प्रयास:- डॉ. पराग सावरकर
"गांधीजी आणि त्यांचे टीकाकार"
सुरेश द्वादशीवार
मला आठवतं पाच वर्षांपूर्वी नवीन दवाखान्यात थोडंस नूतनीकरण केलं होतं. तेव्हा डॉ सॅम्युअल हनीमन, सचिन तेंडुलकर, शिवाजी महाराज यांच्याच प्रमाणे महात्मा गांधीजीचं सुद्धा एक भिंतीचित्र लावलं. तो फोटो आणि एक छोटीशी मुर्ती "सेवाग्राम" आश्रमातुन आणली होती. फोटो लावण्याच्या मागे काहीच अस स्पेशल कारण नव्हतं. लहानपणी खेड्यात शिकायचो तेव्हा हे "बावाजी" आवडायचे. भारी वाटायचं. 'अर्धनग्न बुढा'... खिल्ली उडवायचे, चेष्टा मस्करी करायचो, जोक्स... काही काही जोक्स तर आताही आठवतात... असं सर्व वगैरे.. वैगरे.! परंतु घृणा, राग, किळस असं काही नाही. आपुलकी ती होतीच.
शाळा सुटली गावातून शहरात... migration!
अन गांधीजी आणि माझा संबंध तुटला. सातेक वर्षांपूर्वी म्हणजे क्लिनिक रिनोव्हेशन करण्याच्या दीड वर्षांपूर्वी... "सत्याचे प्रयोग" सापडलं आणि वाचलं. त्यानंतर सेवाग्राम जाऊन आलो. तेंव्हा ठरवलं दवाखान्यात हा "बुढा बावाजी" लावायचाच.
क्लीनिक मध्ये 'गांधीजी' ...? म्हणून कोणी कधी काही म्हटलं नाही. आश्चर्य 'शो' केलं; काही लोकांनी..बस.. तेवढंच...! मागील चार वर्षात सोशल मीडियावर किंवा दोस्त मित्रांसोबत बोलताना खूप सारे वेगवेगळे विचार, भ्रम, गैरसमज दिसायचे. त्यांची उत्तरे स्वतः शोधली आणि इतरांना समजून सांगण्याचा प्रयत्न केला. तेव्हा जर हे पुस्तक असतं तर माझे बरेच श्रम वाचले असते..." गांधीजी आणि टीकाकार".!
आजपर्यंत जगात गांधीजींशी निगडित सर्वात जास्त पुस्तके लिहिल्या गेलीत.. एक लाखाहूनही जास्त. दुसरा नेपोलियन आणि तिसरा मार्क्स. माझ्याकडे असलेलं हे पुस्तक म्हणजे त्यात अजून एक भर. ही या पुस्तकाची दुसरी आवृत्ती. पहिल्या आवृत्तीच्या सातव्या दिवशीच दुसरी आवृत्ती प्रकाशित आणि दहाव्या दिवशी हे पुस्तक माझ्याकडे.... प्रदीप भाऊंची कृपा...!
सहा महिन्यानंतर आत्ता कुठं वाचायला 'घेतलं'. विकत 'घेणं' आणि वाचायला 'घेणं'.... यांत खूप फरक असते. २६२ पेजेसचं जाडजूड पुस्तक वाचनं म्हणजे आपली चांगलीच लावून 'घेणं' आहे, असं मला वाटलं. पाच सहा महिन्यांपासून टाळत राहिलो. असून..असून काय असेल..?जे आपल्याला माहीत आहे तेच तर असेल. पण बघावच म्हटलं नेमकं काय..? अनुक्रमणिका वाचूनच वाचण्याचा मोह झाला. आठ दिवसात दोनदा वाचलं. सलग पुस्तक वाचायची माझी सवय नाही. ३०-४० पानी पुस्तक मला १०-१५ दिवस पुरतं. त्यात एकच पुस्तक "Repeat" वाचायची सवय. Credit goes to own low IQ. खूप क्वचित पुस्तके सलग वाचली असेल त्यातील हे एक...! कोणतंही पुस्तक वाचतांना त्यातील भावलेला मजकूर Highlight करायची माझी एक सवय आहे. पुस्तक वाचून झाल्यावर बघतो तर Highlight च Highlight.
"इतिहास आणि तोही सत्याच्या जवळचा"... वाचनीय आणि सुटसुटीत.
लेखक सुरेश द्वादशीवार... यांचा परिचय देण्यात अजुन एक पेज लिहा लागेल. अन माझ्यासारख्या आळशी माणसासाठी ते अजून एक दिव्य..! त्यांच्या परिचयाचा फोटोच टाकतो. तुम्ही समजून घ्या. लेखकाचे या अगोदर खूप सारे लेख मी वाचले असतील. पण 'हेच ते..?; ते हेच..!' हे माहीत नव्हतं. पहिल्यांदा बघितलं ते अमरावतीमध्ये मागील वर्षी "पंडित नेहरू" यांच्या विषयी त्यांचं एक जाहीर व्याख्यान होतं. दैनिक लोकमतचे काही संपादकीय लेख सुद्धा वाचले होते. You tube वर 7-8 व्याख्याने सुद्धा ऐकली, बघितली. लेखकाचं पुस्तक म्हणून वाचत असलेलं हे माझं पहिलंच पुस्तक. लेखणी आणि वाणी या दोहींवर सम समान प्रभुत्व असणार व्यक्तिमत्त्व म्हणजे सुरेश द्वादशीवार.! हे पुस्तक म्हणजे साप्ताहिक "साधना" साठी लेखकाने लिहलेल्या लेखांचा संग्रह आहे. पण ते तसं जाणवत नाही. साधनात आणि लोकमतमध्ये "हा" फरक जाणवतो.
