Blog Archive

Wednesday, 4 October 2017

विक्रमची सायकल आणि गांधीबाबा

विक्रमची  सायकल आणि गांधीबाबा

Vikram Valimbe विक्रम वाळिंबे हा माझा कॉलेज च्या दिवसांपासूनचा मित्र . मी त्या पिढीतला आहे जेंव्हा कॉलेज ला गेल्यावर आई बापाने काहीही सांगितले तरी ते पटायचे नाही, आपले वडीलधारे जे काही सांगत असतील ते चुकीचेच असणार असे वाटायचे , माझे आजोबा एक ख्यातकीर्त गांधीवादी होते ,ते आयुष्यभर गांधी मूल्यांचा प्रचार करत राहिले .

मला आजोबा फार आवडायचे पण त्यांचे गांधी मात्र फार बोअरिंग वाटायचे .

मी माझ्या तेंव्हा ७२ वर्षाच्या आजोबांना तुम्ही उगाच गांधीजींच्या नादी लागलात ,काय उपयोग झाला तुम्हाला आयुष्यभर गांधी गांधी करून असा उद्धट जाबही विचारला होता , तू एकदा गांधी सांगतात तसे थोडे थोडे वागायला लाग ,तेंव्हा तुला हळूहळू गांधी कळेल असे आजोबा म्हणाले होते आणि जाणते पणानें हसले होते .

त्या हसण्यात ना माझ्या अज्ञानाचा उपहास होता , ना स्वतःच्या आकलनाचा गर्व ......

गांधी नावाचा एक अत्यंत चुकीचा माणूस आपण महात्मा म्हणून निवडला ह्यावर कॉलेज च्या पहिल्या वर्षातच त्या काळात सगळ्यांचा विश्वास बसायचा . त्यामुळे जवळजवळ सगळेच जवळचे मित्र हे गांधीविरोधक तर सोडाच गांधींचा यथेच्छ उपहास करणारेच होते . त्यांचा चष्मा , त्यांच्या खाण्याच्या पद्धती , ब्रह्मचर्य , खजूर , बकरी ,चरखा ह्या सगळ्याचा आम्ही यथेच्छ उपहास करायचो, जणू काही गांधी ही एक सार्वजनिक चूक होती जी गत ५०/६० वर्षे देश करत आला होता आणि फक्त आमच्याच पिढीला ह्या चुकीचे आकलन झाले होते .

ह्या काळातही जंगलातल्या एखाद्या अपवादात्मक दुर्मिळ प्रजातीसारखा विक्रम गांधीवादी होता . मला आठवतेय आम्ही सगळेच जण तेंव्हा किमान बाईक किंवा मोपेड घेऊन फिरायचो तेंव्हा विक्रम सायकल वर फिरायचा . विक्रम आमच्या सारख्याच आर्थीक परिस्थितीतून आलेला होता , आम्ही घेतल्या होत्या तशीच आपल्या आई बापाकडून गाडी विकत घेणे त्याला सहज शक्य होते . पण तो सायकल वर फिरायचा आणि विचारले की सांगायचा पेट्रोल जाळून प्रदूषण करायचे ,पैसे जाळायचे आणि स्वतःची तब्येतही बिघडवून घ्यायची हा कुठला विकास आहे ? तू एकदा सायकल चालवायला सुरुवात कर तुलाही माझे म्हणणे पटेल .

माझे आजोबा काय किंवा माझ्या पिढीतला विक्रम काय , गांधींनी तुम्हाला काय दिले ? गांधींचा काय उपयोग आहे ? असले प्रश्न विचारायला लागले की एकाच समेवर
यायचे ती सम म्हणजे काहीतरी तुम्ही स्वतः आणि एका सातत्याने करून बघा ........ 

पुस्तकांची चळत वाचली ,परिसंवादात सहभाग घेतला किंवा कितीही वाद घातले तरी गांधी बाबा चा काय उपयोग आहे हे कोडे उलगडत नाहीच , हे कोडे उलगडायचे असेल तर काहीतरी कृती आधी करावी लागते आणि मगच एकेक दरवाजे उघडत जातात .
तुम्हाला गांधींचा उपयोग काय ? ह्या प्रश्नाचे उत्तर जाणून घ्यायची कितीही घाई झाली असली तरी आधी कृती करावी लागेल आणि मगच उत्तरे मिळत जातील .

गांधी हे असे कोडे आहे तिथे ज्याला उत्तर माहिती आहे त्याला ते सांगायची काहीही घाई नाही आणि कितीही काळ थांबायची तयारी घेऊन तो बसलाय . ज्याला हे उत्तर माहित नाही तो आधी हा प्रश्नच चुकीचा असेल इथून सुरुवात करतो ,त्यात बराच काळ घालवतो , मग तो गांधी कसे चुकीचे असतील ह्याच्या कल्पना मांडतो आणि सायकल चालवून काही होत नाही आपण स्वतः सायकल चालवून गांधींना चुकीचे सिद्ध  करू ह्या महत्वाकाक्षेने कधीतरी सायकल चालवून पाह्यला लागतो आणि ही सायकल त्याला चालवत चालवत गांधी मार्गावर आणून सोडते .

पहिल्या फटक्यात गांधीजी पटले म्हणून कोणीच गांधी जवळ केला नाही त्यांना खोटे ठरवायला गेले ,त्यांचा तिरस्कार करायला लागले आणि ह्यांना आता दाखवूनच देतो म्हणून माणूस इरेला पेटला , की तो सायकल चालवायला लागतो आणि मग थेट गांधीधाम ला जाऊन पोहोचतो .

माझे तेंव्हा ७२ वर्षाचे असलेले आजोबा काय किंवा विक्रम काय दोघांनीही गांधी नावाच्या म्हाताऱ्याचा सायकलचा ट्रॅप बरोबर ओळखला होता , दोघेही प्रज्ञावान होते गुपचूप काहीही प्रश्न न विचारता त्यांनी थेट सायकल चालवायला सुरुवात केली .

आम्ही आपण बुद्धिवान आहोत ह्या भ्रमात होतो ,सायकल समोर होती ,गांधी समोर होता ,आजोबा होते , विक्रम होता .
आम्ही गांधी , आजोबा , विक्रम सारे नाकारले आणि गांधी बिंधी सब झूट आहे हे सिध्ध करायच्या मागे लागलो .

सारेच आजुबाजूला धुरकट का दिसते आहे ह्या प्रश्नाने भांबावून जाऊन जेंव्हा चष्म्यावरचे धुके पुसले तेंव्हा आजही २ ऑक्टोबर ला समोर सायकल दिसली , विक्रम दिसला ,आजोबा दिसले आणि मुख्य म्हणजे जाणते पणाने हसणारे गांधीजी दिसले ,

त्या हसण्यात गेल्या इतक्या वर्षांच्या पडझडीतही अजूनही ना माझ्या अज्ञानाचा उपहास होता , ना स्वतःच्या आकलनाचा गर्व........

#gandhiforever

No comments:

Post a Comment