, धार्मिक, क्रीडा, साहित्य क्षेत्रात अनेक घडामोडी घडत होत्या आणि त्यावेळेसच्या राजकीय घडामोडींचे प्रतिबिंब या क्षेत्रात उमटत होते. गांधीचे समग्र चारित्र्य टाळून, गांधी या सर्व क्षेत्रातील लोकांच्या अनुभवातून कसे प्रकट होतात हे शोधायचा मी प्रयत्न करणार आहे(मी काही निवडक घटनांचा  आधार घेणार आहे).  अशी लोक त्यांचा आधीही होती, त्यांच्यावेळेसहि व नंतरहि. १५० वर्षांचे गांधी मांडायचे ते या दृष्टिकोनातून. अर्थात या विषयात हात घालण्यापूर्वी बरेच आक्षेप येणार याची जाणीव मला आहे. या साठी वापरण्यात येणाऱ्या संदर्भांचा त्या त्या वेळी उल्लेख होईलच. विषयाची व्याप्ती प्रचंड मोठी असल्याने काही त्रुटी राहण्याची शक्यता आहे, मी अभ्यासकांना  विनंती करेन कि त्यांनी या टीका ससंदर्भ दुरुस्त कराव्यात, तसेच याला समर्पक अजून जी साहित्य उपयोगी पडू शकतील त्याची माहिती द्या.

            स्वातंत्र्य पूर्व काळातील साधनांकडे लक्ष दिले तर आपल्या लक्षात येते कि,  एकतर एकूणच स्वातंत्र्य चळवळ हि खूप विस्तृत आहे, ती कोठे सुरु झाली आणि कोठे संपली हे निश्चित नाही (वस्तुनिष्ठ ती १५ ऑगस्ट १९४७ ला संपली), त्यात एक असे स्थायी तत्वज्ञान, विचार  नाही. समाजातील गुलामगिरीबद्दलच्या जाणिवेत मतभेद आहेत, त्याला कारण देखील तशीच होती, उदा: जोपर्यंत संपत्तीचा ओघ हा लंडन कडे जात आहे याची जाणीव काही सुशिक्षित भारतीय पुढार्यांना झाली तो पर्यंत अनेकांना त्यावेळेहि ब्रिटिश शासन हे गुलामगिरी नसून ईश्वरी राज्यच वाटत होते. राष्ट्रीय सभेला याची जाणीव तीव्र करण्यासाठी व लोकांपर्यंत पोहचवण्यासाठी तब्बल १० वर्षे जावी लागली, तरी देखील काही शहरी व राष्ट्रवादी म्हणवणाऱ्या लोकांनीच या जाणिवेला जवळ केले, बाकीचे चाकरी करण्यात दंग होते. पाश्चिमात्य तत्वज्ञानाची नव्यानेच ओळख झालेला, उपयुक्तवादाचा पुरस्कार करणारा, समाजसुधारकांचा एक प्रवाह हि लूट म्हणजे आपल्याला मिळालेल्या ईश्वरी राज्याच्या बदल्यात व मिळालेल्या ज्ञानाच्या बदल्यात  अपरिहार्य अशी मोजावी लागणारी किंमत समजत होते. मूलतः समाजसुधारक गट आणि व राष्ट्रवादी स्वातंत्र्यप्रेमी गट, असे गट ब्रिटीश शासनाचा स्वीकार व तिरस्कार करत होते. राष्ट्रवादी शब्द देखील थोडासा अप्रस्तूतच आहे कारण भारत म्हणून अखंडत्वाची भावना सर्वदूर नव्हतीच. अशा परस्पर विरोधी विचारसरणीच्या समूहामुळे घडलेल्या घटनांच्या अनुषंगाने तेव्हाही आणि आताही मतभेद होणे स्वाभाविक होते आणि अशा गोष्टींचा त्या त्या साधनांवर परिणाम होणे अपरिहार्य होते, आणि ते तसे झालेच. राजकीय लढ्यातील वापरण्यात येणाऱ्या अशा साधनांविषयी मतभेद आजही आहेत. स्वातंत्र्य मिळूनही अनेकांसाठी अनेक प्रश्न अनुत्तरितच आहेत, हि  ना ती अशी अनेक कारणे. गांधी यापैकी बऱ्याच ठिकाणी ल.सा.वि आणि काही ठिकाणी म.सा.वि. आहेत. त्यामुळे इतकि व्यापकता असतानांहि प्रत्येक विषयाशी गांधींचा संबंध आहे. म्हणून गांधी चर्चित असताना अनेक संदर्भ येणार ते अपरिहार्य आहे कारण त्याचा प्रत्यक्ष संबंध या चळवळीशी आहे.

