Blog Archive

Sunday, 22 May 2016

कुमार केतकरविषयी चर्चा-सुनिल तांबे

...भाजप-शिवसेना वगैरेंनी त्यांच्या निरुपम,दोन राऊत वगैरे अल्पबुध्दी भाटांना खासदारकी देवून जे सौजन्य आणि शहाणपण दाखवलं ते काँग्रसने ख-या अर्थाने अभ्यासु कुमार केतकरांच्या बाबतीत दाखवलं नाही, हे सत्य आहे.
काँग्रेसच्या सद्य माघारीत हे देखील एक महत्वाचे कारण आहे.देशपातळीवर तुमचे विचार प्रभावीपणे पोहचवणा-यांना तुम्ही योग्य सन्मान देणार नसाल तर मेसेज काय जातो..?
रविंद्र पोखरकर यांची पोस्ट

सुनिल तांबेंची कमेंट
कुमार केतकरांचं लिखाण बारकाईने वाचा. त्यांनी काँग्रेसचा प्रचार केलेला नाही. त्यांनी नेहरू-गांधी घराण्याची बाजू घेतलेली आहे. त्यामागची कारणं जाणून घ्या. काँग्रेसमध्ये पुरोगामी वा समाजवादी विचार रुजवणं हे कार्य फक्त नेहरू-गांधी घराण्यातील व्यक्तीच करू शकते कारण काँग्रेसचा वसाहतवाद वा साम्राज्यवादाचा विरोध, सेक्युलॅरिझम आणि सामाजिक न्यायाचा विचार, पुढे नेण्याची जबाबदारी केवळ हे घराणंच पेलू शकतं. काँग्रेसमधील प्रतिगामी, हिंदुत्ववादी विचारांचा निरास करण्याची ताकद केवळ त्यांच्यामध्येच असू शकते. याचा अर्थ असा नाही की हे घराणं पुरोगामी, डाव्या विचारांचं आहे. परंतु आंतरराष्ट्रीय स्थिती ध्यानी घेऊन केतकर या घराण्याची बाजू लावून धरतात. त्यातला आणखी एक बारकावा असा की सुशिक्षित, मध्यमवर्गय मराठी समाजधुरीण (समाजवादी वा कम्युनिस्ट वर्तुळातील वा त्यांचे सहयात्री) नेहरू-गांधी घराण्याची चिकित्सा वा त्यावर टीका करत असतात. त्यांच्या विरोधात केतकर आपली भूमिका डाव्या परिभाषेत नाही तर डाव्या विचारांच्या परिप्रेक्ष्यात मांडत असतात. केतकरांच्या भूमिका मला पटतात की पटत नाहीत हा मुद्दा अलाहिदा पण त्यांची भूमिका समजून मग त्यावर टीका करायला हवी.
केतकरांना पद्मश्री मिळाली वाजपेयी पंतप्रधान असताना. केतकर हे पत्रकार आहेत, त्यातही त्यांचा रस लिखाणात आहे. म्हणूनच त्यांनी वृत्तवाहिनीचं संपादकपद नाकारलं. त्यांना राज्यसभेत खासदार बनण्यात रस नसावा असं मला वाटतं. कारण त्यांची बांधिलकी लेखनाशी आहे. खासदार बनल्यानंतर वेगळी जबाबदारी येते त्यामध्ये त्यांना विशेष रस नसावा. खासदारकीपेक्षाही पत्रकारितेतली आपली ओळख आणि सत्ता यामधून त्यांचे उद्देश अधिक सफल होतात अशी त्यांची धारणा असावी.  जिज्ञासूंनी केतकरांची पुस्तकं अवश्य वाचावीत, विशेषतः ज्वालामुखीच्या तोंडावर.
मी केतकरांचं लिखाण सहसा चुकवत नाही. त्यांची मतं वा भूमिका मला पटतात की नाही हा क्षुल्लक मुद्दा आहे. मी त्यांच्यावर (बहुध एकमेव पत्रकार) जाहीरपणे टीकाही केली आहे. पण तोही महत्वाचा मुद्दा नाही. केतकरांची वैचारिक बांधिलकी पुरोगामीत्वाशी म्हणजेच युरोपियन आधुनिक विचारांशी आहे. त्यामध्ये तत्वज्ञान, समाजशास्त्र, राज्यशास्त्र, अर्थशास्त्र, विज्ञान-तंत्रज्ञान इत्यादी अनेक विषय येतात. वैचारिकदृष्ट्या केतकरांची जडण-घडण श्रीपाद अमृत डांगे आणि लाल निशाण पक्ष यांनी केली आहे.  असो.

No comments:

Post a Comment