Blog Archive

Sunday, 31 July 2016

आता कुठे राहिलिय जातीव्यवस्था,?

आज रविशने बैजवाडा विल्सन या सफाई कामगारांनी हे काम सोडावे म्हणून आयुष्यभर झगडणा-या व्यक्तीला बोलावून " आता कुठे राहिलिय जातीव्यवस्था, " अशी मानसिकता असलेल्या ट्वीटर पिढीचा दृष्टिदोष दूर करण्याचा प्रयत्न केला! बैजवाडा विल्सन यांना मेगेसेसे पुरस्कार जाहीर झालाय. त्यांचे व त्यांच्या सहका-यांचे अभिनंदन! मला हे पाहातांना मुंबईचे समाजवादी कार्यकर्ते महंमद खडस यांच्या समवेत 1985 साली आम्ही लिहिलेल्या ' नरक सफाईची गोष्ट' या पुस्तकाच्या निमित्ताने घेतलेल्या अनुभवांची आठवण झाली. आम्ही आधी दोन वर्ष  महाराष्ट्रा बाहेरुन याच कामासाठी बोलावलेल्या मेघवाल, वाल्मिकी, लालबेगी, शेख या समुदायांच्या वस्तीत फिरलो होतो. एकूण 24 गांव आम्ही प्रत्यक्ष फिरलो. लोकांशी बोललो, काम पाहिले. आत्ता पर्यंत निदान चार समित्यांचे अहवाल सरकारी कागदपत्रात पुरलेले सापडले. एकाही समितीची एकही शिफारस एकाही नगरपालिकेने अंमलात आणली नाही. त्यावेली अनिल अवचटही याच विषयावर काम करीत होते. त्याच्या बरोबर फिरुन आम्ही सकाली या कामाची जुन्या नाशकात पाहाणी करत होतो. अनिल असल्याने पालिकेचे आरोग्याधिकारीही समवेत। होते. अनिलने विचारले, आता डोक्या वरुन मैला वाहाण्याची पद्धत बंद झाली ना? अधिकारी "अजिबात बंद केली, तसा कायदाच आहे " असे सांगत असतांनाच समोरुन डोक्यावर मैल्याचा डबा घेऊन एक सफाई कामगार महिला आली! ही त्या अधिका-याची नव्हे सर्व समाजाचीच ही नाचक्की होती. सफाई कामगारांच्या सर्व समस्या आम्ही पुस्तकात मांडल्या. पुस्तकावर चारदोन ठीकाणी चर्चा झाल्या, त्या काली रामदास आठवले पवारांच्या मंत्रिमंडलात समाजकल्याण मंत्री होते, (जसे आजही आहेत) त्यांची महंमदभाईंशी मैत्री होती पण कृतीच्या आघाडीवर काहीही बदल झाला नाही! आमचे समाजमन कमालीचे बधिर झाले आहे. त्याला हा दु:खी समाज केवल नजरेआड लोटायचा आहे. या व्यवसायाचे सर्वात आधी यांत्रिकीकरण करा असे यंत्रविरोधी मानले जाणारे गांधी व त्यांचे सहकारी सांगत होते. आम्ही वर चंद्रापर्यंंत पोचण्याचे तंत्र आत्मसात केले पण गटारात मात्र दलित माणसांचे बली देत राहीलो. माझा स्नेही व एक अभ्यासू कार्यकर्ता गोपी मोरे हा गेल्या वर्षी असाच गटारीत गुदमरुन मरण पावला. या देशात कुत्र्यांना मारता येत नाही. गायीला मेल्यावरही कुणी हात लावला तर मृत्यु अटल ठरतो. मात्र या देशात रोज शेकडोंनी माणस मारण्याची परवानगी आहे, फक्त ती पददलित असावीत. आहे खरा मेरा भारत महान!
           - अरुण ठाकूर

No comments:

Post a Comment