#_१५०_वर्षांचे_गांधी_
#भाग_४_पहिले_वळण_पूर्वार्ध_
गांधी कुटुंबाचे प्रमुख ( मोहनदासांचे आजोबा) उत्तमचंद हे पोरबंदर या छोट्या संस्थानाचे दिवाण होते, गांधी घराणे मूळचे जुनागड संस्थानातील कुटीया गावचे. बनिया (वाणी) या वैश्य जातीतील "मोढ" या उपजातींमध्ये गांधी घराणे मोडतात. उत्तमचंद यांच्या दिवाणगिरीचा हाच वारसा पुढे करमचंद गांधी म्हणजेच मोहनदासच्या वडिलांनी चालविला. पोरबंदरचे राणा हे राजपूत घराणे. फारसा प्रतिकार न करता हे संस्थान ब्रिटिशाना शरण गेलेले. उत्तमचंद गांधी व करमचंद गांधी यांच्याबद्दल फारशी माहिती उपलब्ध नाही. गांधीजी स्वतःच्या चरित्रात व वेळोवेळी भावंडांशी केलेल्या पत्रव्यवहार किंवा आठवणींनीच्या कथनात उत्तमचंद व करमचंद यांच्याविषयी माहिती पुरवितात. उत्तमचंद यांना ओटा गांधी असेही संबोधले जात असे.त्यांच्या घरी रामाची भक्ती मनोभावे केली जात असे. "तुलसीदास रचित "रामचारीत मानस" याचे घरी नियमित पारायण होत असे, “माझ्या मनावर त्यामुळे रामायण वाचनाचा माझ्या मनावर खोलवर परिणाम झाला आणि तो अतूट राहिला" अशी नोंद गांधी आत्मचरित्रात करतात. ओटा गांधींविषयी ते लिहितात "माझे आजोबा हिशोबाचे खुप पक्के आणि प्रामाणिक राहिले होते, तसेच त्यांचे प्रस्थ व प्रतिष्ठा हि सर्वमान्य होती". पोरबंदरच्याच दिवाणपदी असताना खजिनदार व राजकन्या-राणी रुपालीबा यांच्यात हिशोबावरून काहीतरी बिनसले. चिडलेल्या राणीने त्यास शिक्षा फर्मावली. घडली हकीकत खजिनदाराने ओटा गांधींना सांगितली, कदाचित खजिनदाराची काही चूक नसेल म्हणून ओटा गांधींनी त्याला आश्रय दिला.राणीला हे आवडले नसावे तिने ओटा गांधींचे घर तोफेने उडवायचा फर्मान काढला. ओटा गांधींनीं दरबारचा त्याग केला व राजकोट संस्थानात नोकरीस गेले. तेथेही ते दिवाणपदी राहिले. ओटा गांधींना ६ मुले (पहिली पत्नी ४ व दुसरी पत्नी २), करमचंद गांधी (काबा गांधी) हे ५वे व तुलसीदास हे ६वे सर्वात छोटे.करमचंद जास्त शिकले नव्हते. कदाचित हेच कारण असावे किंवा त्याकाळी संस्थानातील कामकाज पाहण्यासाठी आता नवशिक्षित तरुण अधिकारी ठेवण्यास संस्थानांनी प्राधान्य दिले असावे, परंतु त्यामुळं काबा गांधींना नोकरीत स्थैर्य मिळले नाही. पोरबंदर, बकानेर, जुनागढ, राजकोट अशा संस्थानाच्या त्यांनी दिवाणगिरी केली. राजकोटची चाकरी हि त्यांची शेवटची. ते या संस्थांचे पेन्शनधारी झाले . काबा गांधींनी ४ लग्ने केली. पुतळीबाई त्यांच्या शेवटच्या पत्नी आणि मोहनदास त्यांचे सर्वात शेवटचं आपत्य.लक्ष्मीदास सर्वात मोठा, रलीयत दुसरी, करसनदास तिसरा व मोहनदास चौथे. या व्यतिरिक्त मुलीबेन व पानकुंवरबेन या त्यांच्या सावत्र बहिणी होत्या.
