"पती सत्यवानाच्या प्राणाची यमाकडं याचना करणारी‘, "सासू-सासऱ्यांना दृष्टिलाभ मिळावा, असा वर मागणारी‘ म्हणून सावित्रीकडं पाहिलं जातं. या "पारंपरिक‘ दृष्टिकोनाहून सर्वस्वी वेगळ्या कंगोऱ्यातून घेतलेला सावित्रीच्या कर्तृत्वाचा हा शोध, येत्या 12 जूनच्या वटपौर्णिमेनिमित्त...
आपण म्हणतो ना, "फार फार वर्षांपूर्वीची गोष्ट‘, तशीच ही एक फार वर्षांपूर्वीची गोष्ट आहे. अगदी प्राचीन भारतीय संस्कृतीतली! प्राचीन भारतात मातृसंस्कृती भरभराटलेली होती. अपत्यजन्मात पुरुषांचं योगदान असतं, हे सत्य सुमारे 15 हजार वर्षांपूर्वीपर्यंत माहीत नव्हतं आणि तोपर्यंत गेली शेकडो शतकं मानवी जीवनातली कळपावस्था आणि टोळीअवस्था ही मातृ-अभिमुख होती. तरी जगात बऱ्याच ठिकाणी जंगली पुरुषटोळ्यांच्या हल्ल्यात ही मातृटोळीरचना विस्कळित होऊन अखेर नष्ट झाली; पण भारतात मात्र या मातृ-अवस्थेचं रूपांतर एका रचनाबद्ध अशा संस्कृतीत झालेलं आढळतं. प्राचीन भारतीय वाङ्मय, महाकाव्यं, पुराणकथा, उत्खननातले पुरावे, आदिवासी समाजाच्या रीती, शिवाय आपल्या धार्मिक परंपरा, अंधश्रद्धा या सर्वांमधून आपल्या महान मातृसंस्कृतीचे पाऊलठसे दिसत राहतात.
तसा हा एक ठसा सावित्रीचा! अग्नी घेऊन जंगली स्त्री गुहेत स्थिर झाल्यानंतर, अग्नीच्या साह्यानं भारतीय स्त्रीजीवनाचा जो प्रवास पुढं सुरू झाला, त्या प्रवासाच्या दरम्यान वाटेत भेटते, ती ही सावित्री!
मातृसंस्कृतीनं गुहेपासून सुरवात करून शाकारलेल्या कुटिकावस्थेला पोचेपर्यंत मध्यंतरात बरीच शतकं ओलांडली होती. या कालावधीत सभोवताली पसरलेल्या जंगलातून फळं, कंद गोळा करताना विविध अन्य वनस्पतींची ओळख स्त्रीवर्गाला होऊन स्त्रीला वनस्पतींच्या सेवनासाठी आणि औषधासाठी असणारे उपयोग समजत गेले. आपल्या अपत्यांना रोगमुक्त करण्यासाठी माता तर या वनस्पती औषधांचा वापर करू लागल्याच; पण भोवतालच्या अनेक मातृटोळ्यांमधून त्यांचा औषधोपचारासाठी संचारही होऊ लागला. आपल्या संस्कृतीत पटकीपासून वाचवणारी मरीआई, गोवरापासून दूर ठेवणारी गोरांबामाता, देवीपासून जीवदान देणारी शितळादेवी असे मातांचे उल्लेख सापडतात. डॉ. राणी बंग आपल्या "गोईण‘ या पुस्तकातून आजच्या आदिवासी स्त्रियांना असणाऱ्या अनेक वनस्पतीजन्य औषधांची माहिती देतात.
