आज २ ऑक्टोबर गांधी जयंती..
कुठे चौकाचौकात मोठे तंबु नाहीत, बॅनर नाहीत, कोठे मिरवणुक मोर्चे नाहीत, ना कुठल्या एका जातीधर्माची लोकं गांधीचा फोटो डोक्यावर घेउन मिरवीत आहेत..! ना DJ , ना ढोल ताशा, ना लेझीम पथक, ना पैश्याची उधळण वगेरे.. हाच गांधी विचारांचा विजय आहे..
कधी असे ऐकीवात नाही की, गांधीच्या पुतळ्याची, फोटोची विटंबना झाली, या गावात त्यामुळे तोडफोड, दंगल, जाळपोळ, कर्फ्यू लागु वगैरे झालाय.. हाच् गांधीच्या विचाराचा विजय आहे..
खरं सांगतो, मी विद्यार्थीदशेत गांधींना खूप शिव्या घातल्या ... फाळणीचा गुन्हेगार आणि ५५ कोटींचा पापी म्हणजे हा टकल्या, नंगा -फुंगा गांधी असेच एकंदरीत मत होते.....
गांधीजींना मारणारा नथुराम म्हणजे कट्टर देशभक्त अशीच माझी धारणा होती !!! शिकणाऱ्या, शिकविणाऱ्या, इतिहास आणि अभ्यासक्रम कोणता असावा हे ठरविणाऱ्या, मंडळीकडून माझ्या मनावर अगदी पद्धतशीरपणे "गांधीद्वेष" कोरला गेला होता !!!
पण पुढे वाचनातून गांधी हे काय रसायन आहे याचा उलगडा होत गेला .... आणि एक महात्माच् समोर प्रकट झाला !!!
प्रत्येक गोष्टीला कार्यकारण भाव असतो आणि मानवी बुद्धीला अधिक प्रयत्नाने आज ना उद्या तो उलगडू शकतोच याची खात्री झाली !!! स्वातंत्र्यलढा आणि गांधी ...नव्या जाणीवा झाल्या ...नव्या संवेदना आल्या ....काल माझ्या मनात जे नायक होते ...ते आता खलनायक झाले होते !!!
*बंदुकीच्या गोळीने जीव घेतला की विचार संपेल ही बिनडोक आणि अमानवी धारणा होती. पण तसे झाले नाही !!! गांधी संपले नाहीत !! त्यांना संपविता संपविता अनेक नथुराम मात्र मातीमोल झाले !!!*
महाराष्ट्र वगळला तर या नथुरामला देशात इतरत्र काडीचीही किंमत दिली जात नाही !! जगाला तर नथुराम माहितीही नाही..
महाराष्ट्रात मात्र नथुराम अधूनमधून बोलतो .. पुन्हा हातात बंदूक घेतो गोळ्या झाडत सुटतो ....कधी तो नाटकातून विष ओकतो तर कधी दाभोलकर आणि पानसरे यांच्या मस्तकात जाऊन गोळ्या झाडतो !! महाराष्ट्रात काही ठिकाणी तर नथूरामची जयंती साजरी करण्याचा करंटेपणाही होतो !!!
इतिहासाची पाने सांगतात, आपल्या पापांवर पांघरूण घालण्यासाठी अनेकांनी गांधीजींना देशाचा खलनायक ठरविण्याचा प्रयत्न केला... भारत -पाकिस्तान फाळणी, गांधीजींची अगतिकता आणि अस्सल खलनायक हे आज लक्षात घेतले गेले पाहिजे !!!
टिळक , गांधी , नेहरू , पटेल , सावरकर , बोस , आझाद , बादशहाखान , आंबेडकर , भगतसिंग , चन्द्रशेखर आझाद आणि त्यांचे समकालीन शेकडो नेते हि सगळी तुमच्या आमच्या सारखी हाडामासाची माणस होती. वेगवेगळ्या आर्थिक , सामाजिक , सांस्कृतिक आणि भौगोलिक स्थितीत वाढलेली माणस.. प्रत्येकावर असणारे संस्कार वेगळे , जडणघडण वेगळी.. प्रत्येकाला असणारे गुणदोष तुमच्या आमच्या सारखेच होते. कुणी व्यवसायिक जीवनात यशस्वी होते तर कुणी नव्हते..
पण ह्या सगळ्यांची एकसमान गोष्ट म्हणजे भारतीय स्वातंत्र्य लढ्यात आणि त्यासोबत भारतीय समाजाला जागृत करण्यासाठी हि सगळी मंडळी पुढे आली. इंग्रज सत्तेच्या विरोधात उभी राहिली.
