Thursday, 14 May 2015

शंभूराजे :राजकारणाचे बळी

शंभूराजे: राजकारणाचे बळी!
शंभूराजे जन्मतःच आईचे छत्र गमावून बसले. वडिल राजकारण आणि समाजकारणाने ठिकसे लाभलेच नाहित! आजीच्या कुशीत वाढले, आजीने शक्य तितके लाडाकोडात वाढवले. शेवटी सईबाईंच्या म्हणजे दुसर्याच्याच पोटचा गोळा, त्याला धोक्यात घालणे वा शासन करणे, वळण लावण्यासाठी प्रसंगी रूक्ष वागणे जमले नाही. ठेव सांभाळावी तसे सांभाळले आणि शेवटी पुत्र आणि नातवात फरक पडतोच!
     वडिल समाजकारणात गुंतलेले असताना दरबारी राजकारणाचा वेढा संभाजी महाराजांभोवती पडू लागला. तरुण तडफदार सळसळणारे रक्त, वडिलांनी कर्तृत्वाने कमावलेले राज्य जे निश्चित वारश्याने मिळणार होते, आणि त्या सिंहासनाभोवती घोंघावणार्या माश्या, पौगंडावस्थेतच अपेक्षांचे भले मोठे ओझे आणि त्यात होणारी घुसमट. परिणामी घडलेल्या चुका जश्या औरंगजेबाच्या मुलासोबत स्वराज्यावरच चाल करून येणे, परस्त्रीचे अपहरण, शौकिनपणा, मद्यपान इ.इ. परिणामी महाराज आणि जनतेच्या नजरेतून ढासळणे. मध्ये बुधभुषण पुस्तक वाचायला मिळाले होते, त्यात खुद्द संभाजी महाराज हे शिवाजी महाराजांना शंकराचा अवतार म्हणत होते. ते पुस्तक लगेच पुन्हा खाली ठेऊन दिले. आपल्याच वडिलांना दैवी अवतार म्हणणार्या मुलाची मानसिकता काय असू शकते? आपल्या बापाचे माणूसपण न जाणवण्या इतपत दरी दिसत होतीच, पण त्याकाळच्या अंधश्रद्धाही. संस्कृतभाषेत प्रभुत्व मिळवले पण संस्कृतचा अंधश्रद्धाळू पुराणकथांत रमणारा दोषही लागला. बापही प्रसारमाध्यमांद्वारे पोहोचल्याने असे घडले असावे. बाप शिव आणि आपण साहजिकच शिवपुत्र या संकल्पनेने संस्कृत ज्ञाते संभाजी धर्माच्या प्रेमात अधिक पडले असावेत!
     संभाजी महाराज शौकिन होते आणि राजनितीज्ञ नाही तर औरंगजेबाचा पुत्र आणि एक कवि याला जीवाभावाचा मानत होते. त्यांच्या वयाला, युवराजपदाला साजेसे होते तरी त्यामागे मानसिक घुसमटीला वाव करून देणेही एक कारण असावे.
    तख्तावर अजान राजाराम हवा पण संभाजी नको म्हणून काही पंत राजकारण आखत होते आणि संभाजी महाराजांच्या वाईटावर होते. आपण बसो कि भाऊ याने राजारामांना काही फरक पडणार नव्हता आणि संभाजी महाराजांचेही धाकट्या भावावर प्रेम होते. पण पाय खेचणार्या आणि खोचून बोलणार्या दरबारी राजकारणी पंतांचा खूप राग होता. म्हणून शिवाजी महाराजांप्रमाणे उपद्रवी ब्राह्मणांना नुसती तंबी न देता त्या पंतांना औरंगजेबासारखे हत्तीच्या पायाखाली सिंहासनावर आल्या आल्या दिले. पण आपल्या सावत्र आईला पूर्ण सन्मान दिला. यावरूनच संभाजी राजांना खरा त्रास कोणाचा होत होता हे कळते.  पण संस्कृतात ब्राह्मण नसताना लिहिणे हि चूक एकवेळ जातीयवाद्यांनी दुर्लक्षिली असती पण सरसकट ब्रह्महत्या करून संभाजींनी मोठा अधर्म केला होता, जो त्यांना नंतर भोवला. औरंगजेबाला त्यांचा ठावठिकाणा लागला आणि मद्यधुंद अवस्थेत आपल्या विद्रोही मुलाला शरण देणार्याला पकडले. पण संभाजी महाराजांच्या बहादुरीवर खूष होऊन औरंगजेबाने मुसलमान होण्याचाही प्रस्ताव ठेवला जो संस्कृतज्ञाते स्वधर्माभिमानी संभाजी महाराजांनी नाकारला. आता औरंगजेबाने जावई करण्याचाही प्रस्ताव ठेवला होता असे काही म्हणतात तर काही धर्मांतर करायला सांगणार्या औरंगजेबाला "तुझी मुलगी देशील का?"अशी घाणेरडी विचारणा केली असे म्हणतात. राजे कितीही मद्यधुंद असले आणि शीघ्रकोपी व शौकिन असले तरी ते सुशिक्षित, संस्कारात वाढलेले होते, शिवाजी महाराजांच्या सावलीत वाढले होते, ते अशी विचारणा करणे मनाला पटत नाही. आणि जावई करण्याइतपत ज्याच्यावर मन् आले अशा माणसाला औरंगजेब इतके वाईट मरण का देतो? आणि आख्खी मराठी सेना का अंगावर घेऊ इच्छितो ते कळत नाही. औरंगजेबासारखा संभाजी महाराजांत मुलगा पाहणारा धूर्त मुत्सद्दी एवढी मोठी घोडचूक का करेल ते कळत नाही. मराठीराज्य संभाजी महाराजांच्या मृत्यूने निश्चित संपणार नव्हते. त्याला मराठी राज्य संपवायचे असते तर संभाजी महाराजांना सोडून राजाराम आणि संभाजीत वैमनस्य वाढवून त्या दुफळीचा फायदा घेणे अत्यंत सोपे होते. ज्या औरंगजेबाने ताजमहाल बांधणार्या उधळ्या बापाला आणि भावांना मुघल साम्राज्याची संपत्ती आणि दबदबा राखण्यासाठी रस्त्यातून बाजूला केले आणि घरातच महाभारत घडवून आणले त्याच मुघल साम्राज्यासाठी संभाजींना जावई करून मुलावर जावयाला  ठेवून मुघलसाम्राज्यासाठीच रामायण घडवू पाहणारा औरंगजेब आणि लगेचच संभाजींची हत्या करु इच्छिणारा औरंगजेब यांच्यातली दरी कोणी पुराव्यानिशी नीट सांधली तर बरे होईल. निश्चितच औरंगजेबाला संभाजींचा वध करुन संपूर्ण मराठी सेना अंगावर घेण्याच्या तोट्यपेक्षाही मुघल साम्राज्यासाठी अधिक हिताचे काहितरी दिसले असेल, असे असेल तर ते काय??? औरंगजेब सूड उगवू इच्छित होता कि कोणाला तरी खूश करु इच्छित होता, ज्याने मुघल साम्राज्याचा अधिक फायदा झाला असता????? नेताजी पालकरांनी जी धर्मांतर करुन पुन्हा घरवापसी केली तो शहाणपणा संभाजीमहाराजांनी केला असता तर मराठी सत्तेचा पराक्रमी राजा तरी वाचला असता. पण पालकरांना जातीयवाद्यांनी कधीच परत हिंदू मानले नाही, हेही खरे. तरी बरेच गूढ आहे. काही म्हणतात औरंगजेबाने केवळ संभाजी महाराजांनाच तसे मारले, आणि संभाजी महाराजांना मनुस्मृतीप्रमाणेच मारले गेले. मला संभाजी महाराजांच्या इतिहासाबाबत खोलात माहित नाही म्हणून मीही हे असेच आहे हे ठासून सांगू शकत नाही. फक्त रास्त शक्यता वर्तवत आहे. जाणकारांनी अधिक माहिति पुरवल्यास आभारी राहिल.
     शिवाजी महाराजांवर धार्मिक राजकारण करता येत नाही म्हटल्यावर सवर्ण जातीयवादी मंडळी संभाजींवर घसरली आहे. आणि संभाजींवर जातीयवादी राजकारण आणखी कडवट रुपात येत आहे. ब्राह्मण्यवादी संभाजी महाराज कट्टर  हिंदूधर्माभिमानी होते असे रंगवण्याचा प्रयत्न करताहेत. तर संभाजी ब्रिगेड सारखी संघटना संभाजींचे खरे शत्रू ब्राह्मणच होते हे ठासून सांगण्याचा प्रयत्न करत आहेत. म्हणतात ना जाणारी जाते जीवानिशी खाणारा म्हणतो वातड कशी? संभाजी महाराजांच्या चितेवर आपापली पोळी भाजून घेण्याचे राजकारण जोरात चालू आहे. शिवाजी महाराज संयत होते म्हणून त्यांना ताणता आले नाही. मात्र संभाजी महाराजांना दोन्हीकडचे जातीयवादी दातओठ खात आपापल्या गोटात खेचायचा प्रयत्न करत आहेत. प्रतिकांचे राजकारण प्रतिकांना धुळीस मिळवण्यापर्यंत नाही गेले म्हणजे मिळवले. किती व्यक्तिवाद आणि किती जातिय तेढ???? आता तरी आपण शहाणे व्हावे!
                  
