Blog Archive

Friday, 27 January 2017

तू स्वत: ब्राह्मण असून ब्राह्मणाच्या शत्रूला (गांधीजी) कसा काय मानू शकतोस?

नथुराम गोडसेचा उदोउदो करणार्या काही पोस्ट्स आज पाहण्यात आल्या तेंव्हा मी एम एस्सीला असतांनाचा एका कट्टर हिंदुत्ववादी ब्राह्मण मित्राशी झालेला संवाद आठवला :

मित्र : तू स्वत: ब्राह्मण असून ब्राह्मणाच्या शत्रूला (गांधीजी) कसा काय मानू शकतोस?

मी : मग मी कोणाला मानावे?

"अर्थात नथूरामाला, तो ब्राह्मण होता"

'मित्रा पण नथुराम तर स्वत: ब्राह्मण असून ब्राह्मणांच्याच मूळावर उठला होता हे तू विसरतो आहेस'

"कसा काय?"

'साधी गोष्ट आहे. भारतातील सर्वात लोकप्रिय नेत्याला मारल्यावर मारेकर्याची जात शोधली जाईल आणि त्या जातीलाच नष्ट करण्याचा प्रयत्न केला जाईल हेही न कळण्या इतकी निर्बुद्धता नथुराम, आपटे आदी मारेकर्यांमध्ये ठासून भरलेली होती. गांधी हत्त्येनंतर हजारो ब्राह्मण देशोधडीला लागले, वाडे जाळले गेले, तरूण मुलींवर बलात्कार झाले, तरूणांना जाळले गेले. हा विध्वंस अमानवी आणि निषेधार्हच होता, पण हे सर्व झाले ही वस्तुस्थिती होती. आपल्या एका कृत्याने आपल्या हजारो जाती बांधवांना इतके भोगावे लागेल हे साधे सामाजिक वास्तव ज्याच्या लक्षात सुद्धा आले नाही त्याला माथेफिरूच म्हणले पाहिजे'

"पण हे गांधीच्या हत्त्येमुळेच झाले नाही का?"

'मित्रा, कुठलेही कलेवर कुठलाच आदेश देऊ शकत नाही ! त्यामुळे हे तर नक्कीच की गांधीनी ब्राह्मणांना ठोका हा 'मरणोत्तर' आदेश दिला नसणार ! गांधीवाद्यांनी हातात शस्त्र कधीच घेतले नाही. गावागावात ब्राह्मणांचे वाडे ज्यांच्या डोळ्यात खुपत होते त्यांनी गांधी हत्त्येचा मूहूर्त साधला इतकंच ! नथुराम पुण्याच्या बाहेर कधी गेलाच नसावा आणि म्हणून महाराष्ट्रात खेड्यापाड्यात ब्राह्मणांची एखाद दुसरीच असलेली घरं जाळली जातील एवढंसुद्धा कळण्याची त्याच्या बुद्धीची कुवत नव्हती. आणि मित्रा, आजही असे अनेक ब्राह्मण आहेत ज्यांची हे कळण्याची कुवतच नाही की जात म्हणून जे सर्वाधिक नुकसान ब्राह्मणांचे केले ते नथुरामानेच केले ! ज्यांना काही ब्राह्मणांनी विनाकारण आपला शत्रू मानले त्या मोंढ वाणिया जातीत लौकिक अर्थाने जन्माला आलेल्या गांधीजींनी काय केले? तर त्यांचे गुरू गोखलेही ब्राह्मण आणि पहिले सत्त्याग्रही शिष्य विनोबा भावेही ब्राहमण! आज प्रचलित झालेल्या बहुजनवादाला थारा न देता पहिले राष्ट्रपती, उपराष्ट्रपती, पंतप्रधान म्हणून तीनही ठिकाणी ब्राह्मणांचीच निवड करणारे गांधीजी ब्राह्मण विरोधी कसे हे तूच मला समजावून सांग आता.'

".........." (शांतता !)

हा संवाद तेंव्हा तर तिथेच संपला पण आज फेसबुकवरच्या काही पोस्ट्स वाचून लक्षात आलं की निर्बुद्धता अजूनही संपलेली नाही !

