उत्तर- व्यक्ती ज्या वेळी गाढ संमोहन अवस्थेत असते त्या वेळी तिला सूचना दिलेल्या असतात, त्यातील काही सूचनांची अंमलबजावणी संमोहन निद्रा उतरल्यानंतर ठराविक काळाने करावयाची असते किंवा काही सूचनांचे परिणाम हे काही काळाने दिसणारे असतात. सूचना परिणामकारकपणे पोचल्या असल्यास हे घडून येते. मुद्दा स्पष्ट होण्यासाठी दोन उदाहरणे घेऊ. समजा, रात्री उशिरापर्यंत झोप न येणाऱ्या व्यक्तीस संमोहित अवस्थेत अशी सूचना देण्यात आली की रोज रात्री जेव्हा तू दहाचे ठोके ऐकशील वा घड्याळात दहा वाजलेले बघशील त्या वेळी तुला लगेचच गाढ झोप येईल. ही सूचना संबंधित व्यक्तीने स्वीकारलेली असेल, तर रोज रात्री जेव्हा ती दहाचे ठोके ऐकेल वा घड्याळात दहा वाजलेले बघेल त्या वेळी तिचे शरीर या सूचनेची अंमलबजावणी करावयास लागेल. तिला जांभया येऊ लागतील.
समजा, संमोहन निद्रेत अशी सूचना दिली की ‘उठल्यानंतर पंधरा मिनिटांनी तू ग्लासभर पाणी घेशील. त्यातले दोन घोट तोंडात टाकून बाकीचे फेकून देशील’ तर ती व्यक्ती संमोहनातून जागृत झाल्यानंतर पूर्णपणे पूर्ववत (नॉर्मल) वागेल परंतु पंधरा मिनिटांनी ती ग्लासभर पाणी मागेल. त्यातील दोन घोटच तोंडात टाकून बाकीचे फेकून देईल. गंमत म्हणजे ‘तू असे का केलेस?’ असे विचारले तर ‘मला अशी सूचना दिली होती’ असे ती अजिबात सांगणार नाही (कारण तिला ती त्या स्वरुपात आठवत नसते.) उलट ती तिला तिच्या बुद्धीला सकृतदर्शनी बरोबर दिसणारे काहीतरी स्पष्टीकरण देण्याचा प्रयत्न करेल की पाणी मचूळ होते, अस्वच्छ होते वगैरे.
घड्याळ व तत्सम इतर कोणत्याही साधनांच्या मदतीशिवाय कालमापन बऱ्याच अचूकपणे करता येणे हा संमोहन अवस्थेत सूचना स्वीकारणाऱ्या मनाचा एक गुण आहे. तितक्या कालावधीनंतर ती सूचना प्रगट मनास पोचून कार्यान्वित होते. सूचना दिलेल्या क्षणापासून अमुक इतक्या मिनिटांनी, तासांनी, दिवसांनी, महिन्यांनी तुम्ही अमुक गोष्ट कराल अशी दिलेली सूचना अचूकपणे तेवढ्या कालावधीनंतर कार्यवाहीत येते. अर्थात, जी सूचना फक्त एकदाच अमलात आणावयाची असते. (उदा. ग्लासभर पाणी घेणे व दोन घोट घेऊन बाकीचे फेकून देणे) ती अमलात येणे सहज शक्य असते. दहाच्या ठोक्याला झोप येण्यासाठी सूचना ती स्वीकारली तरी तिचे सातत्य व प्रभाव टिकवण्यासाठी संबंधित व्यक्तीने संमोहनात जाऊन स्वतःला रोज ती सूचना देत राहावी लागते. अन्यथा गाढ संमोहन अवस्थेत स्वीकारलेल्या सूचनांची परिणामकारकता क्रमाक्रमाने कमी होत जाते. (या स्वरूपाच्या सूचना देतांना त्याबरोबर घ्यावयाची काळजीही सांगावयास हवी. उदाहरणार्थ, अशा व्यक्तीने रात्री दहा वाजता आपण वाहन चालवत असणार नाही वा रस्त्यातून चालत असणार नाही याची काळजी घ्यावयास हवी. अन्यथा ठिकाणीच डोळ्यांवर झोप यावयास लागून अपघाताची शक्यता वाढेल).
