१९४७ साली नेहरू पंतप्रधान झाले तेंव्हा आजच्या पेक्षा खूपच पोषक परिस्थिती होती. स्वतंत्र झालेल्या देशाचे नागरिक शिकलेले असणे सरकारसाठी अडचणीचे असते. सामान्य लोक हे शक्यतो वेडे असलेले सरकारसाठी चांगले असते. कारण वेडे लोक सरकारला प्रश्न विचारू शकत नाहीत! सरकारला देश चालवणे सोपे जाते. लोक जर शिकून शहाणे झालेले असतील तर सरकार बनवण्यासाठी आधी त्यांना वेडे करावे लागते, निवडून आल्यानंतरही हे काम संपत नाही. सतत काही ना काही करून लोकांना वेडे बनवत रहावे लागते. शहाणे लोक म्हणजे लोकशाहीला मोठ्ठा धोका!
त्या पार्श्वभूमीवर नेहरू फारंच नशीबवान ठरले! १९४७ साली ते पंतप्रधान झाले तेंव्हा देशात साक्षरता दर जेमतेम १८ टक्के होता. पुढील दोन दशकांतच तो जवळपास दुप्पट करण्याचं पाप नेहरूंचंच! १९५१ ते १९७१ या काळात हा दर १८ टक्क्यांवरून ३५ टक्क्यांपर्यंत गेला! साक्षरतेचं हे खूळ इथंच थांबलं असतं तरी ठीक होतं पण नेहरूंचा नतद्रष्ट पक्षच पुढे सतत सत्तेत राहिला. साक्षरतेचं वेड एवढं वाढवण्यात आलं की १९९१ साली, म्हणजे पुढील वीस वर्षात विखंड भारत ८० टक्के साक्षर झाला. नेहरूंच्या या पापाचा त्रास पुढच्या सरकारांना सोसावा लागला. साक्षरांनाच नाही तर सुशिक्षितांना वेडे करून निवडणुका जिंकाव्या लागल्या. अच्छे दिन पासून शायनिंग इंडिया पर्यंत अनेक योजना त्यासाठी आणाव्या लागल्या. हे घडलं केवळ त्या नेहरूंमुळं!
भारतात पहिल्यापासून भल्या मोठ्या लोकसंख्येचा त्रास आहे. लोकसंख्या नियंत्रणात भूकंप, पूर अशा नैसर्गिक आपदा आपल्याला मदत करत असल्या तरी तेवढ्यावरच अवलंबून राहणं शहाणपणाचं नाही. अधूनमधून धार्मिक दंगली, कत्तली होणं हाच लोकसंख्या नियंत्रणाचा हमखास उपाय आहे हे कळण्याएवढं 'शहा'पण नेहरूंकडे नव्हतं. 'दंगलीतून सत्तेकडे' हे ओशोंचं पुस्तकही तेंव्हा आलेलं नव्हतं. तेंव्हा लोकसंख्या नियंत्रणाचा दुसरा मार्ग म्हणजे विविध आजार होऊन लोक मरणे. परंतु नतद्रष्ट नेहरूंनी हाही मार्ग बंद केला. आरोग्यविषयक अनेक सुधारणा राबवणं ही नेहरूंची एक मेजर चूक होती. त्यामुळे मृत्युदरात खूपच मोठी घट झाली. १९४७ साली भारताचं सरासरी आयुर्मान ३२ वर्ष होतं, नेहरू गेले त्या १९६५ या वर्षात ते ४५ वर पोचलं होतं. पुढच्या सरकारांनी मागचीच चूक केल्यामुळं हे आयुर्मान सन २००७ पर्यंत ६५ वर्षांपर्यंत गेलं! आयुर्मान वाढण्याचे काही व्यक्तिगत फायदे असले तरी अनेक सार्वजनिक तोटे असतात. मोठमोठ्या पदांसाठीच्या शर्यतीत वयस्कर माणसं सारखी आडवी येत रहातात. पण हा धोका स्वल्पदृष्टीच्या नेहरूंच्या लक्षात आलाच नाही.