सर्वसाधारण पणे माणसाचा बुद्धीला जसं सुचतं तसंच तो लिहितो.... ते मांडण ही एक कलाच असते.. पण त्याचा शोध घेणे हे एक विज्ञान. इतिहास हे असंच एक शास्त्र.! इतिहासात रेंगाळनारी इतिहास घडवू शकत नाही आणि इतिहास माहीत असल्याशिवाय भविष्य घडू शकत नाही. इतिहासाचा शोध घेणं हे एक विज्ञान आहे तर त्याची मांडणी करणं ही एक कला. विज्ञान आणि कला याचा अनोखा संगम म्हणजे इतिहास... आणि हे पुस्तक त्याचा एक अप्रतिम उदाहरण आहे.
या पुस्तकात लेखक गांधीजीचा जीवनप्रवास इतर महापुरुषांच्या आणि ऐतिहासिक घटनांच्या अनुषंगाने रेखाटतात. गांधीजी आणि गोखले, टिळक, मार्क्सवादी, समाजवादी, मुस्लिम लीग, जीना, फाळणी, सावरकर (मी नाही ते), भगतसिंग, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, सरदार पटेल, पंडित नेहरू, नेताजी सुभाषचंद्र बोस, विनोबा भावे, मौलाना आझाद, विस्टन चर्चिल, रवींद्रनाथ टागोर, टॉलस्टॉय, पत्नी कस्तुरबा, मुलगा हरीलाल, स्वातंत्र्य , धर्म.. .. यांतील प्रत्येक एक व्यक्ती, घटना म्हणजे एक एक मोती या सर्वांना गुंफून जी माळ होते...ती गांधी..!
गांधीजी म्हणजे एक वर्तुळ आणि यातील प्रत्येक जन एक बिंदू... एकाही बिंदू बिना वर्तुळ अपूर्ण...!
गांधीजींच्या आयुष्याशी निगडित सर्वच घटना आणि व्यक्तींचे तटस्थ विवेचन लेखकाने मांडले. माझ्या माहितीनुसार जर अजून दोन भाग असते तर त्यातील एक म्हणजे
-गांधीजी आणि र धो कर्वे, ब्रम्हचर्य, लैंगिक शिक्षण, कुटुंब नियोजन आणि
- दुसरं गांधीजी आणि थोरला मुलगा हरीलाल
या दोन्ही व्यक्तींशी गांधीजींचे विचार आणि संबंध गुंतागुंतीचे होते. प्रत्येक माणसाला काळाच्या वेळेच्या आणि आकलनाच्या मर्यादा असतातच तश्याच त्या एक माणूस म्हणून गांधीजींना सुद्धा होत्याच. हे आपण विसरून चालणार नाही.
टीकाकारांनी जरूर वाचावे एक बाजू, तो काळ, ती परिस्थिती समजून घ्यावी. गांधीजींना आरोपीच्या पिंजऱ्यात उभं करा. प्रश्न विचारा. तो त्याची बाजू मांडणार नाही. पण तुम्हाला उत्तर देईल. नंतर आपल्या बुद्धिप्रामाण्यवादानुसार खरं खोटं ठरवा. गांधीजींचे समर्थक तर हे पुस्तक वाचतीलच. अनुयायी तर फार कमी शिल्लक राहिले आहेत. तेही आज ना उद्या खपतील. त्यांनी सुद्धा वाचावे... गांधीजी बद्दल आस्था असणाऱ्यांनी नक्कीच वाचावे. एक गोष्ट या पुस्तकाच्या बाबतीत आवर्जून सांगावीशी वाटते, ती म्हणजे इतिहास असा वाचनीय आणि कादंबरी सारख्या ओघवत्या भाषेत... मी पहिल्यांदाच अनुभवतोय. प्रतिमारंजन नाही. सर्वात महत्त्वाचे म्हणजे पुस्तकाचा मुख्य किरदार कधीच "हिरो" होतं नाही. त्याच दैवतीकरण कुठंच जाणवत नाही. तसाही गांधी हा एक सामान्य हाडामासाचा "माणूस" होता.
गांधीजींशी निगडित जे काही समज, गैरसमज, प्रचार, अपप्रचार या सत्तर वर्षात तयार केले गेले त्या सर्व प्रश्नांची हे पुस्तक एक सप्रमाण आणि शास्त्रोक्त उत्तर आहे. माझ्यासारख्यांसाठी या पुस्तकाचा खूप आधार झाला.
गांधी माझ्या जीवनात काय महत्त्व ठेवतो...? टीकेला आणि टीकाकारांना उत्तर देण्यात मला स्वारस्व नाही. त्यांनाही नव्हतं. गांधी म्हणतो.."My life my massage" . मला जरी तो लिखाणातून वाचण्यातून भेटला असला... तरी मला भावतो तो कृतिशील गांधी. एक साधं जीवन जगताना पारलौकिक ध्येय साद्य करतांना मदत करणारा महात्मा...!
स्वतःच्या चुकांना समर्थपणे पेलण्याची आणि ते मान्य करण्याचं सामर्थ्य देणारा.. महात्मा...!
प्रयास:- डॉ. पराग सावरकर
०२/१०/१८
No comments:
Post a Comment