मात्र संमोहित अवस्थेत जाणाऱ्या सर्वच व्यक्ती या स्वरूपाच्या (नंतर पार पाडव्याच्या) सूचना स्वीकारत नाहीत. तसेच ज्या व्यक्ती सूचना स्वीकारतात त्यांनाही त्याची परिणामकारक अंमलबजावणी करण्यासाठी संमोहनाच्या अनेक सेशन्समध्ये या सूचना परत-परत देण्याची गरज असते.
-डॉ. नरेंद्र दाभोलकर व
प्रा. प. रा. आर्डे
यांनी लिहिलेल्या 'अंधश्रद्धा: प्रश्नचिन्ह आणि पूर्णविराम' या पुस्तकातून साभार
Blog by people for People, Creative Ideas, Inspirational and Motivational stories, Myths and Facts, Social activities
Wednesday, 21 June 2017
#प्रश्न_१६- संमोहित व्यक्ती काही दिवसानंतर देसंमोहितखील संमोहनाचे आदेश आपोआप मानते असे आम्ही बघितले आहे. हे घडणे कसे शक्य आहे?
Tuesday, 20 June 2017
अस्सल ट्रोल होण्यासाठी काय लागतं?
एक, बेशरमपणा, नफ्फटपणा. पाय घसरून पायखान्यात पडलो तरी "बघा! जिंकलो की नाही?" असं म्हणता यायला हवं.
दोन, सिंधूची सुधाकराशी, सावित्रीची सत्यवानाशी होती तशी आपल्या हेतूशी समर्पित भावना. हेतू अर्थात विरोधकाला गप्प करणे.
तीन, मुद्याला न भिडता नालस्ती करण्याचं कसब. तसं करताना वरवर तर्काला धरण्याचा आव आणता आला, तर सोन्याहून पिवळं.
चार (हे पूरक आहे, पण येत असलं तर कामाचं आहे), मुख्य काम सोडून इतरत्र सभ्य, अभिरुचीपूर्ण पोष्टी, कॉमेंटी टाकता येणे.
आणखी काय?
राहुल गांधी कि पप्पू-नामदेव अंजना ............
आजी आणि बापाची हत्या झाली. दोन्ही हत्येची कारणं वैयक्तिक नव्हती, तर या देशाशी संबंधित होती. आजी आणि बापाची हत्या झाल्यानंतर अर्थातच सुरक्षेचं कवच अधिक कडक केलं जाणार होतं. तसं झालंही. कधी नाव बदलून शिक्षण, तर कधी नाव बदलून नोकरी. स्वत:ची खरी ओळख सांगणं सुद्धा जीवाला धोका होता. स्वत:ची ओळख न सांगता जगणं, हे किती भयानक आहे! इमॅजिन करवत नाही.
राहुल गांधी असेच जगले. लोकांमध्ये बिनदिक्कीतपणे मिसळता येत नव्हतं किंवा कुठेही ख-या ओळखीने जाता येत नव्हतं. बरं या सर्व गोष्टी तुमच्या-आमच्यामुळेच. कारण त्यांच्या जीवाला भीती असण्याची कारणं वैयक्तिक नव्हती, तर या देशाशी संबंधित होती. कदाचित लहानपणापासून सर्वसाधारण मुलांसारखं मुक्तपणे बागडायला मिळालं नाही म्हणून किंवा अत्यंत संवेदनशील स्थितीत जीवन जगल्याने असेल, राहुलना तळागाळात पोहोचता आलं नाही. म्हणून अनेकदा भाषणात-वागण्यात कृत्रिमपणा जाणवतो. पण त्यामागील भावना खरी वाटते. हे राहुल गांधी या व्यक्तीबद्दल बोलतोय. काँग्रेस पक्षाबद्दल नाही.
जीवाला असलेला धोका आजही कमी झालेला नाही. आजही 'आपरेशन ब्ल्यू स्टार'ची भीती कमी झालेली नाही. अशा एकंदरीत भयावह वातावरणात जगणं, हे तुम्ही आम्ही फक्त इमॅजिन करु शकतो. किंवा तेही नाही.
