#GandhiForever
प्रिय बापू ,
सस्नेह नमस्कार...
आज तुझी जयंती .म्हटलं आपण तुला थेट लिहावं,पण आपल्या नेहमीच्या मोकळ्या शैलीत. एकेरीमध्ये यासाठी की तुझ्याशी जवळीक साधता येईल. नाही?यामध्ये तुझा अपमान होणार नाही याची मी काळजी घेईन.
मी काय तुझा भक्त वगैरे नाही किंवा अनुयायी पण नाही,पहिलेच सांगतो. तुझ्या कमालीच्या सच्चेपणावर आपण फिदा आहे. तसा तू आकाशाएवढा आणि मी एक अतिसामान्य..
तुझ्याबद्दल फक्त विद्वानांनी बोलायचे आणि लिहायचे काय ? तसा चार वर्षांपूर्वीपर्यंत तुझ्याशी माझा दुरदूरचा संबंध नव्हता.
2013 साली चंदूभाऊ वानखडेंचे *"गांधी का मरत नाही ?"* या विषयावर व्याख्यान ऐकले.व्याख्यान ऐकल्यावर थोडे मत बदलले. *'मनुष्य जन्मसे नही कर्मसे महान बनता है"*. हे वाक्य मला खूप प्रभावी वाटते. वर्णवर्चस्ववादाला सुरुंग लावणारे वाक्य आहे असे मी मानतो.नंतर नंतर कळले अरे हा माणूस आपण समजतो तेवढा खुजा नाही.याच्या लेखी कुठल्याही जातीधर्माविषयी अजिबात द्वेष नाही.हा फक्त आणि फक्त प्रेम करतो, आणि आपल्याला शिकवतो सुद्धा.जातीधर्माच्या पार गेलेला माणूस..तुला शिव्याशाप देणारे सर्वच जातीधर्माचे लोक आहेत.पण त्यापेक्षा आत्यंतिक प्रेम करणारे संपूर्ण जगभरात कित्येकपट चाहते आहेत.तुझ्या मृत्यूनंतर तर विदर्भातल्या माझ्या एका आडवळणाच्या गावात संपूर्ण गावाने सुतक पाळले होते.अनेकांनी तर मायबाप गेल्याप्रमाणे मुंडन आणि सामूहिक तेरवी केल्याचे अनेक बुजुर्ग लोकांकडून कळले.असे संपूर्ण देशभरात झाले असणार..तुझ्यासारखी लोकप्रियता खचितच कोणाच्या वाट्याला आली असेल.तुझ्या मानवतेच्या फिलॉसॉफी मुळे तू ग्लोबल झालास.ज्या इंग्रजांच्या विरोधात तू लढा उभारला ,ज्यांना तुझ्या मुळे देश सोडावा लागला त्यांच्याशी पण तू पर्सनली जंटलमन सारखा वागला.व्यक्तीगत द्वेष केलाच नाही.. म्हणूनच इंग्लडच्या संसदेसमोर चक्क तुझा पुतळा उभारला..आपल्या शत्रूचा पुतळा अन तो ही आपल्या देशाच्या सर्वोच्चस्थानासमोर लावावा हे तर आक्रीतच.. संपूर्ण जगभरात तुझे चाहते आहेत.फक्त भारतात नव्हे तर संपूर्ण जगात सर्वात जास्त पुतळे तुझे आहे व जगात सर्वात जास्त पुस्तकं तुझ्यावर छापली जातात असेही समजले.दिवसभर तुझी निंदानालस्ती करणाऱ्या लोकांना पण सार्वजनिक कार्यक्रमामध्ये सुद्धा तुझाच फोटो लावावा लागतो.आदरणीय प्रधानमंत्री मोदीजी सुद्धा भाषणात वारंवार तुझा आदराने उल्लेख करतात.
बापू आम्ही पण तसे थोरच आहोत,
महापुरुषांच्या कुस्त्या लावून मजा घेणे आमचा आवडता छंद आहे.
