Wednesday, 27 May 2015

सावरकर: पुरोगामीत्वापासून प्रतिगामीत्वाचा उलटा प्रवासी

सावरकर: पुरोगामीत्वापासून प्रतिगामीत्वाचा उलटा प्रवासी

लहानपणी शालेय पाठय पुस्तकातून किंवा इतर वेगवेगळ्या माध्यमातून सावरकर जसे ऐकले, वाचले होते तसे ते खूपच ज्वलंत , विज्ञानवादी, बुद्धिवादी वगैरे वाटत. त्यांची माझी जन्मठेप सारखी पुस्तके वाचतांना तर डोळे भरून येई काय तो अंदमानचा त्रास आणि काय ते "ने मजसी ने परत मायभूमीला नावाचे काव्य सगळे एकदम थक्क करणारेच पण नंतर जसजसा अभ्यास वाढला तसे लक्षात आले की सावरकर तर अंदमान मधून सुटून आल्यानंतर प्रतिगामी झाले होते.जो मनुष्य पूर्वी हिनु मुस्लिम ऐक्यावर लिहितो तोच मनुष्य नंतर भारत हे फक्त हिंदुराष्ट्र झाले पाहिजे अशी प्रतिगामी मांडणी कशी करू शकतो??त्यांनतर अजून अभ्यास केला तर एक गोष्ट लक्षात येते कि सावरकरांच्या आयुष्याचे मुख्य 2 पैलू पडतात 

एक-अंदमान शिक्षे पूर्वी -पुरोगामी

दोन -अंदमान शिक्षेनंतर -प्रतिगामी

अंदमानच्या तुरुंगात त्यांचा पुरोगामी ते प्रतिगामी होण्याकडे प्रवास झाला असावा

     स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या विचारांचा मागोवा घेतला तर एक गोष्ट आपल्या ठळकपणे लक्षात येते कि अंदमानच्या आधी ते पुरोगामी विचारांचे होते आणि अंदमानानंतर ते प्रतिगाम्यांचे पक्षधर झाले. पुरोगामी सुधारक ते हिंदुहृदयसम्राट ह्या ठाकरे कुटुंबातील दोन पिढ्यांचा विरोधाभास त्या एकाच व्यक्तीत त्याच क्रमाने प्रकट झाल्याचा जाणवतो. आधी हिंदू मुसलमान एकतेचे गोडवे गात '1857 चे स्वातंत्र्यसमर' हे पुस्तक लिहिणारे, गाय  केवळ एक उपयुक्त पशू आहे म्हणणारे, यज्ञाच्या धुराने वातावरण पवित्र होते या युक्तिवादाची चेष्टा करणारे सावरकर अंदमाननंतर त्याच वैदिक धर्माच्या आधारावर राष्ट्र निर्मितीचे पक्षधर झाले. पुरोगामी - हिंदुहृदयसम्राट - आंबेडकरांच्या बौद्धधम्म प्रवेशाबद्दल त्यांच्यावर सडकून टिका - गांधीहत्येच्या कटात सहभाग हा सावरकरांचा प्रवास निश्चित कोणतेही संवेदनशील मन अस्वस्थ करणारा आहे. सावरकरांच्या ह्या सर्व वाल्मिकी ते वाल्या कोळ्याच्या प्रवासात एक मध्यवर्ती आस दिसतो आणि तो म्हणजे आर्यवंशीयत्वाचा अभिमान. जसा हिटलरला होता तसाच काहिसा सावरकरांत सापडतो. भारतीय स्वातंत्र्यसंग्राम आधी संस्थानिकांचे स्वातंत्र्यसंग्राम होता तोपर्यंत सावरकर स्वातंत्र्ययोद्धे होते परंतु सुधारकांच्या प्रयत्नांनी सर्व तळागाळातील, दलित, हरिजन आदी लोकांना जागरुक केले आणि तोच स्वातंत्र्य संग्राम लोकशाही, समता, बंधुता ह्या मुल्यांचा पक्षधर झाला. संस्थाने खालसा होतील आणि सामान्य जनता राज्य करेल असे दिसू लागताच सावरकर वैज्ञानिक दृष्टिकोन बाजूला ठेवत सनातन वैदिक धर्माचे पक्षधर आणि धार्मिक सुधारणांकडून धर्मांध राजकारणाकडे घसरले हे विशेष आहे. स्वातंत्र्य मिळता मिळता दिल्लीच्या चाव्या नक्की कोणाकडे द्याव्या हिंदूंकडे कि मुसलमानांकडे? हा प्रश्न उद्भवला होता. कारण ब्रिटिशांनी जसजसा भारत घेतला तसतसा (एकेक संस्थान) स्वतंत्र करत जाणार असे म्हणाले होते. त्यामुळे वातावरण अधिक चिघळले होते आणि सत्ता आपल्या हातात रहावी आणि राजेशाही टिकून रहावी, सर्व सुधारणा रद्द व्हाव्या, जातीयता आणि राजवंशाची गरिमा अबाधित रहावी म्हणून सर्व हिंदु-मुस्लिम संघटनांनी धार्मिक अस्मितेचे राजकारण करण्यास सुरवात केली. मग हिंदूमहासभा, मुस्लीम लीग, रझाकार अशा संघटना अस्तित्वात आल्या वा त्यांना बळ मिळाले आणि देश यादवी कडे वाटचाल करु लागला. त्यातल्याच हिंदू धर्मांध गटाचे सारथ्य केले ते पुर्वाश्रमीच्या सुधारक सावरकरांनी. ह्या पार्श्वभुमीवर ते विचारवंत जरी असले तरी स्वभावतःच असणारा आततायीपणा त्याने होणारी विचारभ्रष्टता दिसुन येते.

