दै.प्रजापत्रच्या 'बहुरंग' पुरवणीत 'भाषा आणि समाजजीवन' या पाक्षिक सदरात आज प्रकाशित झालेला लेख .....
न्यायालयातील मराठी भाषा......
“ तमाम सबूत और गवाहोके बयानात मद्दे नजर रखते हुये ,ये अदालत इस नतीजेपर पहुंची है की, मुल्जीम ..... ने ही ये कत्ल किया है ,इसलिये ये अदालत तादिरात-ए-हिंद , दफा ३०२ ते तहत मुल्जीम को सजा-ए-मौत की सजा सुनाती है” अनेक हिंदी चित्रपटातून ऐकलेला हा संवाद , अनेकांच्या परिचयाचा आहे आणि आज प्रत्येकाला पाठ झालेला आहे! यातील जवळपास सर्वच शब्द उर्दू आणि फारसी आहेत. हिंदी चित्रपटांमुळे 'पैरवी' 'मुल्जीम' 'मौका-ए-वारदात' अशा अनेक शब्दांची माहिती अनेकांना झाली असून कित्येकांना असे वाटते कि आजही न्यायालयात याच पद्धतीने निकाल दिला जातो आणि भाषा सुद्धा अशीच वापरली जाते!
न्यायालयात रूढ झालेले असे अनेक शब्द आहेत ,जे मराठी भाषेमध्ये एवढे मिसळून गेले आहेत कि, त्याबद्दल मराठी भाषेतील पर्यायी शब्दच सुचत नाहीत आणि सुचविलेले शब्द आपल्याला रुचत नाहीत. 'अदालत' 'वकील' आणि 'तारीख' या तीन प्रमुख शब्दांबद्दलच विचार केला तर लक्षात येते की ,न्यायालयातील मराठीवर या शब्दांचा किती प्रभाव आहे.
न्यायालयाचे कामकाज मराठी भाषेतून चालावे अशी मागणी सतत होत असते. मराठीतून चालावे याचा अर्थ ते इंग्रजी मधून चालते असा आहे, मात्र मराठीमधून चालते ,असे जेंव्हा आपण म्हणतो ,तेंव्हा न्यायालयात आज प्रचलित असणारी मराठी भाषा आपण वाचत ,बोलत आणि लिहित असलेल्या मराठी पेक्षा वेगळी असते!
बिदरच्या बहामनी साम्राज्याच्या काळापासून सर्वप्रथम महसुली व्यवस्था ,सारा वसुली, प्रशासन आणि न्यायव्यवस्था यांच्यावर फारसी भाषेचा प्रभाव कायम निर्माण झाला आणि पुढे मराठी सत्ता आली तरीही कामकाजाच्या भाषेवर हा प्रभाव आहे तसाच राहिला. मराठवाड्यात म्हणजे जुन्या हैदाराबाद संस्थानात हा प्रभाव उर्दू भाषेच्या स्वरुपात निजामच्या राजवटीमुळे जास्त काळ टिकला. म्हणून आजही मराठवाड्यातील न्यायालयीन आणि कार्यालयीन कामकाजाच्या भाषेवर या भाषांचा प्रभाव जाणवतो.
मराठवाड्यात पूर्वीच्या अनेक खटल्यामध्ये फसली ही कालगणना वापरली जात असे. ‘साप्ताहिक निजाम विजय’ या १९३० सालातील साप्ताहिकाचे अंक ‘काळाच्या पडद्याआड’ या ग्रंथाच्या स्वरुपात आंध्र मराठी साहित्य परिषदेने प्रकाशित केले आहेत. या मध्ये विठ्ठल रंगराव देशपांडे या वकिलांनी ‘संस्थानातील मराठीची सुधारणा व कांही प्रतिशब्द’ असा लेख लिहून हैदराबाद संस्थानातील न्यायायातील मराठी भाषेच्या तत्कालीन स्थितीवर प्रकाश टाकला होता. न्यायालयातील मराठी भाषेत त्याकाळी ८० % शब्द उर्दू असत ज्यात आजही फरक पडलेला नाही. याच लेखात त्यांनी एका वकिलाने त्याच्या अशीलास लिहिलेले एक नमुनेदार पत्र आहे –
“स.न.वि.वि.,आपल्या मुराफ्याची तारीख पेशी ८ अबान सन १३४० फ. साकार झाली आहे. त्या तारखेवर बहस समाअत होऊन फैसला सादर करण्यात येईल. आमच्या मिसली मध्ये अर्जी दावा, जवाब दावा, गवाहाचे बयानात,फैसले व मुलाखत फैसले नसल्यामुळे बहस करण्यास मजबुरी आहे. तर फौरन मिसल मायना करण्यास खर्च धाडावा अथवा नकला पाठवाव्या किंवा तहतच्या वकिलाकडून खास मिसल पाठविण्याचे करावे.