विश्वभर चौधरी

गांधीमुळेच फाळणी झाली,पंचावन्न कोटी गांधीनी पाकिस्तानाला दिले म्हणून त्यांचा "वध" केला ते बरोबरच वाटत होते.हे सारं खोटं आहे हे सांगणारं किंवा त्याबद्दल हे हे वाच म्हणणारं कोणी नव्हत- शरद पाटील

काॅलेजच्या रणसुभे सरांनी विचारलं,"जगन फडणीस सरांना तुझं अक्षर आवडलं आहे त्यांना त्यांच्या पुस्तकातील काही बाबी परत लिहायच्या आहेत तर तू त्यांना लिहायला मदत करायला जातोस का? ते त्याबद्दल तूला मोबदला पण देतील." येवढ्या मोठ्या माणसासोबत काही दिवस काम करायला मिळतं आहे म्हटल्यावर मोबदल्याचा विचार न करता मी जगन फडणीस सरांकडे जावू लागलो.काॅलेज संपल की होस्टेलला यायचं, जेवायचं,जरा आराम करायचा आणि मग सायकल घेवून राजारामपुरीत जायचं मग चार पासून सात साडेसात पर्यंत सर सांगतील ते लिहून काढायचं...गप्पा मारायच्या..एक दोनदा चहा व्हायचा.काही वेळेला पानसरे सर यायचे मग त्यांच्या गप्पा रंगायच्या मी आपला हे सारं बोलणं शांतपणे ऐकत बसायचो.मस्त होतं ते सारं...

लहान असताना किंवा काॅलेजमधे पण महात्मा गांधी बद्दल मला कधी आकर्षण वाटले नव्हते..वयाचा आणि वाचनाच्या अभावाचा परिणाम म्हणून मला क्रांतीकारी चळवळ आकर्षीत करायची.गांधीबद्दल चांगली पुस्तकं हातात येण्याच्या अगोदर.."पंचावन्न कोटींचे बळी" वगैरे सारखी खोटी,गांधीवर चिखलफेक करणारी पुस्तक वाचनात आली होती..मग मला पण अहिंसा वगैरे मुल्ये खटकू लागली.गांधींजींचा "वध" केला गेला,तो गरजेचा होता,गांधीमुळेच फाळणी झाली,पंचावन्न कोटी गांधीनी पाकिस्तानाला दिले म्हणून त्यांचा "वध" केला ते बरोबरच वाटत होते.हे सारं खोटं आहे हे सांगणारं किंवा त्याबद्दल हे हे वाच म्हणणारं कोणी नव्हतं "गांधीवादी" कोणी हे समजावून सांगतील ही अपेक्षा पण नव्हती.आयुष्याच्या या टप्प्यावरती फडणीस सरांची ओळख झाली...

"क्रांतीकारकांचे योगदान कोणीच नाकारत नाही..पण सशस्त्र पद्धतीने भारतातील ब्रिटिश सत्ता उलथून टाकणे शक्य नव्हेत कारण ब्रिटीश सत्ता प्रचंड मोठी होती..जगभर पसरलेले ते साम्राज्य होतं..आणि मुळातच ज्या देशात आगपेटीचे कारखाने १९१५/१६ नंतर सुरू झाले तो देश शस्त्रास्त्रे कुठून आणणार होता..? त्यासाठी लागणारा पैसा,तंत्रज्ञान आपण कोठून आणणार होतो? याचं उत्तर आपल्याकडे नसतं.सशस्त्र क्रांतीच तत्वज्ञान अनेकांना भूरळ पाडतं पण प्रत्यक्ष त्या मार्गावर चालणारे मोजकेच असतात. गांधीजींनी मांडलेले विचार न पटणारे बरेच होते पण प्रत्यक्ष आंदोलनात मात्र लाखो लोक सहभागी होत असतं फरक हा होता.गांधीचे विचार कधीच आकर्षक ठरले नाहीत कारण त्यांच्या विचार,कार्य व मार्गात काही "थ्रीलच" नाही असचं काहींना वाटतं.पण हाच साधा मार्ग देशाला स्वातंत्र्यापर्यंत घेवून गेला होता हे पण खरं आहे.अरविंद देशपांडे सरांचे एक आवडतं वाक्य आहे जे गांधीजींच्या विचार व मार्गाचे यश अधोरेखित करते.,"क्रांतीकारकांनी कमीत कमी लोकांकडून जास्ती जास्त त्यागाची अपेक्षा केली तर गांधीजींनी जास्ती जास्त लोकांकडून कमीत कमी त्यागाची अपेक्षा केली..."पण हे नंतरच समजलं.

