आम्हा घरी धन, शब्दांचिच रत्ने ।
शब्दांचिच शस्त्रे, यत्ने करू
अशा निश्चयाने स्वविकासाचं बळ संत तुकोबांनी वारक-यांना आणि समस्त समाजाला दिलं. समाज परिवर्तनासाठी, समतेसाठी शस्त्रापेक्षा शब्द कसे प्रभावी व परिणामकारी असतात ह्याची साक्ष तुकोबांनी हजारो अभंगातून दिलीय. शस्त्रांना निकामी करणा-या त्यांच्या शब्दांच्या अभंग मार्गदर्शनानेच गेली साडेतीनशे वर्षं पंढरीची वारी सुरू आहे.
तथापि, गेल्या वर्षीच्या वारीप्रमाणे यंदाही संभाजी भिडे गुरुजींच्या शिव प्रतिष्ठानच्या कार्यकत्र्यांनी आळंदीहून संत ज्ञानेश्वरांची पालखी पुण्यात येताच, तलवारींसह घुसखोरी केली.
त्याला संत ज्ञानेश्वर पालखी सोहळा दिंडीचे प्रमुख राजाभाऊ चोपदार यांनी विरोध केला. तलवारधारी हे आपल्या दिंडीतील भाग नाही, हे दाखवण्यासाठी ज्ञानेश्वर दिंडीने तलवारीधा-यांना ओव्हर टेक करण्याचा प्रयत्न केला. तो पोलिसांनी रोखला.
शेवटी राजाभाऊंनी तासभर आळंदीची दिंडी थांबवली आणि आपले आणि तलवारधारींमधले अंतर जाहीर केले. इतका अपमान होऊनही तलवारधा-यांनी आपला चेंगटपणा सोडला नाही.
आधी त्यांनी भिडे गुरुजींना आरती करू द्या अशी मागणी केली. ती नाकारल्यानंतर कार्यकत्र्यांनी भिडे गुरुजींची सभा घेतली. ती विनापरवानगी घेतल्याबद्दल पुणे पोलिसांनी भिडे गुरुजी आणि त्याच्या कार्यकत्र्यांवर गुन्हा दाखल केलाय.
तथापि, पोलीस व प्रशासनाने भिडे गुरुजी विरोधात कारवाईचं पाऊल उचलल्यास हात-पाय तोडून टाकू अशी भाषा आचार्य जितेंद्र याने व्हिडिओ क्लिपद्वारे केलीय. हा भिडे गुरुजींची दहशत माजवण्याचा आणि वारीचं पावित्र्य कलंकित करण्याचा प्रकार आहे.
भिडे गुरुजींची थोरवी सांगताना आचार्य जितेंद्रनी त्यांची तुलना आचार्य द्रोणाचार्यांशी केलीय. ती योग्यच आहे. एकलव्याचं धनुर्विद्येतलं कर्तृत्व संपवण्यासाठी त्याच्याकडून द्रोणाचार्याने ‘गुरुदक्षिणा' म्हणून अंगठा कापून मागितला.
अगदी तसाच- बहुजन तरुणांची बुद्धी-शक्ती त्यांच्या उमेदीत छाटण्याचा उद्योग संभाजी हे नाव धारण करून भिडे गुरुजी सांगली, सातारा, कोल्हापूर परिसरात करीत आहेत. आता त्यांनी पुणे-मुंबई-ठाणे, कोकण परिसरातही हात-पाय पसरायला सुरुवात केलीय.
बहुजन समाजातल्या तरुणांचा जमाव गोळा करून आपली दहशत निर्माण करण्याचा त्यांचा प्रयत्न गेली २५-३० वर्षं सुरू आहे. दीड वर्षांपूर्वी सांगलीत ब.मो.पुरंदरे यांना देण्यात येणा-या 'महाराष्ट्रभूषण पुरस्कार'विरोधात शिवसन्मान परिषद झाली.
त्यात राडा करण्याचा प्रयत्न भिडे गुरुजींच्या कार्यकत्र्यांनी केला. त्यानंतर इचलकरंजीतील एका कार्यक्रमात इतिहास अभ्यासक इंद्रजीत सावंत यांच्यावर हल्ला केला. आता पंढरपूरला निघालेल्या संतांच्या पालखी दिंडीत घुसून कपड्यातून लपवून आणलेल्या तलवारी नाचवण्याचा उद्योग केला.
वारीत एकदाच घुसणार, भगवाच दिसणार अशा घोषणा त्यांनी दिल्या. हा सगळा प्रकार झुंडशाहीत मोडणारा आहे. धर्माच्या आड दडत कट्टरतेला व मुस्लीम द्वेषाला खतपाणी घालत युवकांना भडकावणारी भाषणं करणे, ही भिडे गुरुजींची ओळख आहे.
