गांधी आणि डॉ.हेडगेवार भेटीचा लोकसत्तेतील लेख आणि वास्तव!
महात्मा गांधी जयंती निमित्त लोकसत्तेने या वर्षी भाजपचे माजी आमदार मधु देवळेकर यांचा लेख छापला असून ,या लेखात गांधीजी आणि हेडगेवार यांच्या झालेल्या कथित भेटीचा वृत्तांत दिला आहे ! देवळेकर म्हणतात ही माहिती हेडगेवारांचे सहकारी अप्पाजी जोशी यांच्या लेखानुसार आहे !
अप्पाजी जोशी हे त्याकाळी वर्ध्यातील कॉंग्रेस चे एक नेते होते, शिवाय कॉंग्रेस मध्ये हेडगेवार असताना देखील ते त्यांचे सहकारी होते ! सन १९३५ मध्ये अप्पाजी जोशी यांनी कॉंग्रेस सोडली. देवळेकरांच्या लेखाचा मुख्य स्रोत अप्पाजी जोशी असून त्यांची माहिती ही मुख्य सुत्राकडील माहिती म्हणावी लागेल !
‘युगप्रवर्तक डॉ हेडगेवार’ या गोव्यातून प्रकाशित होणा-या वार्तापत्राच्या ३१ मार्च २०१४ रोजी प्रकाशित झालेल्या अंकाचे संपादक आहेत डॉ श्रीरंग अरविंद गोडबोले ! या विशेषांकात पान क्र. २१ वर संपादक गोडबोले यांनी हेडगेवार यांची जीवनपट मांडला आहे ! त्यातील पान क्र. २४ वर...
‘फेब्रुवारी १९२४ : वर्धा येथे गांधीची भेट. भेटीच्या वेळेस वर्धा जिल्हा कॉंग्रेस समिती कार्यवाह त्र्यंबकराव देशपांडे , उपाध्यक्ष लक्ष्मण राजाराम अत्रे , अप्पाजी जोशी आणि इतर मंडळी .प्रतियोगी सहकार आणि हिंदू मुस्लीम एकीविषयी चर्चा'
असा उल्लेख आहे.
याच अंकात पान क्र. ३३ वर वरील उल्लेख असा आहे .......
- २६ डिसेंबर १९३४ , वर्ध्याच्या संघशाखेच्या आठव्या छावणीला भेट ,सोबत ल.भ भोपटकर ,त्याच्या आदल्या दिवशी गांधीजींची संघस्थानाला भेट. त्याच दिवशी रात्री ७.४० वाजता गांधीजी हेडगेवार भेट , मीरा बहन, ल. भ. भोपटकर ,दादा नाईक आणि आपाजी जोशी .
या माहितीनुसार गांधी आणि हेडगेवार यांची भेट दोनवेळा म्हणजेच फेब्रुवारी १९२४ आणि २६ डिसेंबर १९३४ साली झाली असल्याचे दिसून येते व दोन्ही वेळा अप्पाजी सोबत होते!
अप्पाजी यांचा जन्म ३० मार्च १८९७ रोजीचा असून त्यांचा मृत्यू २१ डिसेंबर १९७९ रोजी झालेला आहे. त्यांनी ५ एप्रिल १९६२ रोजी नागपूर तरुण भारत या दैनिकाने काढलेल्या 'डॉ. हेडगेवार स्मृती गौरव' अंकात “ महान दृष्टे : डॉ. हेडगेवार” असे दोन लेख लिहिले होते. हे दोन्ही लेख ‘युगप्रवर्तक डॉ. हेडगेवार’ या वार्तापत्राच्या ३१ मार्च २०१४ च्या अंकात पुन्हा छापले आहेत!
या अंकातील लेखात प्रत्यक्ष अप्पाजी जोशी काय म्हणतात ते पाहणे महत्वाचे ठरते !
