Blog Archive

Wednesday, 28 December 2016

मत मांडण्याचा अधिकार फक्त मोदी भक्तांनाच आहे का ?*

१९९८ ला मी माझ्या पत्रकारितेस प्रारंभ केला .जवळपास आज १८ वर्षे झाली .सुरवातीस काही काळ वार्ताहार म्हणूण काम केले.२००२ ते २००६ पर्यंत उपसंपादक म्हणूण काम केले .२००६ ते आजतागायत संपादक म्हणूण काम करतो आहे .या संपुर्ण काळात माझी बांधिलकी केवळ या मातीशी व सत्याशी राहिली आहे.कधी कुठला पक्ष किंवा कुठल्या नेत्याच्या वळचणीला जावून काम केले नाही.कुणाची तळी उचलली नाहीत .परखडपणे जे सत्य असेल ते मांडत राहिलो.देशापेक्षा कुणी नेता किंवा पक्ष कधीच मोठा वाटला नाही . *काँग्रेसच्या सत्ता काळात काँग्रेसवर ,त्यांच्या बहूतेक प्रमुख नेत्यांच्यावर सडकून टिका केली आहे .राष्ट्रवादी पक्ष व त्यांच्या नेत्यावरही टिका केली आहे .सेना मनसे ,डावे, पुरोगामी कुणाला सोडले नाही.* देशहिताचा निकष डोळ्यासमोर ठेवून लिहीले.व्यक्तीगत स्वार्थ ,राग ,लोभ याचा कधीच विचार केला नाही ." शेतकर्यांचा कैवारी नव्हे वैरी , शरद पवारांना म्हातारचळ लागले का ?,वगैरे लेखातून शरद पवारांच्यावर अतिशय घणाघाती टिका केली .अजित पवारांनी धरणाच्या पाण्याबाबत वादग्रस्त वक्तव्य केल्यावर "अजितराव धरणात नको काकांच्या कानात मुता " या मथळ्याचे सणसणीत संपादकीय लिहीले .शिवराज पाटील चाकुरकर केंद्रात गृहमंत्री होते .तेव्हा बाँबस्फोट झाला होता .ते बाँबस्फोटाच्या स्थळी नटून थटून गेले .त्यावेळी " हा तर महाराष्ट्राच्या मस्तकावरचा कलंक " या मथळ्याचे संपादकीय होते.राहूल गांधी महाराष्ट्राच्या योगदानाबाबत बोलले तेव्हा " बेट्या इतिहास वाच " या मथळ्याचे परखड संपादकीय होते.आझाद मैदानावर ज्यावेळी रझा अकादमीने दंगल केली व सरकारने कारवाई केली नाही .तेव्हा "आर आर सुंता झाली काय ? "या मथळ्याचे अतिशय परखड संपादकीय लिहीले आहे.काँग्रेसच्या एका मंत्र्याने एका महिलेशी असभ्य वर्तन केल्यावर त्याला नागडं उघडं करणारी लेखमाला एक महिनाभर वज्रधारीतून सुरू होती .असे शेकडोवेळा लिहीले असेल.हे लिहीत असताना सरकार कुणाचे आहे ,पक्ष कोणता आहे ? नेता कोणता आहे ? हे कधीच पाहिले नाही. पाहिले फक्त व्यापक देशहीत. *हे सगळे लिहीले पण आपला आवाज गुदमरल्यासारखे कधी झाले नाही.आपली मुस्कटदाबी होतेय असे कधी वाटले नाही पण आज तसे वाटते आहे.* कधी कधी वाद व्हायचे ,क्वचीत एखादा अती शहाणा धमकवायचा.पण आवाजच बंद झाला पाहिजे ,विरोधात लिहीलेच नाही पाहिजे असा प्रयत्न कुणी केला नाही.त्यावेळी काँग्रेस सरकारच्या विरोधात लिहीले म्हणूण भाजपा समर्थक ,गद्दार ,देशद्रोही अशा उपाध्या कोणी बहाल केल्या नाहीत . आज मात्र चित्र वेगळे आहे .या देशात मत मांडायचा ,टिका करावयाचा अधिकार फक्त मोदी समर्थकांनाच आहे की काय ? असा प्रश्न पडल्यावाचून राहत नाही .