मागील ६० वर्षांपासून राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची हत्या आणि हत्या करणारा नथुराम गोडसे हा विषय अनेकवेळा, अनेक अंगाने सतत चर्चीला जात आहे. एका सामान्य निशस्त्र वृध्दावर गोळ्या झाडणार्या नथुरामाचे गौरविकरण करण्याची एकही संधी या काळात एकदाही सोडली गेली नाही. सार्वजनिक जीवनात नथुराम गोडसे आणि नथुरामाने केलेल्या कृत्याचा धिक्कार करणारे व्यक्तीगत जीवनात त्याचा प्रचंड अभिमान बाळगतात हे वास्तव कोणीच नाकारणार नाही . अशा कर्मठ नथुराम भक्तांची अलीकडच्या काळात अनेकांना नव्याने ओळख होऊ लागली आहे. ‘मी नथुराम गोडसे बोलतोय’ या नाटकाच्या निमित्ताने निर्माण झालेल्या वादळाच्या पार्श्वभूमीवर एक इतिहास संशोधक या नात्याने अगदी तटस्थ वृत्तीने य. दि. फडके यांनी केलेले लेखन प्रत्येकाने गांभीर्याने वाचायला हवे. महात्मा गांधीजींच्या खुनामागे असलेल्या ऐतिहासिक सत्याचा वेध फडकेंनी ‘नथुरामायण’ या त्यांच्या पुस्तकातून घेतला आहे. सत्याचा वेध घेणारा हा प्रयास म्हणजे मागच्या सहा दशकांपासून कुजबुज आघाड्यांवर सुरू असलेल्या अनेक गैरसमजांना तिलांजली देण्याचा महत्वपूर्ण कार्यक्रम म्हटले तरी वावगे ठरणार नाही. नथुराम गोडसे खरोखरच हुतात्मा होता का ? त्याचे आणि सावरकरांचे नेमके काय आणि कसे संबंध होते ? गांधीजींनी ५५ कोटी रूपये पाकिस्तानला देण्याचा आग्रह धरला होता त्यामुळेच त्यांचा खून झाला, या म्हणण्यात किती तथ्य आहे ? या आणि अशा अनेक प्रश्नांची उत्तरे फडकेंनी अत्यंत प्रामाणिकपणे या पुस्तकातून मांडली आहेत.
प्रदीप दळवींनी लिहिलेल्या मी नथुराम गोडसे बोलतोय या नाटकाच्या पहिल्याच दृष्यात नथुराम प्रेक्षकांना उद्देशून बोलताना अटकेत असताना तात्याराव सावरकर आपल्याला काय म्हणाले ते सांगतो. तो म्हणतो, ‘तात्याराव म्हणाले वेडा आहेस. मी तुला शतायुषी हो, असं नाही म्हटलं. चिरंजीव हो असं म्हटलं. तू चिरंजीव झालायस नथुराम; ज्या क्षणी तू पिस्तुलाचा चाप दाबलास आणि गांधी मृत झाले, त्याच क्षणी तू चिरंजीव झालास. गांधीवाद संपवलास की नाही हा कदाचित वादाचा सुध्दा मुद्दा ठरेल; पण तू गांधी संपवलेस आणि स्वतः उरलास.’ अशी अनेक वाक्य सावरकरांचे मनोगत म्हणून नथुरामाच्या मुखातून रंगमंचावर ऐकायला मिळतात. प्रदीप दळवींनी नथुरामाच्या तोंडी या नाटकात अशी अनेक पल्लेदार वाक्ये दिली आहेत. या नाटकात आयजीपी. अर्जूनदास या पात्राखेरीज शेख आणि सावंत या दोन पोलीस अधिकार्यांची पात्रे आहेत. मूळ मराठी नाटकाच्या २२ पाणी टंकलिखीत संहितेत शेख आणि सावंत हे दोघे दिल्लीतील पार्लमेंट स्ट्रीटवरच्या पोलीस ठाण्यातील अधिकारी असल्याचे दाखविले आहे.