महात्मा गांधींच्या अपेंडीसायचीसच्या आजारामुळे , दोन वर्षाच्या आताच सरकारला –दि ५ फेब्रुवारी १९२४ ला त्यांची सुटका करावी झाली. त्यानंतर कांही दिवस ते वर्ध्याला असताना डॉ. हेडगेवार त्यांच्या भेटीसाठी आले. ही मुलाखत लक्षात ठेवण्यासारखी आहे कारण त्यावेळी मी , त्र्यंबकराव देशपांडे लक्षमणराव अत्रे आणि इतर मंडळी उपस्थित होतो ! (पान क्र.८५ )
अप्पाजी जोशी यांनी १९३४ सालातील कथित गांधी भेटीचा उल्लेख त्यांच्या दोन्ही लेखात केलेला नाही. शिवाय या लेखात देवळेकर म्हणतात तसा संवाद झाल्याचा अप्पाजी जोशी अजिबात उल्लेख करत नाहीत ! वास्तविक १९३४ सालातील भेट महत्वपूर्ण आहे कारण त्यावेळी देवळेकर यांच्या मतानुसार गांधीजी संघस्थानावर स्वतः भेटीसाठी आले होते आणि त्यांनी पुन्हा हेडगेवारांना भेटीचे आमंत्रण दिले होते ! मात्र अप्पाजी जोशी या डिसेंबर १९३४ मधील भेटीचा उल्लेखाच करत नाहीत. यावरून ही भेट झाली नसल्याची शक्यता जास्त आहे!
अप्पाजी जोशी ज्या भेटीचा उल्लेख करतात ती भेट फेब्रुवारी १९२४ सालातील आहे. अप्पाजी यांची ही माहिती इतर संदर्भाशी जोडून पहिली असता ,ती वास्तव असल्याचे जाणवते ! 'गांधी ऑन नेहरू' या आनंद हिंगोरानी यांनी संपादित केलेल्या ग्रंथातील पान क्र ५५३ वरील माहितीनुसार , १२ जानेवारी १९२४ ला गांधीजींचे पुण्यातील ससून हॉस्पिटल मध्ये अपेंडीसायटिसचे ऑपरेशन झाले आणि त्यांना डिस्चार्ज ५ तारखेला मिळाला !
अप्पाजींच्या माहितीतील अपेंडीसायटीसचे ऑपरेशन आणि तारीख एकमेंकाशी जुळणारी आहे. याचा अर्थ अप्पाजी जोशी यांच्या माहितीनुसार डॉ. हेडगेवार आणि गांधी यांची पहिली भेट सन १९२४ सालातील आहे !
दैनिक लोकसत्ताच्या अंकात प्रकाशित झालेल्या लेखातील मजकूर प्रत्यक्ष आप्पाजींच्या माहितीशी विसंगत असून ,हा मजकूर कोणत्याही संदर्भाविना अप्पाजी जोशी यांच्या नावावर खपविण्याचा प्रयत्न केल्याचे स्पष्ट दिसून येते. देवळेकर यांच्या लेखातील मजकूर खालील प्रमाणे .......
“.............ध्वजारोहण पूर्ण झाल्यावर आप्पाजींबरोबरच महात्माजींनी भगव्या ध्वजाला संघाच्या पद्धतीने प्रणाम केला. ध्वजप्रणामानंतर महात्माजी शिबिरात असलेल्या संघ वस्तुभांडाराच्या जागी गेले. त्या भांडाराच्या एका बाजूला म्हणी, छायाचित्रे, घोष-वाक्ये व आयुधे वगरेंचे एक लहानसे प्रदर्शनच ठेवलेले हेाते. त्याच्या मध्यावर लक्ष वेधून घेणारे एक छायाचित्र आरास करून नीट मांडलेले होते. ते महात्माजींच्या पाहण्यात आले व त्यांनी नीट निरखून ‘हे कोणाचे?’ अशी पृच्छा केली.
