Blog Archive

Wednesday, 13 July 2016

गांधीजी स्वावलंबनाचा मार्ग

स्वातंत्र्य मिळाले परंतु प्रकाश कुठे आहे अशी भारताची परिस्थिती स्वातंत्र्योत्तर भारताची होती. सर्वांचे पोट भरता येईल इतके देशात अन्नधान्य नाही, कपडे नाहीत. काळाबाजार आणि रेशनिंग दररोजची गोष्ट झाली होती. अशा परिस्थितीत भारताची नाव खवळलेल्या सागरातून बाहेर काढण्याकरिता गांधीजी स्वावलंबनाचा मार्ग आपल्याला कसा शिकवतात हे या प्रार्थना प्रवचनातून दिसेल.
------------------
५६. प्रार्थना प्रवचन
नवी दिल्ली,
ऑक्टोबर १०, १९४७
आजसुद्धा मला बरीच कांबळी मिळाली. काही लोकांनी पैसेसुद्धा दिले. आम्ही काही कांबळी पाठवतो असे सांगणारी बडोद्याहूनसुद्धा तार आली आहे. काही ८०० कांबळी तयार आहेत असे ते म्हणाले असे मला वाटते. परंतु त्यांचे म्हणणे आहे की रेल्वेचे लोक इतक्या मोठ्या गठ्ठ्याचे पार्सल घेण्याच्या परिस्थितीत नाहीत. हे खरे आहे की आज रेल्वेवर कामाचा फार मोठा ताण आहे आणि ते प्रत्येक गोष्ट घेऊ शकत नाहीत. ती कांबळी आणता यावी म्हणून शक्य असेल तर सरकारकडून मी सूचना द्यायला लावीन. असे झाले की गरम पांघरुणांचा आपल्याजवळ भरपूर साठा असेल. आता आपल्याजवळ लोकरीचे पुरेसे कपडे नाहीत. परंतु मला आशा आहे की ईश्वराची इच्छा असली तर कसे तरी करून काम भागवता येईल इतके कपडे आपल्याला मिळतील व कोणालाही थंडीत कुडकुडावे लागणार नाही.
थोड्या वेळेपूर्वी एका स्त्रीने सोन्याची आंगठी पाठवली. सध्या तरी दुलया आणि कांबळी विकत घेण्याकरिताच मी त्या आंगठीचा उपयोग करू शकतो.
आता आपल्यासमोर गंभीर समस्या आहे आणि मी तिच्याबद्दल भरपूर बोललो आहे. आपल्याला अन्नधान्याच्या समस्येला तोंड द्यावे लागत आहे व त्यामुळे आपल्याला भरपूर त्रास सहन करावा लागतो. आपण आपले स्वातंत्र्य मिळवले आहे यात काही संशय नाही. परंतु या स्वातंत्र्याच्या आगमनाबरोबरच आपल्या समस्या किती तरी पटीने वाढत असलेल्या दिसत आहेत. मला असे वाटते की आपण जर खरे स्वातंत्र्य पचवू शकलो तर आपल्याला असा त्रास सहन करावा लागणार नाही. स्वतंत्र लोकांनी खरोखरी कसे वागायला पाहिजे? आपले स्वातंत्र्य असे काही आगळेवेगळे स्वातंत्र्य आहे की त्याच्या रक्षणाकरिता सैनिकाप्रमाणे लढावे लागत नाही. आपल्याला लढावे लागले होते परंतु ती लढाई वेगळ्या प्रकारची होती आणि सर्व जगाला तिचे कौतुक वाटले होते. अशा प्रकारच्या संघर्षाने आपण जर स्वातंत्र्य मिळवले आहे तर त्याचे आपल्याला विशेष महत्त्व वाटले पाहिजे. परंतु आपल्याला त्याची फारशी किंमत वाटत नाही. हा आपला दुबळेपणा आहे. धान्याची आयात करू नये म्हणून मी अतिशय साधी आणि व्यावहारिक सूचना केली होती (पाहा प्रार्थना प्रवचन ऑक्टोबर ६, १९४७). परंतु या व्यावहारिक सूचनेनेही लोकांना धक्का बसल्याचे