मोहनदास चे प्राथमिक शिक्षण प्रथम एक वर्ष पोरबंदर येथे (१८७५) व नंतर राजकोट येथे चालू झाले(१८७६).सन १८८० पर्यंत त्यांनी राजकोटमध्येच ४ थी पर्यंत शिक्षण घेतले.१८८० ला काबा गांधींनीं राजकोटलाच भव्य वास्तू बांधली. याच वर्षी गांधी आंग्ल-गुजराती शाळेच्या प्रवेशपरीक्षेत ७० मुलांत ९ वा नंबर मिळवला. तिथलं शिक्षण नंतर इंग्रजीत झाले. हेच ते प्रसिद्ध आल्फ्रेड हायस्कुल. आपल्या आत्मचरित्रात गांधी “ते अभ्यासात फार हुशार नसल्याचे” नोंदवितात. तसेच “तब्येतीने किरकोळ असल्याची नोंद” ते करतात. त्यांचे आकलन व स्मरण चांगलं असल्याचेही ते सांगतात. त्यांचे शिक्षक, मित्र यांची नावे व शाळेतील प्रसंग हि त्याना आठवत असल्याची कबुली ते देतात. "१० वर्षांचा असताना ब्राम्हण मुलाप्रमाणे कमरेला किल्ल्यांचा जुडगा बांधला" असे ते सांगतात. शाळेतील एक आठवण ते आवर्जून इथे सांगतात. मि.गाइल्स नावाचे शिक्षण पर्यवेक्षक मुलांना परीक्षेत उत्तरे खुणावून सांगत असल्याचे गांधींनी पहिले होते. नक्कल करून गांधींनी उत्तर लिहिली नाहीत तेव्हा कदाचित गाइल्स काय खुद्द गांधींनाही वाटले नसेल कि ते बंडखोर विचार करत आहेत. असो महानायकाच्या चरित्रात ते लहानपणी असामान्य असल्याचे नेहमी रंगवले जाते, वाचनाची आवड निर्माण करणे किंवा लेखकाच्या अभिव्यक्तीचा कदाचित तो अविष्कार असेल, परंतु गांधी बालपणी असामान्य कोठेच वाटत नाहीत. त्यांच्या आत्मचरित्रातील कथनावरून त्यांच्या नंतर च्या वाटचालीत कसा फरक पडला याचा अंदाज बांधता येतो. "माझे सत्याचे प्रयोग अर्थात आत्मकथा" यात गांधींनीं अशा बऱ्याच प्रसंगांचे वर्णन केले आहे. ते बुजरे होते, त्यामुळे शाळेतून थेट घरी येत असत, आईचे ते लाडके होते व सर्व चिकित्सक प्रश्नांची उत्तरे आईकडे विचारात असत. त्यांची आई श्रद्धाळू आणि प्रेमळ होती. घरी वैष्णव परंपरा असली तरी राम व जैन साधूंच्या विचारांचा, भजन व पूजा अर्चनाचा वारसाहि कुटुंबाने जपला होता. "श्रावण-पितृभक्ती","हरिश्चंद्राचे आख्यान" अशी नाटके त्यांनी पाहिली होती. "मला पण श्रावणासारखे व्हावयाचे"असे त्यांच्या मनात येई," सर्वांनीच हरिश्चंद्रासारखे सत्यवादी का होऊ नये"अशा आशयाची विचार त्यांच्या मनात घोळत असे. आत्मकथा लिहिताने "आजही श्रावण आणि हरिश्चंद्राचे विचार मनात घर करून आहेत" असे कथन ते करतात. सौराष्ट्र व गुजरात प्रदेश १८व्या व १९व्या शतकात मोघल, इंग्रज, मराठे व राजपूत शासकांनी वेळोवेळी सत्ता केलेला प्रदेश. इंग्रज, अरब व पारशी व्यापारी पेढी येथे तेजीत होती. जैन, इस्लाम, हिंदू, पारशी संस्कृती येथे एकमेकांसोबत राहिल्या. त्यामुळे इथे एक स्थानिक धार्मिक वैशिष्ट्य निर्माण झाल्याचे जाणवते. इस्लामी प्रणामी पंथ इथे हिंदूंवर प्रभाव पाडताना दिसतो, अनेक जैन संतांचे मुस्लिम व हिंदू अनुयायी असल्याचे दिसतात. बेहरामजी मलबारी(पारशी), वल्लभासूरी (जैन), श्रीमद राजचंद्र(जैन) इ. विद्वान प्रामुख्याने या विचारांचे नेतृत्व करतात. असपृशयांचा प्रश्नांचा "उका" नावाच्या भंग्याच्या निमित्ताने आत्मचरित्रात उल्लेख आढळतो.
