हल्ली अनेकदा 'तुम्ही फक्त हिन्दू धर्मावरच टिका करता, हिम्मत असेल तर मुस्लिम धर्मावर टिका करून दाखवा. त्यांच्या कर्मकांडावर बोला. आम्हालाच नका शिकवू.' अशा प्रकारे दिशाभूल करून अस्मिता जागवणारी वाक्ये 'गर्वसे कहो...' वाले मोठ्या त्वेषाने उधळत असतात. आणि पुरोगाम्यांना तुच्छ लेखून जातीय ठरवण्यात धन्यता मानतात. खरेतर आजचे पुरोगामी हे लोकहीतवादी, विवेकानंद, गाडगेबाबा, तुकडोजी महाराज, कबीर, बुध्द आणि बाबासाहेब आंबेडकर,आगरकर आणि सावरकर यांच्या सुधारणावादी विचारांवर चालणारे आहेत. या प्रभूती त्यांच्याच धर्मात सुधारणा घडवून आणण्यासाठी आयुष्यभर झिजल्या, अणि आम्ही वापरतो त्यापेक्षाही जहाल शब्दात टिका केली; तेव्हा त्यांना कुणीही जातीयवादी ठरवले नाही की तुम्ही आमच्याच धर्मावर टिका का करता, असा कर्कश तर्कदुष्ट टाहोही फोडला नाही...एवढेच काय पण त्यांच्या हत्याही केल्या नाहीत.परंतू आज मात्र ज्यांचा या बहुजन हिंदूंच्या समता आणि प्रगतीला विरोध असतो, ते लगेच पुरोगामी आणि सुधारणावादी चळवळीला जोरदार विरोध करतात , वेळ पडल्यास हे मनुवादी धर्मांध लोक, पुरोगामी हिंदूंची हत्या करायलाही मागेपुढे पाहत नाही, हेही तितकेच सत्य आहे . वर मोठ्या तोंडाने 'हिंदू धर्म हा सहिष्णु धर्म आहे,' असे निर्लज्जपणे म्हणतात.
खरेतर आम्हाला हिंदु धर्मावर टीका करणे अजिबात आवडत नाही . फक्त हिंदु धर्मात स्वातंत्र्य,समता आणि न्यायाची व्यवस्था प्रस्थापित व्हावी एवढीच आमची इच्छा आहे .त्यामुळे जर रोग्याला बरे करण्यासाठी शस्त्रक्रिया करायची असेल, तर शरीराचा रोगट भाग कात्रीने कापावाच लागतो , अन्यथा रोगी दगावू शकतो. म्हणून कात्रीने , ब्लेड्सने वा योग्य त्या शस्त्राने शरीरावर शस्त्रक्रिया करणे जसे चुकीचे ठरत नाही,तसेच हिंदू धर्मातील काही गोष्टीवर टीका करणे अनिवार्य ठरते...ते चुकीचे ठरत नाही . खोटा इतिहास आणि पुराणातील भाकडकथा तसेच दैववादाच्या नावाखाली बहुजनांचे शोषण करणे कधीही मानवतेच्या व्याख्येत बसत नाही . बहुजन, हिंदु, विवेकवादी आणि बुद्धीप्रामाण्यवादी बनावे आणि कुणाच्या संमोहाला न भुलता स्वतःच्या बुद्धीने स्वतंत्र विचार करावा . तसेच तो बुवाबाबांच्या भोंदुगिरीला न फसता अंधश्रद्धा व कर्मकांडामध्ये अडकू नये,एवढीच संतांची इच्छा होती आणि आजच्या समाजसुधारकांची आहे. दाभोळकर , पानसरे , कलबुर्गी यांना त्यासाठी खुप मोठी किंमत चुकवावी लागली . डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी जर भारताची राज्यघटना लिहिली नसती तर या बहुजन हिंदुंची आज काय अवस्था झाली असती याची कल्पनाही करवत नाही .
पुरोगामी चळवळ ही हिंदु धर्माच्या विरोधात नाही तर धर्माच्या नावाखाली होणाऱ्या शोषण , वर्णभेद आणि मनुवाद्यांच्या वर्चस्ववादाच्या विरोधात आहे . तेव्हा धर्मांध मनुवाद्यांनो, तुम्ही दलित अत्याचार , धार्मिक शोषण , बहुजनांच्या शैक्षणिक , आर्थिक दुरास्थेबाबत सोईस्कर मौन बाळगता तसेच वंचित वर्गाच्या आरक्षणालाही नेहमीच विरोध करता त्यामुळे तुम्हाला बहुजन हिंदूंबद्दल किती बंधुभाव आणि आत्मियता आहे हे दिसुन येतेय.
वैदिक सनातन्यांनो, आता तुम्ही कांगावखोरपणा करून खुप दिवस बहुजनांना फसवू शकणार नाही हे लक्षात ठेवा. - जगदीश काबरे.(^J^)
No comments:
Post a Comment