Blog Archive

Saturday, 3 December 2016

पेहरावाचे स्वातंत्र्य! राज कुलकर्णी

पेहरावाचे स्वातंत्र्य! 

अमृता फडणवीस यांच्या पाश्चात्य पेहरावावरून ,त्यांनी अभिनेता अमिताभ बच्चन यांच्या सोबत केलेल्या नृत्यावरून केली जाणारी टीका टिप्पणी अत्यंत चुकीची आहे. उलट अमृता फडणीस यांचे आणि  त्यांना मुक्तपणे स्वत:च्या आवडीनिवडीचे  निर्णय घेण्याची संधी देणाऱ्या मा. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचेही अभिनंदन करायला हवे !

अमृता फडणवीस या उच्च विद्याविभूषित आहेत, शिवाय त्या स्वतः बँकेत नौकरी करतात ,त्यांना त्यांच्या इच्छेनुसार व आवडीनिवडीनुसार त्यांचे वैयक्तिक जीवन जगण्याचे पूर्ण स्वातंत्र्य आहे आणि या त्यांच्या स्वातंत्र्याचा पूर्ण सन्मान व्हायला हवा, असंच माझं मत आहे!   माझा त्यांच्या पाश्चात्य पेहरावाला ,त्यांच्या गाणे गाण्याला किंवा अभिनेत्यांसोबत नृत्य करण्यास किंवा कोण्या संगीत अल्बम मध्ये अभिनय करण्यास अजिबात आक्षेप नाही, उलट त्यांचे खूप कौतुक वाटते आहे.

देशातील सर्वच नागरीकांच्या आवडीनिवडी विषयी असेच स्वातंत्र्य असायला हवे, हेही महत्वाचे ठरते. पण दुर्दैवाने असे आढळून येत नाही. देशातील सर्वच धर्मवादी मग ते हिंदुत्ववादी असो वा मुस्लीम वा इतर कोणत्या धर्मातील असो,ते पुनुरुज्जीवनवादी विचारांचे समर्थन सातत्याने करत असतात. फडणवीस ज्या संघाच्या विचारांचा वारसा सांगतात, त्या संघ परिवारातील विचारवंताची भुमिका पाहता अमृताताईंचा विचार व कृती अतिशय अभिनंदनीय आहे.

संघ परीवारातील बजरंग दल या संघटनेने कांही वर्षापुर्वी महाविद्यालयात मुलींनी जीन्स घालू नये म्हणून आदेश काढले होते. तर बेंगलोर मध्ये हॉटेल मध्ये असणाऱ्या स्त्रियांना श्रीराम सेना नावाच्या हिंदुत्ववादी संघटनेने प्रचंड मारहाण केली होती. मध्यंतरी सध्याच्या केंद्र सरकारमधील एका मंत्र्याने आणि एका खासदाराने हिंदू स्त्रियांनी नौकरी करण्याबद्दल नकारात्मक विधान करून, त्यांनी जास्त अपत्ये जन्माला घालायला हवी ,असे स्त्रीस्वातंत्र्य विरोधी विधान केले होते. सरसंघचालक मोहन भागवत यांनी २०१३ साली पाश्चात्य संस्कृतीच्या आक्रमणामुळे हिंदू संस्कृती धोक्यात आली असल्याचे विधान केले होते. एवढेच नव्हेतर स्त्रियांनी घरकामच करणे चांगले अशीही पुस्ती जोडली होती. हिंदू स्त्रियांनी कसे वागले पाहिजे ,याची प्रवचने देणाऱ्या हिंदुत्ववादी महिलांची संख्या सुद्धा खूप मोठी आहे. त्यांच्या व्याख्यानाला केवळ हिंदुत्ववादी नव्हेतर सर्वच पक्षाचे  पुरूषवर्चस्ववादी लोक टाळ्या वाजवतात. मुस्लीम धर्मात देखील अशा विचाराच्या लोकांची संख्या अजिबात कमी नाही.

महिलांवर होणारे अत्याचार ,छेडछाड किंवा बलात्कार हे त्यांच्या पाश्चात्य पेहरावामुळे होतात ,हा आरोप तर सातत्यने धर्मवादी लोकांकडून  होत असतो.धर्माधीष्टीत राजकारण करणारा कोणताही पक्ष किंवा धर्मावर आधारित सामाजिक संघटना ,त्या त्या धर्मातील स्त्रियांवर अधिक बंधने टाकत असते , हा आजपर्यंतचा अनुभव आहे आणि स्वधर्मातील सनातन्यांशी संघर्ष करूनच महिलाना त्यांचे स्वातंत्र्य मिळाले असल्याचा आजपर्यंतचा इतिहास आहे! 

