Tuesday, 25 November 2014

व्हॉट्स अप वर काही फॉरवर्ड करताना घ्यायची काळजी

व्हॉट्स अप वापरता एवढ माहिती असु  द्या
आपण जागृत आहोत ?

बघा ना, व्हॉट्स अप वर ज्या पद्धतीने बुद्धिवादी म्हणवणारे लोकही आंधळेपणाने खोट्याचा प्रचार करतात, तेंव्हा त्यांच्या स्मार्टपणाची खरोखर कीव करावीशी वाटते.

सुरेश भटांची नसलेली कविता त्यांच्या नावावर खपवली जाते.

खबरदारीचे इशारे बिनधास्त एखाद्या पोलीस अधिकाऱ्याचे नाव टाकून पोस्ट केले जातात.

मंगळ हा ग्रह आहे, हे माहित असतानाही त्यावरच्या कॉस्मिक किरणांनी पृथ्वीवर दुष्परिणाम होणार असल्याचं भय पसरवलं जातं.

भारताच्या राष्ट्रगीताला जगातलं सर्वोत्तम राष्ट्रगीत म्हणून दर्जा मिळाल्याची आवई उठवली जाते.

जम्मू काश्मीर मध्ये तिरंगा फडकावण्यास मनाई असल्याचा कांगावा केला जातो.

नकली नाणे बनविण्याच्या कलमात महिला अत्याचाराच्या सुधारणा केल्याचं सांगितलं जातं.

शीतपेयांमध्ये एड्सबाधित माणसाचं रक्त मिसळलं असल्याचा खोटा प्रचार केला जातो.

गोडसे , कसाब यांसारख्यांना हिरो बनवल्याचे मेसेज केले जातात

काय मिळत असेल, या लोकांना असं खोटंनाटं पसरवून असा भाबडा प्रश्न आपल्या मनात येत असेल.

पण त्याचं उत्तर त्या भाबडेपणातच आहे.आपलं खोटं , लोक किती बेफिकीरीने पुढे पुढे ढकलताहेत हे पाहून जगातली संबंधित विकृत माणसं पोट धरून हसत असतील. आपल्या मूर्खपणावर किंवा अति शहाणपणावर !!!

त्या विकृतांना असुरी आनंद सुद्धा होत असेल.

कारण आपण दिवसेंदिवस बधीर होत चाललो आहोत, याची त्यांना जाणीव आहे.

एक दिवस आपणच आपल्या बेजबाबदारपणामुळे आपलीच घरेदारे पेटवण्यास कारणीभूत ठरणार आहोत.

आपली नजरचुकीने पुढे पाठवलेली पोस्ट एक दिवस दंगेधोपे घडविण्यास कारणीभूत ठरू शकते.

ती आपणावर कायदेशीर कारवाई होण्याचे कारण तर ठरेलच पण आपल्याच प्रियजणांच्या विनाशाचेही कारण बनू शकते.

आपले डोळे उघडतील.

पण तोपर्यंत उशीर झालेला असेल.

तेंव्हा वेळीच जागे व्हा.

पुरेपूर खात्री असल्याशिवाय कोणतीही पोस्ट शेअर किंवा फोरवर्ड करू नका.

कोणतीही कविता, लेख, विचार ज्याचे असतील, त्याचे नाव टाकल्याशिवाय पोस्ट करू नका.

संवेदनशील विषय पोस्ट करण्याचे किंवा शेअर करण्याचे टाळा.

कोणाही व्यक्तीची, समाजाची, धर्माची तारतम्य सोडून बदनामी करेल असे मजकूर, फोटो, चित्रे, कार्टून्स, विनोद पोस्ट करू नका.

महिलांना अवमानित करणारे विनोद, पोस्ट टाळा.अपघात, खून, बलात्कार संबंधी पोस्ट करताना जाणीवपूर्वक काळजी घ्या.पिडीत महिलेचे नाव कोणत्याही परिस्थितीत उघड होणार नाही, हे पाहा.

रक्तरंजित किंवा भावना भडकवणारे फोटो पोस्ट करू नका.

देवांच्या पोस्ट भीती दाखउन अकरा लोकाना  forward करा नाहीतर तुमच नुकसान होइल कोणी आजारी पडेल अशी भीती आणि अंधश्रधा पसरवू नका.

ग्रुपवर आपसात बोलतानाही आपलं लिखाण ग्रुपमधील सर्व सदस्य वाचत असतात, याचे भान राखा.

देशाची सुरक्षितता धोक्यात येईल अशी माहिती उघड करू नका.

हे सोशल नेट्वर्किंग आहे, कचरा डेपो नाही, याची जाणीव असू द्या.

सोशल नेट्वर्किंगचा वापर सकारात्मक करा.

🔬हातात नुसता स्मार्टफोन असून उपयोग नाही.
खऱ्या अर्थाने " स्मार्ट " बना.

No comments:

Post a Comment