मला आढळले. का? ते म्हणाले की धान्याच्या आयातीची आम्हाला सवय आहे. परंतु ही काही पुरातन काळापासूनची सवय नाही. कोणी आम्हाला खाऊ घालेल तेव्हा खाण्याची आम्हाला सवय आहे असे म्हणणे योग्य नाही. जितके काही अन्नधान्य पुरवता येईल तितक्याचे परवाने देत जाणे योग्य नाही. परंतु माझी सूचना अगदी व्यावहारिक आहे. आणि तिच्यामुळे इतके अस्वस्थ होण्याचे काय कारण? भारत हा विशाल देश आहे आणि त्यात करोडो लोक राहतात. आपल्याजवळ पुरेशी जमीन आहे आणि ईश्वर कृपेने पाणीही पुरेसे आहे. मला माहीत आहे की देशात काही वाळवंटी भाग असा आहे की जिथे पाणी उपलब्ध नाही. परंतु भारतात कुठेही पाणी उपलब्ध नाही असे म्हणता येऊ शकत नाही. आपल्याजवळ जर इतके पाणी, जमीन आणि करोडो लोक आहेत तर घाबरण्याचा आपल्याकरिता कोणतेही कारण नाही.
आपली भूक भागवण्याकरिता आपण आपल्या श्रमाने अन्नधान्य पिकवले पाहिजे याची लोकांना जाणीव झाली पाहिजे इतकेच मला सांगायचे आहे. त्यामुळे वातावरणात विद्युतसंचार होईल व लोकांच्या उत्साहामुळेच निम्मे समस्या सुटेल. असे म्हणतात की खऱ्या मृत्यूने मरण्यापेक्षा मराणाच्या भीतीने लोक जास्त मरतात आणि ते खरेच आहे. एक माणूस होतो की ज्याला मी लवकरच मरणार आहे असे वाटत होते. दुसऱ्याबद्दलच का बोलायचे - माझेच उदाहरण घ्या. मला खोकला आहे म्हणून मी लवकर मरणार आहे असा मी विचार केला तर काय होईल? मी तेव्हाच मरेल जेव्हा माझी वेळ येईल. ती ईश्वराच्या हातात आहे. परंतु मी त्याबद्दल आतापासून काळजी करू लागलो व मी मृत्यूपंथाला लागलो आहे असा मी विचार करू लागलो तर तसे करणे हे प्रत्यक्ष मरण्यापेक्षाही मरणे होईल. आणि अशा प्रकारे मृत्यूच्या भीतीत वावरत असल्यामुळे माझ्या आजूबाजूच्या लोकांकरिता आणि माझ्या स्वतःकरिताही मी त्रासदायक परिस्थिती निर्माण करीन. येऊ घातलेल्या मृत्यूबद्दल मी सदैव शोक करत राहीन. चांगली गोष्ट ही आहे की मृत्यू येईपर्यंत निश्चल राहणे आणि ईश्वराशिवाय आपल्याला कोणीही मारू शकत नाही याबद्दल आपल्या मनाची खात्री पटवणे. मरणाची भीती जर आपण सोडली तर काळज्याही आपल्याला सोडून जातात आणि आपण आपल्या काळज्यांमधून मुक्त होतो. कोणीही असा विचार करू नये की इतर कोणाच्या कृपेने आपल्याला अन्न मिळावे, उलट आपल्या मेहनतीन ते आपण निर्माण केले पाहिजे. म्हणूनच माझे म्हणणे आहे की मरण आल्याशिवाय आपण मरू नये. आज ज्या वस्तू मिळतात, छीटचे कापड मिळते ते त्या रेशनच्या दुकानातून मिळत असतात आणि अशा प्रकारच्या ज्या गोष्टी आपला अपमृत्यू घडवून आणतात त्या सर्वांचा आपण त्याग केला पाहिजे. अन्नधान्यसमस्येविषयी इतके पुरे.
-----------------------
अनुवाद - ब्रिजमोहन
महात्मा गांधी संकलित साहित्य खंड ९७, पृष्ठ ६५-६८, संगणकीय आवृत्ती

No comments:

Post a Comment