Thursday, 14 May 2015

आत्मा, सत्य कि कल्पना?

आत्मा, सत्य कि कल्पना? (भाग 1&2)
     आत्मा प्रत्येक आस्तिक धर्माचा मुख्य आस असतो ज्याच्या भोवताली त्यांचे  सर्व सिद्धांत फिरत असतात. त्यांच्या धर्माची सर्व फलश्रृतीचा भोक्ता आत्माच असतो. तो अजन्मा आहे कि नाही माहित नाही मात्र अमर नक्किच मानला जातो. जीवांच्या शरिरात तो असला कि जीव जीवंत असतो आणि त्याने शरीर सोडले कि जीव मरतो.
     मी हाऊस डॉक्टर म्हणून अतिदक्षता विभागात काम केले आहे. त्यावेळी कित्येक माणसांचा मृत्यू जवळून पाहिला आहे. औषध आणि डॉक्टरांच्या प्रयत्नांना साथ न देता कित्येकांचे श्वास हळूहळू बंद पडताना पाहिलेत. माझ्या आजोबांची शेवटची घरघरही कॉलेजला असतानाच ऐकली आहे. या सर्व अनुभवांचा, माणसाच्या शरिराचे जेवढे ज्ञान आहे त्याचा आणि आत्म्याच्या सिद्धांताचा संबंध पडताळायचा प्रयत्न केला तर वेगळेच सत्य माझ्या समोर आले.
     काही महिन्यांपूर्वी सहज विचार आला कि माणसाला आत्मा एक असतो कि अनेक? माणूस मरताना कधी एकदम एकसाथ मरत नाही. तो हळूहळू मरतो, शरीर मेंदू, हृदय, फूप्फूसे, मुत्रपिंड आदि मध्य अक्षाची अतिमहत्त्वाची अवयवे वाचवायचा प्रयत्न करत असते. मेंदू कोमात गेला तरी शरीर जिवंत राहते. मेंदू मेला तरी काही क्षण शरीर जीवंत राहते.मग मेंदूचा आणि शरिराचा आत्मा भिन्न आहे का? हृदयात छिद्र झाले वा अन्य काही कारणांनी डॉक्टरांनी पूर्ण हृदयच बदलावे लागले, तर काढून टाकलेले हृदय मरेल पण नवीन बसवलेल्या (मरण पावलेल्या माणसाच्या) हृदयासकट हा माणूस पूर्ण जीवंतच राहिल मग माणसाचा आणि हृदयाचा आत्मा वेगळा आहे का? फुप्फुसांची शस्त्रक्रिया भविष्यात शक्य झाली वा मुत्रपिंडे आजच्या काळात बदलली तरी हाच प्रश्न पुन्हा त्या सगळ्यांना लागू होतो. समजा एका माणसाच्या पायाला गुडघ्याखाली रक्तपुरवढ्यात अडचण आल्याने गुडघ्याखाली तो सडू लागला, म्हणजे माणूस जीवंत असतानाच त्याच्या शरिराचा एक भाग मेला आणि शरिर सडते तसा तो सडायला लागला ज्याला गॅंग्रीन होणे म्हणतात, तर त्याला कापून काढून टाकणे अपरिहार्य असते अन्यथा सर्व शरिरात जीवाणू पसरून रक्तात त्याचा संसर्ग होऊन संपूर्ण शरिरालाच धोका उद्भवू शकतो, मग आपल्या हातापायाचा आणि आपला आत्मा भिन्न आहे का?????
