विक्रमादित्य त्या वेताळाचा पाठलाग करत करत पुन्हा स्मशानात पोचला. झाडावर लटकलेले प्रेत त्याने खाली उतरवले आणि पाठीवर घेवून उज्जैन नगरीकडे जाणाऱ्या निर्मनुष्य रस्त्यावर तो शांतपणे चालू लागला. अचानक विक्रमादित्याच्या कानी आवाज पडला “ राजा ,तू हट्टी आहेस ,पुन्हा मला घेवून जातो आहेस ,पण ऐक आपण जाईपर्यंत मी तुला एक कथा सांगतो "
वेताळ बोलू लागला " प्राचीन काळात भारतवर्षात नर्मदा नदीच्या खोऱ्यातील विकासपुर नावाच्या देशात भूपेंद्र हा राजा नव्याने सत्तेवर आला होता.भूपेंद्र मुळात एक सामान्य कुटुंबातील युवक होता, तो प्रचंड धर्माभिमानी होता!एका प्रखर धार्मिक गुरुकुलात त्याने शिक्षण घेतले होते, जे गुरुकुल म्हणजेच त्याचा परिवार होता. त्याच्या राज्यातील सर्व सामान्य जनता अतिशय धार्मिक वृत्तीची असल्यामुळे आणि भुपेंद्र यास स्वतःचे कुटुंब असे त्यास कांहीच नसल्यामुळे त्याचे व्यक्तिमत्व वैराग्य वृत्तीचे प्रतिक बनले होते. मात्र समाजात सावकार, काळा बाजार करणारे व्यापारी,भ्रष्टाचारी उद्योजक यांना प्रचंड प्रतिष्ठा होती. भूपेंद्र या व्यापारी लोकांत खूप लोकप्रिय होता आणि त्यामुळे त्यास देशातील सावकारांचे भ्रष्टाचारयांचे , नफेखोर व्यापा-यांचे आणि अप्रत्यक्षरित्या आर्थिक पाठबळ मिळू लागले.
भूपेंद्र याने सर्व सावकार, काळा बाजार करणारे व्यापारी, नफेखोर, भ्रष्ट उद्योजक यांचे सहकार्य घेवून आणि सत्ता मिळताच राजकोषातील संपत्तीत त्यांना हिस्सा देण्याचे आश्वासन त्याने दिले. या व्यापा-यांनी संपूर्ण देशातील याच पद्धतीचा काळा बाजार करणारे व्यापारी, सावकार यांना एकत्रित आणून भूपेन्द्राला राजा बनविण्यासाठी प्रयत्न चालू केले. बहुसंख्य सावकार, काळा बाजार करणारे व्यापारी, भ्रष्ट उद्योजक यांचे एकाच लक्ष होते ‘भूपेद्रच्या हाती सत्ता’!
आर्थिक गुन्हेगारीतून या सावकारांनी, व्यापा-यांनी, नफेखोरांनी , कमवलेला प्रंचंड काळा पैसा, भूपेन्द्राच्या समर्थनासाठी वापरला जावू लागला. भूपेन्द्राने त्याच्या मदतीला या सावकार ,व्यापारी लोकांसोबत कांही गुप्त कामे पार पाडण्यासाठी तडीपार गुंडांना देखील सोबत घेतले. त्याच्या सत्तारोहनापुर्वीच्या विशाल सभा, त्यातील खर्च पाहून कुबेराचे ही डोळे दिपून गेले ! हे वैभव, ही संपत्ती पाहून जनता भूपेन्द्राच्या आश्वासनाने मोहित होवून गेली ,शिवाय धार्मिक पाठबळ त्यास होतेच! विरोधक या खर्चाबद्दल बोलू लागले तेंव्हा, मला कुटुंब नसल्यामुळे, मी कोणासाठी धनसंचय करणार असा रोकडा सवाल त्याने केला! आपसूकच वेदकालीन वैराग्यवृत्तीच्या ऋषीमुनींच्या त्यागाचे वलय त्याच्या व्यक्तिमत्वाला लाभले. त्याच बरोबर त्याने आधीच्या सत्ताधीशांनी पुरून ठेवलेले सोने मी पुन्हा काढेन आणि देशातील प्रत्येक पुरुषास सोन्याची अंगठी आणि प्रत्येक स्त्रीस सोन्याच्या बांगड्या मिळतील असे आश्वासन दिल्यामुळे , त्याचे असंख्य भक्त निर्माण झाले आणि त्याची मंदिरेही बांधली जावू लागली. भूपेंद्र जेवतो कसा, चालतो कसा याचेही कौतुक होवून समाजात अनेक स्तोत्रे, आरत्या, स्तवने प्रचलित झाली . याचा एकत्रित परिणाम होवून हतबल विरोधकांना पराभूत करून प्रचंड काळ्या पैश्याच्या जोरावर भूपेंद्र विकासपूरच्या राजगादीवर विराजमान झाला.
भूपेंद्र गादीवर विराजमान होताच त्याने ज्या सावकारांनी, काळा बाजार करणाऱ्या व्यापा-यानी, भ्रष्टाचारी नफेखोरांनी, गुंडांनी त्यास मदत केली होती त्यांचे देणे देण्यास सुरुवात केली. भूपेन्द्राच्या उन्मादक भाषणांनी मोहित झालेल्या जनतेचे रुपांतर भक्तात होत राहिले आणि भूपेंद्र राजकोशातील वाटा या लोकांना देत राहिला. भूपेन्द्राच्या निर्णयावर शंका घेणे म्हणजे देशद्रोह अशी प्रथा विकासपुरात सुरु झाली होती. भूपेन्द्राच्या विरोधातील प्रत्येक आवाज देशविरोधी ठरवला जावू लागला. मात्र बहुसंख्य लोक भूपेन्द्रावर लुब्ध झालेले होते. सत्तेत आल्यानंतर दोन अडीच वर्ष भूपेन्द्राने त्यास मदत करणाऱ्या सावकारांना, काळा बाजार करणाऱ्या व्यापार्यांना,नफेखोरांना , दरोडेखोरांना , गुंडांना आर्थिक फायदा करून दिला.