३० जानेवारीला नथुरामाला बिरला भवनात पकडण्यात आल्यानंतर त्याला तुघलक रस्त्यावरील पोलीस ठाण्यात आणण्यात आले. तेंव्हा त्याला औपचारिक अटक शेखने केली आणि त्याचे पहिले निवेदन नोंदवून घेतले. असे दळवीनी दुसर्या अंकाच्या पहिल्या दृष्यात दाखविले आहे. आपण नाट्यरूपात इतिहास कथन करत असून जे रेकॉर्डमध्ये नाही, त्याचा नाटकात आधार घेतलेला नाही, असे नाटककाराचे म्हणणे आहे. त्यामुळे शेख आणि सावंत या अडनावाचे पोलीस अधिकारी १९४८ साली मुंबई पोलीसमध्ये होते का ? आणि त्यांचा दिल्लीतील गांधी खून खटल्याशी वा त्यातील आरोपींशी संबंध आला होता का ? याचा प्रथम शोध घेणे इतिहास संशोधकास अटळ असल्याचे मत फडकेंनी नमूद केले आहे. त्यातून नाटकात घुसडन्यात आलेल्या काल्पनिक पात्रांची माहिती फड़के अगदी पुराव्यानिशी मांडतात त्यामुळे दळवीनी केलेला बनाव आपोआप चव्हाटयावर् आल्याखेरीज राहत नाही.
नाटकात नथुरामाच्या तोंडी प्रदीप दळवींनी स्वतःचेच विचार कसे खुपसले आहेत. याचा सप्रमाण उलगडा फडकेंनी केला आहे. सामान्य वाचकाला प्राप्त असलेल्या सगळ्याच दस्ताऐवजाचे शवविच्छेदन करून सत्य जाणून घेणे शक्य नसते. त्यासाठी फडकेंनी केलेला हा प्रयत्न नाटकातून मांडल्या गेलेला खोटेपणा उघड करणारा आहे. नाटकात वापरलेला ‘वध’ हा शब्द जाणूनबुजून वापरलेला आहे. त्यासाठी वध या शब्दाचा चक्क इतिहासच फडकेंनी एका प्रकरणात मांडला आहे. त्यामुळे गांधीजींच्या हत्येला वध नव्हे, खूनच म्हणायला हवे, याचे आत्मभान सामान्य वाचकाला आल्याखेरीज राहत नाही.
पुस्तकात नथुरामायण, इतिहासाशी इमान आहे कुठे ?, दळवींनी रंगविलेली काल्पनिक पात्रे, हे शेख आणि सावंत कुठले ?, नथुराम-देवदास गांधी यांची काल्पनिक भेट, अनेक गांधीशिष्य नथुरामाच्या फाशीच्या विरोधात, नथुराम कधीही गांधीभक्त नव्हता, नथुरामाच्या तोंडी प्रदीप दळवींचेच विचार, पाकिस्तानचा आणि जीनांचा द्वेश करणारे हे कुठले शेख ? हेच का शब्दशः भाषांतर ?, हत्या एका आकाराची, गांधीजींचा वध की खून ?, वध शब्दाचा इतिहास, वध नव्हे खूनच म्हणा, गाय अल्ड्रेड-नथुराम गोडसे-सावरकर आणि गांधी, प्रदीप दळवींच्या नाटकातील नथुराम आणि स्वातंत्र्यवीर सावरकर, गोपाळ गोडसे आणि पु. ल. इनामदार यांना दिसलेले सावरकर, गांधीजी आणि स्वातंत्र्यवीर सावरकर, स्वातंत्र्यवीर सावरकरांचे न्यायालयातील निवेदन, नथुराम हुतात्मा नव्हे तर खुनी, खोटारडा नथुराम, ५५ कोटींचे बळी, गांधीजींचे अखेरचे उपोषण, नथुरामाचे गौरविकरण, अशी एकूण २३ प्रकरणे या पुस्तकात आहेत.
१९९८ मध्ये गांधी जयंतीला या पुस्तकाची पहिली आवृत्ती प्रकाशित झाली. त्यानंतर २०१४ पर्यंत एकूण चार आवृत्त्या प्रकाशित झाल्या आहेत. अक्षर प्रकाशन संस्थेच्यावतीने हे पुस्तक प्रकाशित करण्यात आले आहे. पुस्तकाचे मुखपृष्ठ संजय पवार यांचे असून किंमत २०० रूपये आहे. गांधीजींच्या हत्येचे राजकारण करीत नथुरामाचे गौरविकरण करण्याचा दळवींनी केलेला खोटारडा प्रयत्न, त्याला फडकेंनी वेळोवेळी दिलेले आव्हान आणि नाटककार दळवी तसेच नथुराम गोडसेंचे बंधू गोपाळ गोडसे यांनी फडकेंनी दिलेल्या आव्हानापासून काढलेला पळ हा सर्व इतिहास समजून घ्यावयाचा असेल आणि गांधी हत्येमागे असलेले नथुरामाचे आणि त्याच्या सूत्रधाराच्या सडक्या मेंदूतील राजकारण जाणून घ्यावयाचे असेल तर नक्की हे पुस्तक वाचायलाच हवे.
©रवि केसकर
No comments:
Post a Comment