     वरिल सर्व प्रश्नांचे उत्तर "हो! आहे"असेच द्यावे लागेल. असे विचार येण्याचे कारण डिस्कव्हरी चॅनेलवर एक क्लिप पाहिली होती ज्यात बेडकाचे पाय कापून एका थाळीत ठेवले होते आणि ते सोलले होते, त्या पायांवर एकाने मीठ टाकले आणि ते अक्षरशः नाचू लागले. झाले काय तर पाय अजून मेले नव्हते, नुकतेच शरिरापासून वेगळे केले होते, आणि मीठ टाकताच त्यातील क्षारांचे विभाजन होऊन ऋण आणि धन भार असलेले अयन वेगळे झाले, आपले मज्जातंतू हे अश्याच अयनांनी संदेश वहन करतात, म्हणून सोडियमचा अयन जसा मज्जातंतूंना लागला त्यांना वाटले कि मेंदूनेंच स्नायू आकुंचित करण्याची आज्ञा दिली आहे. तसेच साप वा इतर सरिसृपांचे डोके उडवले तरी ते जवळ जवळ तासभर चावण्याची प्रतिक्रिया राखून असतात, तर झुरळे बिनामेंदूची कित्येक दिवस जगू शकतात. इतकेच काय तर आपल्या शरिरातील संपूर्ण रक्त आणि त्यातील प्रत्येक पेशी 3 महिन्यात नवीन असतात. 3 महिन्यानंतर रक्तात जुन्यापेशी सापडणार नाहित. मेंदूच्या पेशी सोडल्या तर शरिरातील  एकूणएक पेशी हि माणसाच्या जीवनकाळात कैकवेळा बदलली गेलेली असते, तसे होते म्हणून तर जखमा भरून येतात. इतकेच काय तर केस आणि नखे ह्या मृत पेशी सदैव आपण वागवत असतो. शरिरात पेशींना जन्माला घालायचे आणि जुन्यांना नव्याशी बदलायचे काम सदोदित चालू असते.
     --------------------
     थोडक्यात काय तर माणूस जिवंत असतानाही कित्येक पेशी त्याच्या शरिरात मरत किंवा जन्मत असतात. आत्म्याचा विचार करताना उपनिषद वा वैदिकसंस्कृती किंबहुना सर्वच आस्तिक संस्कृती अर्धा रस्ता व्यवस्थित पार करतात आणि तो म्हणजे "मी कोण?" याप्रश्नाचे उत्तर ते देताना म्हणतात, "हात म्हणजे मी नाही, पाय म्हणजे मी नाही, धड म्हणजे मी नाही, डोके म्हणजे मी नाही, मग मी आहे तरी कोण???" याचे सरळसोपे उत्तर जे समोरच दिसते ते द्यायचे सोडून ते भलत्याच गोष्टीकडे उडी मारतात आणि म्हणतात तो मी म्हणजे आत्मा! जो दिसत नाही पण असतो. आत्म्यामुळेच सजीव जन्मतो आणि आत्मा नसेल तर शरीर पुन्हा निर्जिवात विलीन होते. शरीर मरताना त्यातून तो बाहेर पडतो. पण वस्तुतः तो न दिसल्याने आस्तिकांनी त्याला अमूर्त असे म्हटले आहे, काही ठिकाणी मेंदूच्या मध्ये ज्योतीरुपात स्थित असतो असेही सांगितले आहे. तो अमूर्त मानल्याने भौतिक जगातील कोणतीही गोष्ट त्यावर परिणाम करु शकत नाही हेही आलेच! थोडक्यात वास्तवातून सबळ पुराव्यानिशी माणूस कसा कविकल्पनेत रमतो आणि नको तो निष्कर्ष काढून मोकळा होतो याचे हे एक उत्तम उदाहरण म्हणून देता येईल. मुख्य दुखणे कोठून सुरू होते तर जेव्हा हा विचारच सत्य आहे हे धर्म बनवून त्याद्वारे थोपवले जाते.
     वरिल प्रश्नापासून पुन्हा सुरु करु आणि कितीही कटू वाटले तरी एक सत्य आपण स्वीकारले पाहिजे कि जीवन कितीही प्रवाही आणि अमर वाटत असले तरी त्याचा एक अविष्कार म्हणजे आपण मानव पूर्णतः मर्त्य आहोत. आपल्या जगण्या धडपडीचा अविष्कार  पुनर्जन्म नसून प्रजनन आहे. आपण पाहिलेच कि माणूस हा एकसंध नसून पेशींचा समूह आहे, त्या पेशी ज्या समान गुणसूत्रांनी संचालित होतात, त्या गुणसूत्रांचेच मूर्त रूप आपले शरीर असते. सर्व पेशी त्यागुणसूत्रांच्या एकैक अक्षराबरहुकून वागत असतात, त्या सूक्ष्म पेशींचा एकत्रित भव्य आविष्कार म्हणजे शरीर असते. एकपेशीय सजीवांतही आत्मा मानावाच लागेल ना? मग शरीराच्या प्रत्येक पेशीत एकैक आत्मा मानला तर चूक कसे म्हणता येईल? म्हणजे अब्जावधी आत्मे मिळून आपण आणि आपल्यासारखे मोठे प्राणी तयार होतात असे म्हटले पाहिजे, तरच ते संयुक्तिक ठरेल. स्वर्गात वा नर्कात सर्व होऊन गेलेल्या पेशींसहित उभे करायचे म्हटले तर एका माणसाच्या जागी एकाच सारखी कैक माणसे उभी करावी लागेल,थोडक्यात हे त्याही तर्काने हास्यास्पद आणि असंभवणीय ठरेल. म्हणजे आत्मा नाही असेच म्हणावे लागेल, निदान रुढार्थाने तरी नक्किच नाही.