गांधी × बाबासाहेब,
गांधी× सरदार,
गांधी × नेताजी,
गांधी×भगतसिंग..
वास्तवात तू गालिव्हर ऑफ वर्ल्ड आहेस आणि आम्ही लिलीपुट म्हणजे बुटके...
प्रा.सुरेश द्वादशीवारांनी एका भाषणात म्हटले होते की जगाच्या इतिहासात छत्रपती शिवराय व म.गांधी यांच्या योगदानाला तोड नाही.हे दोन उत्तुंग व्यक्तिमत्व असे आहेत की ज्यांनी आपल्या कार्यकर्तृत्वाने व वाणीने सामान्य माणसांच्या साथीने *" न भूतो न भविष्यती "* इतिहास घडविला.
तुझ्यातला एक गुण मला खूप भावतो.तो असा की तुझ्या हयातीमध्ये तुझ्यावर जीवघेणे हल्ले झाले,टिंगलटवाळी आणि प्रेम वाट्याला आले पण टिंगलीचे व कौतुकाशी तुला सोयरसुतकच नव्हते.तू निष्ठेने ,धाडसाने, संयमीपणे काम करत राहिलास. सारा देश स्वातंत्र्याच्या जल्लोषात असतांना फाळणीच्या हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर तू तुझ्या मूठभर साथीदारांसोबत आणि तेही निशस्त्र, निडरपणे धार्मिक हिंसेचा वणवा विझवण्यात गुंतला होता.दंगलग्रस्तांच्या डोळ्यातील अश्रू पूसण्याची तुझी तगमग होती.तुझ्या धाडसाची ,निरिच्छ्तेची दाद द्यावी लागेल.इसके लिए कलेजा होना बॉस..तुझ्यामधली जी टोकाची करुणा होती ना ती मला गौतम बुद्धाच्या व येशू ख्रिस्ताच्या प्रतिमेतल्या डोळ्यांमध्ये सुद्धा दिसते.तोच 'फिल' येतो .तू सुद्धा त्यांच्या वाटेने गेलास..
बापू ,तुझी सर्वसामान्यांशी संवाद साधण्याची स्टाईल लई भारी होती हं..
सर्वसामान्यांना समजेल उमजेल याच भाषेत बोलायचा.तू काही पट्टीचा वक्ता नव्हता पण तुझे शब्द थेट काळजाला भिडायचे म्हणे.
च्यायला, आजकालचे विचारवंत(?) काय बोलतात हेच कळत नाही.तू काही बोलबच्चन नव्हतास. तुझ्या सहज वाणीला अफाट कर्तृत्वाची,कार्याची जोड होती.तुझ्या पत्रव्यवहाराबद्दल पण ऐकले आहे,तुला देशभरातून नव्हे तर जगभरातून पत्र यायचे ,काही पत्रांवर तर चक्क पत्ते सुद्धा नसायचे म्हणे..Mahatma Gandhi, Somewhere In India..बापू किंवा महात्मा गांधी ,भारत..
असे अफलातून नमुने..
तू न चुकता वेळात वेळ काढून त्यांना उत्तर सुद्धा द्यायचा.मोतीलाल नेहरूंनी दांडीयात्रेच्या पूर्वी बावीस पानी दीर्घ पत्र लिहिले होते व यात्रेच्या बाबतीत नकारात्मक.. तू त्यांना एका ओळीत उत्तर दिले."प्रिय मोतीलाल,
तुम्हारा पत्र मिला ...करके देखो..
ते एकदमच परिणामकारक ठरलं राव..मग काय ? मोतीलाल नेहरूंची रवानगी तुरुंगात.