कळावे आपला .......
वकील..........”
आता अशा प्रकारे पत्र पाठविल्यावर तत्कालीन काळातील अडाणी व्यक्ती तर सोडून द्या पण आजच्या काळातील सुशिक्षित व्यक्ती सुद्धा चक्रावून जाण्याची शक्यता आहे! आश्चर्याची बाब अशी कि या भाषेत अद्यापही जास्त बदल झालेला नाही ,फक्त सन इंसवी झाला आणि मिसलला फाईल हा शब्द आला मात्र उर्वरित शब्द आजही मराठवाड्यात अजूनही वापरले जातात.
नुकतीच वकिलीची परीक्षा पास होवून मी उस्मानाबाद मधील न्यायालयात जेंव्हा वकिली सुरु केली तेंव्हा एका वेगळ्याच मराठी भाषेशी माझा परिचय झाला. प्रकरणात युक्तिवाद करण्यासाठी मुदत मागणी करणारा जो अर्ज लिहिला जातो, त्याची भाषा आजही एकदम बखरीमधील भाषा वाटते. “सदरील प्रकरण आज रोजी बहस करणेकामी नेमले असून किंवा कैफियत दाखल करणेकामी नेमले असून” असा मजकूर अर्जात असतो. मराठीमध्ये करण्यासाठी या शब्दासाठी करणेकामी असा शब्द न्यायालयीन मराठी भाषेत पाहायला मिळतो. वकीलपत्र च्या ऐवजी वकालतनामा, ‘हजर होण्यासाठी’ म्हणजे ‘पेशीसाठी' असे अनेक शब्द आहेत. एकदा बार्शीच्या न्यायालयात गेल्यावर मी प्रकरण नेमक्या कोणत्या कारवाई साठी आहे, हे पाहण्यासाठी कारकुनाला विचारले तर तो म्हणाला आपले प्रकरण ‘कामगिरी’ साठी आहे. मला याचा अर्थच समजला नाही. नंतर मला समजले की ज्याला पश्चिम महाराष्ट्रात 'कामगिरी' म्हणतात त्याला मराठवाड्यात 'तामिली' म्हणतात.
वि.दा. सावरकरांनी अनेक इंग्रजी शब्दांना मराठीतील प्रतिशब्द दिले आहेत . मात्र असाच प्रयत्न विठ्ठल रंगराव देशपांडे यांनी उर्दू शब्दांबद्दल १९३० साली केला होता आणि याच लेखात त्यांनी कांही इंग्रजी शब्द ,उर्दू शब्द आणि मराठी शब्द यांची यादी दिली आहे. यात 'जामीन' म्हणजे 'प्रतिभू' , 'सबूत' म्हणजे 'प्रमाण' , 'दस्तावेजी सबूत' म्हणजे 'लिखित प्रमाण' , 'लीसाली सबूत म्हणजे 'साक्षी प्रमाण' , 'तक्सीममनामा म्हणजे 'भागलेख्य', 'हलफनामा' म्हणजे 'शपथपत्र', 'जराद' म्हणजे 'उलटतपासणी' , 'सवाल मुकर' म्हणजे 'फेर तपासणी' असे अनेक शब्द सुचवले असून विशेष म्हणजे त्यांनी 'वकील' या शब्दास 'नियोगी' असा नवीन शब्द सुचवला आहे!