सावरकरकरांनी एका विचारप्रवाहाचे प्रतिनिधित्व केले हे निश्चित, जो आता टाकावू आणि धोकादायक आहे हे सिद्ध झाले आहे. अस्मितेचे राजकारण हे प्रस्थापितांचे राजकारण असते आणि त्यात सामान्य भरडले जातात. द्विराष्ट्रवाद सिद्धांत स्वातंत्र्याच्या चळवळीतच उदयास आला, परंतु सावरकरांनी त्याला ठासून मांडले आणि त्यानुसार सक्रिय राजकारण केले आणि मग परिस्थिति आणखी चिघळत गेली. आंबेडकरांनी धर्मांतर केले त्यावेळी इतर लोक त्यांचे अभिनंदन करत असताना सावरकर आपल्या धार्मिक राजकारणात बळी चढणार्या प्याद्यांची संख्या कमी झाली म्हणून टीका करत होते. हिंदुसंस्थानिकांच्या फौजा वाढवून मुस्लिमांची कत्तल करत अखंड हिंदुस्थानावर सनातनी धर्माचे राज्य आणावे असे त्यांच्या मनात होते. म्हणूनच मुस्लिम रहित अखंड हिदुस्थान आणि ख्रिश्चन व मुस्लिमेतर सर्व  हिंदूच म्हणताना सनातनी धर्म सोडुन विद्रोही धर्मात गेलेल्या आंबेडकरांविषयी आगपाखड यांचा संदर्भ जुळतो. त्यांचे हेच विचार विज्ञानयुगात हिंदुत्त्ववादी संघटना पुढे नेताना दिसत आहेत.

     सावरकरांचा विवेकवाद मानवतावादावरून हिंसक टोळियुद्धाच्या मानसिकतेपर्यंत घसरलेला दिसतो. त्यांनी द्वेषाची इतकी परिसीमा गाठली होती कि, हिंदुद्वेष्टे मुस्लिमच नाही तर धार्मिक सहिष्णु हिंदू-मुस्लिम जे धार्मिक द्वेषाला शह देत सहजीवनावर भर देत होते ते ही डोळ्यात खटकू लागले. दारुड्याला दारू सोडवणारा दुष्मन वाटतो आणि मनोविकृताला वैद्य शत्रू वाटतो त्याप्रमाणेच आपले द्वेषाने खदखदलेले खुनशी मनसुबे तडिस नेण्यास जे सहिष्णू उदारमतवादी लोक अडचण होत होते ते डोळ्यात सलू लागले आणि सगळ्यात जास्त सलत होते ते त्याच आदर्शांसाठी जीवाची पर्वा न करता उभे राहणारे महात्मा गांधी. कारण गांधी असेपर्यंत धर्मांध राजकारण शक्य नव्हते, लाखो-करोडो हिंदू-मुस्लिमादी सर्वधर्मिय भारतीय त्यांचा शब्द साधू-संत-धर्मसंस्थापकासम मानून अहिंसा-बंधुतेचा पाठ गिरवत होते. म्हणून गांधींजींच्या हत्येत अप्रत्यक्ष सहभाग घ्यायला म्हणजेच गांधीहत्येचा कट राचायला सावरकरांना काहीच चुकिचे वाटले नाही. योग्य तत्त्वांची तटबंदी नसेल तर विचारवंत म्हणून नावाजला जाणारा कसा भरकटत जातो याचे उत्तम उदाहरण म्हणून सावरकर अभ्यासता येतील.
     तरी त्यांच्या त्यागाबद्दल आणि बुद्धीबद्दल मनाच्या कोणत्यातरी कोपर्यात आदर करतो.