त्यांनी तुला उत्तर दिले.. "करके देखा "
बापू, तुला सांगतो सध्या देशाचे काही खरे नाही .तू व इतरांनी विणलेली देशाच्या एकात्मतेची,जातीधर्माची वीण,आम्ही आता उसवण्याचा एक कलमी कार्यक्रम हाती घेतला आहे..जातीधर्माचे खूळ कमी होण्याऐवजी वाढतंय. तुला फार प्रेम होतं ना खेड्याबद्दल.खेड्याची व शेतकऱ्याची अवस्था तर फारच वाईट झालेली किंवा आम्हीच केली..अरे,आमच्या विदर्भात तर दर दिवसाला तीन या भयावह वेगाने शेतकरी मृत्यूला कवटाळतायत.हमारे विदर्भ मे सिर्फ किसान एन्काऊंटर चल रहा है.
आम्ही मश्गुल आहोत आमच्या जातीधर्माच्या कप्प्यात सुरक्षित.आणि आम्ही जपतोय आपआपल्या जातीपातीचे ओवळे सोवळे..
मनापासून सांगू बापू ,तुझे हे प्रेमाची फिलॉसॉफी आम्हाला पेलवतच नाही.तुझा माणूसपणाच्या,
सच्चेपणाच्या दिशेने जाणारा रस्ता खूपच कठीण आहे..अरे जातीधर्माच्या कप्प्यात सुरक्षितता असते,हितसंबध असतात.
अरे आम्हाला अव्यवहारी होऊन थोडी चालेल?अरे जातीधर्माची चौकट ओलांडणे सोप कामं थोडे आहे राव.बापू,मी ही प्रयत्न करेन हे पार करण्याचा .
तु नेहमीप्रमाणे मळलेल्या पायवाटेने न जाता ब्रुनो ,सॉक्रेटिस,ज्ञानोबा,तुकोबाच्या वाटेने निघालास ती परंपरा अजून खंडीत झाली नाही बरं. तुझ्या वाटेने डॉ.कलबुर्गी,
डॉ.दाभोलकर,पानसरे अण्णा ,गौरी लंकेश ही लोकं सुद्धा गेली..मानवतेच्या शत्रूंना,भेकडांना हे कळत नाही तुमच्या सांडलेल्या रक्तातून अनेक गांधी निर्माण होतील युगानयुगे..गांधी पुन्हा पुन्हा..
बापू, तसे एकदम निराशाजनक चित्र पण नाही देशात.सध्या तुझ्यासारखा सच्चेपणा मला अनेकांमध्ये दिसतो.जीवाच्या आकांताने, माणुसपणासाठी झगडणारे लोक आहेत ना बरेच..गेल्या पिढीतला नेल्सन मंडेला,शेतकरी चळवळीतले काही योद्धे,आपला NDTV चा रविश कुमार,
इरोम शर्मिला,आणि बुवाबाबाच्या प्रकरणातले पोलीस अधिकारी,न्यायाधीश,साक्षीदार यांच्यात अंशतः का होईना तू दिसतोस. बापू तुझ्याशी माझा परिचय चंद्रकांत वानखडे या सच्च्या फकीर व्यक्तीनी करून दिला..त्यांचे दिलसे आभार,तुझ्यासारख्या आभाळाएव्हढ्या व्यक्तीशी ओळख करून दिल्याबद्दल..
*कुछ लोगोसे जब तक* *न मुलाकात हुई थी*
*मै भी ये समजता था* *खुदा सबसे बडा है.*.
बापू जास्त बोललो का रे ?.माफ करशील..
तुझाच
*प्रदीप पाटील,अमरावती*#GandhiForever
सर्वप्रथम संकेतभाऊ मुनोत यांना धन्यवाद ..... प्रदीप पाटील सर खुप छान लिहिला..... तुमच्या पत्राला प्रतिक्रिया या देशातील गांधीचे अनुयायी आपल्या कर्तुत्वाने देतील ,देत आहे ,गांधी त्यांच्यातच जिवंत आहे ..... मी सुध्दा तुमच्यासारखाच विचार करायचो पण जेंव्हा गांधीना पुर्वाग्रह सोडुन वाचलं तेंव्हा .... गांधीचा तिरस्कार करण्याचे धैर्य माझा विवेक करु शकला नाही ... धन्यवाद
ReplyDelete