मातृप्रधान असणाऱ्या टोळी कुटुंबाची भारतीय गणव्यवस्थेकडं वाटचाल होता होता, औषधोपचारांचं समग्र ज्ञान आणि ती बनवण्याचं तंत्रं मातेकडून मुलीकडं, मुलीकडून तिच्या मुलीकडं अशा प्रवाहानं वाहत वाहत ते आपल्या सावित्रीपर्यंत पोचलं होतं. सावित्री जात्याच बुद्धिमान होती. तिनं विविध वनस्पतींवर अनेक संशोधनं करून आपल्या पूर्वज स्त्रियांच्या ज्ञानसंपदेत अधिक भर टाकली. गंभीर आजारापासून ते हृदयविकारापर्यंत अनेक रोगांवरची वनस्पती-औषधं तिनं शोधून काढली. ती एक तत्कालीन विद्वान वैद्यक स्त्री समजली जात असे.
सावित्रीच्या काळातल्या मातृगणात मातेच्या वंशपरंपरेनं सर्व व्यवहार होत असल्यामुळंच विवाहप्रथा अस्तित्वात नव्हती. मातृगण हे अवैवाहिक जीवनातून शेकडो शतकं वाटचाल करत होते. तरी त्याच सुमाराला नांगरतंत्राच्या उदयामुळं येणारं अमाप धान्योत्पादन आणि उदयाला आलेली जमीनदारी या स्थितीमुळं जमीनदार पुरुषांना स्वतःचा वारस कोण, हे समजण्याची गरज निर्माण झाली. त्यातून विवाहाची कल्पना पुढं आली. बदलत्या काळानुसार सावित्रीच्या मातृकुलात सावित्रीचा सहचर विवाहपद्धतीनं ठरावा, असं वाटत होतं; पण सावित्रीचं इतकं ज्ञान, विद्वत्ता पाहून कुणी पुरुष तिच्यासाठी पुढं येत नव्हता. अखेरीस सावित्रीनं स्वतःचा सहचर स्वतःच निवडण्याचं ठरवलं.
अनेक मातृकुलांतून वैद्यकीय उपचारांसाठी जाणारी सावित्री एका वृद्ध जोडप्याच्या अधू दृष्टीवर इलाज करताना तिला अचानक भेटला तो त्यांचा सालस, सरळ मनाचा सुपुत्र सत्यवान! सत्यवान आपल्या माता-पित्याच्या डोळ्यांवर उपचार करून घेण्यासाठी सावित्रीकडून औषधांचं नियमितपणे मार्गदर्शन घेत होता. सावित्रीच्या ज्ञानाबद्दल त्याला आदर आणि विश्वास होता. सावित्रीला तिच्या ज्ञानाची कदर करणारा सुहृद भेटला आणि तिनं आपल्या जीवनाचा सहचर म्हणून सत्यवानाची निवड निश्चित केली; पण तिच्या कानी येऊ लागलं, की सत्यवानाला छातीचं दुखणं आहे, त्याला हृदयविकाराचा त्रास आहे. शिवाय त्याचे आई-वडील अधू दृष्टीचे! पण सावित्रीला या विकाराचं काहीच भय वाटत नव्हतं. ती स्वतःच्या निवडीवर ठाम राहिली. सावित्री-सत्यवान यांचा एकत्रित जीवनप्रवास सुरू झाला.
महिन्यांमागं महिने सरले आणि पावसाळा आला. पुढील चार महिन्यांसाठी लाकूडफाटा साठवण्याची वेळ आली. सावित्री-सत्यवानानं त्यासाठी जंगलात जाण्याचा दिवस निश्चित केला. परतताना रात्र झालीच तर अंधारात वाट चुकायला नको म्हणून पौर्णिमेचा दिवस त्यांनी निवडला.