एवढं सारं सांगण्याचा मुद्दा असाय की, उठता-बसता त्यांची खिल्ली उडवणं, राहुल गांधींची 'विनोदी' अशी इमेज तयार करुन ते पसरवणं, यामागे राजकीय हेतू आहे, हे लपून राहिलेलं नाही. मात्र, वैयक्तिक टीका करणा-यांकडे दुर्लक्ष करत राहुल वाटचाल करतायेत. वैयक्तिक टीकांवर ते बोलणंही टाळतात. कारण त्यांच्या दृष्टीने देशाचे प्रश्न महत्त्वाचे असतात. 'कुजक्या मेंदूच्या' लोकांच्या वैयक्तिक टीकेला ते अजिबात महत्त्व देत नाहीत. बरं हे मी नाही, तर तेही अनेकदा सांगतात.
संस्काराची टिमकी मिरवणारे जेव्हा राहुल यांच्यावर दर्जाहीन टीका करतात, तेव्हा हसूच येतं. कारण एकीकडे संस्कृती मिरवायची अन् दुसरीकडे 'खरी संस्कृती' दाखवायची.
जर तुम्हाला राहुल यांची संस्कृती काय आहे, हे पाहायचं असेल तर सहा दिवसांपूर्वीची उत्तर प्रदेशातील सभा आठवा. राहुल भाषणाला उभे राहिले आणि काँग्रेस कार्यकर्ते ओरडू लागले, 'मोदी मुर्दाबाद..मोदी मुर्दाबाद'. राहुल भाषणाच्या सुरुवातीलाच थांबले, 'मोदी मुर्दाबाद' घोषणा देणा-यांकडे रागाने पाहिलं अन् खडसावलं, "ये नारे बंद किजीए I हम काँग्रेस के हैं I हमारी संस्कार में ये नहीं है I हमारी लढाई विचार की है, विचार से ही लढेंगे I".
हे उदाहरण सांगण्याचं कारण असं की, संस्कार मिरवणं वेगळी गोष्ट आहे अन् ते आचरणात आणणं वेगळी गोष्ट आहे.
असो. हे सारं सविस्तर लिहिण्याचं निमित्त असं की, एका फेसबुक मित्राने खालील फोटो शेअर करुन राहुल गांधींची खिल्ली उडवली. तसं खूप जण उडवतात. कारण तो त्यांच्या संस्काराचा भाग असतो. बरं खिल्ली उडवण्यालाही आक्षेप नाही. मात्र, वैयक्तिक पातळीवरची नसावी. एवढंच. कारण राहुल ज्या घराशी नातं सांगतात, त्या घराने देशाला नक्कीच महत्त्वाचं योगदान दिलंय. बाकी बोफोर्स, आणीबाणी, हेराॅल्ड, वेस्टलँड या थेट गांधी घराण्याशी संबंधित प्रकरणांवर मलाही आक्षेप आहेतच. पण म्हणून योगदान काहीच नाही असं म्हणणं आणि नेहरु-गांधी घराण्यावर सरसकट वैयक्तिक टीका करणं, हे योग्य नाही, असं प्रामाणिकपणे वाटतं.
- नामदेव अंजना
(ता.क. : मागे शरद पवार यांच्यावर नोटाबंदीनंतर लिहिलं होतं. तेव्हा मला 'राष्ट्रवादी'चं लेबल लागलं होतं. आता 'काँग्रेस'चं लागेल, याची खात्री आहे. उद्या मोदींवर लिहिलं की 'भक्त' म्हटलं जाईल, याचीही खात्रीय. पण असो. मी लिहितच राहणार, जे योग्य वाटेल ते.)
आम्ही आणि आमच्या श्रद्धा! किती चूक, आणि किती बरोबर!
कधीकधी एखादा किस्सा हसवणारा चुटका वाटतो, पण जरा बारकाईनं पाहिलं तर बरेचदा ज्यातून जीवनव्यापी अन्वयार्थ निघावा असा तो दृष्टांत निघतो. या दृष्टीनं अंधश्रद्धा विवेकावर कशी सफाईनं मात करते याचा पुढील नमुना बघा! ती एक हकीगत अशी की एक पुजारी देवळात पठण करत असता बाहेर आजूबाजूला पोरं करीत असलेल्या गिल्ल्यानं पराकोटीचा त्रस्त होतो. त्यांना कसं घालवावं याचा विचार करतांना त्याला एकाएकी एक भन्नाट युक्ती सुचते. तीनुसार तो बाहेर येऊन साऱ्या पोरांना बोलावून सांगतो की गावापासून चार किलोमिटर अंतरावर असलेल्या नदीत एक राक्षस दडलेला आहे आणि तो पृष्ठभागावर येऊन जाळाचा फुत्कार सोडतोय म्हणे! हे ऐकून सारी पोरं तर पळालीच पण काही वेळानं बघतो तो पाठोपाठ सांगीवांगीतून हे कानोकानी होऊन मोठ्यांची पण नदीकडे रीघ लागलीय. तेंव्हा गोंधळून त्याच्या मनात एक शंका येऊन जाते की ज्या अर्थी एवढे लोक जाताहेत त्या अर्थी ते खरं तर नसावं? म्हणून न राहवून पाठोपाठ तोही गंमत बघायला लगबगीनं नदीकडे पळतो!
