Blog Archive

Wednesday, 13 July 2016

वृत्तपत्रसृष्टीसंबंधी गांधीजींनी व्यक्त केलेले विचार

वृत्तपत्रसृष्टीसंबंधी गांधीजींनी व्यक्त केलेले विचार. पर्यायाने सर्वच प्रसारमाध्यांमांना हे लागू होणारे आहेत. -
--------------
वृत्तपत्रे जगातील फार प्रभावी माध्यम झाले आहेत. देश जेव्हा स्वतंत्र होतो तेव्हा तर वृत्तपत्रांची शक्ती अजूनच वाढते. जेव्हा स्वातंत्र्य असते तेव्हा वर्तमानपत्रांच्या बातम्या आणि वृत्तांत छापण्याच्या अधिकारावर कोणतेही बंधन नसते. हे छापू शकता आणि ते नाही असे स्वातंत्र्यात म्हणता येऊ शकत नाही. अशा वेळी लोकमताला फार महत्त्व येत असते. वृत्तपत्रे जेव्हा घाणेरडा प्रचार करतात वा निराधार वृत्त प्रकाशित करतात वा लोकांना चिथावणी देतात तेव्हा अशा गोष्टींना आळा घालण्याकरिता सरकार त्यांच्याविरुद्ध कठोर पाऊल उचलून कायदेशीर कारवाई करण्याकरिता न्यायालयात जाऊ शकते. परंतु असे केल्यामुळे दंगलीची परिस्थिती अजूनच चिघळते व गोंधळ वाढतो. सरकार असेही करू शकत नाही. इंग्रजांचा काळ वेगळा होता. त्यांना कशाची फिकीर?  उचलले टिळक महाराजांना आणि टाकले तुरुंगात. (बाळ गंगाधर टिळक, त्यांना केसरीतील दोन लेखांबद्दल मंडाले येथील तुरुंगात टाकण्यात आले होते. पाहा महान टिळकांना शिक्षा, ऑगस्ट १, १९४७) वृत्तपत्रात त्यांनी लिहिले होते. असे काही खूपही लिहिले नव्हते. तरीही त्यांना सहा वर्षांकरिता हद्दपार करण्यात आले होते व तुरुंगात त्यांना शिक्षेचा संपूर्ण काळ राहावे लागले होते. त्यांच्याप्रमाणेच अनेकांना तुरुगांत जावे लागले. मलासुद्धा सहा वर्षांकरिता तुरुंगात पाठवण्यात आले होते. (गांधीजींना मार्च १८, १९२२ला सहा वर्षांची तुरुंगवासाची शिक्षा झाली होती, परंतु प्रकृतीच्या कारणाकरिता त्यांना फेब्रुवारी ५, १९२४ला सोडण्यात आले.) ही वेगळी गोष्ट आहे की मी सहा वर्षे तुरंगात राहिलो नाही. परंतु यंग इंडियात मी लिहिलेल्या लेखाकरिता मला सहा वर्षांकरिता तुरुंगात पाठवण्यात आले होते. मी वाईट काहीही लिहिले नव्हते परंतु मला शिक्षा झाली. आता आपण स्वतंत्र झालेलो असल्यामुळे असे काहीही घडू शकत नाही. आज जे वार्ताहर आहेत, संपादक आहेत, वर्तमानपत्रांचे मालक आहेत, त्या सर्वांनी सत्याचा मार्ग धरला पाहिजे व लोकांची सेवा केली पाहिजे. वृत्तपत्रांमध्ये कोणतीही खोटी माहिती प्रकाशित होऊ नये तसेच लोकांना भडकवण्यात येईल असे काहीही वर्तमानपत्रातून प्रकाशित करण्यात येऊ नये. आज आपण स्वतंत्र झालेलो असल्यामुळे घाणेरडी वृत्तपत्रे न वाचता पेकून देणे आपले कर्तव्य आहे. जर अशी वृत्तपत्रे कोणीही विकत घेतली नाही तर ते आपोआपच सरळ मार्गावर येतील. लोकांना घाणेरड्या आणि नको त्या गोष्टी वाचण्याचे व्यसन लागले आहे याची मला लाज वाटते. अशा वर्तमानपत्रांचा चांगला खप होतो. मी रेवाडी येथील एका प्रसंगाबद्दल वाचले. एका वृत्तपत्राने बातमी प्रकाशित केली की मिओ समुदायाच्या लोकांनी तिथे सर्व हिंदूंना मारून टाकले, त्यांच्या घरांना आगी लावल्या व त्यांची संपत्ती आणि पशुधन लुटून नेले. मिओंनी अशा प्रकारचे भयानक जंगलीपणाचे कृत्य केले हे वाचून मला धक्काच बसला. दुसऱ्या दिवशी रेवाडीबद्दलची बातमी वर्तमानपत्रांमधून आली. ती सर्व बनावट हकिगत होती. रेवाडीसंबंधीची ती बातमी वर्तमानपत्रांमधून प्रकाशितच कशी होऊ शकली याचे मला आश्चर्य वाटले. ज्या माणसाने रेवाडीसंबंधीचा वृत्तांत लिहिला होता त्याने स्पष्टिकरण दिले पाहिजे. चुकीच्या माहितीमुळे ते वृत्त लिहिण्यात आले होते की जाणीवपूर्वक करण्यात आलेला तो खोडसाळपणा होता हे त्याने स्पष्ट केले पाहिजे. त्याने ईश्वरासमोर फार मोठा अपराध केला आहे. असे काही घडायला नको होते. कोणी जर अशा प्रकारचे वर्तन करील तर आपल्या देशाची कधीही प्रगती होणार नाही. सरकार आज वृत्तपत्रांवर नजर ठेवू शकत नाही. तुम्ही आम्ही वृत्तपत्रांवर नजर ठेवली पाहिजे. आपण आपले अंतःकरण शुद्ध करू या आणि घाणेरड्या गोष्टींचा स्वीकार करण्याकडे आपला कधीही कल असू नये. घाणेरड्या गोष्टी वाचणे आपण वर्ज्य समजू या. आपण जर असे केले तर वृत्तपत्रे आपले कर्तव्य योग्य पद्धतीने बजावतील.
-------------------
अनुवाद - ब्रिजमोहन
महात्मा गांधी संकलित साहित्य, खंड ९७, पृष्ठ ५७-५८, संगणकीय आवृत्ती

No comments:

Post a Comment