#GandhiForever
ज्या देशात गांधी चा जन्म झाला त्या देशातील बहुसंख्य तरुणांना गांधी बद्दल कमालीचा द्वेष आणि तिरस्कार आहे. हे का झालं? कोणी केलं , कुजबुज तंत्राने गांधीला बदनाम करण्याचं कर्तृत्व कोणाचं ? गांधी विरुद्ध भगत सिंग ,गांधी विरुद्ध सुभाषबाबू, गांधी विरुद्ध आंबेडकर हा काही बाबतीतला वैचारिक मतभेद शत्रुत्व म्हणून कोणी तरुणांच्या डोक्यात आणि मनात भरल ? हा भाग वेगळा ....पण मुळात गांधी बद्द्लच हे का व्हावं?...!
गांधी - एक असंभव संभावना अस कोणी म्हणतो, गांधी नावाचा हाडा मांसाचा माणूस होऊन गेला या वर पुढच्या पिढ्या विश्वास ठेवणार नाही असं आईन्स्टाईन ला वाटत..!काय असेल या माणसामध्ये? काय केलं नेमकं गांधी ने?
आमची उत्तर तयार आहेत, गांधी ने मुस्लिमांचा अनुनय केला..!बर मग गांधी प्रिय असेल मुसलमानांना.... तर नाही ...असं ही नाही
गांधी ने पुणे करार केला आणि दलितांचे हक्क नाकारले...अरेरे ...मग गांधी तर पुजला जात असेल सवर्णांच्या घरी, पण असंही दिसत नाही.....
अरे मग होतास तरी कोण तू ? कोणाच्या बाजूने उभा होतात? कोणतीच झुंड का तुझ्या मागे नाही ?
का आहेत तुझ्या मागे फक्त सरकारी कार्यलयाच्या भिंती..! तू सुधारक की सनातनी? तू आस्तिक की नास्तिक?तू देशाला स्वातंत्र्य मिळवून देणारा की देशाची फाळणी करणारा? सगळा संभ्रम
तू उभा केलास देश आणि या देशातला माणूस सुद्धा..!काय जादू केलीस की स्वतंत्र लढ्यात सहभागी झाल्यात स्त्रिया आणि पोर सुद्धा आणि तू झालास या देशाचा अघोषित नेता .! विझवत राहलास द्वेषाची आग.. आग विझवणाऱ्याची हात जळतात म्हणे तू अख्ख जाळून घेतलस तरी शिकवत राहीलास माणुसकी....पण
माणुसकी हे मूल्य आहे ते माणसासाठी ...इथे तर कधीच पशुत्वाची पातळी गाठली गेली..!
व्यवस्था परिवर्तन केलं की माणस बदलतील अस एक गृहीतक होत पण ते आता खर झालेलं दिसत नाही मग माणसाची आंतरिक मूल्ये बदलली पाहिजे ,पण कशी? आणि या "कशी" साठी गांधी समजून घ्यावा लागतो.
चार दिवस हाती झाडू घेतल्याने आणि फोटो काढल्याने देश स्वच्छ होत नाही त्या साठी स्वच्छता हे मूल्य म्हणून प्रत्येक माणसा मध्ये रुजवावे लागते, हे कठीण काम गांधी करू पाहत असतो
गांधी ची पद्धत जरा वेगळी आहे,गांधी जातीभेद संपवायचा प्रयत्न करतो पण उच्चवर्णीयांच्या मदतीने आणि पुढाकाराने .जातीभेद निर्मूलनातून जातिद्वेष निर्माण होणार नाही याची काळजी घेतो. अस्पृश्याच्या मनामध्ये सवर्णां बद्दल आकस, द्वेष, घृणा निर्माण होऊ नये हा त्याचा प्रयत्न .त्याचा प्रयत्न प्रयत्नच राहिला ,आज काय झाले जातीभेद मिटत आला पण त्याची जागा जातिद्वेषाने घेतली.
या देशातील माती च्या कणाकणात आणि माणसाच्या मनामनात गांधीच अस्तित्व आहे म्हणून प्रत्येकाला गांधी लागतो कधी मताचा जोगवा मागण्यासाठी तर कधी मत मांडण्यासाठी...
आता तर म्हणे गांधींचा चष्मा ही स्वीकारला आणि नोटे वर छापला पण तुझी सर्वाना सामावून घेणारी व्यापक दृष्टी स्वीकारता येत नाही ही आमची अडचण आहे. नाही होता येत आह्मला एवढं व्यापक की सर्व बंधने गळून पडावी म्हणूनच तुला कोणत्याही चौकटीत बांधता येत नाही,आणि मग तू कुणाचाच नसतोस...!
आज जगापुढे तीन मुख्य समस्या आहेत. तापमानात होणारी वाढ,भांडवलशाही आणि वाढता हिंसाचार यावर काय उत्तर आहे. मानव जातच नामशेष होते की काय, ही परिस्थिती हाताळायची कशी? अण्वस्त्राची स्पर्धा, आतंकवाद याने कोणीच सुरक्षित नाही ...अशा परस्थिती मध्ये काय करायचे? कोणता विचार ,कोणाच तत्वज्ञान जगाला तारेल याचा विचार जगातील मानवतावादी विचारवंतांना अस्वस्थ करतोय ...आणि अनेकांना उत्तर सापडलंय ते बुद्ध आणि गांधी....!
गांधींची अहिंसा ही भेकडाची अहिंसा नाही ती शुराची अहिंसा आहे . गांधीच मौन हे धर्मचरणाच भाग नाही तो आत्मचिंतनाचा भाग आहे.
आग्रहाची भाषा, दमदाटीची भाषा,प्रेमाची भाषा आणि गांधी सांगतो ती कृतीची भाषा..आपण विसरत चाललोय ती कृतीची भाषा... कधीतरी या भाषेचा स्वीकार करावाच लागेल. आत्मचिंतन करावं लागेल की आपल्याला हा देश कुठे न्यायचा आहे, या देशाचा सीरिया, लिबिया, पाकिस्तान करायचा आहे का? सीरिया लिबिया पाकिस्तान ही कट्टरतेकडून घडली. मग आपण कट्टरता स्वीकारावी की सर्वसमावेशकता.
# डॉ. आशिष लोहे
वरुड,अमरावती
No comments:
Post a Comment