त्यासाठी मोहिमा, दुर्ग दौड व बलिदान मास असे उपक्रम राबवले जातात. देव, देश व धर्माचं नाव घेत इतिहासाची चुकीची मांडणी करत युवकांना उचकवलं जातं. गरुजींनी वयाची पंचाऐंशी गाठलीय. पण त्यांची अनवाणी पायपीट, धावपळ आणि बेफाट वाणी तरुणांना आकर्षित करते.
त्यांच्या इशा-यावर वाट्टेल ते करायला लावते. गुरुजी 'स्वयंभू' सुसंस्कृत समाजातले. पण त्यांच्या भाषणात 'बोच्याला काकडा लावला' हा वाक्यप्रयोग हमखास येतो. बहुजनांच्या दोन तरुण पिढ्यांच्या उमेदीची काकडा लावून राख केल्यानंतर त्यांचा आता पंढरीच्या वारीला काकडा लावण्याचा प्रयोग सुरू झालाय.
वारी व वारकरी संप्रदाय समतेचा संदेश देतात. वारक-यांच्यात कुठेही धर्म-जाती-प्रांत भेदाला थारा नाही. धर्मात माजलेल्या कट्टरतेला व कर्मठतेला वैतागून संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम यांनी बंड पुकारलं. तत्कालीन पुरोहितशाहीला आव्हान दिलं.
कर्मकांडं नाकारत अध्यात्माची पुनर्मांडणी केली. यात कुठेही उच्च-नीचतेचा भेद ठेवला नाही. उलट तशा प्रवृत्तीवर प्रहार केले. आता जसे धर्माचे ठेकेदार समतेचा आणि धर्मनिरपेक्षतेचा आग्रह धरणा-या लोकांना त्रास देत आहेत; तसाच त्रास तत्कालीन ठेकेदारांनी या संतांना दिलाय.
संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम, संत एकनाथ यांची संभावना धर्ममार्तंडांनी धर्मबुडवे म्हणून केली होती. ह्याच धर्ममार्तंडांनी ज्ञानेश्वरांच्या आई-वडिलांना आत्महत्या करावयास लावली. तुकारामांना तर हयातभर त्रास दिला. अखेर संपवलं आणि ते सदेह वैकुंठाला गेल्याचा बनाव रचला.
लोकांच्या देवभोळेपणाचा गैरफायदा उठवत तो पचवला. आताही भिडे गुरुजी कंपनीची धर्माच्या नावाने अरेरावी सुरू आहे. भिडे गुरुजींसारख्या धर्माभिमान्यांच्या नजरेत समानतेचा ऐतिहासिक संदेश देणारे ज्ञानेश्वर महाराज, तुकाराम महाराज हे धर्मबुडवेच आहेत.
मग या धर्मबुडव्यांच्या पालखी दिंडीत ह्या कट्टर धर्मवाद्यांची लुडबुड कशासाठी सुरू आहे ? महाराष्ट्रात निर्माण झालेल्या संत परंपरेने धर्माची अरेरावी कधीच मान्य केली नाही. धर्म-भटशाहीला त्यांनी आव्हान दिलं आहे.
वारकरी संप्रदायातल्या एकाही संताच्या साहित्यात धार्मिक कट्टरता नाही. धर्मांधता नाही. पालखीत येऊन आरतीसाठी आग्रह धरणा-या भिडे गुरुजींना संतांची ही भूमिका मान्य आहे का ? संत धर्मांधता नाकारतात. द्वेष, मत्सर नाकारतात.
त्यासाठी संत तुकाराम कोणाही जीवाचा, न घडो मत्सर।असा उपदेश करतात. तुकोबांचा हा उपदेश, पराकोटीचा मुस्लीम द्वेष शिकवणा-या भिडे गुरुजींना मान्य आहे का? या संतांनी ब्राह्मणशाही नाकारत भागवत धर्माची स्थापना केली.
म्हणजेच वारकरी संत व संप्रदायाने वैदिकशाही नाकारली. समाजाला नवा पर्याय दिला. अध्यात्माचं व मानवतेचं नवं तत्त्वज्ञान दिलं. प्रचलित धर्म व्यवस्था असताना, नव्या भागवत धर्माची गरज संतांना का वाटावी, याचं उत्तर भिडे गुरुजी देतील का ?
भिडे गुरुजी आज हिंदू धर्माचं व शिवाजीराजांचं नाव घेत पुन्हा ब्राह्मणशाही व वैदिक धर्माची पुनस्र्थापना करू पाहात आहेत. लोकांना कर्मठता व कट्टरता शिकवत आहेत. संत परंपरेने जी व्यवस्था बाराव्या शतकापासून नाकारली, त्याच व्यवस्थेचा जीर्णोद्धार करणा-या भिडे गुरुजी कंपनीची वारकरी संप्रदायातली लुडबुड निश्चितपणे शंकास्पद आहे.