               महाराष्ट्र आणि गांधी यांचं नातं थोडं वेगळं आहे. कारण “गोपाळ कृष्ण गोखले” चा वारसा सांगणारे गांधी महाराष्ट्राशी नाते जोडतात. पुढे लोकमान्य टिळकांनंतर राष्ट्रीय नेतृत्वाचा वारसा खंबीरपणे पुढं चालवतात, सावरकरांसारखे कडवे विरोधक त्यांना महाराष्ट्रातच भेटतात, समतेच्या मुद्द्यावर आंबेडकरांशी ते समझोता करतात, वर्धा इथे सेवाग्राम आश्रम स्थापून राष्ट्रीय चळवळीचे एक प्रमुख केंद्र बनवतात ( विसाव्या शतकाचे ३ रे व ४ थे दशक, गांधीजीनी राष्ट्रीय चळवळीची बरीच सूत्रे इथूनच हालवली, वर्ध्याला राजधानीचे स्वरूप प्राप्त झाले होते ),  हत्या करणाऱ्या गोडसे पाशी गांधीं  त्यांचे महाराष्ट्राशी व जगाचे असलेले इहलोकी नातं संपवतात, पण विनोबांच्या रूपाने ते महाराष्ट्राशी वॆचारिक नाते जिवंत ठेवतात. अगदी मोजक्या शब्दात  सांगायचे तर, गांधींचा महाराष्ट्राशी संबंध आला तो असा.

आधुनिकता, समाजसुधारणा, स्वराज्य, धर्म  आणि राजकारण अशा प्रश्नांच्या उंबरठ्यावर उभ्या असलेल्या, ब्रिटिशांची गुलामगिरी भोगत असलेल्या, काही मोजके सॊडले तर स्वत्व हरवलेल्या व चाढ नसलेल्या अनेक  संस्थानिकांनी व्यापलेल्या भारत देशात, जीर्ण, पुराणमतवादी, सनातनी गांधी येतात आणि या सर्व प्रश्नांना सोबत घेऊन समर्थपणे राष्ट्रीय चळवळ उभारतात व स्वातंत्र्यलढ्यास वेगळीच धार देतात. भारतीयच काय पण ब्रिटिशांना व जगाला देखील अचंबित करून सोडणाऱ्या प्रभावी मार्गांचा अवलंब ते करतात. सत्याग्रह, असहकार, सविनय कायदेभंग हि सर्व अस्त्र जगाला त्यावेळी नवीन होती व बंदुकीच्या जोरावर जगावर राज्य करणाऱ्या सर्वच साम्राज्यवाद्यांच्या पार्लमेंट मध्ये खळबळ उडवून देणारी होती. गांधी जगाच्या कुतुहुलाचे विषय ठरले ते यामुळे. "युध्दस्य कथा रम्या" असे साधारणतः म्हटले जाते आणि ते खरे देखील आहे. युद्ध व साहसकथा आकर्षित करत असतात, सीमेवरील जवानांना साहस व  वीरकथा किती स्फुरण देतात ते एखाद्या जवानाच्या  तोंडून ऐकल्यावरच  त्याच महत्व कळते. पण युद्ध हि कधीच चांगली नसतात. स्वतःची प्रिय व्यक्ती, मित्र, सहकारी, आप्तेष्ट जेव्हा युद्धात, हिंसेत अकारण मारली जातात त्यावेळेस हीच युद्ध आता चांगली कि वाईट हे सांगणे कठीण होऊन जाते. टॉल्स्टॉय च्या विचारांना मानणाऱ्या गांधींनीं अशा युद्धखोर काळात अहिंसेची, मानवतावादी चळवळ चालवली ती देखील साम्राज्यवादी विचारसरणीच्या, हिंसेच निष्ठुरपणे समर्थन करणाऱ्या ब्रिटिशांविरुद्ध.
हे कस घडलं?
ब्रिटिश का नमले?
हे इतकं सोप्प होत?
का त्यामागे गांधीद्वेष करणारे म्हणतात तस काहीतरी साटंलोटं होत का?
सशस्त्र क्रांतिकारकांचे आणि गांधीजींचे खरंच वैर होते का?
आजमितीला स्वातंत्र्यलढ्यातील काळ हा, गांधी म्हणजे अहिंसा मार्ग, क्रान्तिकारक म्हणजे सशस्त्र मार्ग व ब्रिटीश म्हणजे साम्राज्यवादी मार्ग अशी तिरंगी लढत होती का?
आणि प्रत्येक जण एकमेकांना पाण्यात होते, असे जे चित्र निर्माण झाले आहे ते खरेच तसे होते का?