कारण त्यांनी कुणाला काहीही म्हंटले तर चालते .ते सर्व संस्कृतीत ,सभ्यतेत बसते .मग ते कितीही असभ्य असले तरी .मोदी समर्थक सोडून बाकी कुणाला विरोधात बोलायचा, लिहायचा हक्क नाहीच .असे अघोषीत वातावरण निर्माण केले जात आहे .लिहीले तर बरीच भक्तमंडळी शिव्या घालते.देशद्रोही ठरवते ,काँग्रेसचे हस्तक ,केजरीवाल समर्थक ठरवून मोकळी होते. काही मोदी समर्थक खुप संयमाने बोलतात .विचाराला विचाराने वाद घालतात .पण बर्यापैकी मंडळी अकलेशी पिढीजात वैर असल्यासारखे बोलतात. *बर्याचवेळा निट न वाचताच वाद घालतात.ते मोदींचे समर्थक आहेत याचा अर्थ मोदींनी त्यांना देश सातबार्यावर लिहून दिला आहे किंवा मोदी या देशाचे मालक आहेत व हे त्यांचे वारस आहेत. अशाच मानसिकतेत ते वावरत आहेत.देशहिताचे फक्त आपल्याला व मोदींनाच कळते .बाकी सगळे बेअक्कल आहेत .शिवाय देशभक्तीचे टेंडर यांनीच भरले आहे.आणि मोदींनी यांनाच ठेका दिलाय .या मानसिकतेत हे आहेत.देशभक्ती म्हणजे काय तर हे जे म्हणतात तीच देशभक्ती ,मोदी जे करतात तेच देशप्रेम . बाकी सगळे देशाचे शत्रू आहेत* अशी रितसर घोषणा करणेच फक्त बाकी राहिले आहे. हा सगळा प्रकार लोकशाहीच्या मुळावर उठणारा आहे.आजवर जगातल्या प्रत्येक मोठ्या माणसाची वाट त्याच्याच आंधळ्या व मुर्ख भक्तांनी लावली आहे.हा इतिहास आहे.मोदींना जर या देशात काही वेगळे करावयाचे असेल तर हेच मोदींचे आंधळे भक्त मोदींच्या कामाची वाट लावल्याशिवाय सोडणार नाहीत .स्वताच्या झुंडशाहीतून मोदींची प्रतिमा मलिन केल्याशिवाय राहणार नाहीत.मोदींच्या कामातला सर्वात मोठा अडसर हीच आंधळ्यांची जत्रा ठरेल .यात शंका नाही.मोदींनी काळ्या पैशाला आवरण्यासाठी जेवढे प्रयत्न चालवले आहेत तेवढेच प्रयत्न या आंधळ्या भक्तांना आवरण्यासाठी करावेत. गेल्या  दोन अडीच वर्षात पाहतोय .येणार्या प्रतिक्रिया ऐकतोय .मोदी भक्त ज्या भाषेत बोलताहेत ,ज्या पध्दतीने बोलताहेत ते भयंकर आहे .खरेतर भक्त व्हायला अक्कल लागत नाही .पण पवित्र ह्रदय मात्र लागते .इथे भक्त मंडळी द्वेषाने ,तिरस्काराने भरली आहे.अकलेचा पत्ताच नाही पण ह्रदयातही पवित्रता नाही .याला काही अपवाद आहेत .पण बावळटांची गर्दी जास्त आहे. हम करे सो । मानसिकता अशीच राहिली तर घटनेचे व लोकशाहीचे अस्तित्व फार काळ राहणार नाही.कारण या  *अंध भक्तांना लोकशाही प्रक्रीयाच मान्य नाही.सत्य मांडायचेच नाही हे कसे काय ? मोदी सर्व देशासाठी करतायत तुम्ही का आडवे पडताय ? असा प्रश्न करून दमबाजी करणारे ,देशद्रोही ठरवणारे अनेकजन भेटले .नोटबंदीनंतरच्या गचाळपणाचा लोकांना होणारा त्रास मांडल्यावर अनेकांना राग आला.* पत्रकारांनी वास्तव लिहीणेे हा पत्रकारांचा धर्म आहे .तो धर्म मी निभावतो आहे .हा देश घटनेनुसार चालतो अन चालला पाहिजे .कारण देशात लोकशाही व्यवस्था आहे."