महात्मा गांधींना मारण्याचे बहुतेक सारे प्रयत्न महाराष्ट्रातून झाले होते.अशा सात प्रयत्नांची सुरवात १९३४ पासून पुण्यातली गांधीजींच्या मिरवणूक मार्गावर बाॅंम्ब टाकून केली गेली होती. यातले बरेच प्रयत्न नथुराम गोडसे व सहकार्यांनी केले होते.

महाराष्ट्रात पेशवाई गेल्यानंतर लोकमान्य टिळकांच्या रुपाने एक असा नेता महाराष्ट्राला मिळाला होता ज्याच्याकडून परत महाराष्ट्रात पेशवाई स्थापन होईल अशी काहींना अपेक्षा होती. लोकमान्यांचा मृत्यू होणं आणि त्याचवेळी गांधींचा राजकीय उदय होणं व चळवळीचे सत्ताकेंद्र महाराष्ट्रा बाहेर जाणं अनेकांना खुपत होतं. लोकशाही,सामान्यांच्यात राष्ट्रवादाचा गांधींनी रूजवलेला विचार काहींना त्रासदायक ठरत होता. गेलेली पेशवाई परत आणणं(हिंदुराष्ट्र वगैरे) याचसाठी महाराष्ट्रातील एक गट काम करत होता.गांधी त्यात अडचणीचे ठरत होते.त्यांना संपवणे हा मग यांचा उद्योग होता.आणि त्याची सुरवात झाली होती ती १९३० पासून तेंव्हा ना फाळणी झाली होती,तेंव्हा ना ५५ कोटी दिले होते,तेंव्हा ना मुस्लिमांचे लालूंगचालून केले होते...ना नथुराम माथेफिरू होता.पण हे वाचणार कोण?आणि मुळात लिहणार कोणं.

जगन फडणीस सरांनी बर्याच वर्षांपूर्वी या विषयावर"महात्म्याची अखेर" हे पुस्तक लिहलं होतं.त्यानंतर त्यांना धमक्या आल्या होत्या,तशी धमकीची पत्रं आली होती.त्याच पुस्तकाचं नव्याने लेखन करताना सरांनी मला लिखाणासाठी मदत करायला बोलवलं होतं..त्यानिमित्ताने हे पुस्तक वाचलं,जगन फडणीस सरांसोबत गप्पा मारता आल्या आणि गांधींना थोडंफार वाचून पाहता आलं.गांधी हत्येबद्दल ज्यांना किमान काही तठस्थपणे समजून घ्यायचं आहे त्यांनी हे पुस्तक किमान वाचावं.३० जानेवारी येतोय काहींचा गांधी द्वेष टोकावर पोहचला असेल. गांधी मरणार नाहीच तरी पण त्या नावाभोवती तयार केलेली काही जळमटं आपल्याला साफ मात्र नक्की करता येतील. लोकवाड:मयने प्रकाशित केलेलं हे लहानसं पुस्तक त्यासाठी नक्कीच आपल्याला मदत करेल...!!
शरद पाटील

Wednesday, 25 January 2017

नेटवर्किंगच्या माध्यमातून ‘सोशल वर्क’- दै. पुढारी

👆🏼👇🏻our news in दै. पुढारी

नेटवर्किंगच्या माध्यमातून ‘सोशल वर्क’
By pudhari | Publish Date: Jan 21 2017
पुणे : शंकर कवडे

*सोशल नेटवर्किंग साईट्सच्या वापराने तरुणाई बिघडत असल्याचा आरोप एकीकडे होत आहे. मात्र, याच्या माध्यमातून काही ग्रुप मात्र समाजाशी आपली नाळ जोडण्यासाठी धडपडत आहेत*. *धार्मिक सलोखा राखणे, आंतरजातीय विवाहातील समस्या; तसेच पर्यावरण, शिक्षण आणि आरोग्यविषयक विविध उपक्रम राबवून ते सोशल मीडियामार्फत लोकांपर्यंत पोहोचत आहेत.* 

व्हॉट्सअ‍ॅप, फेसबुक, हाईक, टेलिग्राम, हँगआउट्स, जी टॉक, इस्टाग्राम आदी  माध्यमांचा *वापर केवळ मनोरंजन म्हणून न करता त्यामार्फत हे तरुण वैचारिक मंथन करत आहेत.* एवढेच नव्हे तर मानवी हक्कांचा प्रचार-प्रसार करण्याचे कामही *नवी पिढी उत्साहाने* करताना दिसते. 
*संकेत मुनोत यांनी  ‘नोइंग गांधीझन्स’*हा ग्रुप केला आहे. *देश आणि विदेशात गांधी विचार* पोहोचविण्यासाठी  व्हॉट्सअ‍ॅपसह फेसबुकवर सुरू असलेल्या या ग्रुपमध्ये *तुर्की, युगांडासारख्या देशातील तरुण* जोडले गेले आहेत. 

