सावरकर: पुरोगामीत्वापासून प्रतिगामीत्वाचा उलटा प्रवासी
लहानपणी शालेय पाठय पुस्तकातून किंवा इतर वेगवेगळ्या माध्यमातून सावरकर जसे ऐकले, वाचले होते तसे ते खूपच ज्वलंत , विज्ञानवादी, बुद्धिवादी वगैरे वाटत. त्यांची माझी जन्मठेप सारखी पुस्तके वाचतांना तर डोळे भरून येई काय तो अंदमानचा त्रास आणि काय ते "ने मजसी ने परत मायभूमीला नावाचे काव्य सगळे एकदम थक्क करणारेच पण नंतर जसजसा अभ्यास वाढला तसे लक्षात आले की सावरकर तर अंदमान मधून सुटून आल्यानंतर प्रतिगामी झाले होते.जो मनुष्य पूर्वी हिनु मुस्लिम ऐक्यावर लिहितो तोच मनुष्य नंतर भारत हे फक्त हिंदुराष्ट्र झाले पाहिजे अशी प्रतिगामी मांडणी कशी करू शकतो??त्यांनतर अजून अभ्यास केला तर एक गोष्ट लक्षात येते कि सावरकरांच्या आयुष्याचे मुख्य 2 पैलू पडतात
एक-अंदमान शिक्षे पूर्वी -पुरोगामी
दोन -अंदमान शिक्षेनंतर -प्रतिगामी
अंदमानच्या तुरुंगात त्यांचा पुरोगामी ते प्रतिगामी होण्याकडे प्रवास झाला असावा
स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या विचारांचा मागोवा घेतला तर एक गोष्ट आपल्या ठळकपणे लक्षात येते कि अंदमानच्या आधी ते पुरोगामी विचारांचे होते आणि अंदमानानंतर ते प्रतिगाम्यांचे पक्षधर झाले. पुरोगामी सुधारक ते हिंदुहृदयसम्राट ह्या ठाकरे कुटुंबातील दोन पिढ्यांचा विरोधाभास त्या एकाच व्यक्तीत त्याच क्रमाने प्रकट झाल्याचा जाणवतो. आधी हिंदू मुसलमान एकतेचे गोडवे गात '1857 चे स्वातंत्र्यसमर' हे पुस्तक लिहिणारे, गाय केवळ एक उपयुक्त पशू आहे म्हणणारे, यज्ञाच्या धुराने वातावरण पवित्र होते या युक्तिवादाची चेष्टा करणारे सावरकर अंदमाननंतर त्याच वैदिक धर्माच्या आधारावर राष्ट्र निर्मितीचे पक्षधर झाले. पुरोगामी - हिंदुहृदयसम्राट - आंबेडकरांच्या बौद्धधम्म प्रवेशाबद्दल त्यांच्यावर सडकून टिका - गांधीहत्येच्या कटात सहभाग हा सावरकरांचा प्रवास निश्चित कोणतेही संवेदनशील मन अस्वस्थ करणारा आहे. सावरकरांच्या ह्या सर्व वाल्मिकी ते वाल्या कोळ्याच्या प्रवासात एक मध्यवर्ती आस दिसतो आणि तो म्हणजे आर्यवंशीयत्वाचा अभिमान. जसा हिटलरला होता तसाच काहिसा सावरकरांत सापडतो. भारतीय स्वातंत्र्यसंग्राम आधी संस्थानिकांचे स्वातंत्र्यसंग्राम होता तोपर्यंत सावरकर स्वातंत्र्ययोद्धे होते परंतु सुधारकांच्या प्रयत्नांनी सर्व तळागाळातील, दलित, हरिजन आदी लोकांना जागरुक केले आणि तोच स्वातंत्र्य संग्राम लोकशाही, समता, बंधुता ह्या मुल्यांचा पक्षधर झाला. संस्थाने खालसा होतील आणि सामान्य जनता राज्य करेल असे दिसू लागताच सावरकर वैज्ञानिक दृष्टिकोन बाजूला ठेवत सनातन वैदिक धर्माचे पक्षधर आणि धार्मिक सुधारणांकडून धर्मांध राजकारणाकडे घसरले हे विशेष आहे. स्वातंत्र्य मिळता मिळता दिल्लीच्या चाव्या नक्की कोणाकडे द्याव्या हिंदूंकडे कि मुसलमानांकडे? हा प्रश्न उद्भवला होता. कारण ब्रिटिशांनी जसजसा भारत घेतला तसतसा (एकेक संस्थान) स्वतंत्र करत जाणार असे म्हणाले होते. त्यामुळे वातावरण अधिक चिघळले होते आणि सत्ता आपल्या हातात रहावी आणि राजेशाही टिकून रहावी, सर्व सुधारणा रद्द व्हाव्या, जातीयता आणि राजवंशाची गरिमा अबाधित रहावी म्हणून सर्व हिंदु-मुस्लिम संघटनांनी धार्मिक अस्मितेचे राजकारण करण्यास सुरवात केली. मग हिंदूमहासभा, मुस्लीम लीग, रझाकार अशा संघटना अस्तित्वात आल्या वा त्यांना बळ मिळाले आणि देश यादवी कडे वाटचाल करु लागला. त्यातल्याच हिंदू धर्मांध गटाचे सारथ्य केले ते पुर्वाश्रमीच्या सुधारक सावरकरांनी. ह्या पार्श्वभुमीवर ते विचारवंत जरी असले तरी स्वभावतःच असणारा आततायीपणा त्याने होणारी विचारभ्रष्टता दिसुन येते.