‘‘हेच डॉ. केशवराव हेडगेवार!’’ आप्पाजींनी सांगितले.
‘‘अस्पृश्यता नष्ट करण्याच्या संदर्भात आपण ज्यांचा उल्लेख केलात ते डॉक्टर हेडगेवार हेच काय? यांचा संघाशी काय संबंध?’’ – महात्माजी.
‘‘हे संघाचे प्रमुख आहेत. यांना आम्ही सरसंघचालक म्हणतो. यांच्या नेतृत्वाखाली संघाचे सर्व काम चाललेले असते. यांनी तर हा संघ सुरू केला.’’ – आप्पाजी.
‘‘डॉ. हेडगेवार यांची भेट होऊ शकेल काय? तशी भेट झाल्यास प्रत्यक्ष त्यांच्याकडूनच या संघटनेची माहिती करून घेण्याचा विचार आहे.’’ – महात्माजी. ‘‘उद्या शिबिराला डॉ. हेडगेवार भेट देणार आहेत. आपली इच्छा असेल तर ते आपणास भेटतील.’’याप्रमाणे संवाद झाल्यानंतर महात्माजी आश्रमात परत गेले. जाता जाता ‘‘हे काम केवळ हिंदूंपुरतेच आहे; त्यात सर्वाना मोकळीक असती तर अधिक बरे झाले असते,’’ असे अभिमत व्यक्त करण्यास ते विसरले नाहीत. अर्थात त्यावर थोडी चर्चा झाली. तेव्हा त्यांनी ‘‘इतरांचा द्वेष न करता केवळ हिंदु-संघटन करणे हे राष्ट्रविघातक नाही,’’ ही गोष्ट मान्य केली”
देवळेकर यांचा हा मजकूर म्हणजे २६ डिसेंबर १९३४ रोजी गांधीजी आणि हेडगेवार यांची प्रथमच भेट झाल्याचे सांगण्याचा प्रयत्न करणारी आहे. वास्तविक अप्पाजी जोशी यांच्या मतानुसार गांधीजी आणि हेडगेवार यांची भेट फेब्रुवारी १९२४ मधेच झाली आहे. जर १९२४ मध्ये गांधीजी हेडगेवारांना भेटले असतील तर , ते हेडगेवारांच्या छायाचित्रास पाहून हा , "हे कोणाचे? " असा प्रश्न १९३४ साली विचारणार नाहीत ! त्यामुळे देवळेकर यांच्या लेखातील या संपूर्ण संवादावर प्रश्नचिन्ह निर्माण होते आणि त्याच बरोबर या अनुषंगाने त्यांनी लेखात मांडलेल्या प्रसंगाविषयी आणि त्यातील कथित संवादाची विश्वासार्ह्यताच राहत नाही !
गांधी आणि हेडगेवार यांच्या भेटीचा प्रसंग एम. जी. चितकारा यांच्या 'हिंदुत्व' या पुस्तकात पान क्र ४७ आणि आणि ४८ वर दिलेला आहे. यामध्येही २६ डिसेंबर १९३४ रोजी रात्री ८.३० वाजता हेडगेवार, अप्पाजी जोशी आणि भोपटकर यांना गांधीजींनी भेटायला बोलावले असे ,म्हटले आहे मात्र देवळेकर लेखात मांडतात तसा , नाट्यमय संवाद मात्र या पुस्तकात देखील नमूद केलेला नाही आणि स्रोत म्हणून पुन्हा त्यांनीही अप्पाजी जोशींचेच नाव दिले आहे.
