कधीकधी एखादा किस्सा हसवणारा चुटका वाटतो, पण जरा बारकाईनं पाहिलं तर बरेचदा ज्यातून जीवनव्यापी अन्वयार्थ निघावा असा तो दृष्टांत निघतो. या दृष्टीनं अंधश्रद्धा विवेकावर कशी सफाईनं मात करते याचा पुढील नमुना बघा! ती एक हकीगत अशी की एक पुजारी देवळात पठण करत असता बाहेर आजूबाजूला पोरं करीत असलेल्या गिल्ल्यानं पराकोटीचा त्रस्त होतो. त्यांना कसं घालवावं याचा विचार करतांना त्याला एकाएकी एक भन्नाट युक्ती सुचते. तीनुसार तो बाहेर येऊन साऱ्या पोरांना बोलावून सांगतो की गावापासून चार किलोमिटर अंतरावर असलेल्या नदीत एक राक्षस दडलेला आहे आणि तो पृष्ठभागावर येऊन जाळाचा फुत्कार सोडतोय म्हणे! हे ऐकून सारी पोरं तर पळालीच पण काही वेळानं बघतो तो पाठोपाठ सांगीवांगीतून हे कानोकानी होऊन मोठ्यांची पण नदीकडे रीघ लागलीय. तेंव्हा गोंधळून त्याच्या मनात एक शंका येऊन जाते की ज्या अर्थी एवढे लोक जाताहेत त्या अर्थी ते खरं तर नसावं? म्हणून न राहवून पाठोपाठ तोही गंमत बघायला लगबगीनं नदीकडे पळतो!
वरील किस्सा जरी कपोलकल्पित असला तरी मानवी मनाची 'श्रद्धा व्यवस्था' (बिलीफ सिस्टम ) कशी कार्यरत असते याचा तो बेहद्द नमुना आहे. मुळात श्रद्धा ही अशी भावना असते की स्वभावतः तिला पुरावा लागत नाही. जसं कुठलाही निर्विवाद पुरावा न देता भुतं आहेत असं ठामपणे मानणारे लोक आहेत, तसेच देव मानणारे पण आहेत! याला समान कारण म्हणजे लहानपणीच त्या कल्पना अपत्यांच्या कोवळ्या मनांत रुजवल्या जातात. लहानपणी दिसतं त्यावर, ऐकतो त्यावर विश्वास ठेवण्याचा मनाचा स्वाभाविक कल असतो. जेष्ठांनी ऐकवलेल्या 'सिंह मग कोल्ह्याला म्हणाला ..." या कहाणीनुसार जनावरं बोलतात ही त्यांची खात्री असते. पुढं विचारांची, म्हणजे विवेकाची जसजशी वाढ होते तशा अनेक अंध श्रद्धा ढासळतात, मात्र ईश्वरासारख्या पारलौकिक आणि आणि पाप-पुण्य या सारख्या नैतिक श्रद्धा त्यांची जागा घेतात. मात्र त्यांनाही अंध श्रद्धेची सावली असतेच. निरपेक्ष श्रद्धांना स्वार्थापायी सापेक्ष करण्याच्या उभयपक्षी खटाटोपातून हे अपरिहार्यपणे होतं. धर्मस्थानांच्या परिसरात नवसापोटी भक्तीचा सौदा करणाऱ्या भक्तांच्या झुंडी आणि आस्वासकांचे मुखवटे चढऊन वावरणाऱ्या पुजाऱ्यांच्या दलाली टोळ्यांचा वावर यातून याचा नेमका पुरावा मिळतो. तंतोतंत हीच प्रक्रिया राजकारणात पण दिसून यावी हा खात्रीनं योगायोग नाही.. फक्त देवळाजागी सर्किटहाऊस टाका. पुढं मंत्र्याजागी मूर्ती कल्पा म्हणजे कार्यकर्ते पुजाऱ्यागत भासतात का नाही ते बघा! जगभरातल्या चांगल्या जाणत्या सुशीक्षितांनीपण 'गणपती दूध पितो' या अफवेवर ठेवल्याचा इतिहास काही फार जुना नाही!
निखळ थापेतून सत्याचा आभास कसा शक्य होतो याचा खुद्द माझाच एक प्रायोगिक अनुभव आहे. तो असा: मी चंद्रपूरचा रहिवासी असल्यानं मला बाहेरून येणाऱ्या पाहूण्यांबरोबर सोबत म्हणून ताडोबा अभयारण्यात जाण्याचा वारंवार योग येत असे. वाघ दिसावा, नव्हे मी तो दाखवावा हा त्यांचा खुळा हट्ट असे! अशात एकदा बनवाबनवीचा एक अफलातून प्रयोग करण्याचा खोडसाळ विचार मनात आला. यात एकदा उत्सुक नजरांनी आम्ही सारे निबिड जंगलातून जात असताना मी एकाएकी जीप थांबवून बाहेर बोट दाखवून कुजबुजत्या आवाजात म्हणालो "तो बघा वाघ! बारकाईनं बघा, झाडाआड चक्क शेपटी आणि मागचा भाग दिसतोय!" माझे शब्द संपत नाही तो तो एका पोराला दिसला पण! नंतर बघतो तो एक एक करत प्रत्येकाला दिसत गेला! नंतर घरी पोचल्यावर एक पाहूणा तर फोनवर चक्क चार हातांवर अक्खा वाघ दिसला हे सांगतांना मी ऐकलाय! सांगीवांगीच्या गुणाकारातून आभासाचं वास्तवात रूपांतर कसं होतं याचा हा अस्सल अनुभवी नमुना आहे!