वरील किस्सा जरी कपोलकल्पित असला तरी मानवी मनाची 'श्रद्धा व्यवस्था' (बिलीफ सिस्टम ) कशी कार्यरत असते याचा तो बेहद्द नमुना आहे. मुळात श्रद्धा ही अशी भावना असते की स्वभावतः तिला पुरावा लागत नाही. जसं कुठलाही निर्विवाद पुरावा न देता भुतं आहेत असं ठामपणे मानणारे लोक आहेत, तसेच देव मानणारे पण आहेत! याला समान कारण म्हणजे लहानपणीच त्या कल्पना अपत्यांच्या कोवळ्या मनांत रुजवल्या जातात. लहानपणी दिसतं त्यावर, ऐकतो त्यावर विश्वास ठेवण्याचा मनाचा स्वाभाविक कल असतो. जेष्ठांनी ऐकवलेल्या 'सिंह मग कोल्ह्याला म्हणाला ..." या कहाणीनुसार जनावरं बोलतात ही त्यांची खात्री असते. पुढं विचारांची, म्हणजे विवेकाची जसजशी वाढ होते तशा अनेक अंध श्रद्धा ढासळतात, मात्र ईश्वरासारख्या पारलौकिक आणि आणि पाप-पुण्य या सारख्या नैतिक श्रद्धा त्यांची जागा घेतात. मात्र त्यांनाही अंध श्रद्धेची सावली असतेच. निरपेक्ष श्रद्धांना स्वार्थापायी सापेक्ष करण्याच्या उभयपक्षी खटाटोपातून हे अपरिहार्यपणे होतं. धर्मस्थानांच्या परिसरात नवसापोटी भक्तीचा सौदा करणाऱ्या भक्तांच्या झुंडी आणि आस्वासकांचे मुखवटे चढऊन वावरणाऱ्या पुजाऱ्यांच्या दलाली टोळ्यांचा वावर यातून याचा नेमका पुरावा मिळतो. तंतोतंत हीच प्रक्रिया राजकारणात पण दिसून यावी हा खात्रीनं योगायोग नाही.. फक्त देवळाजागी सर्किटहाऊस टाका. पुढं मंत्र्याजागी मूर्ती कल्पा म्हणजे कार्यकर्ते पुजाऱ्यागत भासतात का नाही ते बघा! जगभरातल्या चांगल्या जाणत्या सुशीक्षितांनीपण 'गणपती दूध पितो' या अफवेवर ठेवल्याचा इतिहास काही फार जुना नाही!
निखळ थापेतून सत्याचा आभास कसा शक्य होतो याचा खुद्द माझाच एक प्रायोगिक अनुभव आहे. तो असा: मी चंद्रपूरचा रहिवासी असल्यानं मला बाहेरून येणाऱ्या पाहूण्यांबरोबर सोबत म्हणून ताडोबा अभयारण्यात जाण्याचा वारंवार योग येत असे. वाघ दिसावा, नव्हे मी तो दाखवावा हा त्यांचा खुळा हट्ट असे! अशात एकदा बनवाबनवीचा एक अफलातून प्रयोग करण्याचा खोडसाळ विचार मनात आला. यात एकदा उत्सुक नजरांनी आम्ही सारे निबिड जंगलातून जात असताना मी एकाएकी जीप थांबवून बाहेर बोट दाखवून कुजबुजत्या आवाजात म्हणालो "तो बघा वाघ! बारकाईनं बघा, झाडाआड चक्क शेपटी आणि मागचा भाग दिसतोय!" माझे शब्द संपत नाही तो तो एका पोराला दिसला पण! नंतर बघतो तो एक एक करत प्रत्येकाला दिसत गेला! नंतर घरी पोचल्यावर एक पाहूणा तर फोनवर चक्क चार हातांवर अक्खा वाघ दिसला हे सांगतांना मी ऐकलाय! सांगीवांगीच्या गुणाकारातून आभासाचं वास्तवात रूपांतर कसं होतं याचा हा अस्सल अनुभवी नमुना आहे!