त्यांच्या आत्मचरित्रात बालपणातील केलेल्या चुकांवर प्रामुख्याने भर दिलेला आढळतो. त्यांनी व त्यांचा भाऊ करसनदास हे सिगारेटच्या व्यसनाच्या मागे लागले होते. मेहताब नावाच्या मित्राने त्यांना मांसाहार करण्यास प्रवृत्त केले.
“BEHOLD THE MIGHTY ENGLISHMAN
HE RULES THE INDIAN SMALL
BECAUSE BEING A MEAT-EATER
HE IS FIVE CUBITS TALL”
हि कविता गांधींना मांसाहाराशिवाय शूरवीर होता येत नाही याची पुष्टीच करून देणारी ठरली. असो मेहताब ने गांधींना वेगळ्या वाटेवर नेण्याचा प्रयत्न केला. परंतु नंतर गांधी सावध होतात. मेहताब हे प्रकरण पुढे दक्षिण आफ्रिकेपर्यंत चर्चेत आलेले व्यक्तिमत्व. शूर माणसे होण्यासाठी मांसाहार हि प्राथमिक पायरी आहे हि त्यांची भाभडी समजूत होती. अंगपीडाने बारीक असलेल्या मोहनला हा मार्ग सोपस्कार वाटला असावा. तरीही गांधीजींचा मूळचा पिंड हा नव्हताच. त्या काळी प्रसिद्ध कवी नर्मदाशंकरांचे काव्य त्यांना खूप प्रेरित करून गेले, तर कवी शामल भट्ट यांचे काव्याने ते भावुक झाले. नर्मदाशंकर व भट्ट दोघेही भावनाप्रधान काव्य करणारे कवी होते. पश्चिमेकडील बंगाली कवी अशी देखील काही अभ्यासकांची त्यांच्याविषयी मते होते. सर जॉन स्ट्राची बंगाली लोकांना बायकी समजायचा, तेच मत त्याचे गुजराती आणि महाराष्ट्री लोकांबद्दल होते. पराभवानंतर अवसान घाट झालेली लोक असं त्याच म्हणणं होत. १८८८ सालचे त्याचे हे मत किती अपरिपक्व होते हे त्याला नंतर कळून चुकले असेल. सुरुवातीस इंग्रजी शासनाचे गोडवे गाणारे काव्य हि त्यांना पसंद पडत होती. गांधींनी अशा अनेक गोष्टी आत्मचरित्रात नोंद केलेली आहे,
आत्मचरित्रातील खंड १ मध्ये गांधी बालपणातील ज्या चुकांबद्दल बोलतात त्या काहींपैकी त्यांचा बालविवाह. त्यांचा विवाह १८८२ साली (१३ व्य वर्षी) कस्तुर माकानजी कापडिया शी झाला. त्यांची बालविवाह बाबतच्या दृष्टिकोनाकडे आपण नंतर येणार आहोत. याच खंडात त्यांनी "चोरी आणि प्रायश्चित" या सदरात वडिलांकडे चोरी केल्याची कबुली देतानाचा प्रसंग वर्णन केलेला आहे.त्यांनी एक चिट्ठी लिहिली व वडिलांकडे दिली(वडील त्यावेळीस आजारी असून अंथरुणात खिळून होते).
-"कबुलीजबाब देताना मी थरथर कापत होतो.. त्यांनी तो संपूर्ण वाचला आणि मोत्यासारखे टपोरे अश्रू त्यांच्या गालावरून ओघळून कागद ओला करू लागले. क्षणभर डोळे मिटून त्यांनी विचार केला आणि चिट्ठी फाडून टाकली. ती वाचण्यासाठी ते उठून बसले होते. ते पुन्हा आडवे झाले. मीसुद्धा रडत होतो. माझ्या वडिलांच्या मनाला झालेल्या वेदना मला जाणवत होत्या. मी जर चित्रकार असतो, तर त्या प्रसंगाचं चित्र आज मी काढू शकलो असतो. त्या मोत्यांसारख्या प्रेमळ अश्रुनी माझ्या हृदयाला न्हाऊ घातलं आणि माझी पाप धुवून काढली". (आत्मचरित्र - खंड १,प्रकरण ८ चोरी आणि प्रायश्चित)
गांधी अंतर्मुख होऊ लागले होते. संवेदनशिलता व चुकीची कबुली देण्याचे धारिष्ट हि मूल्य प्रामुख्याने आत्मचरित्रातील पूर्वार्धातील वैशिष्ट्य ठरतात. आत्मचरित्रातील पूर्वाधात त्यांनी शैक्षणिक वाटचाल व वडिलांच्या मृत्यूनंतर शिक्षण व खाजगी आयुष्यातील आलेल्या अडचणी व त्या वर केलेली मात यावर लिहिले आहे. १८८७ साली ते मॅट्रिक ची परीक्षा पास झाले. पुढचा प्रवास त्यांना लंडन ला घेऊन जाणारा होता. त्याची चर्चा आपण पुढील भागात करणार आहोत तत्पूर्वी भारतातील काही प्रमुख राजकीय घडामोडींचा आढावा घेणं इथे योग्य ठरेल.