आधुनिकता आणि मुक्त विचार ही पाश्चात्य मुल्ये असल्याचा प्रचार करून आधुनिकता ही भारतीय संस्कृतीच्या विरोधात असल्याची मांडणी आजपर्यंत देशातील दोन्ही सर्वच धर्मातील कट्टर आणि धर्मांध लोक करत आले आहेत, त्यातूनच कोणी बुरखा अनिवार्य करू पाहते तर कोणी हिंदू मुलींनी कुंकू अथवा टिकली लावलीच पाहिजे असा आग्रह धरताना दिसून येतात. प्रखर राष्ट्रवादाच्या प्रचार प्रसारासाठी ज्याप्रमाणे एखाद्या  शत्रू राष्ट्राचे भय दाखविण्याची  गरज असते , त्या प्रमाणे स्वधर्माच्या संस्कृतीतील अनेक बंधनांना पावित्र्य आणि मांगल्य प्रदान करण्यासाठी भारतात इतर धर्माच्या भीती बरोबरोबरच आधुनिकतेला देखील शत्रू मानले जाते. त्यातून आधुनिक आणि मुक्त विचारसरणी असणाऱ्या लोकांवर विनाकारण टिप्पणी केली जाते.

आधुनिकता आणि मुक्त विचारसरणी हे एक व्यापक मूल्य आहे ,ज्यात केवळ आधुनिक पेहरावाचा समावेश नसून आधुनिक स्वातंत्र्यवादी मुक्त विचारांचा देखील समावेश आहे, याचे भान अमृताताईंना नक्कीच असणार!

समाज म्हणून कांही बंधने असतातच पण, अन्न आणि वस्त्र या मुलभूत गरजा बाबतचे तरी स्वातंत्र्य त्यात महत्वाचे आवश्यक ठरते. आपण कोणता वेष परिधान करावा, आपण कोणते अन्न खावे,  हे ठरविण्याचे स्वातंत्र्य या मुक्त विचारत अनुस्यूत आहे. मात्र देशात कांही दिवसांपासून मुक्त विचारांना राष्ट्रवाद किंवा धर्मवाद या नावाखाली बंधने घातली जात आहेत. कोणी काय वेष  परिधान करावा हा तर मुद्दा आहेच परंतु कोणी काय खावे आणि काय खावू नये ,हे देखील सरकारकडून वा ठराविक धर्मवादी गटांकडून ठरवले जावू लागले आहे. कोणी याचे उल्लंघन केल्याचे दिसून आले तर गुन्हा नोंदवून पोलिसात तक्रार करण्यापेक्षा जागेवरच शिक्षा करण्याचा अधिकार कांही लोकांना भेटला असल्याच्या अविर्भावात आहेत आणि तेच स्वतःला संस्कृतीचे रक्षक म्हणवले जात आहेत. यातूनच बजरंग दल आणि दुर्गा वाहिनीच्या अनेक कार्यकर्त्यांनी जीन्स घालून महाविद्यालयात येणाऱ्या मुलींना समज सदृश्य  इशारे दिलेली उदाहरणे या देशात अनेक वेळा घडलेली आहेत.

पेहरावावरून टीका करणारे अत्यंत संकुचित विचारांचे लोक असून ,हे तेच लोक आहेत ,जे पाश्चात्य वातवरणात शिकलेल्या आधुनिक विचारांच्या जवाहरलाल नेहरूंच्या वेशभूषेसारख्या वैयक्तिक बाबीवर टीका करत असत ,कधी त्यांचे कपडे परदेशात इस्त्रीला जात असल्याचा खोटा आरोप करत असत. अमिताभ बच्चन सारख्या महान  महानायकाबरोबर नृत्य केले म्हणून टीका करणारे हे तेच लोक आहेत , जे मृणालिनी साराभाई या नृत्यांगानेबरोबर नेहरूंच्या फोटोबद्दल आक्षेप घेवून अश्लाघ्य आरोप करत होते. हेच तेच लोक आहेत जे सोनिया गांधींवर त्यांनी महाविद्यालयात असताना हॉटेलामधे वेट्रेस म्हणून काम करत असतानाच्या प्रसंगाचे बनावट फोटो सोशल मेडीयावर प्रकाशीत करत होते.  परंतु  सार्वजनिक क्षेत्रात कार्य करणा-यांच्या  वैयक्तिक खाजगी जीवनाचे राजकारण करून असभ्य टीका करणाऱ्या अनेक लोकांच्या डोळ्यात झणझणीत अंजन घालण्याचे कार्य अमृता ताई नी केले आहे!

सन्मानिय अमृत्ताताई या महाराष्ट्राच्या प्रथम महिला नागरिक आहेत. त्यांनी स्वीकारलेल्या मुक्त, स्वतंत्रता वादी आधुनिकत मूल्यांचे समर्थन करण्यास अनेक महिला नक्कीच पुढे येतील ,त्यांनी नेतृत्व स्वीकारून सनातनी प्रवृत्ती विरोधात लढा उभा करावा यासाठी मी त्यांना मनातून शुभेच्छा देतो !
© राज कुलकर्णी.

No comments:

Post a Comment