गुणाकारातुन असत्याचं सत्य कसं होतं वा करता येतं याचा निर्विवाद पुरावा हिटलरच्या काळी गोएबल्सनं दिलाय. या संदर्भात त्याचं गाजलेलं वचन म्हणजे 'खोट्याची पुनरावृत्ती केली की ते खरं होतं!'. धर्मसंस्था त्यांच्या हितसंबंधांना बाधा आणणारे बदल नाकरून सोयीचं तेच कायम रूढावण्यासाठी संस्काराच्या गोंडस नावाखाली हेच पुनरावृत्तीचं सुलभ तंत्र वापरतात. आपल्याकडची युगानुयुगी अमानुष जाती संस्था कालबाह्य होऊनही अजूनही चिवटपणे टिकून असणं हा याचा जबर पुरावा आहे! नेमक्या याच तंत्रानं राजकारणात 'आश्वासन' या संभावित नावाखाली थापांची पुनरावृत्ती करून लोकांना कायम झुलवत ठेवण्याची सोय होते. आपणा सगळ्यांचा गेल्या पन्नास-साठ वर्षांचा अनुभव याचा पुरावा! राजकारणातली आश्वासनं 'तसं काही झालंच तर आपण लग्न करू!' या फशी पाडणाऱ्या आश्वासनांच्या जातकुळीची असतात हे उदाहरणांनी पुरेसं सिद्ध होऊनही लोकांनी त्यांना बळी पडावं ते का हा एक कूट प्रश्न निर्माण होतो. ठार मूर्खांनी आणि मतिमंदांनी या तंत्राला बळी पडणं क्षणभर क्षम्य मानता येईल, पण सुशिक्षित आणि जाणते या विकृतीला बळी पडावेत ते का हा एक मोठाच प्रश्न आहे, नव्हे तीच खरी समस्या आणि खरं आव्हान आहे! '
वास्तविक पाहता मुळात एकूण मानवी समूहात प्रामुख्यानं परंपरागत सत्ता संघटनं तीन! एक पारलौकिक म्हणजे ईश्वरी सत्ता, आणि उरल्या दोन लौकिक म्हणजे राजसत्ता आणि धर्मसत्ता. व्यक्तीचे या तिहींशी नातं कसं आणि कशासाठी याचं एक लाजबाब विवेचन धो. वि. देशपांडे यांच्या 'जी.एं. च्या कथा: एक अनवयार्थ' या ग्रंथात त्यांच्या 'दूत' या कथेच्या संदर्भात आलं आहे. ते म्हणतात "ईश्वरी सत्ता दैनंदिन व्यवहारात अडमडत नाही. सारख्या अडमडत असतात त्या दोघी: एक राजसत्ता आणि दुसरी धर्मसत्ता एकाच जात्याची दोन पेडे. त्यांच्या भ्रमंतीत भरडली जातात ती साधी माणसे. ही दोन्ही पेडे फिरतात ती मात्र ईश्वरी खिट्टीभोवती याचा अर्थ काय तर या तिन्ही सत्ता भरडून पीठ पाडतात ते सामान्य माणसांचे; आणि त्यातल्या त्यात भल्या माणसांचे; दाण्यातले गणंग जात्यातून सहीसलामत आणि शाबूत निसटतात. माणसातल्या गणंगांचेही तेच होते राजा हा काय, तो काय, धर्माधिपती एक जेल काय, दुसरा आला काय, या लोकांची नेहमी चलती असते. त्याची शिडे वाऱ्याप्रमाणे ताबडतोब गर्रकन फिरतात. म्हणूनच या मंडळींच्या दोंदांना नेहमी गर्भार शिडांचा आकार येतो. नियमांनी चालणारी माणसे, ती राजसत्तेलाही नको असतात आणि धर्मसत्तेलाही नको असतात.