              -डॉ. कौस्तुभ कल्पना विलास
संकेत मुनोत

Thursday, 14 May 2015

छत्रपती शाहू महाराज

समाजसुधारक जाणता राजा
     छत्रपती शाहू महाराज
ांचा काळ हा स्वातंत्र्यपूर्व काळ, लोकमान्य टिळक धार्मिक अस्मितेचे राजकारण करत ती अस्मिता ब्रिटिश राजवटीविरूद्ध वापरण्यासाठी जंग जंग पछाडत होते. म.फुले हाती शेतकर्यांचा आसूड घेऊन हिंदू धर्मातील पाखंड आणि जातपात, पुरुष प्रधान संस्कृती यांवर जबर कोरडे ओढत होते आणि शिक्षणाचा जागर करत होते. गांधी नावाचा जागतिक राजकारणाच्या क्षितिजावर अरुणोदय होत होता. राष्ट्रसंत गाडगे बाबा ठिकठिकाणी जाऊन लोकांना शिक्षणाचे महत्त्व सांगत अंधश्रद्धांच्या चिंधड्या उडवित होते. राजा राम मोहन् रॉय, लोकहितवादी, न्या.रानडे, आगरकर, गोखले आदि सुधारक संपूर्ण देशात समाजसुधारणेचा अहोरात्र अविश्रांत जागर घालत होते. अशा कालखंडात कोल्हापुरातील शिवछत्रपतींच्या गादीवर आणि संपूर्ण मराठी मनावर  त्यांचा खरा वारस शोभेल अशी व्यक्ति आसनस्थ झाली होती आणि ती व्यक्ती म्हणजे छत्रपती शाहू महाराज!
     राजबिंडे व्यक्तिमत्त्व पण तितकेच सुधारक आणि पुरोगामी विचार. तळागाळातील लोकांचा दिनदुबळ्यांचा कैवार घेणारा, संवेदनशील मनाचा जाणता संवेदनशील राजा.
    लोकमान्य टिळकांबरोबर झालेले वेदोक्त आणि उपनिषदोक्त प्रकरण तर सर्वांना माहितच आहे. वेदोक्त मंत्र फक्त खरे क्षत्रियासाठीच म्हटले जातात, म्हणून शिवाजी महाराजांप्रमाणेच शाहू महाराजांनाही त्यांचे क्षत्रियत्व अमान्य करणार्या भटाची बाजू घेत टिळकांनी शाहू महाराजांवर केसरीवर आगपाखड केली होती आणि शाहू महाराजांनीही त्याला सडेतोड उत्तर दिले होते. तरी शाहू महाराज आणि टिळकांमधील फरक हा कि फुले वारल्यावर टिळकांनी एक वाक्यही केसरीत लिहिले नाही पण छ.शाहू मात्र टिळक गेल्यावर मातब्बर विरोधक गेला म्हणून हळहळले. विरोधकांचेही गुण आणि विद्वत्तेचा आदर करणारे शाहू महाराज.
     शाहू महाराजांची एक गोष्ट सांगतो, शाहू महाराजांच्या वैयक्तिक वकिलांत त्यांनी एक बॅरिस्टर दलित मुद्दाम घेतला. तोपर्यंत सर्व ब्राह्मणांचाच दबदबा होता. एक शूद्र आला हे पाहून त्या वकिलांना कसेसेच झाले. त्यांनी अर्थातच त्याला वाळीत टाकले आणि एकही प्रकरण वा कसलेच काम त्याच्या वाटेला येणार नाही असे पाहिले. येणे हजेरी लावणे डबा खाणे आणि घरी जाणे हेच काम त्याला करावे लागले. मग त्यांचा वरिष्ठ कामाच्या आढाव्यात लिहायचा कि अत्यंत सुमार काम, कामच करत नाही,नुसता बसून असतो, त्वरित कमी करावे इ.इ. शाहू महाराज वाचतात आणि सर्व हेरून लिहितात,"तोतूमचा कनिष्ठ आहे, तुम्हाला त्याची कामगिरी सुधारण्यासाठी नेमण्यात आले आहे, जर त्याची कामगिरी सुधारली नाही तर तुमचा पगार कापण्यात येईल." आणि आश्चर्याची बाब म्हणजे त्याची कामगिरी नुसती सुधारलीच नाही तर अत्युत्कृष्ट म्हणून नोंदवली गेली. अशा अनेक कथा आहेत त्यातील ही एक.
    भारतीय राजपटलावर धार्मिक सवर्णिय आरक्षणाविरूदध राजकिय-सामाजिक दलित आरक्षण आणले त्याचे श्रेय जाते ते शाहू महाराजांना. त्यांनी दलितांसाठी शाळाच काढल्या नाहित तर आपल्या दरबारी सवर्ण रोषाची पर्वा न करता समतेशी निष्ठा राखत रोजगारही दिले. आंबेडकरांचा मूकनायक निधि अभावी मूक झाला होता, शाहू महाराजांच्या देणगीनेच पुन्हा तो बोलू लागला. शाहू महाराजांनी आंबेडकरांना वेळोवेळी मदत तर केलीच पण त्यांचे गुण आणि क्षमता हेरून माझ्या नंतर समाज सुधारणेचा वारसा हा चालवेल असेही सांगितले.
     तर असा महान समाजसुधारक, दिनांचा कैवारी, गुणग्राहक, प्रजेचा मायाळू पालक, दूरदर्शी जाणता राजा छत्रपती शाहू महाराज! त्यांना मानाचा त्रिवार मुजरा!!!
👑👑👑👑👑👑👑👑👑👑
                

