चाकण क्लिनिकमध्ये नेहमीप्रमाणे माझी ‘ओपीडी’ सुरू होती. त्यात शनिवार असल्याने पेशंटची गर्दी होतीच. त्यावेळी अचानक आमचे मित्र, प्रसिद्ध युवा अभ्यासक संकेत मुनोत सर यांचा मेसेज मिळाला. साम टीव्हीवर भिलारे गुरूजीं संदर्भात कार्यक्रम आहे. त्याकरिता मुंबई स्टुडिओमध्ये जायचे आहे. या मित्राला माझी कंपनी हवी होती. मी कुठलेही आढेवेढे न घेता तात्काळ होकार कळविला. आमच्या सोबत आणखी दोन जीवलग मित्र होते. सुप्रसिद्ध इंटेरिअर डिझायनर गणेश चोंधे आणि ज्यांच्याकडे पुणेकरांच्या जीभेवरची गोड चव म्हणून ओळख निर्माण केलेले असे कोथरूड येथील लाडके मिठाईवाले उमेश ठाकूर. आम्ही सगळे वाकड येथे एकत्र आलो आणि आमची मोटार मुंबईच्या दिशेने धावू लागली. आम्ही मित्र एकत्र भेटलो याचा आनंद मनात होताच, पण आम्ही साम टीव्हीच्या निमित्ताने महाराष्ट्रातील पत्रकारितेत आपला स्वतंत्र ठसा उमटविणारे व्यक्तीमत्त्व म्हणून अल्पावधीत कीर्ती मिळविलेले साम वृत्तवाहिनीचे मुख्य संपादक संजय आवटे यांना भेटणार ही माझ्यासाठी अगळीवेगळी पर्वणीच ठरणार होती.
‘पुणे टू मुंबई’ प्रवास करीत आमची मोटार मुंबईत पोहोचली आणि ठरलेला ‘प्रोग्राम’ संपवून पुन्हा पुण्याकडे निघाली तेव्हा मात्र मला आश्चर्याचा धक्का बसला. खुद्द संजय आवटे सर आमच्या मोटारीतून पुण्याला येणार होते. अर्थात आमच्या सोबत. खरं तर ही माझ्यासाठी मोठी पर्वणी ठरली. आजपर्यंत ज्यांच्याबद्दल खूप सारे ऐकले, पाहिले. त्यांच्यासोबत काही काळ मला मिळणार होता. त्यामुळे आजपर्यंत पत्रकारितेबद्दल आणि सर्वाधिक संजय आवटे यांच्याविषयी ज्या प्रश्नांची गर्दी केली होती. त्या सार्या विचारांच्या ‘ट्रॅफिक’मधून सुटका होणार होती. कोणत्याही कर्तुत्ववान माणसामागे त्यांचा भूतकाळ असतो. तो जाणून घेणे कोणाला आवडत नाही. यशस्वी व्यक्तींचा इतिहास जाणून घेण्याची माझी खूप इच्छा असते. ते संजय आवटे यांच्याबद्दलही होतीच. त्यांच्याबद्दल वाचनातून खूपसारी माहिती होतीच. पण प्रत्यक्ष त्यांच्या तोंडून ऐकण्याची पर्वणी मिळणे हा दुर्मिळातील दुर्मिळ योग मी समजतो. त्यामुळे मी आणि संकेत सरांनी गप्पा सुरू केल्या.
‘तुम्ही पत्रकारितेकडे कसे आलात’ या आमच्या पठडीतल्या प्रश्नाला आवटे सरांनी मनमोकळे पणाने उत्तर दिली,
जसे कि
"मी अगदी सर्वसाधारण घरातील आहे.दहावीत बोर्डात आलो होतो, भाऊ डॉक्टर झाल्यामुळे घरच्यांनाही मी वैद्यकीय क्षेत्रातच पुढे जावे असे वाटले. भविष्याबद्दल फारसा विचार केलेला नसल्यामुळे मी ‘सायन्सला’ अॅडमिशन घेतले.बारावीत मानसशास्त्रात महाराष्ट्रात पहिला आलो होतो.काही लोक म्हणत ‘आयएएस’ करून देशाची सेवा कर... जो भेटेल तो आपापल्या परीने माझ्या भविष्याचे मार्ग दाखवित असत."