     मग पुन्हा तोच प्रश्न राहतो कि मी कोण? शरीराचे अवयव म्हणजे मी नाही, अहो पण सजीव शरीर तर मी आहे! घराचे छप्पर घर नसते, घराची फरशी घर नसते, घराच्या भिंती घर नसते, पण ह्या सर्वांनी मिळून घर तयार होते. तसे शरीरसुदधा! फरक येवढाच कि बाहेरून वस्तू आणून कृत्रिम गोष्ट माणूस बनवतो तर शरीर आतूनच बाहेर वाढत जाते. घरासंबंधी आणखी एक छान गोष्ट सांगितली जाते ती म्हणजे बांधली जाते ती वास्तू(House) तर त्याला घर(Home) आतील माणसे बनवतात, ते तर सजीवांना अगदी चपलख बसते. जोपर्यंत सर्वपेशी व्यवस्थित काम करत आहेत, तोपर्यंत ते सक्रिय शरीर आणि पेशींच्या असलेला किंचकट गुंता आणि त्यांचे नाते सजीव म्हणून गणले जाते, तर बंद पडलेला सजीव निर्जीव शरिर म्हणून गणला जातो. बंद यंत्र गंजते तसेच बंद पडलेले शरीर सडू लागते. आणखी एक जवळ जवळ समर्पक उदाहरण म्हणजे संस्था! आपले शरीर पेशींची एक संस्थाच असते. संस्थेचे नाव घेतल्यावर जागा, वास्तू, अध्यक्ष, कार्यकारिणी, कर्मचारी असे एकत्रित सर्व आपल्या नजरे समोर उभे राहते, मी संस्थेत काम करतो, संस्थेचा असाअसा निर्णय आहे, संस्थेवर खटला दाखल झाला वैगेरे म्हणताना संस्था जणू एक स्वतंत्र  व्यक्तिमत्त्व असलेली एक व्यक्तिच गणतो, सजीवांचेही अगदी असेच आहे. संस्थेत कर्मचीरी बदलत असतात अगदी तसेच पेशींचेही.
     असे विचार जेव्हा आले तेव्हाच आत्मा, पुनर्जन्म, भूत इ.इ. शब्दांचा आधार नाहिसा झाला आणि आत्मा संकल्पनेचे तुकडेच नव्हे तर माझ्यापुरता पार भुगा झाला. आणि ना राहिला स्वर्ग-नर्क! ना मृत्यूनंतरचे जीवन! किंबहुना जीवन हि पुर्णतः भौतिक गोष्ट आहे, भौतिकतेच्या आधाराशिवाय जीवन असूच शकत नाही, मग ज्याला शरीर नाही असा कोणी जीवंत नाही, त्याची इच्छा वा  मर्जी नाही, मग भले ईश्वर म्हणा वा भूत! एक तर ते सजीव हवे वा निर्जीव. निर्जीव सजीवांवाचून / जीवनावाचून असू शकतात पण सजीव वा जीवन निर्जीवाच्या आधारावाचून असूच शकत नाही. कारण सजीव निर्जीवातून पुढे उद्भवले. गूढ निर्जीवातून जीवन असणार्या पेशी वा आत्मभान असणारे निर्जीव गुणसूत्र कसे तयार झाले, ज्यांनी रासायनिक प्रक्रियांची साखळीच जन्माला नुसती घातलीच नाही तर विभाजनादी प्रक्रियेने मोठ्या प्रमाणात वाढवली, जे नंतर सजीवांचे प्रजनन म्हटले गेले, आणि त्याने उत्क्रांतीचा मार्ग धरत आत्ताची जैवविविधता अस्तित्वात आली याचे आहे, पण त्या गुढाची उकल वा उत्तर निश्चितच आत्मा-ईश्वर इ.इ.नाही.
                -डॉ. कौस्तुभ कल्पना विलास

No comments:

Post a Comment