शंभूराजे :राजकारणाचे बळी

शंभूराजे: राजकारणाचे बळी!
शंभूराजे जन्मतःच आईचे छत्र गमावून बसले. वडिल राजकारण आणि समाजकारणाने ठिकसे लाभलेच नाहित! आजीच्या कुशीत वाढले, आजीने शक्य तितके लाडाकोडात वाढवले. शेवटी सईबाईंच्या म्हणजे दुसर्याच्याच पोटचा गोळा, त्याला धोक्यात घालणे वा शासन करणे, वळण लावण्यासाठी प्रसंगी रूक्ष वागणे जमले नाही. ठेव सांभाळावी तसे सांभाळले आणि शेवटी पुत्र आणि नातवात फरक पडतोच!
     वडिल समाजकारणात गुंतलेले असताना दरबारी राजकारणाचा वेढा संभाजी महाराजांभोवती पडू लागला. तरुण तडफदार सळसळणारे रक्त, वडिलांनी कर्तृत्वाने कमावलेले राज्य जे निश्चित वारश्याने मिळणार होते, आणि त्या सिंहासनाभोवती घोंघावणार्या माश्या, पौगंडावस्थेतच अपेक्षांचे भले मोठे ओझे आणि त्यात होणारी घुसमट. परिणामी घडलेल्या चुका जश्या औरंगजेबाच्या मुलासोबत स्वराज्यावरच चाल करून येणे, परस्त्रीचे अपहरण, शौकिनपणा, मद्यपान इ.इ. परिणामी महाराज आणि जनतेच्या नजरेतून ढासळणे. मध्ये बुधभुषण पुस्तक वाचायला मिळाले होते, त्यात खुद्द संभाजी महाराज हे शिवाजी महाराजांना शंकराचा अवतार म्हणत होते. ते पुस्तक लगेच पुन्हा खाली ठेऊन दिले. आपल्याच वडिलांना दैवी अवतार म्हणणार्या मुलाची मानसिकता काय असू शकते? आपल्या बापाचे माणूसपण न जाणवण्या इतपत दरी दिसत होतीच, पण त्याकाळच्या अंधश्रद्धाही. संस्कृतभाषेत प्रभुत्व मिळवले पण संस्कृतचा अंधश्रद्धाळू पुराणकथांत रमणारा दोषही लागला. बापही प्रसारमाध्यमांद्वारे पोहोचल्याने असे घडले असावे. बाप शिव आणि आपण साहजिकच शिवपुत्र या संकल्पनेने संस्कृत ज्ञाते संभाजी धर्माच्या प्रेमात अधिक पडले असावेत!
     संभाजी महाराज शौकिन होते आणि राजनितीज्ञ नाही तर औरंगजेबाचा पुत्र आणि एक कवि याला जीवाभावाचा मानत होते. त्यांच्या वयाला, युवराजपदाला साजेसे होते तरी त्यामागे मानसिक घुसमटीला वाव करून देणेही एक कारण असावे.
    तख्तावर अजान राजाराम हवा पण संभाजी नको म्हणून काही पंत राजकारण आखत होते आणि संभाजी महाराजांच्या वाईटावर होते. आपण बसो कि भाऊ याने राजारामांना काही फरक पडणार नव्हता आणि संभाजी महाराजांचेही धाकट्या भावावर प्रेम होते. पण पाय खेचणार्या आणि खोचून बोलणार्या दरबारी राजकारणी पंतांचा खूप राग होता. म्हणून शिवाजी महाराजांप्रमाणे उपद्रवी ब्राह्मणांना नुसती तंबी न देता त्या पंतांना औरंगजेबासारखे हत्तीच्या पायाखाली सिंहासनावर आल्या आल्या दिले. पण आपल्या सावत्र आईला पूर्ण सन्मान दिला. यावरूनच संभाजी राजांना खरा त्रास कोणाचा होत होता हे कळते.  पण संस्कृतात ब्राह्मण नसताना लिहिणे हि चूक एकवेळ जातीयवाद्यांनी दुर्लक्षिली असती पण सरसकट ब्रह्महत्या करून संभाजींनी मोठा अधर्म केला होता, जो त्यांना नंतर भोवला. औरंगजेबाला त्यांचा ठावठिकाणा लागला आणि मद्यधुंद अवस्थेत आपल्या विद्रोही मुलाला शरण देणार्याला पकडले. पण संभाजी महाराजांच्या बहादुरीवर खूष होऊन औरंगजेबाने मुसलमान होण्याचाही प्रस्ताव ठेवला जो संस्कृतज्ञाते स्वधर्माभिमानी संभाजी महाराजांनी नाकारला. आता औरंगजेबाने जावई करण्याचाही प्रस्ताव ठेवला होता असे काही म्हणतात तर काही धर्मांतर करायला सांगणार्या औरंगजेबाला "तुझी मुलगी देशील का?"