भूपेन्द्राने अचानक एके दिवशी विकासपुरातील सर्व सावकारांच्या, भ्रष्टाचारयांचा ,काळा बाजार करणाऱ्या व्यापा-यांच्या , नफेखोरांच्या , त्यांच्याशी संबंधित लोकांवर कडक कारवाई करण्याची घोषणा केली आणि सर्वसामान्य लोकांनी भूपेन्द्राच्या या निर्णयाचे प्रचंड स्वागत केले. विरोधकांनाही या निर्णयाचे समर्थन करणे भागच होते. जो तो भूपेन्द्राची स्तुती करू लागला, जो भूपेन्द्राची स्तुती करणार नाही ,तो आपसूकच काळा बाजरी, भ्रष्टाचारी समर्थक म्हटला जावू लागला. भूपेन्द्राने सर्व देश स्वच्छ केला म्हणून त्याचे कौतुक सुरु झाले ”
एवढे बोलून वेताळाने विक्रमास प्रश्न केला “ विक्रमा , भूपेंद्र ने घेतलेला हा निर्णय जनतेच्या हिताचा नक्कीचआहे , कारण तो भ्रष्टाचारी लोकांच्या विरोधात कारवाई करतो आहे ! भूपेंद्र हा खरेतर काळा बाजार करणाऱ्या, भ्रष्टाचारी, नफेखोर, सावकार यांच्या भ्रष्ट पैश्याच्या जोरावर सत्तेत आला होता, मग त्याने असे का केले ?
विक्रम माझ्या प्रश्नाचे उत्तर दे अन्यथा तुझ्या मस्तकाचे तुकडे होवून विखरून जातील. विक्रमादित्य उत्तरला “ हे बरोबर आहे की, भूपेंद्र हा काळा बाजार करणाऱ्या, भ्रष्टाचारी, नफेखोर, सावकार यांच्या भ्रष्ट पैश्याच्या जोरावर सत्तेत आला होता. भूपेंद्र धूर्त आहे. ज्या भ्रष्ट आणि काळ्या पैश्यावर भूपेंद्र सत्तेत आला , त्याविरोधातील कारवाई ही भूपेंद्रची केवळ देशातील काळा पैसा पांढरा करणारी नसून ,ती त्याबरोबरच स्वतःची प्रतिमा उजळ करणारी सुद्धा आहे. एकतर पूर्वीच्या सत्ताधीशांनी सोने पुरून ठेवले, ही त्याने मारलेली थाप होती किंवा त्यास कळून चुकले की ,असे सोने असले तरी आपण ते प्राप्त करू शकत नाही किंवा त्या सोने मिळाले तरी जनतेला न सांगता आपल्या गुरुकुलास ते द्यावे. त्यामुळे देशातील प्रत्येक पुरुषास अंगठी आणि स्त्रीस बांगड्या देण्याचे आश्वासन तो पूर्ण करू शकत नाही याची जाणीव त्यास झाली आणि शिवाय तो भ्रष्ट आणि काळ्या पैश्यावर निवडून येवून व्यापाऱ्यांना मदत करतो असा आरोप त्याच्यावर होत होताच! आणि हा आरोप सतत डोक्यावर वागवत आपण पुन्हा सत्तेत येण्याची शक्यता कमी दिसू लागल्यामुळे , ज्यांना मदत करतो म्हणून किंवा ज्यांच्या मदतीच्या जोरावर सत्तेत आला असा आरोप केला जातो, त्यांच्याच विरोधात कारवाई केल्यामुळे तो आरोपही संपला आणि त्याची प्रतिमा देखील उजळून निघाली ! सर्व सामान्य जनतेसाठी भ्रष्ट आणि काळा बाजारातील अमोघ संपत्तीच्या जोरावर सत्तेत आलेला भूपेंद्र हा एकदम सुचीर्भूत बनला आणि लोक त्याच्या अपरिग्रही आणि निरीच्छ व्यक्तिमत्वाचे पुन्हा कौतुक करू लागले. त्याच्या भक्तांनी तर त्यास नैतिकतेच्या पावित्र्याच्या आणि मांगल्याच्या गिरिशिखरावर विराजमान केले. ज्या भ्रष्ट आणि काळ्या पैशाचा वापर करून भूपेंद्र सत्तेत आला त्याच पैशाच्या विरोधात कारवाई करून त्याच्या प्रतिमेस आभासी उजळलेपण प्राप्त झाले, खरे पहिले तर, स्वप्रतीमेच्या स्वच्छतेसाठी देशातील भ्रष्ट आणि काळ्या पैशाची स्वच्छता त्यास आवश्यकच होती कारण सावकार, काळा बाजार करणारे. भ्रष्ट व्यापारी यांच्या प्रयत्नातूनच त्याची प्रतिमा निर्माण झाली होती”
‘विक्रम ,तुझ्या उत्तराने प्रसन्न झालो ,तू खरोखरच एक ज्ञानी आणि बुद्धिवान राजा आहेस . भूपेन्द्राच्या कृतीचे मर्म तू खूप चांगले ओळखलेस ,पण माझे मौन संपले , मी निघालो”
असे म्हणून वेताळ पुन्हा स्मशानाच्या दिशेने निघाला आणि विक्रमाने त्याचा पुन्हा पाठलाग सुरू केला.
No comments:
Post a Comment