फक्त २४ तास मोबाईल पासून लांब ठेवल तर माश्यासारखी तडफडणारी आजची तरुणाई कदाचित नवल करेल , पण टेलिफोन, तार आणि बहुतेक साधनं ब्रिटिश मालकीची असताना त्या प्रतिकूल परिस्थितीत सगळा भारत (जो ५०० पेक्षा जास्त संस्थानांच्या आणि विविध प्रदेशात विभागलेला होता तो समाज), एक "देश" म्हणून उभा करणं, आणि इंग्रज सत्तेच्या विरोधात आंदोलनाला तयार करणं, हि सगळ्यात आश्चर्यजनक गोष्ट आहे , अंगावर शहारे आणणारी आहे..
हे करत असताना समोर आलेल्या अडचणी सोडवताना , राजकीय पेचप्रसंग सोडवताना त्यांनी त्या त्या काळाला अनुसरून , त्यांच्या बुद्धीला योग्य वाटेल त्याप्रमाणे निर्णय घेऊन अनेक गोष्टी केल्या.
त्याचे बरेवाईट परिणामही झाले , त्यांनी तेही भोगले.
प्रसंगी तुरुंगवास सोसले , अनेक खटल्यांना सामोरे गेले ,लाठ्या खाल्ल्या , कित्येकांनी प्राणाचं मोल दिलं, तेव्हा हे स्वातंत्र्य मिळालं..
आपल्या जातीच्या, पक्षाच्या किंवा विचारसरणी असलेल्या अशा एखाद्या महापुरुषाला आदर्श मानला कि त्याची प्रत्येक कृती अचूक आहे असं मानून त्याचं समर्थन करणं, प्रसंगी त्याच्या चुकाही योग्य ठरवणं, *हि आपली पहिली चूक...*
*दुसरी चूक* म्हणजे, त्यांनी त्या काळात घेतलेल्या भूमिका , त्यांची वक्तव्ये आणि भाषण ह्यांचे संदर्भ आजच्या काळाशी जोडून डोक्यावर घेणं, नाहीतर झोड झोड झोडपणं, असले अडाणी उद्योग आपण करतो..
*तिसरी अजून वरताण चूक म्हणजे*, असे महापुरुष आणि त्यांचं व्यक्तित्व आदर्श मानून त्यांना देवत्व प्रदान करून त्यांना भक्तीच्या मखरात बसवणं आणि मग पुतळे बांधून, पूजा अर्चा मांडून, त्यांच्या विचारांचं अनुकरण करण्यापासून आपली सोयीस्करपणे सुटका करून घेणं..
एवढ्या तीन चुका टाळून प्रत्येकाच चरित्र अभ्यासा, आणि मग पहा.. *ज्या साम्राज्यावर कधीही सूर्य मावळत नव्हता अश्या इंग्रज साम्राज्याशी टक्कर घेऊन, लोकांना एकत्र करून जनआंदोलन उभारणं हि किती महान आणि आश्चर्यजनक घटना आहे..*
एकदा हे समजलं कि अजूनही कैक वर्ष उलटली तरीही मार्टिन ल्युथर किंग पासून नेल्सन मंडेला पर्यंत सगळ्यांना, ह्या आंदोलनाचं आणि गांधींच्या विचारांचं आकर्षण आणि प्रेरणा का वाटते, हे मग लक्षात येईल.. त्या त्या काळातले संदर्भ समजून घेऊन अभ्यास केला तर इतिहास समजून घेणं सोप होईल.
गांधी डोक्यात घ्यायची गोष्ट आहे, डोक्यावर नव्हे..
*हातात बंदूक आली की कोणालाही नथुराम होता येतं.. पण गांधी व्हायला मात्र कष्ट पडतात..* तेवढे कष्ट घ्यायची ज्यांची कुवत नाही, ईच्छा नाही आणि लायकीही नाही, असे लोक मग गांधींचे character assassination सुरु करतात.. पण एक लक्षात ठेवा,
“मरते है हम तुम, गांधी कभी मरते नही"...
असो...
जयंतीच्या निमित्ताने महात्मा गांधी यांना विनम्र अभिवादन...
Dr sachin Landge
Very nice article.....i am also trying to convey same messages
ReplyDeleteSuperb
ReplyDeleteGrt job sir...
ReplyDeleteNice one..!!
ReplyDeleteYane kuth proove hot ki gandhi ni yogya decision ghetle mhanun India sathi......nathuram godase ni je tya kali kel te yogyach hot.......v4 karunch kelt.....Gandhi yanch nav zal karan magil 60 varsh satta tyanchyach gharanyachi hoti.
ReplyDelete