(नोंद:- हे लिहिताना कोणाच्या भावना दुखावण्याचा मानस नाही. दुखावल्यास क्षमस्व. राजकारणानेच संभाजी महाराजांचा जीव गेला आणि त्यावरून पुन्हा राजकारण नको एवढीच माफक अपेक्षा. 21 व्या शतकात धर्मही टाकाऊ गोष्ट झाली असताना आणि जातपात विषारी आहे हे सिद्ध झाले असताना संभाजी महाराज धर्मासाठी मेले कि ब्राह्मण्यवादी जातिय मंडळीनी त्यांचा जीव घेतला हि चीरफाड करत बसण्यात काय हशील? धर्मांधता वा जातिय तेढ दोन्ही देशासाठी घातकच मग हा देशद्रोह करणार्यांना कोठवर चुचकारायचे? संभाजीमहाराजांना खरी श्रद्धांजली ही जातीपातीचे विसर्जन हिच आहे. जातीयतेढ निश्चित नाही आणि धर्मांधता तर नाहीच नाही. धर्मांधता येणार्या पिढ्यांशी गद्दारी ठरेल)
                   - डॉ कौस्तुभ कल्पना विलास

1 comment:

  1. आयघाल्यांनो अजून किती खोटा ईतिहास सांगायचा....राजांना बदनाम करता भटांनो

    ReplyDelete