*जगात शांतता राहावी, यासाठी गांधी विचारांचा प्रसार हा ग्रुप करीत आहे* या ग्रुपमध्ये महात्मा गांधी यांचे खापरपणतू *तुषार गांधी, सुनील गोखले, अ‍ॅड. असिम सरोदे* यांचा सहभाग आहे.   विविध ग्रुप्स, तसेच पेजच्या माध्यमातून तरुणाई समाजोपयोगी उपक्रम राबवण्याचा प्रयत्न करत आहे. सोशल नेटवर्किंग साइट्सच्या माध्यमातून सुरू केलेले उपक्रम यापुढेही कायम ठेवत त्यामध्ये भर घालण्याचा तरुणाईने केलेला निश्‍चय कौतुकास्पद आहे.

Link- Follow this link to join our WhatsApp group: https://chat.whatsapp.com/AfWc4tE2yrK8KTwHeuVUZx

http://www.pudhari.com/news/pune/124510.htmlKnowing Gandhism :

शरद पोंक्षेंचा खून करायचाय? काय करू...

परवा मला एक विचित्र स्वप्न पडलं. ते तुमच्याशी शेअर करावं म्हणतो. मला एक माणूस मोबाईलवर फोन करतो. म्हणतो, ‘मला शरद पोंक्षेंचा खून करायचाय! काय करू? बंदूक कोण देईल? कुठून मिळेल?’ मी चरकतो, जाग येते. मोबाईल बघतो तर कुणाचा कॉल नव्हता. आवाज तर ओळखीचा नव्हता फोन करणाऱ्याचा. मग हे असं विचित्र स्वप्न का पडलं? दिवसा घडणाऱ्या घटनांचे विभ्रम की काय?

‘मी नथुराम गोडसे बोलतोय’नंतर ‘हे राम नथुराम’ हे नाटक शरद पोंक्षे करताहेत. कोल्हापूर, नागपूर इथं या नाटकाच्या विरोधात चळवळीतले कार्यकर्ते निषेध, आंदोलन करताहेत. नागपूरला तर आंदोलनानंतर या नाटकाला बघायला हजारावर आसनक्षमता असलेल्या वसंतराव देशपांडे सभागृहात फक्त दीडशेच्या आसपास लोक होते. त्यातले निम्मे संरक्षण व्यवस्थेतले कर्मचारीच होते. खुद्द नागपुरात या नाटकाचा फज्जा उडाला. लोकांनी त्याकडे पाठ फिरवली. नागपुरात नथुरामची पुन्हा हार झाली! त्याच्या बातम्या प्रसारमाध्यमांमध्ये झळकल्या. गांधी नावाच्या जादूची चर्चा झाली. व्हॉटसअॅप, फेसबुक अशा सोशल मीडियावर या नाटकाबद्दल उलटसुलट चर्चा सुरू आहे.

धादान्त खोट्या नाटकाचा निषेध होतोय. नथुराम हा गुन्हेगार होता. खून केलेला गुन्हेगार! भारताच्या न्यायालयाने त्याला गुन्हेगार ठरवून फाशी दिलं. या गुन्हेगाराचं समर्थन, त्याच्या हिंसेचं समर्थन वारंवार शरद पोंक्षे विविध नाटकं करून का करताहेत, असा प्रश्न आता तरुण विचारू लागले आहेत. या चर्चाकल्लोळाचा परिणाम म्हणून तर तो फोन आणि ते स्वप्न नसेल?