सावरकरकरांनी एका विचारप्रवाहाचे प्रतिनिधित्व केले हे निश्चित, जो आता टाकावू आणि धोकादायक आहे हे सिद्ध झाले आहे. अस्मितेचे राजकारण हे प्रस्थापितांचे राजकारण असते आणि त्यात सामान्य भरडले जातात. द्विराष्ट्रवाद सिद्धांत स्वातंत्र्याच्या चळवळीतच उदयास आला, परंतु सावरकरांनी त्याला ठासून मांडले आणि त्यानुसार सक्रिय राजकारण केले आणि मग परिस्थिति आणखी चिघळत गेली. आंबेडकरांनी धर्मांतर केले त्यावेळी इतर लोक त्यांचे अभिनंदन करत असताना सावरकर आपल्या धार्मिक राजकारणात बळी चढणार्या प्याद्यांची संख्या कमी झाली म्हणून टीका करत होते. हिंदुसंस्थानिकांच्या फौजा वाढवून मुस्लिमांची कत्तल करत अखंड हिंदुस्थानावर सनातनी धर्माचे राज्य आणावे असे त्यांच्या मनात होते. म्हणूनच मुस्लिम रहित अखंड हिदुस्थान आणि ख्रिश्चन व मुस्लिमेतर सर्व हिंदूच म्हणताना सनातनी धर्म सोडुन विद्रोही धर्मात गेलेल्या आंबेडकरांविषयी आगपाखड यांचा संदर्भ जुळतो. त्यांचे हेच विचार विज्ञानयुगात हिंदुत्त्ववादी संघटना पुढे नेताना दिसत आहेत.
सावरकरांचा विवेकवाद मानवतावादावरून हिंसक टोळियुद्धाच्या मानसिकतेपर्यंत घसरलेला दिसतो. त्यांनी द्वेषाची इतकी परिसीमा गाठली होती कि, हिंदुद्वेष्टे मुस्लिमच नाही तर धार्मिक सहिष्णु हिंदू-मुस्लिम जे धार्मिक द्वेषाला शह देत सहजीवनावर भर देत होते ते ही डोळ्यात खटकू लागले. दारुड्याला दारू सोडवणारा दुष्मन वाटतो आणि मनोविकृताला वैद्य शत्रू वाटतो त्याप्रमाणेच आपले द्वेषाने खदखदलेले खुनशी मनसुबे तडिस नेण्यास जे सहिष्णू उदारमतवादी लोक अडचण होत होते ते डोळ्यात सलू लागले आणि सगळ्यात जास्त सलत होते ते त्याच आदर्शांसाठी जीवाची पर्वा न करता उभे राहणारे महात्मा गांधी. कारण गांधी असेपर्यंत धर्मांध राजकारण शक्य नव्हते, लाखो-करोडो हिंदू-मुस्लिमादी सर्वधर्मिय भारतीय त्यांचा शब्द साधू-संत-धर्मसंस्थापकासम मानून अहिंसा-बंधुतेचा पाठ गिरवत होते. म्हणून गांधींजींच्या हत्येत अप्रत्यक्ष सहभाग घ्यायला म्हणजेच गांधीहत्येचा कट राचायला सावरकरांना काहीच चुकिचे वाटले नाही. योग्य तत्त्वांची तटबंदी नसेल तर विचारवंत म्हणून नावाजला जाणारा कसा भरकटत जातो याचे उत्तम उदाहरण म्हणून सावरकर अभ्यासता येतील.
तरी त्यांच्या त्यागाबद्दल आणि बुद्धीबद्दल मनाच्या कोणत्यातरी कोपर्यात आदर करतो.
-डॉ. कौस्तुभ कल्पना विलास
संकेत मुनोत
No comments:
Post a Comment