गुणाकारातुन असत्याचं सत्य कसं होतं वा करता येतं याचा निर्विवाद पुरावा हिटलरच्या काळी गोएबल्सनं दिलाय. या संदर्भात त्याचं गाजलेलं वचन म्हणजे 'खोट्याची पुनरावृत्ती केली की ते खरं होतं!'. धर्मसंस्था त्यांच्या हितसंबंधांना बाधा आणणारे बदल नाकरून सोयीचं तेच कायम रूढावण्यासाठी संस्काराच्या गोंडस नावाखाली हेच पुनरावृत्तीचं सुलभ तंत्र वापरतात. आपल्याकडची युगानुयुगी अमानुष जाती संस्था कालबाह्य होऊनही अजूनही चिवटपणे टिकून असणं हा याचा जबर पुरावा आहे! नेमक्या याच तंत्रानं राजकारणात 'आश्वासन' या संभावित नावाखाली थापांची पुनरावृत्ती करून लोकांना कायम झुलवत ठेवण्याची सोय होते. आपणा सगळ्यांचा गेल्या पन्नास-साठ वर्षांचा अनुभव याचा पुरावा! राजकारणातली आश्वासनं 'तसं काही झालंच तर आपण लग्न करू!' या फशी पाडणाऱ्या आश्वासनांच्या जातकुळीची असतात हे उदाहरणांनी पुरेसं सिद्ध होऊनही लोकांनी त्यांना बळी पडावं ते का हा एक कूट प्रश्न निर्माण होतो. ठार मूर्खांनी आणि मतिमंदांनी या तंत्राला बळी पडणं क्षणभर क्षम्य मानता येईल, पण सुशिक्षित आणि जाणते या विकृतीला बळी पडावेत ते का हा एक मोठाच प्रश्न आहे, नव्हे तीच खरी समस्या आणि खरं आव्हान आहे! '
वास्तविक पाहता मुळात एकूण मानवी समूहात प्रामुख्यानं परंपरागत सत्ता संघटनं तीन! एक पारलौकिक म्हणजे ईश्वरी सत्ता, आणि उरल्या दोन लौकिक म्हणजे राजसत्ता आणि धर्मसत्ता. व्यक्तीचे या तिहींशी नातं कसं आणि कशासाठी याचं एक लाजबाब विवेचन धो. वि. देशपांडे यांच्या 'जी.एं. च्या कथा: एक अनवयार्थ' या ग्रंथात त्यांच्या 'दूत' या कथेच्या संदर्भात आलं आहे. ते म्हणतात "ईश्वरी सत्ता दैनंदिन व्यवहारात अडमडत नाही. सारख्या अडमडत असतात त्या दोघी: एक राजसत्ता आणि दुसरी धर्मसत्ता एकाच जात्याची दोन पेडे. त्यांच्या भ्रमंतीत भरडली जातात ती साधी माणसे. ही दोन्ही पेडे फिरतात ती मात्र ईश्वरी खिट्टीभोवती याचा अर्थ काय तर या तिन्ही सत्ता भरडून पीठ पाडतात ते सामान्य माणसांचे; आणि त्यातल्या त्यात भल्या माणसांचे; दाण्यातले गणंग जात्यातून सहीसलामत आणि शाबूत निसटतात. माणसातल्या गणंगांचेही तेच होते राजा हा काय, तो काय, धर्माधिपती एक जेल काय, दुसरा आला काय, या लोकांची नेहमी चलती असते. त्याची शिडे वाऱ्याप्रमाणे ताबडतोब गर्रकन फिरतात. म्हणूनच या मंडळींच्या दोंदांना नेहमी गर्भार शिडांचा आकार येतो. नियमांनी चालणारी माणसे, ती राजसत्तेलाही नको असतात आणि धर्मसत्तेलाही नको असतात.
या उपरचे एक नवलविशेष म्हणजे ती ईश्वरी सत्तेलाही फार आवडतात असे नाही. तशी ती आवडत असती तर त्यानं हे भले करण्यासाठी कधी काळी तिची 'दगडी भुवई' थोडी तरी हलली असती. तशी ती काही केल्या हलत नाही म्हणूनच त्या बिचाऱ्या सामान्य भल्यांना जन्मभर पोळतच जगावे लागते, आणि ती पोळतच मरतात. तुमच्याआमच्यापैकी जो कुणी भला असेल हीच कथा आहे. ही केवळ आजची कथा नाही. कालची कथा हीच होती. आणि उद्याचीही कथा हीच असणार आहे. म्हणूनच ती चिरंतनाची म्हणजे सनातनाची कथा आहे."
मनोहर सप्रे
No comments:
Post a Comment