Tuesday, 18 July 2017

#कुटुंब_प्रबोधन निमित्त झालेला संवाद

आमचे शेजारी बर्वे म्हणजे उमदे व्यक्तिमत्त्व, एखाद्याची खेचावी तर त्यांनीच,

तर झाले असे, आम्ही त्यांच्या घरी गप्पा मारत बसलेलो असताना, बाहेरून आवाज आला,

"बर्वे आहेत का?"

"या चिन्मयराव या" बर्वेनी आतूनच आवाज दिला,

चिन्मय देशमुख, शेजारच्या बिल्डिंग मध्ये राहतात, संघाचे स्वयंसेवक, माणूस एकदम चिवट, एखाद्या विमा एजेंट सारखा, एकदा मागे लागला की पिच्छा सोडत नाही, कमालीचा संयम.

बर्वेनी किचन कडे पाहून मोठ्याने आवाज दिला,

"अहो ऐकलं का? चिनू आलाय, दोन कप चहा ठेवा"

तिघे असताना दोन कप? बहुतेक बर्वेचा चहा झाला असावा, असो.

"बोला चिन्मयराव कसं काय येणं केलंत?"

"मी तुमचे बौद्धिक घ्यायला आलोय"

"ह्या ह्या ह्या, चिन्या तुझ्याकडे बुद्धीचा दुष्काळ असताना तु कसले आमचे बौद्धिक घेणार रे"

देशमुखांना याची कल्पना असावी, मुद्दा पुढे रेटत बोलले,

"आम्ही कुटुंब प्रबोधनाचा उपक्रम राबवतोय, घरोघरी जाऊन……"

"चिन्या ते लोकांच्या कुटुंब प्रबोधनाच सोड, आणि घरी कुटुंब प्रजननासाठी प्रयत्न कर, ७ वर्ष झाले रे लग्नाला, ह्या ह्या ह्या"

बर्वेच्या या हल्ल्याने देशमुख जरा हिरमुसले, पण आपला मुद्दा पूढे रेटत बोलले,

"सणासुदीला स्त्रियांनी साडी घालावी यासाठी आम्ही प्रबोधन……"

किचन मधून आवाज आला,

"गणपतीच्या मिरवणुकीत नाचताना सायली जीन्स मध्ये छान दिसत होतिरे चिनू, आणि तुमच्या दोघांचे गोव्याचे फोटो पाहिलेत आम्ही फेसबुकवर"

बर्वेनी मला डोळा मारला, देशमुख निर्विकार चेहऱ्याने आमच्याकडे बघायला लागले,

"अजून काय आहे तुमच्या उपक्रमात" बर्वेनी पुढे विषय चालु केला,

"सणासुदीला पुरुषांनी कुर्ता पायजमा ………"

बर्वे खो खो हसत सुटले, माझ्याकडे पाहून म्हणाले,

"हे आत्ता कुठे चड्डीतून फुलपँटीत आले, आणि आपल्याला सांगतायत कुर्ता पायजमा ह्या ह्या ह्या"

देशमुखांच्याकडे वळून पुढे बोलले,

"चिन्या, धोतरे नेसून संचलन करारे तुम्ही पहिले, ह्या ह्या ह्या, आणि त्या अगोदर नुसते लंगोट घालायची संस्कृती होती आपली, होऊन जाऊ द्या एकदा ह्या ह्या ह्या"

माझ्या डोळ्यासमोर उगाचच लंगोटीतले संचलन आले, आणि हसू फुटले.

एवढं खेचूनही देशमुख आपले मुद्दे सोडत नव्हते, माणूस चिवट.

"वाढदिवशी मेणबत्ती विझवू नये, केक कापू नये, ही विदेशी संस्कृती आहे"

"अरे चिनू, मुळात वाढदिवस साजरा करणे हीच विदेशी संस्कृती आहे, सांग पाहू कोणत्या पुराणात कोणी वाढदिवस साजरा केल्याची नोंद आहे का"

बर्वेनी जरा गोडीत घेतले,

तसं देशमुखांनाही उत्साह आला,

"बरोबर आहे तुमचे, मी याबद्दल बोलतो शाखेत"

"अजून काय?"

"शाकाहार याबद्दल महत्व पटवून देणार आहोत" माझ्याकडे पाहून "तुम्हीही ऐकाहो"

"आम्हाला कोंबड्या आणि बोकडाशिवाय जमत नाही" आम्ही शांततेत उत्तर दिलं,

तेव्हढ्यात किचन मधून आवाज आला,

"चिनू तुझ्या घरी सायलीने मासे केलेले दिसतायत, वास सुटलाय बघ सगळीकडे"

तसं बर्वे आणि आम्ही हसू रोखू शकलो नाही,

काहीतरी काम आठवले सांगून देशमुखांनी काढता पाय घेतला,

देशमुखांना ऐकायला जाईल अशा आवाजात बर्वे बोलले,

"देशमुख गेले, आणा आता चहा"

दोन कप चहाचे गुपित आत्ता आमच्या ध्यानी आले.

अमोल शिंदे.

#कुटुंब_प्रबोधन

No comments:

Post a Comment