‘माझ्या क्रूर कृत्याचा उगम हा सहृदयता, दया आणि स्त्रीदाक्षिण्य या आत्यंतिक भावनांमध्ये आहे,’ अशी साद नथुराम या नाटकात घालतो. शरद पोंक्षे अशा आशयाचे संवाद बेंबीच्या देठापासून ओरडत मंचावर फेकतात. नथुरामच्या पापावर पांघरूण घालत क्रूरपणाचं उदात्तीकरण करण्याचा दुर्मानवी प्रयत्न करतात. हे अत्यंत केविलवाणं नाटक आहे. मानवी हृदय असणाऱ्या कुणालाही हे संतापजनक वाटेल. कलाकाराचं वेगळेपण त्याच्या संवेदनशीलतेत असतं. पोंक्षे संवेदनशील आहेत की नाहीत? नथुरामची पुन्हा पुन्हा हार होत असताना शरद पोंक्षे ही नाटकं (की सर्कस?) का रेटत आहेत? तुम्हाला वाटणाऱ्या चांगल्या गोष्टींसाठी खून केला तरी चालेल, असं खुनशी तत्त्वज्ञान पुन्हा पुन्हा का मांडलं जात आहे?

शरद पोंक्षे हा काही कुणी वेडपट, माथेफिरू माणूस नाही. ते शिक्षित आहेत. शिवसेनेच्या नाट्यसेनेचे प्रमुख आहेत. म्हणून ते करत असलेली ही नाटकं गांभीर्यानं घेतली पाहिजेत. त्याचा अर्थ समजून घेतला पाहिजे. त्याच्या मागच्या शक्तींची चाल बघितली पाहिजे.

‘मी नथुराम गोडसे बोलतोय’ हे तसं प्रचारनाट्य होतं. ते पहायला कंटाळवाणं आहे. त्यात नथुरामची लांबलचक स्वगत आहेत. प्रेक्षकांना खिळवून ठेवण्याची क्षमता नसलेलं ते नाटक राज्यातल्या विविध शहरांत नाट्यगृहात चालवलं गेलं. त्याचे शो विकत घेण्यात आले. काही संस्थांनी घरोघरी तिकिटं विकून पैसा जमा केला. एका गटानं आर्थिक पाठबळ दिल्याने न चालणाऱ्या या नाटकाचे अनेक प्रयोग होऊ शकले. गुन्हेगाराला घरोघर विकलं जाण्याचा हा प्रयोग स्वत:ला सुसंस्कृत (?) म्हणवणाऱ्यांनी केला.

आता पुढची पायरी म्हणून ‘हे राम, नथुराम’चे प्रयोग सुरू आहेत. त्याला विरोध करणारे निवडणुका डोळ्यापुढे ठेवून विरोध करताहेत, असं पोंक्षे सगळीकडे सांगतात. नाटकाला विरोध करणारे राजकारण करत असतील तर पोंक्षे हे नाटक रेटून एक वेगळं राजकारणच करत आहेत, हे समजून घेतलं पाहिजे की नाही?

या राजकारणाला अनेक पदर आहेत. हे राजकारण पुढे रेटणं हा एका मोठ्या ‘राजकीय प्रोजक्ट’चा भाग आहे. अनेक संघटना या प्रकल्पात सामिल आहेत. विचारपूर्वक मोठमोठी माणसं, संस्था या प्रोजेक्टला बळ देत आहेत. नथुरामी प्रवृत्ती जिवंत ठेवायची, खदखदत ठेवायची, स्वत:ला योग्य वाटणाऱ्या हेतूंसाठी माणसं मारणं समर्थनीय आहे, ती मारेकरी माणसं शहिदांच्या दर्जाची आहेत, असं वारंवार खोटारडेपणाने सांगायचं काम ही मंडळी करत आहेत. घृणास्पदरीत्या हे होत आहे.

हे काम वेगवेगळ्या मंचांवरून सुरू आहे. दाभोलकर, पानसरे, कलबुर्गी यांचे खून करून उजळमाथ्याने काही लोक, संघटना आरोप-प्रत्यारोप करताना दिसतात. पानसरे-दाभोलकरांची बदनामी करतात. खून करणारे आमचे सत्शील साधक आहेत, असं हिमतीनं सांगतात. त्यांना ही हिंमत येते कुठून? ती हिंमत पोक्षेंसारखे लोक नाटक करून पुरवण्याचं काम करतात, हे स्पष्ट आहे. हिंसक तत्त्वज्ञानाला उजळ करण्याचाच हा प्रयत्न आहे.

