स्वातंत्र्य मिळाल्यानंतरच्या काळातील गांधीजींची मनस्थिती दाखवणारा हा परिच्छेद वाचण्यासारखा आहे.
---------------------
आपण जर वेड लागल्यासारखे वागलो नसतो तर आज हे जे काही घडत आहे ते घडले नसते याची मी तुम्हाला कसा खात्री पटवून देऊ? याबद्दल मला काहीही शंका नाही. मुसलमान वेड लागल्याप्रमाणे वागले म्हणून हे निर्वासत पाकिस्तानमधून पळून येत आहेत. हिंदू जर तिथे सुखासमाधानात असते तर ते पळून का आले असते? त्यांनी पश्चिम पंजाबमधून का पळून यावे? पाकिस्तानच्या इतर भागांतूनही लोक पळून येत आहेत ही खरोखरच दुःखद गोष्ट आहे. हिंदू का पळून येत आहेत याचा आपण विचार केला पाहिजे. कल्पना करा की तेथील मुसलमान जुलमी झाले आहेत तर त्यामुळे आपणही जुलमी झालो पाहिजे काय? तरुण आणि म्हातारे, स्त्रिया आणि मुले यांना मुसलमान मारत आहेत म्हणून कायदा हातात घेऊन आपणही त्यांना मारले पाहिजे काय? मी वारंवार सांगत आलो आहे की हा जंगलाचा कायदा आहे. जर असा कायदा टिकणार असेल तर मी जिवंत राहू शकत नाही. देशाची अजून सेवा करता यावी म्हणून हे देवा मला १२५ वर्ष जिवंत ठेव अशी मी आतापर्यंत ईश्वराला प्रार्थना करत होतो. आणि मी तेव्हाच विश्रांती घेऊ शकतो जेव्हा देशात ईश्वराचे राज्य म्हणजे रामराज्य प्रस्थापित होईल. असे होईल तेव्हा खरोखर भारत स्वतंत्र झाला असे म्हणता येऊ शकेल. परंतु आज तर हे केवळ स्वप्न राहिले आहे. रामराज्य तर सोडाच परंतु आज देशात केणतेही शासन शिल्लक राहिलेले नाही. अशा परिस्थितीत माझ्यासारखा माणूस काय करू शकतो? या परिस्थितीत जर सुधारणा होऊ शकत नसेल तर हे देवा मला ताबडतोब घेऊन जा अशी माझे हृदय आक्रंदन करत ईश्वराची प्रार्थना करील. अशा गोष्टींचा साक्षीदार बनून मी का राहू? आणि त्याची इच्छा मी जिवंत राहावे अशीच असेल तर एके काळी माझ्यात जी शक्ती होती ती त्याने मला द्यावी अशी माझी त्याला प्रार्थना आहे.लोकांची मी समजूत घालू शकतो असा मला अभिमान होता. पूर्वी मी जेव्हा लोकांकडे जात असे व काही करण्याविरुद्ध मी त्यांना सावधगिरीची सूचना देत असे तेव्हा ते माझे ऐकायचे. माझ्यावर त्यांचे असे प्रेम होते. माझे असे म्हणणे नाही आज माझ्यावरील लोकांचे प्रेम कमी झाले आहे. परंतु ते कमी असो वा अधिक त्यामागे कृतीची जोड पाहिजे. आणि आज या कृतीचीच उणीव भासते. यामुळे मी म्हणतो की माझा प्रभाव कमी होत चालला आहे. आपण जेव्हा गुलामगिरीत होतो तेव्हा माझे काम चांगले सुरू होते. परंतु आज स्वतंत्र झाल्यानंतर माझ्यात काहीही करण्याची क्षमता उरलेली नाही. त्या वेळी लोकांना मी जे शिकवत होतो तेच मी आजही शिकवत आहे. तुम्ही जर तो माझा सल्ला ऐकाल तर आपण किती तरी पुढे जाऊ.
-----------------
अनुवाद - ब्रिजमोहन हेडा
ऑक्टोबर ४, १९४७च्या प्रार्थना प्रवचनमधून
No comments:
Post a Comment