अशी घाणेरडी विचारणा केली असे म्हणतात. राजे कितीही मद्यधुंद असले आणि शीघ्रकोपी व शौकिन असले तरी ते सुशिक्षित, संस्कारात वाढलेले होते, शिवाजी महाराजांच्या सावलीत वाढले होते, ते अशी विचारणा करणे मनाला पटत नाही. आणि जावई करण्याइतपत ज्याच्यावर मन् आले अशा माणसाला औरंगजेब इतके वाईट मरण का देतो? आणि आख्खी मराठी सेना का अंगावर घेऊ इच्छितो ते कळत नाही. औरंगजेबासारखा संभाजी महाराजांत मुलगा पाहणारा धूर्त मुत्सद्दी एवढी मोठी घोडचूक का करेल ते कळत नाही. मराठीराज्य संभाजी महाराजांच्या मृत्यूने निश्चित संपणार नव्हते. त्याला मराठी राज्य संपवायचे असते तर संभाजी महाराजांना सोडून राजाराम आणि संभाजीत वैमनस्य वाढवून त्या दुफळीचा फायदा घेणे अत्यंत सोपे होते. ज्या औरंगजेबाने ताजमहाल बांधणार्या उधळ्या बापाला आणि भावांना मुघल साम्राज्याची संपत्ती आणि दबदबा राखण्यासाठी रस्त्यातून बाजूला केले आणि घरातच महाभारत घडवून आणले त्याच मुघल साम्राज्यासाठी संभाजींना जावई करून मुलावर जावयाला  ठेवून मुघलसाम्राज्यासाठीच रामायण घडवू पाहणारा औरंगजेब आणि लगेचच संभाजींची हत्या करु इच्छिणारा औरंगजेब यांच्यातली दरी कोणी पुराव्यानिशी नीट सांधली तर बरे होईल. निश्चितच औरंगजेबाला संभाजींचा वध करुन संपूर्ण मराठी सेना अंगावर घेण्याच्या तोट्यपेक्षाही मुघल साम्राज्यासाठी अधिक हिताचे काहितरी दिसले असेल, असे असेल तर ते काय??? औरंगजेब सूड उगवू इच्छित होता कि कोणाला तरी खूश करु इच्छित होता, ज्याने मुघल साम्राज्याचा अधिक फायदा झाला असता????? नेताजी पालकरांनी जी धर्मांतर करुन पुन्हा घरवापसी केली तो शहाणपणा संभाजीमहाराजांनी केला असता तर मराठी सत्तेचा पराक्रमी राजा तरी वाचला असता. पण पालकरांना जातीयवाद्यांनी कधीच परत हिंदू मानले नाही, हेही खरे. तरी बरेच गूढ आहे. काही म्हणतात औरंगजेबाने केवळ संभाजी महाराजांनाच तसे मारले, आणि संभाजी महाराजांना मनुस्मृतीप्रमाणेच मारले गेले. मला संभाजी महाराजांच्या इतिहासाबाबत खोलात माहित नाही म्हणून मीही हे असेच आहे हे ठासून सांगू शकत नाही. फक्त रास्त शक्यता वर्तवत आहे. जाणकारांनी अधिक माहिति पुरवल्यास आभारी राहिल.
     शिवाजी महाराजांवर धार्मिक राजकारण करता येत नाही म्हटल्यावर सवर्ण जातीयवादी मंडळी संभाजींवर घसरली आहे. आणि संभाजींवर जातीयवादी राजकारण आणखी कडवट रुपात येत आहे. ब्राह्मण्यवादी संभाजी महाराज कट्टर  हिंदूधर्माभिमानी होते असे रंगवण्याचा प्रयत्न करताहेत. तर संभाजी ब्रिगेड सारखी संघटना संभाजींचे खरे शत्रू ब्राह्मणच होते हे ठासून सांगण्याचा प्रयत्न करत आहेत. म्हणतात ना जाणारी जाते जीवानिशी खाणारा म्हणतो वातड कशी? संभाजी महाराजांच्या चितेवर आपापली पोळी भाजून घेण्याचे राजकारण जोरात चालू आहे. शिवाजी महाराज संयत होते म्हणून त्यांना ताणता आले नाही. मात्र संभाजी महाराजांना दोन्हीकडचे जातीयवादी दातओठ खात आपापल्या गोटात खेचायचा प्रयत्न करत आहेत. प्रतिकांचे राजकारण प्रतिकांना धुळीस मिळवण्यापर्यंत नाही गेले म्हणजे मिळवले. किती व्यक्तिवाद आणि किती जातिय तेढ???? आता तरी आपण शहाणे व्हावे!
                  