व्हॉईसरॉय लॉर्ड मेयो यांची अंदमान च्या दौऱ्यावर असताना फेब्रुवारी १८७२ मध्ये हत्या करण्यात आली. (अजमेर चे राजपुत्रांसाठीचे महाविद्यालय व राजकोट चे महाविद्यालय हि मेयोची कामगिरी म्हणता येईल. रेल्वेच्या विस्तारीकरणासाठी याने भरीव कामगिरी केली, तसेच त्याने शेतीविषयी व वाणिज्य घडामोडींसाठी स्वतंत्र विभाग चालू केला. पुढे १८७६ -७७ यासालच्या भीषण दुष्काळाच्या प्रसंगी या विभागाने महत्वाची भूमिका बजावली. महाराष्ट्रातील बोलायचे झाले तर भाग३ मध्ये ज्या "डेक्कन ऍग्रीकल्चरिस्ट रिलीफ ऍक्ट" ह्या घटनात्मक तरतुदीविषयी चर्चा झाली तिला मुख्य पाठबळ या विभागाच्या परिस्थितीजन्य अहवालाचे होते.). शेर अली आफ्रिदी नावाच्या व्यक्तीने हि हत्या केली. या घटनेची गंभीर दाखल लंडन मध्ये घेण्यात आली. प्रसारमाध्यमांनी याला जिहाद म्हणून घोषित केले. वास्तविक हि घटना "जिहाद" या इस्लामी संकल्पनेशी जोडण्याची ब्रिटिश माध्यमांना फार घाई केली होती. शेर अली हा काही राजकीय गुन्हेगार नव्हता, तो याआधी ब्रिटिश सेवेतच होता व त्याची सेवा देखील ब्रिटिशांप्रती इमानीच होती, त्याने एका नातलगाची हत्या केल्या कारणाने तो अंदमानात शिक्षा भोगत होता. त्याला झालेल्या शिक्षेच्या विरोधात त्याने मेयोची हत्या केली होती. इस्लामी संकल्पना, राष्ट्रीय भावना, इस्लामी समस्याच इ. घटनांशी त्याचा काही संबंध नव्हता, परंतु हा विषय आता पराचा कावळा झाला होता. याच दरम्यान सर विल्यम हंटर यांनी भारतात "इंपिरियल गॅझेटिअर ऑफ इंडिया" १८६९ साली काम चालू केले होते.(९ खंडातील हे गॅझेटिअर १८८१ साली प्रकाशित झाले) विल्यम हंटर हे फार महत्वाचे व्यक्तीमत्व ठरतात ते अशा कारणाने कारण मुस्लिम प्रश्न धार्मिक ते सामाजि पातळीवर अभ्यासणारे ते सर्वात प्रभावी ब्रिटिश अधिकारी. त्यांनी मुस्लिम प्रश्नावर भाष्य करणारे "Bound by their religion to rebel against the Queen" अशा लांब लचक शीर्षकाचे पुस्तक लिहिले, १८७१ साली प्रसिद्ध झालेले पुस्तक मेयो च्या पाठपुराव्यामुळे झाले होते. वास्तविक स्वतः मेयो व हंटर हे ब्रिटिश आणि सर सय्यद अहमद खान हे भारतीय मुस्लिम नेते सोडले तर भारतीय मुस्लिम समाजाची फारशी दाखल घ्यायला इतर ब्रिटिश मुत्सद्दी तयार नव्हते. मुस्लिम समुदायाला दबावात ठेवणे हे एकमेव धोरण १८५७ ते १८७१ पर्यंत राबवण्यात आले होते. अफगाण प्रश्न, भारतीय मुस्लिम समाज हे एकप्रकारे फक्त लष्करी प्रशासनासमोरचे आव्हान मानण्यात आलेले होते. मेयो ने प्रथम