Blog Archive

Wednesday, 4 October 2017

गांधीजींच्या जवळ जाऊन त्यांना शिव्या द्यायला कुणालाही संकोच, भय, दहशत वाटत नाही हेच त्यांचे थोरपण आहे- राजेंद्र शिंदे

सेंन्ट्रल रेल्वेच्या माटूंगा स्टेशनला लागून रेल्वे वर्कशॉप आहे. त्या वर्कशॉपवर सुरवातीला गांधीजींचे मोठ्ठे चित्र होते.
काही दिवसांनी बाजूला शिवाजी महाराजांचे चित्र आले, त्यानंतर काही दिवसांनी बाबासाहेब आंबेडकरांचे चित्र आले. मी ठाण्यावरून CST ला जातांना आमच्या लोकलमधिल अनेक तरूण मित्र माटूंगा आल्यावर गांधीजींच्या चित्राकडे पाहून रोज अर्वाच्य शेरेबाजी आणि शिवीगाळ करायचे. यातले अनेक जण सुसंस्कृत ब्राम्हण घरातील होते. अनेक वर्ष त्यांचा हा पराक्रम मी पहात होतो.
त्यातील एकाने मला एकदा विचारले.. तू गांधीवादी ना मग तुला आमचा राग नाही येत..?
मी हसुन म्हटले.. इतके दिवस तुम्ही गांधीजींना शिव्या घालताय, तरीही तुम्ही जिंकला असं तुम्हालाच वाटत नाही, हे खरे ना?
तो मित्र झटकन बोलला... गोळी घालण्याच्या लायकीचाच होता तो, बरं झालं मेला...
मी म्हणालो... मेले नाहीत, ते अजुनही तुमच्या मानगुटीवर बसले आहेत आणि म्हणूनच तुम्ही आजही शिव्या देऊन त्यांचा उध्दार करता.
तो गप्प बसला.. हाच मित्र खाजगीत बाबासाहेबांचाही उध्दार करायचा.
त्याला जवळ घेऊन मी म्हणालो... काय रे, त्यांच्याबद्दल हेच जोराने बोलून दाखवतो का ?
तो पटकन् बोलला- येडा आहेस का.?
यानंतर रोज जातांना मी ती तीन महापुरूषांची चित्रे रोज पहायचो, गांधीजींचा चेहरा रोज हसराच भासायचा...
लोकांनी शिवाजी महाराज व बाबासाहेबांना देवत्व बहाल केलंय, त्यांच्याबद्दल अपशब्द काढण्याची हिम्मत कोणाही माणसात नाही.
पण, आपण गांधीजींना काहीही बोलू शकतो कारण ते स्वातंत्र्य त्यांनी सर्वांनाच दिलंय, गांधीजींच्या जवळ जाऊन त्यांना शिव्या द्यायला कुणालाही संकोच, भय, दहशत वाटत नाही हेच त्यांचे थोरपण आहे.... 
आणि
म्हणूनच मला ते भावतात....
#Gandhiforever
Rajesh Shinde

No comments:

Post a Comment