(नोंद:- हे लिहिताना कोणाच्या भावना दुखावण्याचा मानस नाही. दुखावल्यास क्षमस्व. राजकारणानेच संभाजी महाराजांचा जीव गेला आणि त्यावरून पुन्हा राजकारण नको एवढीच माफक अपेक्षा. 21 व्या शतकात धर्मही टाकाऊ गोष्ट झाली असताना आणि जातपात विषारी आहे हे सिद्ध झाले असताना संभाजी महाराज धर्मासाठी मेले कि ब्राह्मण्यवादी जातिय मंडळीनी त्यांचा जीव घेतला हि चीरफाड करत बसण्यात काय हशील? धर्मांधता वा जातिय तेढ दोन्ही देशासाठी घातकच मग हा देशद्रोह करणार्यांना कोठवर चुचकारायचे? संभाजीमहाराजांना खरी श्रद्धांजली ही जातीपातीचे विसर्जन हिच आहे. जातीयतेढ निश्चित नाही आणि धर्मांधता तर नाहीच नाही. धर्मांधता येणार्या पिढ्यांशी गद्दारी ठरेल)
                   - डॉ कौस्तुभ कल्पना विलास

आत्मा, सत्य कि कल्पना?

आत्मा, सत्य कि कल्पना? (भाग 1&2)
     आत्मा प्रत्येक आस्तिक धर्माचा मुख्य आस असतो ज्याच्या भोवताली त्यांचे  सर्व सिद्धांत फिरत असतात. त्यांच्या धर्माची सर्व फलश्रृतीचा भोक्ता आत्माच असतो. तो अजन्मा आहे कि नाही माहित नाही मात्र अमर नक्किच मानला जातो. जीवांच्या शरिरात तो असला कि जीव जीवंत असतो आणि त्याने शरीर सोडले कि जीव मरतो.
     मी हाऊस डॉक्टर म्हणून अतिदक्षता विभागात काम केले आहे. त्यावेळी कित्येक माणसांचा मृत्यू जवळून पाहिला आहे. औषध आणि डॉक्टरांच्या प्रयत्नांना साथ न देता कित्येकांचे श्वास हळूहळू बंद पडताना पाहिलेत. माझ्या आजोबांची शेवटची घरघरही कॉलेजला असतानाच ऐकली आहे. या सर्व अनुभवांचा, माणसाच्या शरिराचे जेवढे ज्ञान आहे त्याचा आणि आत्म्याच्या सिद्धांताचा संबंध पडताळायचा प्रयत्न केला तर वेगळेच सत्य माझ्या समोर आले.
     काही महिन्यांपूर्वी सहज विचार आला कि माणसाला आत्मा एक असतो कि अनेक? माणूस मरताना कधी एकदम एकसाथ मरत नाही. तो हळूहळू मरतो, शरीर मेंदू, हृदय, फूप्फूसे, मुत्रपिंड आदि मध्य अक्षाची अतिमहत्त्वाची अवयवे वाचवायचा प्रयत्न करत असते. मेंदू कोमात गेला तरी शरीर जिवंत राहते. मेंदू मेला तरी काही क्षण शरीर जीवंत राहते.मग मेंदूचा आणि शरिराचा आत्मा भिन्न आहे का? हृदयात छिद्र झाले वा अन्य काही कारणांनी डॉक्टरांनी पूर्ण हृदयच बदलावे लागले, तर काढून टाकलेले हृदय मरेल पण नवीन बसवलेल्या (मरण पावलेल्या माणसाच्या) हृदयासकट हा माणूस पूर्ण जीवंतच राहिल मग माणसाचा आणि हृदयाचा आत्मा वेगळा आहे का? फुप्फुसांची शस्त्रक्रिया भविष्यात शक्य झाली वा मुत्रपिंडे आजच्या काळात बदलली तरी हाच प्रश्न पुन्हा त्या सगळ्यांना लागू होतो. समजा एका माणसाच्या पायाला गुडघ्याखाली रक्तपुरवढ्यात अडचण आल्याने गुडघ्याखाली तो सडू लागला, म्हणजे माणूस जीवंत असतानाच त्याच्या शरिराचा एक भाग मेला आणि शरिर सडते तसा तो सडायला लागला ज्याला गॅंग्रीन होणे म्हणतात, तर त्याला कापून काढून टाकणे अपरिहार्य असते अन्यथा सर्व शरिरात जीवाणू पसरून रक्तात त्याचा संसर्ग होऊन संपूर्ण शरिरालाच धोका उद्भवू शकतो, मग आपल्या हातापायाचा आणि आपला आत्मा भिन्न आहे का?????