या उपरचे एक नवलविशेष म्हणजे ती ईश्वरी सत्तेलाही फार आवडतात असे नाही. तशी ती आवडत असती तर त्यानं हे भले करण्यासाठी कधी काळी तिची 'दगडी भुवई' थोडी तरी हलली असती. तशी ती काही केल्या हलत नाही म्हणूनच त्या बिचाऱ्या सामान्य भल्यांना जन्मभर पोळतच जगावे लागते, आणि ती पोळतच मरतात. तुमच्याआमच्यापैकी जो कुणी भला असेल हीच कथा आहे. ही केवळ आजची कथा नाही. कालची कथा हीच होती. आणि उद्याचीही कथा हीच असणार आहे. म्हणूनच ती चिरंतनाची म्हणजे सनातनाची कथा आहे."
मनोहर सप्रे
गांधी नावाच्या बनियाचा गहिवर
(गांधीजी स्वतःला सनातनी हिंदू म्हणत, पण ते कधीचेच धर्माच्या पलीकडे गेले होते. ते कर्मकांडी धार्मिक नसले, तरी धर्माची पोकळी व्यापण्याचं मोल त्यांना माहीत होतं.
राम गांधीजींच्या हातातून निसटला, तो थेट अडवाणींच्या हातात गेला. गांधीजींच्या अनुयायांना ही चतुराई ना कधी कळली, ना जमली. ते आदरणीय अमितभाईंच्या पथ्यावरच पडलं आणि पडतंय.)
-*-*-*-*-
गांधींनी गळ्यातला गहिवर आवरला
आणि ते म्हणाले, तरी तुम्ही भाग्यवान
एकेक जातजमात तरी तुमच्या पाठीशी आहे
माझ्या पाठीशी मात्र फक्त सरकारी कचेऱ्यातील भिंती!
कुसुमाग्रजांच्या ‘अखेर कमाई’ या गाजलेल्या कवितेचा हा शेवट. आदरणीय अमितभाई शाह महाराष्ट्राचे जावई असले तरी त्यांनी ही कविता वाचलेली नसावीच. पण तेही कवीच. *आधुनिक भारताला आकार देणाऱ्या जुमल्यांचे रचनाकार*. जे न देखे रवी ते देखे अमितभाईंसारखे कवी. कुसुमाग्रजांच्या महान प्रतिभेला जाणवलेला गांधींच्या गळ्यातला गहिवर एकटे अमितभाईच समजू शकले. *त्यांनी महात्म्याची जात काढली*. निवडणूक जवळ असलेल्या छत्तीसगढमधील प्रतिष्ठितांच्या बैठकीत त्यांनी *गांधीजी ‘बनिया’ असल्याची जगाला आठवण करून दिली*. नुसते बनिया नाहीत, तर ‘चतुर बनिया’.
खोटं बोलून निवडणुकीत मतं मिळवणं आणि नंतर ‘मन की बात’ सांगत गुंडाळून ठेवणं, हा आज चतुरपणाचा अर्थ झाला असला तरी, चतुर हा मुळातून वाईट शब्द नाही. गांधीजी त्या अर्थाने चतुर तर होतेच होते. आदरणीय अमितभाईंच्या *वैचारिक पूर्वसुरींच्या किमान चार तरी पिढ्या गांधीजींना भोळसट, बावळट आणि कमजोर ठरवण्यात वायाच गेल्या म्हणायच्या*. त्या चार पिढ्यांनी पाहिलेलं हिंदू राष्ट्राचं स्वप्न वास्तवात येत असताना, आता त्याचा एक सेनापतीच गांधीजींना चतुर म्हणतो, म्हणजे सगळंच मुसळ केरात. अमितभाई म्हणतात, इंग्रजांनी स्थापन केलेल्या काँग्रेस नावाच्या क्लबाचं या चतुर बनियाने स्वातंत्र्याच्या चळवळीत रूपांतर केलं. हे ऐकल्यावर चार पिढ्या कळवळल्या असणारच. हे गांधींनी केलं तर आमचे लोकमान्य काय फक्त अडकित्त्याने सुपारी कातरत बसले होते का?