मुळात या अतिरेकी प्रवृती आहेत. सर्व धर्मांत, सर्व देशांत त्या दिसतात. त्या जगभर फोफावत आहेत. अमेरिकेत डोनाल्ड ट्रम्प द्वेषाचं तत्त्वज्ञान मांडून विजयी होतात. पाकिस्तानात अतिरेकी गट सरकार आणि गरीब जनतेला वेठीस धरतात. ब्रह्मदेशात रोहिंग्या नागरिकांवर सरकारातले लोक अन्याय करतात. बांगलादेशात अतिरेकी संघटना तरुणांना गुन्हेगारीकडे ओढतात. सिरिया आणि त्याच्या शेजारच्या अन्य देशांत जो हिंसाचार सुरू आहे, तो अशी विद्वेषी लोकांनी मांडलेल्या उच्छेदाचाच परिणाम आहे. युरोपातही बहुतेक देशात विद्वेषी संघटना मूळ धरताहेत. यामागे सामाजिक, आर्थिक कारणं आहेत. मग हफीज सईदची नाटकं आणि पोक्षेंची नाटकं यात भेद तो काय राहतो?

द्वेष की सभ्यता, हिंसा की अहिंसा, युद्ध की बुद्ध, गांधी की नथुराम अशी आता लोकल ते ग्लोबल फाळणी झाली आहे. या फाळणीने अमेरिकेतली अभिनेत्री मेरील स्ट्रीप घायाळ झाली. पुरस्कार स्वीकारण्याचा आनंद ती घेऊन शकली नाही. दुबळ्यांना चेचू पाहणाऱ्या विद्वेषी प्रवृत्तींना तिने नापसंती दर्शवली. माणूस म्हणून आपलं होणारं अध:पतन योग्य नव्हे, तर लाजिरवाणं आणि घातक आहे, हे या संवेदनशील अभिनेत्रीनं जागतिक मंचावरून धाडसानं सांगितलं. ते सांगताना तिला अश्रू अवरेनात.

अमेरिकेत डोनाल्ड ट्रम्प यांच्या मुजोरी, द्वेषी राजकारणाविरोधात तीव्र आंदोलनं सुरू आहेत. काळे, गोरे असे सर्ववंशीय तरुण रस्त्यावर उतरत आहेत. त्यांना जगभर पाठिंबा मिळत आहे. आपली बॉलिवुडची ख्यातनाम अभिनेत्री प्रियंका चोप्रा हिनंही नुकताच डोनाल्ड ट्रम्पविरोधी आंदोलकांना पाठिंबा दिला. ‘मी अमेरिकेत असते तर आंदोलनात सामिल झाले असते,’ अशी एखाद्या कार्यकर्त्याला शोभेलशी तिची प्रतिक्रिया आहे. विविध क्षेत्रांतले लोक द्वेष की सभ्यता या लढाईत सभ्यतेच्या बाजूने उतरत आहेत. नथुरामी प्रवृत्तीला भारतात, महाराष्ट्रात याच भावनेनं विरोध होतोय. नथुरामच्या खोट्या नाटकालाही राज्यात तरुण कार्यकर्ते याच भावनेनं नापसंती दर्शवत निषेध करत आहेत. प्रियंका तुझी संवेदनशीलता थोडी पोक्षेंनाही दे ग बाई!

व्हॉटसअॅपवर कवी अजय कांडर यांनी एक पोस्ट फॉरवर्ड केली आहे. विनय काटे यांची ती आहे. तिच्यात गांधी नथुरामला प्रेमानं सांगतात, “नथुरामा तुझी अवस्था पाहून खरंच दु:ख वाटतं रे. घड्याळाचे काटे जर उलटे फिरवता आले असते तर तुलाही नेलं असतं माझ्या सोबत आफ्रिकेला, भारत दर्शनाला, इंग्लंडला, नौखालीच्या दंगलीतसुद्धा. दाखवलं असतं तुला या जगातलं द्वेष आणि प्रेमाचं चिरंतन द्वंद्व. ओळख करून दिली असती तुला प्रेमातून निपजणाऱ्या आनंदाची, सुखाची, शांततेची आणि मानवतेची. जी या द्वेषाच्या वणव्याला विझवून टाकायची शाश्वत शक्ती ठेवून असते. कदाचित तुझ्यामधून एखादा विनोबा भावे, एखादा नेल्सन मंडेला, एखादा मार्टिन ल्यूथर किंगसुद्धा निर्माण करू शकलो असतो. पण आता सगळंच तुझ्या आणि माझ्या हाताबाहेर गेलंय. मला अनुसरणं हे नेहमीच खूप अवघड आहे हे मला माहीत आहे. तुला अनुसरणं मात्र आजकाल खूप सोप्पं झालंय…”

शरद पोंक्षे त्याचाच बळी ठरलेत. पुन्हा पुन्हा स्वप्नातला तो फोन कॉलवरचा आवाज माझ्या कानात घुमतोय, ‘पोंक्षेचा खून करायचाय! काय करू?’