            "कार्ल पॉपर" या इतिहासकारांचे एक मत इथे नोंदविणे फार सयुंक्तिक ठरेल. 'इतिहासातील घडलेल्या घटनांचा कारक हा नेहमी एक कर्ता किंवा अमुक एखादी परिस्थिती कधीच असू शकत नाही, अर्थात इतिहास हा त्या घटनांत सामील असलेल्या कर्त्यांच्या कर्मांचा एक परिपाक असतो, स्वतःच्या मतांप्रमाणे आजूबाजूस घडणाऱ्या घटनांप्रमाणे,  हा कर्ता (किंवा कर्ते ) हेतुपरस्पर काही कर्म किंवा योजना निश्चित करत असतात व त्या तडीस नेण्याचा पुरेपूर प्रयत्न करत असतात. त्यांच्या इच्छेप्रमाणे  सर्व काही घडेलच, हे सर्वस्वी त्याच्या समकालीन परिस्थितीचे झालेल्या आकलनावर, त्याने निवडलेल्या साधनांवर, त्याच्या नेतृत्वावर व इतर अनियंत्रित परिस्थितींवर अवलंबून असते. सर्वच परिस्थितीवर त्याचे कधीच नियंत्रण असू शकत नाही. कारण एक गोष्ट इथे नेहमी लक्षात ठेवणे गरजेचे आहे, कि त्याच्या  विरोधातही असाच कोणी एक कर्ता असतो, तो हि शड्डू ठोकून असतो.  हे ध्यानात घेतले म्हणजे इतिहास समजून घेण्यात  "व्यक्तीनिरपेक्षता'  या तत्वाला  किती महत्व आहे याची कल्पना येते'.  याच दृष्टिकोनातून स्वातंत्र्यलढ्यातील गांधी समजून घेण्याचा व पुढे काही लेखांमध्ये मांडण्याचा, एक छोटासा प्रयत्न करणार आहे  .