कॉंग्रेस ने १९३४ मध्ये ठराव करून कॉंग्रेस सदस्यांना संघापासून दूर राहण्याचे निर्देश दिले होते. शिवाय १९३५ च्या भारत कायद्यानुसार प्रांतिक सरकारांसाठी निवडणुकाची तयारी प्रत्येक पक्ष करत असल्यामुळे कॉंग्रेस मधील विविध विचारांचे गट कॉंग्रेस पासून दूर जावून स्वतंत्र अस्तित्व निर्माण करत होते. अशा वेळी गांधीजी संघस्थानावर भेट द्यायला जातील ही बाब शक्य वाटत नाही. असे असेल तर गांधीजी आणि हेडगेवार यांची भेट झाली होती ,ही माहिती कशी काय पसरली गेली असा प्रश्न उभा राहतो !
हेडगेवार यांचे चरित्रकार चं.प. भिशीकर यांच्याच ‘ संघ वृक्ष के बीज –डॉ केशवराव हेडगेवार” या पुस्तकात म्हणतात की, गांधीजींनी संघाच्या शिबिरास भेट द्यावी म्हणून जमनालाल बजाज यांनी आग्रह धरल्यावर गांधीजींनी संघाला कांही प्रश्न विचारले होते. या प्रश्नाची उत्तरे न देता , डॉ. हेडगेवार स्वतःच गांधीजींना भेटायला आले. विशेषतः गांधीजींनी त्यांना संघाचा आर्थिक स्रोत विचारला होता आणि त्यावर हेडगेवार यांनी गुरुदक्षिणा हे उत्तर दिल्यावर गांधीजींचे त्यावर समाधान झाले नाही. एकदा एका प्रसंगात संघाबद्दल चर्चा चालु असताना एकाने संघाच्या शिस्तीचा उल्लेख केल्यावर गांधीजी म्हणतात 'शिस्त तर हिटलर आणि मुसोलिनीची पण आहे ,असा उल्लेख प्यारेलाल यांच्या 'महात्मा दि लास्ट फेज' या पुस्तकात आहे !
गमतीशीर बाब अशी की , गांधीनगर येथील 'गांधी कुटीर' मधील प्रदर्शनात गांधी हेडगेवार यांची भेट १९३० साली झाली असल्याचे नमूद करून ही भेट घनश्यामदास बिर्ला यांनी घडविल्याचे म्हटल्याचा उल्लेख रामचंद्र गुहा यांनी केला आहे! ही गांधी हेडगेवार भेटीची तिसरी तारीख म्हणावी लागेल!
गांधीजी या भेटीबद्दल स्वतः काय म्हणतात ते खूप महत्वपूर्ण आहे. गांधीजींच्या हत्येच्या पूर्वी १६ सप्टेंबर १९४७ रोजी भंगी कॉलनीतील एका सभेस अनेक संघ स्वयंसेवकांनी देखील हजेरी लावली. गांधींजी त्यांना पाहून, आपुलकीच्या स्वरात म्हणाले , कितीतरी वर्षांपूर्वी डॉ. हेडगेवार हयात असताना वर्ध्यात मी त्यांच्या शिबिराला भेट दिली होती !
गांधीजींचे हे भाषण १९४७ चे असून , डॉ. हेडगेवार यांचा मृत्यू सन १९४० सालातील आहे. अशा वेळी 'कितीतरी वर्षांपूर्वी' हा उल्लेख १९२४ सालातील भेटीबद्दल असणे स्वाभाविक आहे ! कारण प्रत्यक्ष संघस्थापना होण्यापुर्वी पासूनच हेडगेवार अशी स्वंयसेवकांची शिबिरे आयोजित करत असल्याच्या उल्लेख 'युगप्रवर्तक हेडगेवार' स्वत: अप्पाजींच्याच या लेखात आहे.
एकंदर पाहता देवळेकर यांचा लेख म्हणजे अत्यल्प सत्य सांगून, भरपुर प्रमाणात सत्याचा अपलाप करून, अप्पाजींचे नाव पुढे करून स्वतःच्या कल्पनेच्या तीरांवर गांधी आणि हेडगेवार यांच्या भेटीचा प्रसंग रंगविण्याचा धूर्तपणा म्हणावा लागेल !
© राज कुलकर्णी
No comments:
Post a Comment