मराठीतील हे शब्द चांगले व योग्यही आहेत मात्र हे शब्द वापरण्यास बोजड वाटतात. त्यामुळे आजही 'उत्तर कथन' असा शब्द न वापरता सर्रास 'कैफियत' किंवा 'जवाबदावा' असा त्यादृष्टीने सोपा शब्द वापरतात. कित्येकांना सोपे शब्द अवघड वाटतात कारण अवघड शब्द अंगवळणी पडलेले असतात. त्यातही बाब अशी असते की लोकांना असे अवघड शब्द वापरल्याशिवाय ते लेखन वकिली भाषेत म्हणजेच एका अर्थाने कायदेशीर आहे ,असे वाटतच नाही!
धार्मिक क्षेत्रात संस्कृत येत असेल तरच तो विद्वान पंडित समजला जात असे ,त्याच धर्तीवर मराठवाड्यातील न्यायालयात देखील पूर्वी उर्दू भाषा येणारा वकील विद्वान समजला जात असे पश्चिम महाराष्ट्रात ,हीच बाब इंग्रजी भाषेची म्हणावी लागेल.
न्यायालयात मराठी भाषेतून कामकाज चालवण्यासंबंधी आग्रह केला धरला जातो ,मात्र कायद्याची अनेक पुस्तके आजही इंग्रजी भाषेतच आहेत. सर्वोच्च न्यायालयाचे आणि उच्च न्यायालयाचे निर्णय मराठी भाषेत भाषांतरित करणे मोठे अवघड काम आहे. अनेक न्यायालयाचे विशेष उल्लेखनीय निकालपत्र नियमितपणे प्रकाशित करणारे रेपोर्टर ,जर्नल, रेफ्रन्सर आजही केवळ इंग्रजी भाषेतूनच प्रकाशित होतात. तालुका आणि जिल्हा न्यायालयात झालेल्या निकालाच्या नाराजीने उच्च न्यायालयात अपील दाखल करावयाचे असल्यास ,संचीकेतील प्रत्येक मराठी दस्तऐवजाचे इंग्रजी भाषांतर दाखल करावे लागते. त्याचा वेगळा खर्च पक्षकाराला सोसावा लागतो. त्यामुळे अनेक वकील तालुका आणि जिल्हा न्यायाय्लायात देखील त्यांचे दावे ,अपील ,अर्ज ,पिटीशन इंग्रजी भाषेतून दाखल करतात. परंतु युक्तिवाद करताना मात्र मराठी-इंग्रजी अशा मिश्र भाषेतून केला जातो, ज्यामुळे खूप गमती जमती घडतात!
साठेखत (अँग्रीमेंट फॉर सेल) किंवा ईसार पावतीच्या आधारावर खरेदीखत करून मिळावे म्हणून करार पूर्तीच्या दाव्याचा अंतिम युक्तिवाद चालू होता आणि एक वकील युक्तिवाद करत होते “ युवर ऑनर , दी कब्जे इसारपावती एक्झ्यूटेड बाय दी डिफेंडंट ऑन सतरा तीन दोन हजार बारा अँड ऑन दी सेम डे इसार ऑफ रुपीज एक लाख आकरा हजार अँक्सेप्टेड बाय द ङिफेंडंट . दी पजेशन ऑफ लँड गट नंबर तीनशे चौदा , हँविंग एरिया पाच एकर वीस गुंठे आकार चार रुपये पंचाहत्तर पैसे वाज अल्सो डिलीव्हर्ड टू प्लेन्टिफ ” हा युक्तीवाद नेमका कोणत्या भाषेत आहे, असा प्रश्न सर्वसामान्यांना पडू शकतो!
अशा प्रकारच्या युक्तिवादात दिनांक, क्षेत्र, रक्कम हमखास मराठीतून सांगितले जाते. . अनेक इंग्रजी-मराठी-उर्दू-फारसी अशा विविध शब्दांच्या माध्यमातून कोर्टाच्या कामकाजाची एक नवीनच भाषा आज तयार झाली आहे, नवीन ऐकणा-या व्यक्तीस ही भाषा गमतीशीर वाटू शकते, पण कोर्टात मात्र हीच दैनंदिन भाषा म्हणून प्रचलित आहे!
© राज कुलकर्णी
No comments:
Post a Comment