सुदैवाने गांधीजीनी स्वतःहि  आणि समकालीन साहित्यांनी यावर चांगला प्रकाश टाकला आहे. गांधीजींच्या माझे सत्याचे प्रयोग , इंडियन ओपिनियन , हिंद स्वराज, हरिजन, यंग इंडिया  इ. लिखाणातून ते व्यक्त होतात, तसेच आधी सांगितल्या प्रमाणे इतर लाखो साधने त्यावर प्रकाश टाकतात. गरज आहे ती, हा वारसा स्वच्छपणे समाजापुढे मांडण्याची. त्याग, समर्पण, सहनशीलता, सर्वांगीण सहिष्णुता (सर्वांगीण या शब्दाची इथे फार गरज आहे, कारण सहिष्णुतेच्या हल्ली धार्मिक,सामाजिक,राजकीय,शैक्षणिक इ. अशा अनेक शाखा उघडल्या आहेत. सहिष्णुतेचे प्रकार कसे असू शकतात?) ,नैतिकता इ मूल्यांना समाजजीवनात खूप महत्व आहे, तसेच प्रत्येक नागरिकाला त्या बंधनकारक अशाच आहेत. गांधीजींचे राजकीय आणि अराजकीय अधिष्ठाणच मुळात नैतिकता या प्रमुख मुद्द्यावर उभे होते . याच दैनंदिन आचरणात अवलंबन हेच सामाजिक स्वास्थ्यास गरजेचं असते. आदर्श समाज हा, सरकार बनवत नसून समाजातील सामील घटक बनवत असतात, सरकार किंवा शासन हे फार तर व्यवस्थापक अथवा कार्यवाहक असतात.  प्रस्थापित इतिहासकार संघर्षाच्या घटनांवर नको तेवढा भार देतात आणि अकारण नायक आणि खलनायक तयार करत असतात. इतिहास वस्तुनिष्ठ मांडण्यात आला, तर सहसा एक गोष्ट सहज लक्षात येऊ शकते कि ज्यांच्या हातून चुका झाल्या होत्या त्या व्यक्तींचा दाखला घेऊन भविष्यात त्या चुका टाळल्या जाव्या यासाठी प्रयत्न करणेच हितकारक असते. अकारण त्या उगाळत बसण्यात काहीही साध्य होत नाही, इतिहास बदलणे शक्य नसते आणि डोळ्यासमोर वर्तमानही वाया जाते. इतिहास आणि वर्तमानाच्या या झगड्यात भविष्याची विषारी स्वप्ने दिसू लागतात. 
             व. पु. काळे यांचं “पार्टनर” या पुस्तक आहे. त्यात एक छान ओळ आहे. “तहान लागल्यावर पाणी प्यावं, त्याच उगीच H2O  वगैरे पृथक्करण करत बसने फालतू आहे”. तहान लागल्यावर पाण्यान तहान भागवली, विषय इथेच संपतो, त्याच H2O वैगरे पृथक्करणान काय साध्य होते ? गरज तहान हि होती इतक हे साध्य तत्वज्ञान आहे. इतिहासाचं देखील असेच आहे. मांडावं सगळं काही, पण घ्यावं हवं तेवढंच.
            पाण्याचं पृथक्करण हि वैज्ञानिक संकल्पना आहे, विज्ञानाचा विषय निघालाच म्हणून, अशाच एका वैज्ञानिकांचे गांधीबाबत मत घेऊन हा प्रथम लेख संपवतो. अल्बर्ट आइन्स्टाइन हे एक महान वैज्ञानिक होते. गांधी निवर्तल्यानंतर ते म्हणाले " भावी पिढ्यांचा यावर विश्वास बसणं कठीण होईल, कि हाडामांसाचा असा एक माणूस खरोखरच या पृथ्वीतलावर होता". ( १९९९ च्या Person of Century  या Times magazine ने प्रकाशित केलेल्या यादीत अल्बर्ट आइन्स्टाइन हे पहिले तर गांधी दुसरे होते ) 
आइन्स्टाइन असे का म्हणाले याचा विचार व्हायला हवा का ?

चेतन साळुंखे
विघ्नहर्ता ऐतिहासिक ग्रंथालय,
हडपसर, पुणे

संदर्भ : मोहनदास : राजमोहन गांधी, अखंड प्रेरणा गांधीविचारांची : रघुनाथ माशेलकर , लेट्स किल गांधी : तुषार गांधी , दुसरे प्रोमेथिस - गांधी : वि स खांडेकर ,  जिना अँड गांधी : एस के मुजुमदार , लोकमान्य ते महात्मा : सदानंद मोरे , फ्रिडम ऍट मिडनाईट : डोमिनिक लॅपिये / लॅरी कॉलिन्स , ट्रान्सफर ऑफ पॉवर : मेनन, निवडक नरहर कुरुन्दकर - तिन्ही खंड : देशमुख आणि कंपनी,  मार्क्स एंगल्स लेनिन यांचे भारतावरील लेख : सरला कारखानीस , बहुरूप गांधी : अनु बंदोपाध्याय , ब्रिटिशांची भारतातील राजनीती : एस गोपाळ, अच्युतराव पटवर्धन : हरिभाऊ लिमये , गांधीजी आणि त्यांचे टीकाकार : सुरेश द्वादशीवार, गांधीजी जसे पहिले जाणले विनोबांनी : कांती शाह.