Blog Archive

Wednesday, 13 July 2016

कस्तुरबांबद्दलचा गांधींना वाटणारा हा आदरभाव किती हृद्य आहे

कस्तुरबांबद्दलचा गांधींना वाटणारा हा आदरभाव किती हृद्य आहे.
--------------------------
बा माझ्यापेक्षा गुणात कमी नव्हती, उलट जास्तच होती. मला तिचे सहकार्य नसते तर आज मी अधःपतीत झालो असतो. त्या अशिक्षित स्त्रीने कडक शिस्त ठेवून आणि जागृत राहून मला माझ्या सर्व शपथांचे पालन करण्याकरिता मदत केली. याचप्रमाणे राजकारणातसुद्धा तिने फार मोठे साहस दाखवले आणि माझ्याबरोबरीने मोहिमांमध्ये भाग घेतला. जगरहाटीप्रमाणे ती शिकलेली नसेल परंतु ती आदर्श स्त्री होती आणि ज्याला मी खरे शिक्षण समजतो ते तिला मिळाले होते. ती परम वैष्णव होती. ती तुळशीपूजा करायची, व्रतवैकल्य करायची आणि अगदी आपल्या मृत्यूपर्यंत गळ्यात सदैव माळ घालायची. ही गळ्यातील साखळी मी मुलीला दिली होती. परंतु ती हरिजन मुलीवर तितकेच प्रेम करत होती जितके ती मनू वा देवदासच्या तारावर करते. नरसी मेहता यांच्या भजनात वर्णिल्याप्रमाणे ती वैष्णवाची मूर्तीमंत आवृत्ती होती. आज मी जो काही आहे तो तिच्यामुळे आहे. कितीही आजारीअसली तरी तिने माझी सेवा करण्यात मागेपुढे पाहिले नाही. आणि अनेकदा माझ्या जिवाला धोका निर्माण झाला होता. १९४३च्या (मुळात १९४२ आहे. स्पष्ट आहे की ही मुद्रणाची चूक आहे) उपोषणाच्या वेळी मी अगदी मृत्यूच्या दारावर पोहोचलो होतो, परंतु ती कधीही घाबरली नाही की तिने धीर सोडला नाही उलटपक्षी तिने इतरांना धीर दिला आणि ईश्वराची प्रार्थना केली. आजही मला तिचा चेहरा स्पष्टपणे आठवतो.
गुजरातीवरून. बिहार पछी दिल्ली, पृष्ठ ९८
---------------
महात्मा गांधी संकलित साहित्य, खंड ९५, पृष्ठ २३३-३४, संगणकीय आवृत्ती

No comments:

Post a Comment