१९२०मध्ये मुंबईच्या सरदारगृहात लोकमान्य टिळकांनी देह ठेवला. तेव्हा त्यांना खांदा देण्यासाठी गांधीजी पुढे आले. आता आदरणीय अमितभाईंनी काढली तशीच तेव्हाही कुणीतरी त्यांची जात काढली, *‘तुम्ही ब्राह्मण नसल्यामुळे खांदा देऊ शकत नाही.’ गांधीजींचं त्याला निरुत्तर करणारं उत्तर तयार होतं, ‘लोकसेवकाला जात नसते!’* त्यांनी भर पावसात टिळकांच्या पार्थिवाला खांदा दिला. इतकंच करून थांबले नाहीत, तर त्यांनी त्यांचे सहकारी *मौलाना शौकत अलींनाही खांदा देण्यास भाग पाडलं.* बनियाच्या या चतुराईने अमितभाईंच्या पूर्वसुरींच्या पिढ्या कायमच्या हादरल्या.
गांधीजींच्या बनियागिरीमुळेच असे हादरे नंतरही बसतच राहिले. चळवळीतलं पैशांचं मोल या बनियाला पक्कं ठाऊक होतं. कार्यकर्त्याला ते फक्त कार्यक्रमच द्यायचे नाहीत, तर त्यासोबत निधीही उभारून देत. टिळक गेले त्याच वर्षी गांधीजींनी असहकाराचं आंदोलन घोषित केलं. त्यासोबत त्यांनी काँग्रेसला एक कोटी निधी उभारायचं टार्गेटही दिलं. *नाव दिलं ‘टिळक फंड’. ठरलेल्या वर्षभरात पैसे जमा झाले नाहीत, तर ते परत करायचं विचित्र आश्वासनही त्यात होतं.* शेवटचा दिवस आला. काही हजार रुपये कमी पडत होते. अनुयायी म्हणाले, ‘घोषणा करा. उरलेले पैसे जमा करू लवकरच.’ पण हा शब्दाला आणि हिशेबाला पक्का असणारा बनिया पैसे परत करायच्या तयारीला लागला. सगळ्यांनी धावाधाव करत संध्याकाळपर्यंत *एक कोटी पूर्ण केले. अस्पृश्यता निवारणाच्या कार्यक्रमासाठी गांधीजींनी त्यांचा आवडता हरिजन फंड उभारला.* त्यांच्याबरोबर फोटो काढायचे असतील तर पैसे ठरले होते. कुणाला त्यांना आपल्या घरी घेऊन जायचं असेल, तर मिनिटाप्रमाणे पैसे लागायचे. कुणीतरी त्यांना दान म्हणून फुटकी कवडी दिली. हे एखाद्या गरिबाचं सर्वस्व आहे, असं सांगत त्यांनी त्याचाही लिलाव केला आणि फुटक्या कवडीला तेव्हा सव्वाशेहून अधिक रुपये मिळवले. दांडीच्या समुद्रकिनाऱ्यावर त्यांनी मूठभर मीठ उचललं आणि साम्राज्याचा पाया खचला. *त्या मूठभर मिठाचाही त्यांनी तिथेच लिलाव केला. साडेचारशेहून जास्त रुपये मिळवले. ते सारं होतं हरिजन फंडासाठी.*
गांधीजींनी जमा केलेल्या पै अन् पैचा हिशेब दिला. एकही पैसा वाया जाणार नाही, अशी कडक शिस्त घालून दिली. त्याचबरोबर *या बनियाने आपल्या आयुष्याच्या प्रत्येक क्षणाचाही हिशेब दिला*. कोणतीही गोष्ट लपवून न ठेवता आपल्या प्रत्येक कृतीचा, मनातील विचारांचाही हिशेब पेपरांत लेख लिहून मांडला. त्यामुळे लोक कोणताही हिशेब न करता त्यांच्यामागे ओढले गेले. गांधीजी सांगायचे तसं देशाच्या कानाकोपऱ्यातले कोट्यवधी लोक करायचे. स्वतःची जात विसरून आणि या बनियाचीही जात विसरून. संध्या करणारे हात संडास साफ करू लागले आणि मेलेली ढोरंही ओढू लागले. दुसरीकडे मूठभर जातीवर्चस्ववाद्यांची स्वप्नरंजनं सुरू होती. आमच्या जातीतल्या पेशव्यांकडून इंग्रजांनी सत्ता घेतली म्हणून त्यांच्याकडून