     वरिल सर्व प्रश्नांचे उत्तर "हो! आहे"असेच द्यावे लागेल. असे विचार येण्याचे कारण डिस्कव्हरी चॅनेलवर एक क्लिप पाहिली होती ज्यात बेडकाचे पाय कापून एका थाळीत ठेवले होते आणि ते सोलले होते, त्या पायांवर एकाने मीठ टाकले आणि ते अक्षरशः नाचू लागले. झाले काय तर पाय अजून मेले नव्हते, नुकतेच शरिरापासून वेगळे केले होते, आणि मीठ टाकताच त्यातील क्षारांचे विभाजन होऊन ऋण आणि धन भार असलेले अयन वेगळे झाले, आपले मज्जातंतू हे अश्याच अयनांनी संदेश वहन करतात, म्हणून सोडियमचा अयन जसा मज्जातंतूंना लागला त्यांना वाटले कि मेंदूनेंच स्नायू आकुंचित करण्याची आज्ञा दिली आहे. तसेच साप वा इतर सरिसृपांचे डोके उडवले तरी ते जवळ जवळ तासभर चावण्याची प्रतिक्रिया राखून असतात, तर झुरळे बिनामेंदूची कित्येक दिवस जगू शकतात. इतकेच काय तर आपल्या शरिरातील संपूर्ण रक्त आणि त्यातील प्रत्येक पेशी 3 महिन्यात नवीन असतात. 3 महिन्यानंतर रक्तात जुन्यापेशी सापडणार नाहित. मेंदूच्या पेशी सोडल्या तर शरिरातील  एकूणएक पेशी हि माणसाच्या जीवनकाळात कैकवेळा बदलली गेलेली असते, तसे होते म्हणून तर जखमा भरून येतात. इतकेच काय तर केस आणि नखे ह्या मृत पेशी सदैव आपण वागवत असतो. शरिरात पेशींना जन्माला घालायचे आणि जुन्यांना नव्याशी बदलायचे काम सदोदित चालू असते.
     --------------------
     थोडक्यात काय तर माणूस जिवंत असतानाही कित्येक पेशी त्याच्या शरिरात मरत किंवा जन्मत असतात. आत्म्याचा विचार करताना उपनिषद वा वैदिकसंस्कृती किंबहुना सर्वच आस्तिक संस्कृती अर्धा रस्ता व्यवस्थित पार करतात आणि तो म्हणजे "मी कोण?" याप्रश्नाचे उत्तर ते देताना म्हणतात, "हात म्हणजे मी नाही, पाय म्हणजे मी नाही, धड म्हणजे मी नाही, डोके म्हणजे मी नाही, मग मी आहे तरी कोण???" याचे सरळसोपे उत्तर जे समोरच दिसते ते द्यायचे सोडून ते भलत्याच गोष्टीकडे उडी मारतात आणि म्हणतात तो मी म्हणजे आत्मा! जो दिसत नाही पण असतो. आत्म्यामुळेच सजीव जन्मतो आणि आत्मा नसेल तर शरीर पुन्हा निर्जिवात विलीन होते. शरीर मरताना त्यातून तो बाहेर पडतो. पण वस्तुतः तो न दिसल्याने आस्तिकांनी त्याला अमूर्त असे म्हटले आहे, काही ठिकाणी मेंदूच्या मध्ये ज्योतीरुपात स्थित असतो असेही सांगितले आहे. तो अमूर्त मानल्याने भौतिक जगातील कोणतीही गोष्ट त्यावर परिणाम करु शकत नाही हेही आलेच! थोडक्यात वास्तवातून सबळ पुराव्यानिशी माणूस कसा कविकल्पनेत रमतो आणि नको तो निष्कर्ष काढून मोकळा होतो याचे हे एक उत्तम उदाहरण म्हणून देता येईल. मुख्य दुखणे कोठून सुरू होते तर जेव्हा हा विचारच सत्य आहे हे धर्म बनवून त्याद्वारे थोपवले जाते.
     वरिल प्रश्नापासून पुन्हा सुरु करु आणि कितीही कटू वाटले तरी एक सत्य आपण स्वीकारले पाहिजे कि जीवन कितीही प्रवाही आणि अमर वाटत असले तरी त्याचा एक अविष्कार म्हणजे आपण मानव पूर्णतः मर्त्य आहोत. आपल्या जगण्या धडपडीचा अविष्कार  पुनर्जन्म नसून प्रजनन आहे. आपण पाहिलेच कि माणूस हा एकसंध नसून पेशींचा समूह आहे, त्या पेशी ज्या समान गुणसूत्रांनी संचालित होतात, त्या गुणसूत्रांचेच मूर्त रूप आपले शरीर असते. सर्व पेशी त्यागुणसूत्रांच्या एकैक अक्षराबरहुकून वागत असतात, त्या