आरोग्य क्षेत्रात अनेक व्यर्थ उठाठेवी नेहरूंनी केल्यामुळेच देशाला हा त्रास झाला. १९४८ च्या जानेवारीत म्हणजे स्वातंत्र्य मिळून जेमतेम ५ महिने झालेले असतांनाच या महाशयांनी आपल्या देशाला संयुक्त राष्ट्रसंघाच्या जागतिक आरोग्य संघटनेचं (WHO) सभासद करून घेतलं. वास्तविक परदेश संबंधात, जागतिक राजकारणात अशा गोष्टींना अजिबात महत्व नसते. आधुनिक काळात त्या त्या राष्ट्राध्यक्षास कडकडून मिठ्या मारणे आणि जवळीक दाखवणारी एकेकी संबोधने वापरणे हेच आंतरराष्ट्रीय मुत्सद्देगिरीचे मुख्य लक्षण झालेले असतांना नेहरूंनी फुकट हे सगळं युनो बिनो करत वेळ वाया घालवला.
आरोग्यसेवा म्हणजे पंचतारांकित सुखसोई आणि मजबूत पैसे खर्च केल्याचं समाधान! पण नेहरूंना हे व्यापक सूत्र कळलेलंच नव्हतं. अंबानींना हॉस्पीटलला जागा देऊन उद्धाटनास स्वत: जाण्यातून केवढी थोर रूग्णसेवा होऊ शकते हेही नेहरूंच्या लक्षातच येण्यासारखे नव्हते! गरीबांना औषधे परवडावीत या दुष्ट हेतूनं नेहरूंनी पुण्यात १९५५ साली 'हिंदुस्तान अॅंटीबायोटीक्स लि.' हो भारतातला सार्वजनिक क्षेत्रातील पहिला कारखाना काढला. याला बरेचजण पेनिसीलीन फॅक्टरी म्हणतात. इथे अगदी नव्वदीच्या दशकापर्यंत प्रतिजैविकं तयार होत होती. त्याआधी १९५१ मध्ये नेहरूंनी लखनौला 'राष्ट्रीय औषध संशोधन संस्था' काढून ठेवली. नेहरूंच्या या पापांमधून अनेक रूग्ण वाचून लोकसंख्यावाढीचा देशद्रोह नेहरूंनी साधला. वास्तविक प्रश्न फक्त काही काळ वाट पाहण्याचा होता. २०१४ नंतर सगळे औषधी गुण गोमूत्र आणि गोमयातच आहेत हे सिद्ध झालंच. त्यामुळे देशाचा १९४७ पासून २०१४ पर्यंत औषध संशोधनावर केलेला सगळा खर्च वाया गेला! आता तर आपल्या थोरथोर आणि खूप कष्टानं वगैरे शिकून शास्त्रज्ञ झालेल्या रसायनशास्त्रज्ञांना सुद्धा 'गोमूत्रशास्त्रज्ञ' व्हावेसे वाटावे एवढे राष्ट्रप्रेम तयार झालेले आहे! याआधी त्यांचा 'रिलायन्स' म्हणजेच निर्भरता ही रसायनांच्या क्षेत्रात होती हेही विसरून जाण्याएवढा 'गोबर इफेक्ट' आता २०१४ नंतरच्या आपल्या वैभवसंपन्न राष्ट्रात आला आहे. असो.
नुकताच सोशल मिडीयावर #Nehrufor2019 हा हॅशटॅग पाहण्यात आला. काही 'तटस्थ' नेहरू विरोधकांनी हा कुत्सित हॅशटॅग टवाळखोरीसाठी प्रसवला असला तरी मी मात्र त्यावर गंभीर विचार केला. १९६५ साली मृत झालेले नेहरू २०१९ साली जिवंत होऊ शकणार नाहीत. कल्पनेत ते जिवंत झालेच तरी निवडून येणं आणि पंतप्रधान होणं अशक्यच! त्याचं कारण असं की निवडणुक तंत्र पूर्णत: बदललेलं आहे. नेहरू रायबरेलीतून हरणार हे निश्चित. जगातल्या सर्वात मोठ्या पक्षाच्या सर्वात थोर परदेशी (येल) विद्याप्राप्त विदूषीपुढे त्यांचा टिकाव लागणं अशक्य. इकडून तिकडून स्वत: निवडून आलेच तरी सरकार आणण्याएवढं बहुमत मिळवणं अशक्य! सत्ताधारी पक्ष बनायचं असेल तर काहीएक 'विशिष्ट' गुण असलेला मनुष्य आधी पक्षाध्यक्ष करावा लागतो. नेहरूंना ते मानवणार नाही हे नक्की. आरोग्य वगैरे फडतूस विषयात काही करणे आजच्या फॅशनमध्ये बसत नाही. त्यामुळे अब की बार, नेहरू सरकार हे २०१९ साली शक्य नाही हे हा हॅशटॅग तयार करणार्या तटस्थ नेहरू प्रेमींनी आत्ताच लक्षात घेतलेलं बरं
No comments:
Post a Comment