त्यांच्या इस्लामी धोरणाविषयी पुनर्विचार कारण्याबाबत हालचाली केल्या. दुर्दैवाने त्याचीच हत्या झाली. त्याचदरम्यान बंगालचे मुख्य न्यायाधीश नॉर्मन यांची हत्या मुस्लिमांनी केली आणि लंडन प्रशासन यांनी हंटरच्या अहवालाची दाखल घेतली. पुढे जाऊन उदारमतवादी म्हणवला गेलेल्या लॉर्ड रिपन च्या काळात शैक्षणिक परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी जे कमिशन नेमले गेले त्याचे हंटर अध्यक्ष होते. हंटर ने इस्लामी सभ्यता, भारतातील इस्लामी स्थिती, इस्लामच्या राजकीय भावना, राष्ट्रवाद या विषयी सविस्तर लिहिले. बायबल व कुराण यातील साम्य दाखवून हे पुस्तकी धर्म व हिंदू सभ्यता यातील भेद स्पष्ट करणारे उदाहरणे त्याने दिली. स्वराष्ट्रासाठी जिहाद पुकारणाऱ्या इस्लामी सभ्यता ब्रिटिश धार्जिणे होऊ शकत नाही हे त्याने स्पष्ट नमूद केले. हिंदू आणि इस्लामी संस्कृती अनेक शतके एकत्र राहत असली तरी हिंदू इस्लाम एकी होणे शक्य नाही याची स्पष्टोक्ती हंटर देतात. तरीही ब्रिटिश साम्राज्याविरुद्ध भारतातील मुस्लिम हे वैरी ठरू शकत नाहीत याची हंटर खात्री देतात. परंतु त्या आधी ते काही धोरणात्मक तरतुदी सुचवतात. त्यांना शैक्षणिकी सवलती देण्याचे ते सुचवतात, अप्लसंख्यांक असल्या कारणाने त्यांचे राजकीय भविष्य हिंदूंच्या मेहेरबानीवर अवलंबून राहू नये यासाठी त्यांच्यासाठी राजकीय सवलती सुचवतात. हंटर एवढ्यावर थांबत नाहीत तर ब्रिटिशांच्या मुस्लिमद्वेष्ट्या धोरणामुळे भारतात अप्रत्यक्ष हिंदू मुस्लिम वाद निर्माण होऊन ब्रिटिश साम्राज्यास नुकसानच होईल अशी सणसणीत टीका करतात. ख्रिश्चनांनी बायबल मधील १० तत्वामध्ये बदल करून धार्मिक आधुनिकीकरणाचे धोरण कडव्या सनातन्यांना डावलून आचरणात आणले याचा दाखला मुस्लिमाना देतात व कुराणातील धार्मिक विचार व आचार, आधुनिक राष्ट्राच्या गरजा भागविण्यात कुचकामी ठरतील असे सांगून सावध करतात. सय्यद अहमद मात्र हंटर च्या मतावर समाधानी नव्हते. त्याची कारणे ते स्पष्ट करतात. हंटर ने वहाबी चळवळीत भारतातील मुस्लिमांनी घेतलेल्या सहभागामुळे, त्यांना स्वभतः राजद्रोही म्हटले. ते धर्मनिष्ठ असू शकतात पण राष्ट्रनिष्ठ नाही या वाक्याबद्दल हि खान साहेबांना आक्षेप होता. "इंडियन पायोनियर" यातुन त्यांनी हंटर ला याबाबत आवाहन केले. वास्तविक आधुनिकतेच्या मुद्द्यावर व मुस्लिम समस्यांवर खान व हंटर यांचे एकमत होणे अपेक्षित होते. पण तसे झालेले दिसत नाही. उलट सनातनी मुस्लिम परंपरेचा अभिमान व