सूक्ष्म पेशींचा एकत्रित भव्य आविष्कार म्हणजे शरीर असते. एकपेशीय सजीवांतही आत्मा मानावाच लागेल ना? मग शरीराच्या प्रत्येक पेशीत एकैक आत्मा मानला तर चूक कसे म्हणता येईल? म्हणजे अब्जावधी आत्मे मिळून आपण आणि आपल्यासारखे मोठे प्राणी तयार होतात असे म्हटले पाहिजे, तरच ते संयुक्तिक ठरेल. स्वर्गात वा नर्कात सर्व होऊन गेलेल्या पेशींसहित उभे करायचे म्हटले तर एका माणसाच्या जागी एकाच सारखी कैक माणसे उभी करावी लागेल,थोडक्यात हे त्याही तर्काने हास्यास्पद आणि असंभवणीय ठरेल. म्हणजे आत्मा नाही असेच म्हणावे लागेल, निदान रुढार्थाने तरी नक्किच नाही.
     मग पुन्हा तोच प्रश्न राहतो कि मी कोण? शरीराचे अवयव म्हणजे मी नाही, अहो पण सजीव शरीर तर मी आहे! घराचे छप्पर घर नसते, घराची फरशी घर नसते, घराच्या भिंती घर नसते, पण ह्या सर्वांनी मिळून घर तयार होते. तसे शरीरसुदधा! फरक येवढाच कि बाहेरून वस्तू आणून कृत्रिम गोष्ट माणूस बनवतो तर शरीर आतूनच बाहेर वाढत जाते. घरासंबंधी आणखी एक छान गोष्ट सांगितली जाते ती म्हणजे बांधली जाते ती वास्तू(House) तर त्याला घर(Home) आतील माणसे बनवतात, ते तर सजीवांना अगदी चपलख बसते. जोपर्यंत सर्वपेशी व्यवस्थित काम करत आहेत, तोपर्यंत ते सक्रिय शरीर आणि पेशींच्या असलेला किंचकट गुंता आणि त्यांचे नाते सजीव म्हणून गणले जाते, तर बंद पडलेला सजीव निर्जीव शरिर म्हणून गणला जातो. बंद यंत्र गंजते तसेच बंद पडलेले शरीर सडू लागते. आणखी एक जवळ जवळ समर्पक उदाहरण म्हणजे संस्था! आपले शरीर पेशींची एक संस्थाच असते. संस्थेचे नाव घेतल्यावर जागा, वास्तू, अध्यक्ष, कार्यकारिणी, कर्मचारी असे एकत्रित सर्व आपल्या नजरे समोर उभे राहते, मी संस्थेत काम करतो, संस्थेचा असाअसा निर्णय आहे, संस्थेवर खटला दाखल झाला वैगेरे म्हणताना संस्था जणू एक स्वतंत्र  व्यक्तिमत्त्व असलेली एक व्यक्तिच गणतो, सजीवांचेही अगदी असेच आहे. संस्थेत कर्मचीरी बदलत असतात अगदी तसेच पेशींचेही.
     असे विचार जेव्हा आले तेव्हाच आत्मा, पुनर्जन्म, भूत इ.इ. शब्दांचा आधार नाहिसा झाला आणि आत्मा संकल्पनेचे तुकडेच नव्हे तर माझ्यापुरता पार भुगा झाला. आणि ना राहिला स्वर्ग-नर्क! ना मृत्यूनंतरचे जीवन! किंबहुना जीवन हि पुर्णतः भौतिक गोष्ट आहे, भौतिकतेच्या आधाराशिवाय जीवन असूच शकत नाही, मग ज्याला शरीर नाही असा कोणी जीवंत नाही, त्याची इच्छा वा  मर्जी नाही, मग भले ईश्वर म्हणा वा भूत! एक तर ते सजीव हवे वा निर्जीव. निर्जीव सजीवांवाचून / जीवनावाचून असू शकतात पण सजीव वा जीवन निर्जीवाच्या आधारावाचून असूच शकत नाही. कारण सजीव निर्जीवातून पुढे उद्भवले. गूढ निर्जीवातून जीवन असणार्या पेशी वा आत्मभान असणारे निर्जीव गुणसूत्र कसे तयार झाले, ज्यांनी रासायनिक प्रक्रियांची साखळीच जन्माला नुसती घातलीच नाही तर विभाजनादी प्रक्रियेने मोठ्या प्रमाणात वाढवली, जे नंतर सजीवांचे प्रजनन म्हटले गेले, आणि त्याने उत्क्रांतीचा मार्ग धरत आत्ताची जैवविविधता अस्तित्वात आली याचे आहे, पण त्या गुढाची उकल वा उत्तर निश्चितच आत्मा-ईश्वर इ.इ.नाही.
                -डॉ. कौस्तुभ कल्पना विलास