आठ जून १९४७ च्या प्रार्थना प्रवचनमधील हा भाग आहे. यात जो प्रसंग घडला तशा प्रसंगात कधी आपणही दर्शक म्हणून राहिलो असू, निदान असे प्रसंग अनेकदा वाचनात तरी येतातच. लोक अनेक असतात. एखादी व्यक्ती संकटात सापडलेली असते. परंतु धावून कोणीही जात नाही. द्रौपदी टाहो फोडते. भिष्मातार्य, द्रोणाचार्य वगैरे सर्व पाहतात परंतु दुर्योधनाचा हात कोणीही धरत नाी हे केवळ महाभारतातच घडत नाही. आपल्या दैनंदिन जीवनातील ही शोकांतिका आहे. माणसाच्या या मनोवृत्तीवर बरेच संशोधन झाले आहे. परंतु त्यासंबंधी वेगळे लिहावे लागेल. इथे गांधीजी माणसाच्या माणुसकीला करत असलेले आवाहन महत्त्वाचे आहे. त्याच्यातील पौरुष जागा करणे, त्याला माणूसपणाचे भान करून देणे हा गांधीजींचा प्रयत्न आहे. -
-----------------------------
एक सद्गृहस्थ मला नेहमी भेटण्याकरिता येत असतात. ते चांगले गृहस्थ आहेत. ते डेहराडून येथून प्रवास करत आले. गाडीत खूप गर्दी होती. एका स्टेशनवर (मी नाव विसरलो) एक माणूस आमच्या डब्यात शिरला. त्या डब्यात इतर सर्व हिंदू आणि शीख होते. काहींजवळ तलवारी होत्या आणि काहींजवळ चाकूसुरे. त्यांनी त्या नवागताकडे बारकाईने पाहिले. त्यांनी त्याला तू कोण म्हणून विचारले. तो गरीब माणूस एकटा होता. तो म्हणाला की मी चांभार आहे. परंतु त्या लोकांना संशय आला. त्यांनी जेव्हा त्याचा हात पाहिला तेव्हा त्याच्या हातावर त्याचे नाव गोंदलेले असल्याचे त्यांना आढळले. काही वेळा लोक आपल्या हातावर आपले नाव गोंदून घेत असतात.आणि अशा प्रकारे तो मुसलमान असल्याचे सिद्ध झाले. कोणी तरी त्याच्या शरिरात सुरा खुपसला आणि यमुनेजवळ जशी गाडी पोहोचली तसे त्याने त्यांना उचलले आणि नदीत फेकून दिले. हे सर्व एका माणसाने केले होते परंतु तिथे असलेले सर्व लोक ते पाहत होते. ते सद्गृहस्थ हे सर्व पाहत होते. परंतु अखेरीस त्यांच्याकडून हे पाहवले गेले नाही व त्यांनी आपले तोंड दुसऱ्या बाजूला केले. मी त्यांना विचारले की तुमच्या अंतःकरणात इतकी करुणा होती आणि तो माणूस मारला गेलेला तुम्हाला जर आवडला नाही तर त्याला हे पाशवी कृत्य करण्यापासून तुम्ही का अडवले नाही? त्या डब्यात जवळपास ५०-६० हिंदू आणि शीख होते व त्यांच्यात तो एकटा बिचारा मुसलमान होता. अशा प्रकारच्या एकट्या माणसाच्या शरीरात सुरा भोसकून त्याला मारून टाकायचे आणि यमुनेत फेकून द्यायचे यात कोणती माणूसकी आहे? तो माणूस पूर्णपणे मेलेलासुद्धा नव्हता. त्याला भोसकण्यात आले, जखमी करण्यात आले आणि नदीत फेकून दण्यात आले. माझ्याकडे आलेल्या सद्गृहस्थांमध्ये इतकी करुणा होती तर त्यांनी हस्तक्षेप का केला नाही आणि त्याला मृत्यूपासून का वाचवले नाही? ते म्हणाले की मला जरी वाईट वाटत होते तरी मी माझे कर्तव्य करू शकलो नाही. ते म्हणाले की दुसरे काही करण्याचा मी विचारच करू शकलो नाही. मी त्यांना सांगितले की ही काही चांगली गोष्ट नाही, ही काही माणूसकी नाही. आपण इतके लोक असू आणि एखादा मुसलमान आपल्यामध्ये येत असेल तर आपण त्याला मारून टाकतो आणि आणि त्याचा देह नदीत फेकून देतो. कोणीही जर असे करत असेल तर आपण त्याला अडवले पाहिजे आणि दया दाखवण्याकरिता प्रेमाने समजावले पाहिजे. त्याला त्याने सांगायला पाहिजे - ‘हे तू काय करतो आहेस? तू कोणाला मारतो आहेस? त्याला मारू नकोस. त्याने काहीही केलेले नाही.’ आणि याचा काहीही परिणाम होत नसेल आणि त्या मुसलमानाला वाचवण्यात त्याचा जीव जरी गेला असता तरी मला आनंद झाला असता. पन्नाससाठ लोकांनी एकट्या माणसाला मारण्यात कोणता मोठेपणा आहे? परंतु तिथे किती तरी लोक होते आणि एका माणसाने त्या माणसाला मारून टाकायचे ठरवले व अक्षरशहा तसे केलेसुद्धा आणि त्या वेळी त्याच्याकडे इतर माणसे पाहत होती व बहुधा त्यांनाही त्याची ती कृती मान्य असावी. मी तुम्हाला सांगायलाच पाहिजे की जे लोक अशा प्रकारच्या विचारसरणीला शरण जातात ते चूक करतात. ज्या लोकांनी हत्या केली त्यांच्यामध्ये असेही काही लोक असतील की ज्यांच्या अंतःकरणात दयाभाव असेल व त्यांना ती हत्या पसंतही नसेल. परंतु त्यांना त्यांच्या स्वतःच्या जीवाची भीती वाटत असल्यामुळे ते गप्प बसले आणि अशा प्रसंगी आपले काय कर्तव्य असते हे ते विसरले. पण माणूस कसा काय विसरू शकतो? कोणी जर पाशवी वर्तन करत असेल तर तुम्ही त्याला थांबवलेच पाहिजे. असे पाशवी कृत्य पसंत नसणारेसुद्धा केवळ त्या गोष्टीकडे पाहत राहिले ही किती लाजिरवाणी गोष्ट आहे? मी तुम्हाला हे सांगतो आहे कारण ज्या लोकांना हे पाशवी कृत्य आवडत नव्हते त्यांच्यातसुद्धा त्याला विरोध करून हस्तक्षेप करण्याचे साहस नव्हते. अशा प्रकारचे कृत्य होत असताना एक माणूस जरी उभा राहिला आणि त्याने हल्ला करू पाहणाऱ्या अपराध्याचा हात धरून हल्ला करण्यापासून त्याला अडवण्याचा प्रयत्न केला व म्हणाला की मी याला मारू देणार नाही व तरीही त्याने ऐकले नाही तर स्वतःचा जीव द्यायलाही त्याने मागेपुढे पाहिले नाही तर मला आनंद होईल. तो जर माझ्यासारखा माणूस असेल तर तो अहिंसेवर अढळ राहील. त्याला जरी मरावे लागले तरी तो मारणार नाही. उलट तो स्वतःचा जीव देऊन मरणाऱ्या व्यक्तीचा जीव वाचवील. असे धैर्य जर कोणी दाखवले असते तर तो माणूस वाचला असता याबद्दल मला किंचितही संशय नाही. आणि वाचवण्याच्या प्रयत्नात तो माणूस जर मरण पावला तर तो खरोखरी शूर असल्याचे सिद्ध होईल. ही खरी अहिंसा आहे. सबळांसमोर गप्प राहणे आणि दुबळ्यांच्या विरोधात जोर दाखवणे म्हणजे खरी अहिंसा नाही.
आपण ब्रिटिशांच्या विरोधात अहिंसक होतो परंतु आता मात्र हिंसेचा वापर करतो आहोत.आपण कोणाच्या विरोधात हिंसेचा वापर करतो आहो? आपल्याच देशबांधवांच्या विरोधात. ब्रिटिशांच्या विरोधात आपण जो अहिंसेचा वापर केला ती शूरांची अहिंसा नव्हती. त्याचे परिणाम आज देशाला भोगावे लागत आहेत. मी त्याचे परिणाम भोगतो आहे. तीच अवस्था तुमचीही आहे. मी तुम्हाला खरी अहिंसा शिकवू शकलो नाही हे मी मान्य करतो. शूरांची अहिसा कशी असते ते मी तुम्हाला दाखवतो आहे. आज इथे मुसलमान राहत आहेत. आणि तिथे पाकिस्तानमध्ये मुसलमान हिंदूंशी दुर्वर्तन करत आहेत. परंतु त्याचा बदला म्हणून आपणही मुसलमानांशी गैरवर्तणूक केली पाहिजे काय? ते काय शूरपणाचे काम करत आहेत? मी तुम्हाला सांगतो की पाकिस्तानमध्ये जे काही घडते आहे ते निंदनीय आहे आणि आपल्या संघराज्याने जर त्याचेच अनुकरण केले तर ते तितकेच निंदनीय असेल. आणि कोणत्या बाजूने पहिल्यांदा आक्षेपार्ह वर्तन केले आणि कोणी जास्त अतिरेक केला असे म्हणणे हा काही मैत्री करण्याचा खरा मार्ग नाही. मैत्रीचा खरा मार्ग आपण नेहमी न्यायाच्या बाजूने असणे व चांगले वागणे हा आहे. आपण जर हा मार्ग अनुसरला तर रानटी माणूस आणि विवेकाचे भान सुटलेल्या लोकांची विवेकबुद्धीसुद्धा जागृत होऊ शकते. कोणाचा अपराध मोठा आणि कोणाचा लहान वा कोणी सुरुवात केली यात पडण्याची आपल्याला गरज नाही. असे करणे शुद्ध अडाणीपणा आहे असे मला वाटते. मैत्री करण्याचा हा मार्ग नाही. कालकालपर्यंत जे शत्रू होते आणि आज जर त्यांना मित्र व्हायचे असेल तर त्यांनी भूतकाळातील शत्रुत्व विसरून मित्राप्रमाणे वागायला सुरुवात केली पाहिजे. वैरभावनेची आठवण ठेवून काय लाभ? जमत असेल तर मैत्री करू आणि आवश्यकता पडली तर भांडण्याचीही आमची तयारी आहे असे म्हणणारे मित्र होऊ शकत नाहीत. मैत्रीची वाढ अशी होत नसते.
---------------
अनुवाद - ब्रिजमोहन
महात्मा गांधी संकलित साहित्य, खंड ९७, पृष्ठ ५५ ते ५८. संगणकीय आवृत्त
No comments:
Post a Comment