धार्मिक बाबतीत हंटरच्या मागे गेलेले दिसतात पण सुधारणा सामाजिक व शैक्षणिक सुधारणांसाठी त्यांनी हंटरच्या सल्ल्याला केराची टोपली दाखवली. हंटरने जेव्हा नंतर काँग्रेसच्या स्थापनेत पुढाकार घेतला तेव्हा सर सय्यद खान मुस्लिमाना काँग्रेपासून लांब राहा का म्हणाले हे एवढ्यावरून स्पष्ट होते. हंटरच्या मतांना हिंदू नेत्यांनी विरोध केला हे काही वेगळे सांगायला नको. पुणे स्थित चिपळूणकर, रानडे, लोकहितवादी हे त्यात प्रमुख होते. महात्मा फुले यांनी देखील हंटर च्या धोरणांना विरोध केला परंतु त्याचे कारण हंटर ने हिंदूंकडे संशयाने पाहिले व मुस्लिमांचे उदात्तीकरण केले हे नसून, हिंदूंमध्ये देखील ब्राम्हण वर्ग सोडला तर इतर वर्ग शैक्षणिक व इतर सुधारणांच्या बाबतीत मसुलमानाइतकाच मागासला आहे या गोष्टीकडे हंटर ने केलेले दुर्लक्ष हे होते. त्यातून पुढे हंटर कमिशनपुढे त्यांनी सुप्रसिद्ध साक्ष दिली. असो हंटर संयमी, हुशार व परिस्थतीचे अचूक आकलन करणारा सनदी अधिकारी होता. ब्रिटिश शासन भारतात दीर्घकालीन टिकवायचे असेल तर भारतीय लोकांना काही अधिकार दिले पाहिजेत या निष्कर्षापर्यंत तो पोहचला होता. लॉर्ड नॉर्थबुक हे १८७२ साली व्हॉईसरॉय म्हणून भारतात आले. त्यांच्या काळात पंजाब मधील कुका व कसाई यांच्यात संघर्ष उद्भवला गुरु रामसिंह कुका हा त्यातील एक प्रमुख. लुधियानाचे डेप्युटी कमिश्नर मि. कॉवीन याने ६८ कुका पकडले व त्यातील ४९ जणांना तोफेच्या तोंडी दिले होते. लॉर्ड अल्फ्रेड लॉयल याने त्यावेळीस अशाप्रकारच्या शिक्षेवर टीका केली होती. भारतमंत्री जॉर्ज कॅम्पबेल हा त्यावेळेस फार वाद्ग्रस्त ठरलेला व्यक्ती होता. वास्तविक हा अत्यंत उर्मट , घमंडी आणि हेकेखोर होता. त्याने त्याच्या मुलाचा राणी एलिझाबेथ च्या मुलीशी विवाह घडवून आणला होता. याचीच धोरणे १८७८ च्या दुसऱ्या अफगाण युद्धास कारणीभूत ठरली होती. मुस्लिम प्रश्न चिघळत जाण्यात अशीच काही अनपेक्षित व्यक्तीदेखील कारणीभूत ठरल्या होत्या. मि.कोविन च्या कारवाई वर कॅम्पबेल ने दुर्लक्ष केले व नॉर्थबुक ला अफगाण व मुस्लिम प्रश्न सक्तीने हाताळण्याचा सल्ला दिला. नॉर्थबुक नरम स्वभावाचे होते परंतु वशिल्याने पद मिळालेल्या कॅम्पबेलचे ऐकणाऱ्यातले नव्हते. परंतु हंटर मात्र कॅम्पबेलच्या पवित्र्याने पुरते संतापले. हंटर चा मुस्लिम धार्जिणा स्वभाव पाहून सर अल्फ्रेड लॉयलने हंटरचे सर्व युक्तिवाद "एशियाटिक स्टडीज" व "इंग्लिश डोमेन इन इंडिया" या पुस्तकात खोडून काढले.