राजा कांदळकर
लेखक ‘लोकमुद्रा’ या मासिकाचे संपादक आहेत.

rajak2008@gmail.com

http://www.aksharnama.com/client/article_detail/449
जरूर वाचा हा लेख

Wednesday, 18 January 2017

देशभक्त तरुणांचा वैचारिक लोचा

*😇...देशभक्त तरुणांचा वैचारिक लोचा...😇*

अनेक हिंदुत्ववादी (भक्त) तरुणांचा वैचारिक लोचा झाला असल्याचे दिसून येते. त्याची कांही उदाहरणे म्हणजे:

*1. त्यांना भगत सिंग वगैरे क्रांतीकारकांच्या बद्दल खूपच प्रेम असते, पण बहुतेक सगळे क्रांतीकारक हे धर्मनिरपेक्ष विचारांचे होते, त्यातील अनेकजन तर कम्युनिस्ट आणि नास्तिक होते याचा थांगपत्ता नसतो.*

*2. त्यांना गांधीजींच्या बद्दल प्रचंड द्वेष असतो, पण गांधीजीचे अनुयायी असणा-या सरदार वल्लभ भाई पटेल, सुभाष चंद्र बोस, लाल बहादूर शास्त्री यांच्याबद्दल फारच प्रेम असते. अर्थातच क्रांतीकारकांच्याप्रमाणेच पटेल, बोस, शास्त्री यांचे विचार काय होते याचाही या तरुणांना पत्ता नसतो.*

*3)टिळकांबद्दल प्रचंड आदर असतो, पण टिळक काँग्रेसचे होते हे त्यांना माहीतच नसतं...! काँग्रेस हे नाव जरी काढलं तरी खालच्या स्तरावर जाऊन नालस्ती करण्यात त्यांना रस असतो...!*

*4)संघाने स्वातंत्र्यलढ्यात काहीही योगदान दिलेलं नाही...हेही त्यांना माहीत नसतं...! पण अशा अडचडणीच्यावेळी मात्र हेडगेवार कोंग्रेसमध्ये होते...याची आठवण नक्की होते...!*

*4)यांना स्वामी विवेकानंदाबद्दल प्रचंड प्रेम असतं...पण विवेकानंदांनी हिंदू धर्माबद्दल काय काय म्हंटलय हेच माहीत नसतं...चरित्राची एकांगी मांडणी केल्यामुळे धर्मसुधारक विवेकानंद यांना माहीतच नसतात...!*

*5)चातुर्वर्ण्य,मनुस्मृती,जातव्यवस्था याबद्दल यांना एकतर घण्टा इतिहास माहीत नसतो..*
*पण तरीही सगळे म्हणतात म्हणून ते 'जात संपली पाहीजे,असं म्हणतात...*
*पण माधव गोळवलकर या चातुर्वण्याचे समर्थन करत काय म्हणतात..हे त्यांना माहीतच नसतं...!*

*6)इंग्रज अधिकार्यावर साधा दगडही न भिरकावू शकलेला पण गांधींचा खून करणारा नथुराम ज्यांना देशभक्त वाटतो...अशा तरुणांनी भगतसिंग,आंबेडकर सोडा...पण स्वतःला प्रिय असलेले गोळवलकरही वाचलेले नसतात...!*

*7)देशभक्ती,संस्कृती,धर्म,संस्कार असं प्रचंड धुके उभं केल्याशिवाय आपण वाढू शकणार नाही..हे मात्र यांना पक्क माहीत असतं...!*

*असे खुप सारे मुद्दे मांडता येतील..!*

*इतिहास,हिंदू धर्म,संस्कृती याबद्दल निव्वळ लोचा, नुसता लोचा झालेला असतो डोक्यात...शाखेत सांगतील तो इतिहास आणि शाखेत सांगतिल ते विज्ञान...असे संस्कार असल्यामुळे 'खरं काय..? खोट काय..?' याची चिकित्सा करावी...स्वतः वाचन करावं याची गरजच त्यांना वाटत नाही...!*

या तरुणांच्या असा वैचारिक लोच्या होण्याचे कारण म्हणजे अर्ध्या चड्डीतल्या वयस्क बालकांनी कुजबुज करुण पसरवलेले विचार आहेत..!