मार्मिक शब्दांचे संवादशील व्यक्तीमत्व म्हणून संजय आवटे यांच्यासारख्या संपादकांनी राज्यातच नव्हे, तर राष्ट्रीयस्तरावरही अनोखा ठसा उमटविला आहे. समाजातील मुलभूत हक्कांसाठी संपादकीय मार्गाने लढणारे आवटे सर सर्वदूर परिचित आहेत. एखाद्या अभ्यासू व्यक्तीकडे पाहिले की ते आपल्या लक्षात येते. त्यांची विचार करण्याची पद्धत आणि त्यांच्या विचारांत असलेली सामाजिक बांधिलकी. हे नजरेआड होऊच शकत नाही.
बालवयात संजय आवटे यांना राजकारणात येण्याची इच्छा होती. दरम्यान हेच स्वप्न पाहताना ‘बीएसस्सी अॅग्री’नंतर करायचे काय असा यक्ष प्रश्न त्यांना पडला. आई-वडील आणि त्यांचे वडीलबंधू यांनी हातभार लावला. विशेष म्हणजे त्यांनी ज्येष्ठ संपादक आणि लेखक अरूण साधू यांना त्यावेळी 10 पानी पत्र लिहिले आणि पुढील आयुष्यात काय करू असे पत्रात नमूद केले होते. आवटे सरांचे लेखन पाहून अरूण साधू यांनी त्यांच्या पत्राला उत्तर दिले. यामध्येच संजय आवटे यांच्या सारख्या संपादक महाराष्ट्राला मिळणार हे उघड झाले. कारण बाळाचे पाय पाळण्यात दिसतात, असा प्रत्यक्ष अनुभव कदाचित अरूण साधू यांना आवटे यांनी लिहिलेल्या पत्रातून आला असावा. संजय आवटे यांना भेटण्यासाठी बोलावून तू पत्रकारितेतून तुझं भविष्य घडवू शकतो, असे सांगितले. त्यानंतर संजय आवटे यांचा पत्रकारितेतील प्रवास थांबायचे नाव घेत नाही. एक दिलखुलास व्यक्तीमत्व, अभ्यासू संपादक, मनमिळावू मित्र, समाजाचा मार्गदर्शक अखंड महाराष्ट्राला लाभला हे भाग्य लपून राहिले नाही.
सर्वसाधारण कुटुंबातून लहानाचा मोठा झालेला आणि रक्ताच्या प्रत्येक थेंबात गांधी-फुले-शाहू-आंबेडकरांची विचारधरा भिनलेला. या एका महान संपादकांना भेटण्याचा योग मला मिळाले, हे मी माझे भाग्य समजतो. ज्यांच्या व्यक्तीमत्त्वाने, परखड विचाराने सरळ रेषेत चाललेला सारा महाराष्ट्र ‘यू टर्न’ घेतो. हे दिलखुलास, विचारांचा महाराजा म्हणजे ‘साम’ वृत्तवाहिनीचे मुख्य संपादक संजयजी आवटे. संजय आवटे सरांचे नाव माहिती नाही, असा माणूस शोधून सापडणार नाही. मनीध्यानीही नसताना केवळ 10 पानी पत्राच्या लेखणाने पत्रकारितेतील पहिले पाऊल उमटले. जीवलग मित्र प्रसिद्ध युवा अभ्यासक यांचा सहवासातून संजय आवटे यांना भेटण्याची सुवर्णसंधी मिळाली. त्यांच्या सहवासाने मी धन्य झालो. खरं पाहिले तर बदलत्या महाराष्ट्रातील पत्रकारितेचा ‘सक्सेस पासवर्ड’ म्हणून आपण त्यांच्याकडे पाहूयात...
डॉ जयपाल गोरड़े
अनुवाद ( रामदास होले )