सत्यवान लाकडं तोडत होता आणि सावित्री लाकडाच्या मोळ्या बांधून त्या एकीकडं रचत होती. उन्हं उतरली; पण दिवसभराच्या उन्हानं व अतिश्रमानं सत्यवानाला अचानक भोवळ आली. सावित्री मनात काय ते समजली. तिनं जवळच्या वटवृक्षाखाली त्याला आणून झोपवलं. सत्यवान निपचित होता. त्याचा श्वास मंदावला होता. हात-पाय गार पडत होते. सावित्रीनं नाडीचे ठोके तपासून सत्यवानावर तातडीनं उपचार सुरू केले. घटका-पळं सरत होती. आकाशात पौर्णिमेचा चंद्रसुद्धा उगवला, तरी सावित्रीच्या उपचारांची सर्वतोपरी पराकाष्ठा सुरूच होती. बराच काळ निश्चेष्ट पडलेल्या सत्यवानामध्ये काही वेळानं चेतना जाणवू लागली. नाडीचे ठोके सावरले. श्वसन नियमित झालं आणि थोड्या अवधीत सत्यवान आधारानं उठून बसला. सावित्रीच्या आनंदाला पारावार राहिला नाही. तिच्या वैद्यकीय ज्ञानाचं ते मोठं यश होतं. तिनं पूर्ण चंद्राकडं पाहून हात जोडले.
वैद्य सावित्रीचे आपल्या सासू-सासऱ्यांच्या डोळ्यांवरही उपचार सुरू होतेच. कालांतरानं सावित्री-सत्यवानाला अपत्य झालं आणि तोवर थोडंफार चांगलं दिसू लादलेले सत्यवानाचे माता-पिता सत्यवान-सावित्रीचं बाळ पाहू शकले. सावित्री मात्र आपल्या ज्ञानाची कसोटी पाहणारी ती वटवृक्षाच्या छायेतली पौर्णिमा कधीही विसरली नाही. ही वटपौर्णिमा म्हणजेच सावित्रीच्या दीर्घायुष्यातलं एक दीर्घ समाधान होतं.
थोडक्यात, वटपौर्णिमेच्या कथेतली ही सावित्री, त्या काळातली डॉक्टर स्त्री होती; पण तरीही सावित्रीचं आयुर्वेदीय ज्ञान, त्या ज्ञानावरचा तिचा विश्वास, तिचा दृढनिश्चय या गुणात्मक इतिहासाऐवजी कुणा कपोलकल्पित यमाकडं पतीच्या प्राणांची याचना करणारी, सासू-सासऱ्यांना दृष्टिलाभ देणारा वर मागणारी अंधश्रद्धाळू, अगतिक सावित्री भारतीय संस्कृतीत कशी प्रस्थापित झाली? कुणी केला सावित्रीच्या विद्वत्तेचा हा इतिहास नष्ट? प्राचीन स्त्रीप्रधान राज्यांच्या स्त्रीशासकांचा "राक्षसिणी‘ म्हणून आपल्या वाङ्मयात उल्लेख करणाऱ्या आक्रमकांनी सावित्रीला अशी हतबल स्त्री म्हणून रंगवली का? मरीआईसारख्या परोपकारी मातांची मंदिरं गावाबाहेर टाकणाऱ्यांनी मातृसंस्कृतीच्या द्वेषातून केलेलं हे कारस्थान होतं का? ज्यामुळं भारतीय स्त्रिया वैद्यकीय ज्ञानात कधीकाळी अत्यंत आघाडीवर होत्या, या इतिहासाचा मागमूसही राहू नये आणि त्यातून प्राचीन मातृसंस्कृतीचा "आयुर्वेद‘ आक्रमकांना स्वतःचा म्हणून पुढं आणणं सोपं जावं, असे अनेक प्रश्न मनात उभे राहतात.
वटपौर्णिमेला वटवृक्षाभोवती निव्वळ निरर्थक दोरे गुंडाळण्याऐवजी आणि फेरे घालण्याऐवजी आम्ही स्त्रियांनी मातृसंस्कृतीच्या या पाऊलखुणा शोधण्याचा म्हणून हा एक दिवस जरी सावित्रीच्या नावानं दरवर्षी वटपौर्णिमेदिनी कामी लावला, तरी "डॉक्टर‘ सावित्रीची वटपौर्णिमा खऱ्या अर्थानं सार्थकी लागेल. नाही का?
ttps://goo.gl/L2jCQF
'डॉक्टर सावित्री'ची वटपौर्णिमा ! (मंगला सामंत)
- मंगला सामंत mangala-samant@yahoo.com
रविवार, 8 जून 2014 - 02:00 AM
No comments:
Post a Comment