देशभक्त तरुणांचा वैचारिक लोचा

*😇...देशभक्त तरुणांचा वैचारिक लोचा...😇*

अनेक हिंदुत्ववादी (भक्त) तरुणांचा वैचारिक लोचा झाला असल्याचे दिसून येते. त्याची कांही उदाहरणे म्हणजे:

*1. त्यांना भगत सिंग वगैरे क्रांतीकारकांच्या बद्दल खूपच प्रेम असते, पण बहुतेक सगळे क्रांतीकारक हे धर्मनिरपेक्ष विचारांचे होते, त्यातील अनेकजन तर कम्युनिस्ट आणि नास्तिक होते याचा थांगपत्ता नसतो.*

*2. त्यांना गांधीजींच्या बद्दल प्रचंड द्वेष असतो, पण गांधीजीचे अनुयायी असणा-या सरदार वल्लभ भाई पटेल, सुभाष चंद्र बोस, लाल बहादूर शास्त्री यांच्याबद्दल फारच प्रेम असते. अर्थातच क्रांतीकारकांच्याप्रमाणेच पटेल, बोस, शास्त्री यांचे विचार काय होते याचाही या तरुणांना पत्ता नसतो.*

*3)टिळकांबद्दल प्रचंड आदर असतो, पण टिळक काँग्रेसचे होते हे त्यांना माहीतच नसतं...! काँग्रेस हे नाव जरी काढलं तरी खालच्या स्तरावर जाऊन नालस्ती करण्यात त्यांना रस असतो...!*

*4)संघाने स्वातंत्र्यलढ्यात काहीही योगदान दिलेलं नाही...हेही त्यांना माहीत नसतं...! पण अशा अडचडणीच्यावेळी मात्र हेडगेवार कोंग्रेसमध्ये होते...याची आठवण नक्की होते...!*

*4)यांना स्वामी विवेकानंदाबद्दल प्रचंड प्रेम असतं...पण विवेकानंदांनी हिंदू धर्माबद्दल काय काय म्हंटलय हेच माहीत नसतं...चरित्राची एकांगी मांडणी केल्यामुळे धर्मसुधारक विवेकानंद यांना माहीतच नसतात...!*

*5)चातुर्वर्ण्य,मनुस्मृती,जातव्यवस्था याबद्दल यांना एकतर घण्टा इतिहास माहीत नसतो..*
*पण तरीही सगळे म्हणतात म्हणून ते 'जात संपली पाहीजे,असं म्हणतात...*
*पण माधव गोळवलकर या चातुर्वण्याचे समर्थन करत काय म्हणतात..हे त्यांना माहीतच नसतं...!*

*6)इंग्रज अधिकार्यावर साधा दगडही न भिरकावू शकलेला पण गांधींचा खून करणारा नथुराम ज्यांना देशभक्त वाटतो...अशा तरुणांनी भगतसिंग,आंबेडकर सोडा...पण स्वतःला प्रिय असलेले गोळवलकरही वाचलेले नसतात...!*

*7)देशभक्ती,संस्कृती,धर्म,संस्कार असं प्रचंड धुके उभं केल्याशिवाय आपण वाढू शकणार नाही..हे मात्र यांना पक्क माहीत असतं...!*

*असे खुप सारे मुद्दे मांडता येतील..!*

*इतिहास,हिंदू धर्म,संस्कृती याबद्दल निव्वळ लोचा, नुसता लोचा झालेला असतो डोक्यात...शाखेत सांगतील तो इतिहास आणि शाखेत सांगतिल ते विज्ञान...असे संस्कार असल्यामुळे 'खरं काय..? खोट काय..?' याची चिकित्सा करावी...स्वतः वाचन करावं याची गरजच त्यांना वाटत नाही...!*

या तरुणांच्या असा वैचारिक लोच्या होण्याचे कारण म्हणजे अर्ध्या चड्डीतल्या वयस्क बालकांनी कुजबुज करुण पसरवलेले विचार आहेत..!