सत्ता घेण्याचा हक्क आमचाच आहे, असं लिखाण पुण्यातले मोठमोठे विचारवंत करत होते. *ही मंडळी स्वातंत्र्याला धर्माशी जोडत असताना गांधीजी त्याला जातीशी जोडत होते*. देशाच्या राजकारणात स्थिरस्थावर होण्याआधीच त्यांनी सांगितलं होतं, मेहतराची मुलगी भारताचा राष्ट्रपती बनणं, हा माझ्या लेखी स्वातंत्र्याचा अर्थ आहे. *जातवर्चस्ववाद्यांची गांधीजींशी दुश्मनी तेव्हाच सुरू झाली होती.* फाळणी आणि पाकिस्तानला पंचावन्न कोटी देण्याची मागणी, हे सांगितले गेलेले बहाणे खूप नंतरचे. गांधीजींना मारण्याचे प्रयत्न त्या आधीच सुरू झाले होते. अशा सलग पाच प्रयत्नांमध्ये शेवटच्या हल्ल्यातील कुणी ना कुणी जोडलेला होता. हल्लेखोरांमधला एखादा अपवाद वगळता सगळेच एकाच जातीचे आणि पुण्याचे. खोटं वाटत असेल, तर जगन फडणीसांचं ‘महात्म्याची अखेर’, सदानंद मोरेंचं ‘लोकमान्य ते महात्मा’ आणि तुषार गांधींचं ‘लेट्स किल गांधी’ ही पुस्तकं आहेत. तरीही नसेल पटत तर, पाचगणीत गांधीजींवर हल्ला करण्यासाठी चाकू उगारणाऱ्या नथुरामला पकडणारे भि. दा. भिलारे गुरुजी मुंबईत राहतात आजही.
अमितभाईंच्या वैचारिक पूर्वसुरींची चतुर बनियाने अडचणच करून ठेवली होती. गांधीजींनी आपलं बनिया असणं कधीच नाकारलं नाही. तरीही ते जातींच्या पलीकडे गेले होते. *चातुर्वर्ण्याचं समर्थन करण्यापासून आंतरजातीय लग्नांचा पुरस्कार करण्यापर्यंतचा बदल त्यांनी स्वतः कमावला होता*. गांधीजी स्वतःला सनातनी हिंदू म्हणत, पण ते कधीचेच धर्माच्या पलीकडे गेले होते. ते कर्मकांडी धार्मिक नसले, तरी धर्माची पोकळी व्यापण्याचं मोल त्यांना माहीत होतं. *राम गांधीजींच्या हातातून निसटला, तो थेट अडवाणींच्या हातात गेला*. गांधीजींच्या अनुयायांना ही चतुराई ना कधी कळली, ना जमली. ते आदरणीय अमितभाईंच्या पथ्यावरच पडलं आणि पडतंय.
अमितभाईंच्या नरेंद्रभाईंना गांधीजींचं मोठेपण पक्कं माहित्येय. म्हणूनच ते भाषणांमध्ये हेडगेवार- गोळवलकरांऐवजी गांधीजींचे गोडवे गातात. अमितभाईंचा संघही गांधीजींचीच कॉपी करतो. तो गोसेवेची महती गातो. स्वदेशीसाठी जागरण करतो. साधेपणाचा आग्रह धरतो. आवर्जून खादी वापरतो. निसर्गोपचाराचे प्रयोग करतो. आदिवासींसाठी आश्रम बांधतो. आध्यात्मिक गुरुंना ताब्यात ठेवतो. प्रार्थना वगैरे न चुकता म्हणतो. गांधीवादाचं तत्त्वज्ञान एकात्म मानवतावाद्याच्या पुडक्यात बांधून वापरतो. तरीही हा बनिया इतका चतुर आहे की, तो संघवाल्यांच्या ताब्यात येत नाही. *त्याला वारंवार मारूनही तो मरत नाही.*
आदरणीय अमितभाई, एकच सांगायचंय, अशी कितीही कॉपी केली तरी गांधी असे नाही सापडायचे कधी. *त्यांच्यासारखंच प्रामाणिकपणे जात, धर्म आणि देशाच्याही पलीकडे माणूस म्हणून जगायला लागलं, की मग मात्र गांधी भेटतील, अगदी कडकडून*. हिंमत असेल तर एकदा बघा करून. मग तुम्ही त्यांना बनिया म्हणा की इतर काहीही...
लेखकाचा संपर्क :
सचिन परब
९९८७०३६८०५