१८६८ साली ब्रिटिशांनी एडन बंदराच्या जवळचा असलेले खुरीया मुरिया हि बंदरे जिंकली व एडन च्या नियंत्रणाखाली आणली, सुएज कालव्याच्या निर्मिती नंतर दक्षिण मध्य युरोपात भूमध्य सागराच्या वर्चस्वासाठीचा संघर्ष उद्भवने स्वाभाविक होते. तुर्किश सत्ताकेंद्रे त्याच दरम्यान अंतर्गत कलहाने कमकुवत झाली होती. रशिया सारख्या देशाने जेव्हा तुर्किश सीमेवर हल्ले करून बराचसा प्रदेश जिंकला तेव्हा इतर युरोपीय देशांना भीती वाटणे सहाजिकच होते. त्यातूनच १८७८ सालाची बर्लिन काँग्रेस आयोजित केली गेली बाल्कन प्रदेशाचा तिढा सोडवण्यासाठी युद्धेत्तर तोडगा काढण्याचा प्रयत्न केला गेला. तुर्किश साम्रज्याचे विघटन करून युरोपीय देशांनी आपापले फायद्याचे प्रदेश मिळवले. बेंजामिन डिझारेली यांच्या शिष्ट मंडळाने त्यावेळेस सायप्रस हा महत्वाचा प्रदेश स्वतःकडे ठेवण्यात यश मिळवले. सुएज कालव्याच्या भूमध्य समुद्रातील प्रवेशासमोरील हा महत्वाचा भाग. सूरज कालवा आता जरी फ्रेंच संस्थांच्य नियंत्रणात होता तरी भूमध्य समुद्रातील व्यापारी संघर्ष बाल्कन प्रदेशातील प्रभुत्व ठेवणाऱ्या देशांच्या हातात होता. पुढे जाऊन हाच बाल्कन प्रदेश पहिल्या महायुध्दास कारणीभूत ठरला. १८७० ते १८८० दशकात आणखीही काही महत्वाच्या घडामोडी घडल्या. त्याचाही परामर्श घेणे गरजेचे आहे. भाग ५ मध्ये मोहनदास इंग्लंडला शिक्षणास जातो, भारतीय हिंदुत्व राजकारण, रिपन च्या भूमिका, काँग्रेस ची स्थापना इ मुद्द्यांवर असेन.
स्वातंत्र्य युद्धात इतिहासाने अनेक वळणे घेतलेली आपण पहिली आहेत. अशा वळणांची यादी करायची म्हटले तर १८५७ च्या उठावानंतर १८७० च्या दशकातील ब्रिटिशांचे धार्मिक धोरण (फोड व राज्य करावा) ते १८८५ काँग्रेसची स्थापना हे इतिहासातील पहिले महत्वाचे वळण. या वळणाच्या पूर्वार्धातील काही घडामोडी व गांधीजींचे बालपण याची चर्चा आपण येथे केली उर्वरित ५ व्या व ६ व्या भागात पाहूया.
#भाग_३_ची_लिंक_https://www.facebook.com/groups/1770059159878452/permalink/2119601038257594/
संदर्भ
Mahatma Gandhi Collected Works Volume -1
सत्याचे प्रयोग अथवा आत्मकथा - मो.क.गांधी
मोहनदास - रा. गांधी
ब्रिटिशांची भारतातील राजनीती - एस गोपाळ
लोकमान्य ते महात्मा - डॉ. सदानंद मोरे
महान भारतीय क्रान्तिकारक - स ध झाम्बरे
मोहनदास करमचंद गांधी एक प्रेरक जीवनी - नरेंद्र शर्मा
चित्र १ - सर विलियम हंटर भारतीय समाजाच्या धार्मिक मानसिकतेचे अभ्यासक, मुस्लिम प्रश्नांचा पुनर्विचार करणारे, मुस्लिमांच्या अवनीतीस ब्रिटिशांस जबाबदार धरणारे सनदी अधिकारी.
चित्र २ - हंटरचे महत्वपूर्ण काम म्हणजे "इंपिरियल गॅझेटियर ऑफ इंडिया"
चित्र ३ - अंदमानच्या तुरुंगात ज्यांची हत्या झाले ते लॉर्ड मेयो
चित्र ४ - व्हॉईसरॉय मेयो ची हत्या करणारा शेर अली आफ्रिदी
चित्र ५ - मेयोने पुढाकार घेऊन रेल्वेचे जाळे भारतभर पसरविण्याकरिता त्याची राज्यनिहाय विभागणी केली. त्याचा प्रातिनिधिक स्वरूप दाखवणारा नकाशा.
चित्र ६ - पश्चिम भारत नकाशा
चित्र ७ - तरुणपणी गांधी बंधूचे एक चित्र
चित्र ८ - बाल्कन प्रदेश तिढा सोडवण्यासाठी जर्मन बिस्मार्कने १८७८ साली युरोपीय देशांची बैठक बोलावली. बर्लिन काँग्रेसचे एक चित्र.
No comments:
Post a Comment