उच्च-नीचता त्यागून, लहान-थोर, जातपात, धर्मभेद गाडून समतेचा व मानवतेचा संदेश देणा-या या संप्रदायात घुसण्याचा त्यांचा नेमका हेतू काय आहे ? संतांनी कधी तलवारीची वा कु-हाडीची भाषा केली नाही. त्यांनी प्रत्येकाच्या हृदयातला परमेश्वर पाहिला; पाहायला शिकवला. त्याला साद घालत जागवण्याचा प्रयत्न केला.
अशी महान वैश्विक विचारांची परंपरा असणा-या संप्रदायात घुसताना तलवारी व काठ्यांची गरज काय? संतांनी आपल्या भक्तीलाच शक्ती मानलं. त्यांनी शक्तीप्रदर्शनासाठी कधीच शस्त्रं बाळगली नाहीत किंवा ती मिरवण्याचा गोसावडी उद्योग केला नाही.
मग अशी परंपरा जोपासणा-या भक्तीपरंपरेच्या वारीत तलवारी घेऊन शक्तीप्रदर्शन करण्याची गरज भिडे गुरुजींना का वाटते ? ते या प्रदर्शनाला भक्ती-शक्तीगंगा संगम प्रयोग म्हणतात. तथापि, भिडे गुरुजींची कर्मठ, कट्टर आगलावू विचारधारा व संतांची जीवमात्रावर प्रेम करणारी समतेची विचारधारा याचा कुठेच मेळ होत नाही.
या दोन्ही विचारधारेत जमीन-अस्मानाचा फरक आहे. शिवाजीराजांचे नाव घेत भिडे गुरुजींनी शिवाजीराजांना मुस्लीम द्वेषाचे ब्रँड अॅम्बेसिडर केलं. परंतु, शिवाजीराजांनी आपल्या स्वराज्य निर्माणाच्या कार्यात सर्व जाती-धर्मीयांबरोबरच मुस्लिमांनाही सामील करून घेतलं होतं.
त्यासाठी पुरोहितशाही गुंडाळून ठेवली होती. भिडे गुरुजींनी मात्र आपला भटी अजेंडा रेटण्यासाठी शिवरायांना धर्म संस्थापक करून पुरोहितशाहीचा उदोउदो चालवला आहे. त्यासाठी युवकांना रायगडावर जानवी घालायला देऊन भटशाहीचा गळफास त्यांच्या गळ्यात अडकवला जातोय.
रायगडावर सोन्याचं सिंहासन करण्याचा उपक्रम राबवून बहुजनांचा पैसा शिक्षण वा सार्वजनिक कामाऐवजी भावनिक गोष्टीत कसा खर्च होईल, ह्याचा डाव आखला जातोय. त्यामुळे वारीत घुसून संतांच्या विचारांना सुरुंग लावण्याचं कारस्थान रचलं असण्याची दाट शक्यता आहे.
ही सगळी कारस्थानं यशस्वी व्हावीत, यासाठी भिडे गुरुजी स्वयंघोषित हिंदू धर्माचे मालक व शंकराचार्यांचे बाप झाल्यासारखे वागत आहेत. हिंदूराष्ट्र निर्माणासाठी ते वाट्टेल ते करू शकतात.
त्यासाठी ते आपल्या संघटनेतल्या युवकांना पोटापाण्याच्या वा शिक्षणाच्या विषयाचं मार्गदर्शन करीत नाहीत. भ्रष्टाचार, बेरोजगारी, भूकबळी, पर्यावरण, शेतकरी आत्महत्या, वाढती गुन्हेगारी असे शेकडो प्रश्न देशासमोर आहेत. यातल्या एकाही प्रश्नावर काम न करता युवकांना आपल्याच माणसांविरोधात भडकवण्याचं काम ते जातिनिशी करतात.
छत्रपती शिवाजी- संभाजींच्या विचारांचा तरुण प्रशासनात पाहिजे, राजकारणात पाहिजे, सत्तेत अग्रभागी पाहिजे, उद्योग-व्यवसायात पाहिजे, यासाठी भिडे गुरुजी युवकांना कधीच का मार्गदर्शन करीत नाहीत?
तलवारी घेऊन समतेच्या वारीत भक्तीगंगा- शक्तीगंगाच्या नावाखाली तलवारी नाचवण्याऐवजी शिक्षणगंगा, व्यवसायगंगा, करिअरगंगा, भ्रष्टाचारविरोधी संघर्षगंगा, पर्यावरण संवर्धनगंगा असे उपक्रम ते का राबवत नाहीत ?
युवकांना रायगडावर जानवी घेऊन बोलवण्याऐवजी संगणक घेऊन विज्ञान परिषदेला किंवा व्यवसाय-उद्योग मेळाव्याला का जमवत नाहीत ? आज देशाला रचनात्मक, सृजनात्मक कामाची गरज असताना भिडे गुरुजी त्या कामात युवकांना का गुंतवत नाहीत ? या प्रश्नांच्या उत्तरांसाठी-भिडे गुरुजी तुमच्या कुठल्या भागाला, तुमचा आवडता काकडा लावायला हवा ?
No comments:
Post a Comment