Blog Archive

Monday, 3 October 2016

चरख्याने आजादी दिली हे खोट आहे “ असल्या काहीतरी पोस्ट ढिगान आल्यात सोशल मिडीयावर पण...आनंद शितोळे

नेमेची येतो पावसाळा ह्या धर्तीवर आज सुद्धा गांधीजींच्या बदनामीच्या भरपूर पोस्ट आल्यात.

“ चरख्याने आजादी दिली हे खोट आहे “ असल्या काहीतरी पोस्ट ढिगान आल्यात सोशल मिडीयावर.

ज्यांना गांधी कोण हेच माहित नाही त्यांनाही गांधींची ओळख करून दिल्याबद्दल सगळ्या डिजिटल फेसबुकी भक्तांचे आभार आणि अभिनंदन.

ह्या सगळ्या फेसबुकी डिजिटल मित्रांसाठी खास.

टिळक , गांधी , नेहरू , पटेल , सावरकर , बोस , आझाद , बादशहाखान , आंबेडकर , भगतसिंग , चन्द्रशेखर आझाद आणि त्यांचे समकालीन शेकडो नेते हि सगळी तुमच्या आमच्या सारखी हाडामासाची माणस होती.
वेगवेगळ्या आर्थिक , सामाजिक , सांस्कृतिक आणि भौगोलिक स्थितीत वाढलेली माणस.प्रत्येकावर असणारे संस्कार वेगळे , जडणघडण वेगळी.
प्रत्येकाला असणारे गुणदोष तुमच्या आमच्या सारखेच होते.
कुणी व्यवसायिक जिवनात यशस्वी होते कुणी नव्हते.

पण ह्या सगळ्यांची एकसमान गोष्ट म्हणजे भारतीय स्वातंत्र्य लढ्यात आणि त्यासोबत भारतीय समाजाला जागृत करण्यासाठी हि सगळी मंडळी पुढे आली.
इंग्रज सत्तेच्या विरोधात उभी राहिली.

फक्त २४ तास मोबाईल पासून लांब ठेवल तर माश्यासारखी तडफडणारी आजची तरुणाई कदाचित नवल करेल , पण टेलिफोन ,तार आणि बहुतेक साधन सरकारी मालकीची असताना त्या प्रतिकूल परिस्थितीत सगळा भारत जो ५०० पेक्षा जास्त संस्थानांच्या आणि विविध प्रदेशात विभागलेला होता तो समाज देश म्हणून उभा करण आणि इंग्रज सत्तेच्या विरोधात आंदोलनाला तयार करण हि सगळ्यात आश्चर्यजनक गोष्ट आहे , अंगावर शहारे आणणारी आहे.

हे करत असताना समोर आलेल्या अडचणी सोडवताना , राजकीय पेचप्रसंग सोडवताना त्यांनी त्या त्या काळाला अनुसरून , त्यांच्या बुद्धीला योग्य वाटल्या त्याप्रमाणे निर्णय घेऊन अनेक गोष्टी केल्या.

त्याचे बरेवाईट परिणामही झाले , त्यांनीही ते भोगले.
प्रसंगी तुरुंगवास भोगले , अनेक खटल्यांना सामोरे गेले ,लाठ्या खाल्ल्या , कित्येकांनी प्राणाच मोल दिल तेव्हा हे स्वातंत्र्य मिळाल.

आपल्या जातीच्या , पक्षाच्या किंवा विचारसरणी असलेल्या अशा एखाद्या महापुरुषाला आदर्श मानला कि त्याची प्रत्येक कृती अचूक आहे अस मानून त्याच समर्थन करण , प्रसंगी त्याच्या चुकाही योग्य ठरवण हि आपली पहिली चूक.

दुसरी चूक म्हणजे त्यांनी त्या काळात घेतलेल्या भूमिका , त्यांची वक्तव्य आणि भाषण ह्यांचे संदर्भ आजच्या काळाशी जोडून डोक्यावर घेण नाहीतर झोड झोड झोडपण असले अडाणी उद्योग आपण करतो.

तिसरी अजून वरताण चूक म्हणजे असे महापुरुष आणि त्यांच व्यक्तित्व आदर्श मानून त्यांना देवत्व प्रदान करून त्यांना भक्तीच्या मखरात बसवन आणि मग पुतळे बांधून , पूजा अर्चा मांडून त्यांच्या विचारांचं अनुकरण करण्यापासून आपली सोयीस्करपणे सुटका करून घेण.

एवढ्या तीन चुका टाळून प्रत्येकाच चरित्र अभ्यासा आणि मग पहा , ज्या साम्राज्यावर कधीही सूर्य मावळत नव्हता अश्या इंग्रज साम्राज्याशी टक्कर घेऊन , लोकांना एकत्र करून जनआंदोलन उभारण हि किती महान आणि आश्चर्यजनक घटना आहे.

हे समजल कि अजूनही कैक वर्ष उलटली तरीही मार्टिन ल्युथर किंग पासून नेल्सन मंडेला ते थेट मलाला पर्यंत सगळ्यांना ह्या आंदोलनाच आणि गांधींच्या विचारांचं आकर्षण आणि प्रेरणा का वाटते हे मग लक्षात येईल.

त्या त्या काळातले संदर्भ समजून घेऊन अभ्यास केला तर इतिहास समजून घेण सोप होईल.

अन्यथा “ अमुक ढमुक हे अमुक ढमुक ह्यांचे निस्सीम भक्त असून विचारवंत आहेत “ अस काहीतरी हास्यास्पद विधान अजूनही अनेकवर्ष ऐकायला मिळेल.

“ मरते है हम तुम , गांधी कभी मरते नही “

No comments:

Post a Comment