लोकांनी लोकांच्यासाठी चालवलेले राज्य म्हणजे लोकशाही " ही लोकशाहीची व्याख्या आहे. प्रसिध्द तत्ववेत्ता व्हाॅलटेअर असे म्हणतो की, *"मला तुमचे मत मान्य असेलच असे नाही पण तुम्हाला तुमचे मत मांडण्याचा पुर्ण अधिकार आहे. अन त्या अधिकाराचे मी प्राणपणाने रक्षण करेन"*  इथे हे सांगितले तर कोण व्हाॅलटेअर ,त्याचा काय संबंध ? असे विचारले जाईल .मुळातच आहे ही घटणाच मान्य नाही .दुसर्यालाही काही मतं असू शकतात .हेच स्विकारले जात नाही . तिथे मत मांडण्याच्या अधिकाराचे व ते मांडणार्याचे रक्षण कोण करणार ?अशा स्थितीत  व्हाॅलटेअर कोण स्विकारणार व समजून घेणार ? भक्तांना हे कोण समजून सांगणार ?केवळ भक्तांनाच नव्हे तर त्यांच्या दैवतालाही हे समजवून सांगावे लागेल .कारण आडातच नसेल तर पोहर्यात कोठून येणार ?मोदी संसदेत जात नाहीत.त्यांना संसदीय चौकट पेलवत नाही.संसदेत उपस्थित राहात नाहीत .बहूमताच्या जोरावर विरोधकांचीच नव्हे तर संसदेची मुस्कटदाबी सुरू आहे .मोदी या देशाचे पंतप्रधान आहेत .त्यांचे व आमचे काही वैर नाही .मोदींनी आमचा बांधही बळकावला नाही.आम्हाला त्यांच्याबद्दल आदर आहे .पण म्हणूण त्यांच्या काही निर्णयाचा ,कामाचा फटका लोकांना होत असेल,त्याचा त्रास लोकांना होत असेल तर ते मांडणे गुन्हा आहे काय ? आम्हीही देशहिताचाच विचार करतो .त्याच विचारापोटी  सरकारच्या,प्रशासनाच्या चुका निदर्शनास आणूण देतो.आमचेही या मातीवर निस्सिम प्रेम आहे .मग आमच्या देशप्रेमावर शंका घेणारी ,आम्हाला देशद्रोही ठरवणारी  ही बांडगुळं कोण  ? देशभक्तीची सर्टीफिकेट वाटण्याचा अधिकार ,ठेका यांना कुणी दिला ? बहूमताच्या घमेंडीत इंदीरा गांधीनी देशात आणीबाणी लादली .लोकांनी ते सरकार उलथवून टाकले.मोदी भक्त असेच मग्रूरी करत राहिले तर त्या इतिहासाची पुनरावृत्ती व्हायला वेळ लागणार नाही .याचे भान मोदींच्या भक्तांना ठेवावे लागेल. लोकशाहीत कोणतीही सत्ता निरंकुश असेल तर बिथरल्या शिवाय राहत नाही .जे इंदिरा गांधींचे झाले तेच मोदींचे होणार का ? हा प्रश्न आहे.पण गमत्तीचा भाग म्हणजे मोदी बिथरण्याधी त्यांचे भक्त बिथरले आहेत .त्यांनी संयमाने राहिले पाहिजे.एखाद्याचा विचार पटत नाही तर तो मुद्याने खोडून काढावा .सदर लेखाचा प्रतीवाद करणारा दुसरा लेख लिहावा .पण देशद्रोही ,गद्दार ,काँग्रेसी वगैरे भाषा का ? आपण एका दावणीला आहे याचा अर्थ प्रत्येकजन असतोच असे नाही .मतं पटत नसतील तर संयमाने खुषाल खोडून काढा ना ! पण मुद्दयावर न बोलता देशभक्तीचे डोस दुसर्याला पाजू नये.कारण या मातीवर प्रत्येकाचेच प्रेम आहे .आपल्याच देशात आपल्यालाच देशद्रोही म्हंटल्यावर वेदना होतात .जिभ उचलून टाळ्याला लावण्याधी अकलेचा उपयोग केला तर बरे होईल.
*- दत्तकुमार खंडागळे*
*संपादक- वज्रधारी*

No comments:

Post a Comment